Monday, November 8, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ७५



उरूस, 6 नोव्हेंबर  2021 

उसंतवाणी- 223

(उद्धव ठाकरे बारामती येथे एका कार्यक्रमात बोलताना असे म्हणाले की पंचेवीस वर्षे भाजप सोबत आम्ही अंडी उबवली.  )

पंचेवीस वर्षे । उबवली अंडी ।
युतीमध्ये थंडी । खूप वाजे ॥
तीन बांबुंची ही । मांडली तिघाडी ।
सत्तेची खिचडी । शिजविण्या ॥
काकांमुळे मिळे । सत्तेची ही गर्मी ।
वसुलीची उर्मी । करोडोंची ॥
खिशात खेळती । तेंव्हा राजीनामे ।
आता करू कामे । घड्याळाची ॥
हप्तेवाले आत । तुरूंग कपाळी ।
करू ही दिवाळी । गरिबीत ॥
उबवली अंडी । बनेना कोंबडी ।
सत्ता ही चोंबडी । इरसाल ॥
कांत सत्तेसाठी । असंगाशी संग ।
भगव्याचा रंग । ‘हिरव’ळे ॥
(4 नोव्हेंबर 2021)

उसंतवाणी- 224

(नेमके हिंदूंचे सण आले की पर्यावरण, प्रदुषण अनिष्ट चालीरीती यांची चर्चा सुरू होते. सगळ्या पुरागाम्यांना नेमका इथेच जोर चढतो. हेच सारे इस्लाममधील अनिष्ट प्रथा परंपरांबाबत चकार शब्द काढत नाहीत. )

सेक्युलर किती । आमचे फटाके ।
ढिल्ले करी टाके । हिंदुंचेच ॥
चारच दिसांत । किती प्रदूषण ।
हिंदुंना दुषण । देवू चला ॥
फारच सोपे हे । पुरोगामी फंडे ।
शाकाहारी अंडे । तैसेची हे ॥
बकरी ईदला । सांडताच रक्त ।
प्रदूषण मुक्त । जग सारे ॥
मशिदीमधून । उठता अजान ।
हवेत ये जान । त्वरित ही ॥
क्रिसमससाठी । तोडताच झाडी ।
निसर्गाची नाडी । धावू लागे ॥
खरा प्रदूषित । मेंदू पुरोगामी ।
बुद्धी अधोगामी । कांत म्हणे ॥
(5 नोव्हेंबर 2021)

उसंतवाणी-225

(दादरा नगर हवेली येथील लोकसभेची पोटनिवडणुक शिवसेनेने जिंकली. त्यावर संजय राउत यांनी दादर पासून दादरा पर्यंत आमचे कसे वर्चस्व आहे असे वक्तव्य केले. आता शिवसेनेची झेप पंतप्रधान पदापर्यंत असल्याचे सांगितले.)

दादर पासून । गाठले दादरा ।
परि तो दरारा । उरला ना ॥
बाळासाहेबांची । शिवसेना मर्द ।
काकापुढे सर्द । आता दिसे ॥
कॉंग्रेसी घोड्यांचा । करिती खरारा ।
शब्दांचा दरारा । पोकळच ॥
दरारा कसला । चर्चा ही ‘दराची’ ।
खंडणीखोराची । पिलावळ ॥
कोर्ट आवळिते । रोजच मुसक्या ।
वल्गना फुसक्या । संजयच्या ॥
केंद्राची कपात । पेट्रोल करात ।
उद्धव मौनात । चिडीचूप ॥
थोड्या यशात जी । शेफारते सत्ता ।
कटे तिचा पत्ता । कांत म्हणे ॥
(6 नोव्हेंबर 2021)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

No comments:

Post a Comment