दैनिक कृषीवल दि. २९ मार्च २०१२
कवी मंगेश पाडगांवकर यांना नुकतेच एका आघाडिच्या
वृत्तपत्राने महाराष्ट्र भुषण हा सन्मान देऊन गौरविले. आश्र्चर्याची गोष्ट
म्हणजे कुणालाच याबाबत काही शंका उपस्थित करावी वाटली नाही. गेली वीस वर्षे
पाडगांवकरांनी एकही चांगली कविता लिहीली नाही. कविताच कश्याला एक धड ओळही
लिहीली नाही. ज्या पाडगांवकरांनी ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
ते तुमचं नी सेम असतं’ असल्या टूकार कविता लिहून वाचकांची अभिरूची बिघडवली,
त्या पाडगांवकरांना महाराष्ट्र भुषण कश्यासाठी? अखिल भारतीय साहित्य
संमेलनाची निवडणुक पाडगांवकरांनी कधी लढवली नाही. आणि याचंच भांडवल करून
जेंव्हा त्यांच्याकडे विश्र्व संमेलनाचे अध्यक्षपद चालत आलं ते मात्र
त्यांनी चटकन स्विकारलं. इतकंच नाही तर आपल्याला मानधन किती देता, व्यवस्था
कशी करणार, ‘इतर’ सगळ्या सोयी आहेत ना हे सगळं व्यवहारिक पातळीवर पक्कं
ठरवून घेतलं. असे पाडगांवकर ‘महाराष्ट्र भुषण’ कसे?
पाडगांवकर, बापट, करंदीकर यांनी बघे निर्माण केले असा आरोप दिलीप
चित्र्यांनी केला होता. अजूनही हा आरोप पाडगांवकरांना खोडता आला नाही.
जागोजागी पाडगांवकरांचे कार्यक्रम व्हायचे. (आता वयोमानानुसार होत नाहीत.
नसता पाडगांवकर तयार असतातच.) मग पाडगांवकरांच्या कविता संग्रहांच्या किती
आवृत्त्या निघाल्या? अलिकडच्या काळातील त्यांच्या कविता तर इतक्या सामान्य
आहेत. की त्या पाडगांवकर हे नांव आणि मौज हे प्रकाशन या दोघांच्याही
प्रतिमेला बट्टा लावणार्या आहेत. पण त्याचं पाडगांवकरांना आणि त्यांचं
वाट्टेल ते छापणार्या मौज सारख्या दर्जेदार प्रकाशकांनाही काही वाटत नाही.
सन्मान आणि पुरस्कारांचा सध्या महाराष्ट्रात पुर आला आहे. याची सुरवात
महाराष्ट्रात शरद पवार मुख्यमंत्री असताना 93-94 सालात झाली. तेंव्हा
त्यांनी महाराष्ट्रातील नामांकित अश्या 100 लोकांना एक लाख रूपये,
सन्मानिचिन्ह देऊन गौरविले होते. (संख्या अजून जास्त असावी मला नेमकं आठवत
नाही) पावारांच्या या कृतीवर गोविंद तळवलकरांनी महाराष्ट्र टाईम्स मधून
‘पवारांचा रमणा’ असा अग्रलेख लिहून सणसणीत टिका केली होती. त्यावरून
महाराष्ट्राने काय बोध घेतला माहित नाही पण खुद्द त्या वृत्तपत्रानेच काही
बोध घेतला नाही हे स्पष्ट आहे. कारण त्यांनीच पाडगांवकरांना हा पुरस्कार
देऊन सन्मानिले आहे.
पुरस्कार देणार्यांचं एक मोठं बरं असतं. त्यांना साहित्य संस्कृति
क्षेत्रात काही भरीव करण्यापेक्षा आपण काहीतरी केलं असं दाखवण्यातच मोठा रस
असतो. मग यासाठी सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे या क्षेत्रात काम करणार्यांचा
गौरव करायचा. प्रत्यक्ष त्या क्षेत्रासाठी काही करायची गरज नाही. कारण तसं
करणं फार अवघड आणि किचकट काम असतं. त्याला वेळ लागतो. दमानं ही कामं करावी
लागतात. त्यापेक्षा पुरस्कार देऊन टाकायचा. ‘तूमच्यासारख्याची देशाला, या
क्षेत्राला गरज आहे’ अशी गुळगुळीत भाषा वापरायची. ‘आपले योगदान खुप मोठे
आहे’ असं म्हणत त्या व्यक्तीला भारावून टाकायचं. कार्यक्रम संपला की मग
कुणीच त्या व्यक्तीकडे किंव त्याच्या क्षेत्राकडेही ढूंकूनही पहात नाही.
साहित्यीक कविता महाजन यांनी त्यांच्या ग्राफिटी वॉल या पुस्तकात
पुरस्काराचा एक किस्सा सांगितला आहे. ‘‘समारंभ सुरू झाला. भाषणं झाली.
छायाचित्रं घेतली गेली. समारंभ संपला. सगळं पांगले. हातातल्या पिशवीत
पुरस्काराचे स्मृतिचिन्ह, मानपत्र, फुलांचा गुच्छ, श्रीफळ आणि शाल घेऊन मी
जिना उतरले. दुसरा पुरस्कार मिळालेले लेखक आपल्या कुटुंबीयांसह
गाड्यांमध्ये बसून निघून गेले. पाठोपाठ आयोजकांच्या गाड्या गेल्या. समारंभ
पुण्यातला असल्यानं आयोजकांनी ‘कुठे येणार, कुठे राहणार, जेवणाचं काय?’ अशी
विचारपूस करणं अपेक्षित नव्हतंच.’’ खरं तर पुणंच काय बर्याच मोठ्या
शहरांमध्ये अशीच औपचारिकता उरलेली आहे.
आयोजकांच्या मानसिकतेवर काय बोलणार? पण पुरस्कार, सन्मान यांच्याबाबत
स्वत: साहित्यीकांनी जागरूक रहायला नको का? पुरस्कार स्विकारून नेमकी कोणती
संस्कृती आपण रूजवू पहात आहोत? आणि जर आपणाला पुरस्कार मिळाला आहे तर आपली
जबाबदारी वाढली असं नाही का वाटत?
पाडगांवकरांसारख्यांनी ‘बघे’ निर्माण केले हे त्यामूळेच पटते. कारण
यांनी स्वत: वाङ्मयीन प्रांतात इतके सन्मान प्राप्त झाल्यानंतरही भरीव
कामगिरी केली नाही. ही कामगिरी म्हणजे पुस्तकं लिहीणे असं नाही. कारण
पुस्तकांच्या संख्येवरून साहित्यीकाचा दर्जा ठरत नाही. ‘बोरकरांची कविता’
असं एक अप्रतिम संकलन मौज प्रकाशनाने बोरकरांच्या वयाला पन्नास वर्षे
पूर्ण झाली म्हणून प्रसिद्ध केलं. त्या संग्रहात बोरकरांची अतिशय उत्कृष्ठ
अशी मुलाखत पाडगांवकरांनी घेतली आहे. मग हे पाडगांवकर गेली वीस पंचेवीस
वर्षे गेले कुठे?
पाडगांवकरांनी शेक्सपइरच्या तीन नाटकांचे मुळाबरहुकूम अनुवाद केले
तसेच बायबलचेही मराठी रूपांतर सिद्ध केलं. ही महत्त्वाची कामं पाडगांवकर
अजूनही करू शकतात किंवा करून घेऊ शकतात. ज्या वृत्तपत्राने त्यांना
पुरस्कार दिला त्यालाही ते ठणकावून सांगू शकले असते की ‘आजकाल तूमचा पेपर
वाचकांसाठी उरला नसून बघ्यांसाठी उरला आहे.’ पण पाडगांवकर काय सांगणार?
कारण तेच या ‘बघ्ये’ बनविणार्यांच्या टोळीत सामिल झाले आहेत.
