Tuesday, February 18, 2014

फँड्री-रोखठोक ओवी । देते व्यवस्थेला शिवी ॥


दैनिक पुण्य- नगरी "उरूस" १८ -२-१४

जात्यावरच्या ओव्या हा मराठीतील एक मोठा लक्षणीय असा सांस्कृतिक ठेवा आहे. या  ओव्यांमधून स्त्री मनाचा हळवेपणा जसा प्रकट होतो तसा रोखठोक ठावही समोर येतो. रामाची पूजा करणारी बाई ओवीत सहज लिहून जाते

राम म्हणून राम नाही सीतेच्या तोलाचा ।
सीतामाई हिरकणी राम हलक्या दिलाचा ॥

गंगाखेडच्या परिसरात जनाबाईवर भरपूर ओव्या सापडतात. विठ्ठलाचे जनीवरचे प्रेम पाहुन रूक्मिण विठ्ठलाला थेट विचारते

रूक्मिन म्हणे देवा तुम्हा लाज थोडी ।
गादी फुलाची सोडून वाकळाची काय गोडी ॥

हा रोखठोकपणा जनाबाईने उचलला आणि आपल्या रचनांमधुन देवाला म्हणजेच व्यवस्थेला शिव्या घातल्या.

जनी म्हणे देवा मी झाले वेसवा । रिघाले केशवा घर तुझे ॥

हा रोखठोकपणा नागराज मंजुळे सारख्या तरूण दिग्दर्शकाला भावला असावा. म्हणूनच त्यानं फँड्री या आपल्या अप्रतिम चित्रपटातून व्यवस्थेला फँड्री म्हणून शिवी घातली आहे.
जब्या नावाचा सातवीतला छोटा पोरगा. त्याचा पिर्‍या म्हणून जिवलग दोस्त. ते विकत असलेल्या पेप्सी गारेगारच्या रंगीबेरंगी कांड्यासारखीच त्याची छोटी रंगीत स्वप्ने असतात. त्याची पेप्सीचा डबा असलेली सायकल ज्या मोठ्या गाडीला टेकून उभी असते ती गाडी मागे सरकते आणि याच्या पेप्सीच्या कांड्यांचा, सायकलचा चुराडा होतो. जब्याच्या छोट्याशा स्वप्नांचाही असाच चुराडा समाज करू पाहतो. जब्या सारं सहन करत जातो. पण जेंव्हा त्याच्या विधवा बहिणीला गावातील टारगट तरूण टोमणे मारतात मग मात्र जब्या भलामोठा दगड त्यांच्यावर भिरकावतो. बस्स इतकी छोटीशी या चित्रपटाची कहाणी आहे.
नागराज मंजुळेच्या चित्रपटावर भरपूर लिहिलं जाईल. या चित्रपटाला फार मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळत आहे. याचं साधं कारण म्हणजे नागराजने मातीतला चित्रपट बनवला आहे. आपण चित्रपट पाहतो आहे असं वाटतच नाही. आपण त्या अकोळनेर गावात कॅमेर्‍याच्या पाठीमागे उभे आहोत आणि कॅमेरा नव्हे तर आपला डोळाच सारे टिपत चालला आहे. 
शाळेची वेळ झाली आहे. सगळी पोर/पोरीं अंघोळी करून गणवेश घालून शाळेत चालली आहेत आणि जब्या त्याची आई, दोन बहिणी, बाप यांच्या सोबत डुक्कर पकडण्याच्या मोहिमेवर उकिरडे धुंडाळतो आहे. एक तर प्रसंग अगदी अंगावर येतो. डुक्कर जवळ आलं आहे. त्याला पकडणार की इतक्यात शाळेत राष्ट्रगीत  सुरू होते. जब्याचा बाप, जब्याची  आई सगळेच ताठ उभे राहतात. डुक्कर आरामात त्यांच्यासमोरून निघून जाते. 
दुष्यंतकुमार या हिंदी कवीची मोठी सुंदर कविता आहे

