Monday, November 8, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ७३

 

उरूस, 31 ऑक्टोबर  2021 

उसंतवाणी- 217

(आर्यन खानला बेल मिळताच पुरोगामी नाचत सुटले आहेत. जणू काही त्याची निर्दोष सुटकाच झाली आहे. )

आर्यन सुटला । झाली जमानत ।
सुटले नाचत । लिब्रांडू हे ॥
माध्यमांनी केली । अशी काव काव ।
चोरसुद्धा साव । भासू लागे ॥
केंद्र सरकार । वागते फ्याशिष्ट ।
बोलती हे शिष्ट । पुरोगामी ॥
त्याच्या विरोधात । लढाई हे सूत्र ।
शाहरूख पुत्र । निमित्त हा ॥
इमान गहाण । ऐसे पत्रकार ।
भासे चाटुकार । वाचकांना ॥
अंधभक्त तैसे । विरोधक अंध ।
विवेकाचा बंध । सुटलेला ॥
लोकांनो सांभाळा । माध्यमांचा तोल ।
लावुनिया बोल । कांत म्हणे ॥
(29 ऑक्टोबर 2021)

उसंतवाणी- 218

(दिवाळी अंकांची परिस्थिती बिकट आहे. नुसती चर्चा केली जात आहे पण प्रत्यक्षात चांगल्या अंकांच्या प्रती खपत नाहीत. त्यावर मोठी चर्चा घडताना दिसत नाही. )

दिवाळीची सुरू । झाली धामधूम ।
परि सामसुम । वाचनाची ॥
दिवाळी अंकाची । नाही लगबग ।
उलगा उलग । जागजागी ॥
उसने आणले । जरी अवसान ।
हो पर्यवसान । उदासीत ॥
रोख जाहिराती । ओघ अटलेला ।
जागी गोठलेला । व्यवहार ॥
सर्वदूर होई । वितरण वांधा ।
अर्थशास्त्र सांधा । निखळला ॥
प्रतिभाही कुठे । ऐसी उजळून ।
ठेवी खिळवून । वाचकाला ॥
कांत वाढविण्या । वाचनाचा भाव ।
डिजिटल गाव । शोधू जरा ॥
(30 ऑक्टोबर 2021)

उसंतवाणी-219

(दिवाळी सुरू होते आहे. हा आनंदाचा सण सर्वत्र सुखात साजरा होवो.)

फुलत्या मनाचा । उत्सव दिवाळी ।
सुख रेषा भाळी । रेखतसे ॥
जिद्दी माणसाचा । पूर्ण हो नवस ।
पूजिली अवस । उजेडाने ॥
भावाबहिणीची । गोड भाऊबीज ।
आनंदाचे बीज । पेरणारी ॥
सकल नात्यांचा । वाढवी गोडवा ।
सजतो पाडवा । प्रेममय ॥
गाय वासराची । मांडियली पूजा ।
संस्कृतीची ध्वजा । फडफडे ॥
झेंडुच्या फुलात । सनईचे सूर ।
मांगल्याचा पूर । वाहतो हा ॥
मनातली रात । संपविते काळी ।
ती खरी दिवाळी । कांत म्हणे ॥
(31 ऑक्टोबर 2021)


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

No comments:

Post a Comment