एक अतिशय उथळ अशी ‘पुरस्कार’ संस्कृती आपण रूजवू पहात आहोत.
देणार्यांना कसलीच बांधिलकी नाही. त्यांना आपले सार्वजनिक चारित्र्य
प्रतिभावंतांना उपकृत करून स्वच्छ करून घ्यायचे आहे. भल्या भल्या
प्रतिभावंतांनाही ही मोहिनी पडलेली आहे. त्या निमित्तानं आपला फोटो येतो,
आजूबाजूचे लोक ओळखतात आणि आपण मोठे झाल्याचा साक्षात्कार होतो.
विशेषत: वृत्तपत्रांमुळे एक मोठी घातक गोष्ट झाली आहे. त्यातील
बातम्या लेख वाचून आणि फोटो पाहूनच समाजातला एक वर्ग आपले मत ठरवू लागला
आहे. मी ज्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून शिकलो त्या महाविद्यालयातील
सर्व माजी विद्यार्थ्यांचे एक स्नेह संमेलन मागील वर्षी 26 जानेवारीला पार
पडले. वीस वर्षांनंतर भेटलेला एक मित्र मला म्हणाला, ‘‘उमर्या, साल्या तू
तर मोठा माणूस झाला. तूझा फोटो बघतो मी पेपरात बर्याचदा.’’ माझा फोटो
कश्यासाठी आला होता, मी कुठल्या क्षेत्रात काम करतोय, मी अश्यात काय
लिहीलंय हे त्या मित्राला काहीच माहित नव्हतं. वाईट याचंच की त्याला ते
समजून घ्यायचंही नव्हतं. अगदी त्यानं जो फोटो बघितला तो कुठल्या
कार्यक्रमातला होता हेही त्याला आठवत नाही. मी जर साहित्यीक म्हणवून घेतो
तर माझी कविता वाचून, लेख वाचून जो कोणी प्रतिक्रिया देईल ते मला
महत्त्वाचं वाटायला पाहिजे. माझा फोटो पाहून नाही.
पाडगांवकर हे एक जबाबदार प्रतिष्ठित साहित्यीक आहेत. त्यांना मान
सन्मान, प्रतिष्ठा, लोकप्रियता सगळं मिळालं आहे. मग आता
त्यांच्यासारख्यांकडून अपेक्षा आहे त्यांनी अश्या उठवळ ‘पुरस्कार’
संस्कृतीपासून लांब रहावं. आणि ते जर राहणार नसतील तर मी संयोजकांनाही
विचारतो अश्यांना सन्मान करून तूम्ही काय मिळवता अहात? जर पाडगांवकरांचं
कतृत्व वाङ्मयात असेल आणि जर लोक वाङ्मय वाचत नसतील तर काय करायचं?
काही जण असं लंगडं समर्थन करू शकतात की उतारवयात पाडगांवकरांनी आता
काय करावं? त्यांच्यापाशी चालत आलेले सन्मान त्यांनी स्वीकारावेत यात गैर
ते काय? खरं तर याच काळात त्यांच्या वयोगटातील नेमाडे सारखे प्रतिभावंत
अजूनही वाङ्मयीन दृष्ट्या कार्यरत आहेत. हिंदू सारखी प्रचंड मोठ्या
आवाक्याची श्रेष्ठ कादंबरी त्यांनी सिद्ध करून दाखवली आहे. इतकंच नाही तर
पुढील तीन कादंबर्यांचा खर्डा लिहून काढला आहे. मग हे पाडगांवकर आणि
त्यांच्या झिलकर्यांना दिसत नाही का?
आणि जर हे समजत नसेल तर पुढचा पुरस्कार मग ‘लव्ह लेटर म्हणजे, लव्ह
लेटर म्हणजे’ लिहीणार्या संदीप खरेलाच द्यायला पाहिजे. कारण पाडगांवकर ते
संदीप खरे यांच्यामध्ये कोणी ‘तश्या’ दर्जाचा कवी नाहीच ना!
No comments:
Post a Comment