उरूस, 9 नोव्हेंबर 2021
उसंतवाणी- 226
(चार दिवसांची दिवाळी संपताच हुरहुर मनाला लागून राहते. )
चार दिवसांची । संपली दिवाळी ।
विस्कटे रांगोळी । दारातली ॥
फटाक्यांचा कानी । येई न आवाज ।
उतरला साज । शृंगारही ॥
नातेवाईकांचा । पांगला कळप ।
उतरे कलप । लावलेला ॥
मिटे सजावट । उतरे झळाळी ।
दिव्यांच्या या ओळी । शांत शांत ॥
फुलांचे निर्माल्य । कचना नि धूर ।
ओसरला पूर । आनंदाचा ॥
सरते मांगल्य । उरतो पाचोळा ।
होई चोळामोळा । जीव भोळा ॥
वर्षभर राहो । पेटलेली वात ।
आशेची मनात । कांत म्हणे ॥
(7 नोव्हेंबर 2021)
उसंतवाणी- 227
(पेट्रोल डिझेल कर कपात केंद्राने केली. पण भाव वाढले म्हणून ओरडणारे विरोधी पक्ष आपल्या राज्यात राज्य सरकारचे कर कमी करायला तयार नाहीत. आता दिवाळी संपली. केंद्राची घोषणा होवून आठवडा उलटला. )
पेट्रोल दरात । केंद्रिय कपात ।
आणले गोत्यात । विरोधक ॥
राज्य जे करिती । आरडा ओरड ।
कपातीची रड । सुरू आता ॥
संपली दिवाळी । तरी ना घोषणा ।
मौनात ‘सामना’ । गप्पगार ॥
कोरोना लाटेत । अशीच ओरड ।
आरोपांची लड । पेटलेली ॥
आता विझल्या त्या । आरोपांच्या वाती ।
तोंड लपविती । विरोधक ॥
विरोधाचा सारा । खेळ पोरकट ।
होई बळकट । सत्ताधारी ॥
कांत शोधू आता । पर्यायी इंधन ।
संपन्न सधन । देश होवो ॥
(8 नोव्हेंबर 2021)
उसंतवाणी-228
(ऐन दिवाळीत राहूल गांधी देशाबाहेर गेले आहेत. मोदी सीमेवर सैनिकांसोबत दिवाळी साजरी करत आहेत. योगी आयोध्येत शरयु किनारी 12 लाख दिवे लावत आहेत. प्रियांका सोनिया यांचाही कुठे पत्ता नाही. )
ऐन दिवाळीत । होतो जो गायब ।
नेता हा नायब । कॉंग्रेसचा ॥
सैनिकांसोबत । मोदींची दिवाळी ।
करिती टवाळी । विरोधक ॥
राहूल विदेशी । टाळून दिवाळी ।
गप्प आळीमिळी । पुरोगामी ॥
मोदींनी करता । म्हणती नाटक ।
ही उठापटक । मतांसाठी ॥
सदर्यावरती । घालती जानवे ।
नाटक हे नवे । काय आहे? ॥
प्रियांका प्रेमाने । भावाला ओवाळी ।
अशी ही दिवाळी । दिसली का? ॥
नव्हे लोकनेता । जाणे ना भावना ।
सण उत्सवांना । कांत म्हणे ॥
(9 नोव्हेंबर 2021)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
No comments:
Post a Comment