कल नुमाईश मे मिला वो चिथडे पहने हुए ।
मैने पुछा नाम तो बोला के हिंदुस्थान है ॥
 

खाने को कुछ नही है फटेहाल है मगर ।
झोले मे उसके पास कोई संविधान है ॥ 
 

व्यवस्थेवर इतकं अप्रतिम भाष्य आणि तेही केवळ दृश्यातून. कोणताही संवाद या ठिकाणी नाही. हे दिग्दर्शकाचे यश आहे. 
मुळात नागराज मंजुळे याने सोमनाथ अवघडे या मुलाला निवडूनच प्रेक्षकांना जिंकले आहे. या लहान मुलाने जब्याची भूमिका अप्रतिम साकारली आहे. त्याची मुलाखत पाहत असताना असे जाणवले की नागराजला हा जब्या 100 % या मुलात दिसला  म्हणून त्याच्या तीन महिने मागे लागून त्याने त्याला चित्रपटात काम करण्यासाठी तयार केले. त्याच्या दोस्ताची भूमिका सुरज पवार या मुलानेही अप्रतिम केली आहे. या मुलाने नागराजच्या ‘पिस्तुल्या’ नावाच्या माहितीपटात यापूर्वी काम केले आहे. खरं तर नागराजने स्वत:च या मुलात आपली स्वप्नं पाहिली आहेत. प्रेमात हरलेला व्यवस्थेने नाकारलेला चक्या नावाचा वाया गेलेला तरूण जब्या या मुलाच्या स्वप्नात रंग भरायचा प्रयत्न करतो. त्याला उर्जा पुरवतो हे फार कलात्मक पद्धतीने आलेलं आहे.  
देवाच्या जत्रेत पालखी मिरवताना जब्या मोठ्या उत्साहाने नाचतो आहे. त्याला चक्या खांद्यावर घेवो. जब्याची मैत्रीण शालू पाहते म्हणून जब्याला जोर चढतो. पण त्याचा बाप कचरू- जी भूमिका   किशोर कदम याने अतिशय अप्रतिम साकारली आहे- बोलावतो. नंतरचे दृश्य तर केवळ अप्रतिम. डोक्यावरची बत्ती दिसत राहते. वरतून कॅमेरा खाली खाली येतो आणि शेवटी ती बत्ती धरणारा चेहरा दिसतो. तो असतो जब्याचा. नाचणार्‍या जब्याच्या डोक्यावर बत्ती धरायचे काम येते व त्याच्या बरोबरचे मित्र त्याच्यासमोर खुन्नसने नाचतात. जब्याचे डोळे नुसते वाहत राहतात. असे कित्येक प्रसंग कुठल्याही संवादाशिवाय पडद्यावर जिवंत होतात. उदा. बाजारात वेताच्या टोपल्या विकत बसलेला जब्या शालू दिसताच एका टोपलीच्या खालीच लपतो. किंवा जत्रेत जब्याला त्याचा बाप एक शर्ट विकत घेऊन देतो आणि तो शर्ट घालून तो फिरतो. पेप्सी विकताना जब्याला व्हॅन हुसेनच्या जाहिरातीतील तरूणाच्या सरळ नाकाचा हेवा वाटतो. तो घरी आल्यावर रात्री अभ्यास करताना आपल्या नाकाला कपड्यांचा चिमटा लावतो.
चित्रपटातील व्यक्तीरेखा ओळखीच्या चेहर्‍यांना न घेता सामान्य लोकांना घेवून साकारल्यामुळे सहज आणि स्वाभाविक झाल्या आहेत. आज मराठी चित्रपटांची एक वेगळी वाट श्‍वास, हरिश्‍चंद्राची फॅक्टरी, देऊळ, विहीर, गाभ्रीचा पाऊस, तुकाराम यांनी तयार केली आहे. हे चित्रपट काहीतरी अस्सल काहीतरी वेगळं मराठी मातीतील देऊ  पाहात आहे. 
चित्रपटात नसलेले पण  थिम म्हणून यु ट्यूबवर गाजत असेलेले गाणे अस्सल मराठी मातीतले आहे. या गाण्याला हलगी जब्याने म्हणजेच सोमनाथ अवघडे यानेच वाजविली आहे. दलित-सवर्ण असा संघर्ष साहित्यात चित्रपटात रंगविल्या जातो. पण कैकाड्यांसारख्या भटक्या जमातीची वेदना नागराजने या चित्रपटातून दाखवून दिली. 
‘उन्हाच्या कटाविरूद्ध’ या कवितासंग्रहात नागराजने लिहून ठेवले होते-

माझ्या हाती
नसती लेखणी
तर...
तर असती छिन्नी सतार बासरी
अथवा कुंचला
मी कशानेही
उपसतच राहिलो असतो
हा अतोनात कोलाहल मनातला

त्यावेळी कदाचित नागराजच्या हाता कॅमेरा नसेल. कारण लेखणी, छिन्नी, सतार, बासरी, कुंचला हे काहीच हाती न घेता कॅमेर्‍याच्या साहाय्याने फँड्रीमधून नागराज मंजुळेने आपल्या मनातला कोलाहल उपसलेला आहे.

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575      

1 comment: