Monday, November 8, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ७४



उरूस, 3 नोव्हेंबर  2021 

उसंतवाणी- 220

(लोकगीतं जात्यावरच्या ओव्या तशा आकृतीबंधात ही दिवाळीवरची रचना )

दिवाळी म्हणजे । आरास घरांची ।
तशीच सूरांची । श्रवणीय ॥
दिवाळी म्हणजे । भर्जरी अंगाची ।
रांगोळी रंगाची । उधळण ॥
दिवाळी म्हणजे । थंडीची चाहूल ।
सुखाचे पाऊल । काळजात ॥
दिवाळी म्हणजे । प्रेमाचा आहेर ।
लेकीला माहेर । उबदार ॥
दिवाळी म्हणजे । पोरांसाठी किल्ला ।
गोंधळ नि कल्ला । आनंदाचा ॥
दिवाळी म्हणजे । सजते अंबर ।
गायीचा हंबर । तृप्ततेचा ॥
दिवाळी म्हणजे । आईच्या डोळ्यांत ।
सजे फुलवात । कांत म्हणे ॥
(1 नोव्हेंबर 2021)

उसंतवाणी- 221

(म.गांधी, सरदार पटेल यांच्या बरोबरीने जिन्नांचे नाव घेवून अखिलेश यादव यांनी मोठी खळबळ माजवून दिली. उत्तर प्रदेश निवडणुकांचे वातावरण तापायला सुरवात झाली. )

अखिलेश तोडी । तारे अकलेचे ।
जिन्नाच्या स्तुतीचे । भाषणांत ॥
गांधीच्या जोडीला । जिन्नाचे घे नाव ।
देशप्रेमी नाव । बुडविली ॥
सेक्युलर ऐसी । घातली चादर ।
जिन्नाची कबर । सुखावली ॥
जोरात उमटे । बाटग्याची बांग ।
पुरोगामी ढोंग । मतांसाठी ॥
लोहियांचे शिष्य । हे समाजवादी ।
नव्हे माजवादी । संकुचित ॥
दंग्यांवर पोळी । भाजाया आपली ।
काढती खपली । फाळणीची ॥
कांत ज्याच्या मनी । अजुनीही ‘पाक’ ।
इरादा नापाक । ध्वस्त होवो ॥
(2 नोव्हेंबर 2021)

उसंतवाणी-222

(अखेर अनिल देशमुख ईडी समोर हजर झाले. त्यांना चार दिवसांच्या कस्टडीत पाठवण्यात आले.)

पळुनि  थकला । दाखवी श्रीमुख ।
मंत्री देशमुख । ईडीपुढे ॥
कायदा व्यवस्था । जयाच्या मुठीत ।
तोचि चिमटीत । कायद्याच्या ॥
सचिन वाझेचे । जड झाले ओझे ।
‘परम’ ही गाजे । लपुनिया ॥
पालघर साधू । हत्येचे हे पाप ।
संन्याशाचा शाप । भोवला हा ॥
पडला महाग । सत्तापद माज ।
अटकेची आज । नौबत ही ॥
दादांवर छापे । उतरला तोरा ।
वाजले की बारा । घड्याळाचे ॥
कांत खुपसतो । पाठी जो खंजीर ।
सत्तेचा अंजीत । लाभेचना ॥
(3 नोव्हेंबर 2021)


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

No comments:

Post a Comment