Tuesday, November 30, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ८१



उरूस, 24 नोव्हेंबर  2021 

उसंतवाणी- 241
(विदेशी मद्याच्या उत्पादन शुल्कात सवलत देण्याची घोषणा महाराष्ट्र सरकारने केली.)

उत्पादन शुल्क । ‘विदेशी’ला सूट ।
पाठीमध्ये बूट । देशीच्या या ॥
भारतात फार । विदेशीचे लाड ।
देशी वाटे द्वाड । घरचीच ॥
उच्चभ्रू जगात । ‘विदेशी’चा थाट ।
गटारीचा काठ । देशीसाठी ॥
‘विदेशी’चा मंद । धुंद गंध तोरा ।
देशी भपकारा । तीव्र किती ॥
विदेशी सोबत । काजूचा चखणा ।
देशीचा फुटाणा । गरिबीचा ॥
विदेशी म्हणजे । नाजूक गझल ।
देशी उठवळ । लावणी ही ॥
नशे नशे मध्ये । आहे इथे भेद ।
समतेला छेद । कांत म्हणे ॥
(22 नोव्हेंबर 2021)

उसंतवाणी- 242

(तीन ही कृषी कायदे मागे घेतले तरी शेतकरी आंदोलन करत रस्त्यावर बसूनच आहेत. आता आमच्या बाकिच्या मागण्या पूर्ण करा असा आग्रह त्यांनी धरला आहे. )

तीन ही कायदे । घेतले माघारी ।
तरी शेतकरी । रस्त्यावरी ॥
आंदोलन नव्हे । आडमुठेपणा ।
बुद्धीने ठणाणा । जाणवतो ॥
वैचारिक नको । कुणालाच चर्चा ।
बिनडोक मोर्चा । निघालेला ॥
सरकारी पाश । अडकतो पाय ।
कसायाला गाय । धार्जिण ही ॥
हक्क नको यांना । हवी आहे भीक ।
कटोराच ठीक । हातामध्ये ॥
कुर्‍हाडीचे दांडे । गोतास हे काळ ।
बंधनाचा फाळ । उरामध्ये ॥
कांत बंधनात । सुख वाटे भारी ।
नभात भरारी । नको वाटे ॥
(23 नोव्हेंबर 2021)

उसंतवाणी-243

(परमवीर सिंह यांनी सर्वौच्च न्यायालयात असे शपथपत्र दाखल केले आहे की मला मुंबई पोलिसांपासून धोका आहे. तेंव्हा मला सुरक्षा देण्यात यावी. खुद्द पोलिस प्रमुखच म्हणतो आहे की मला पोलिसां पासूनधोका आहे. )

पोलिस प्रमुख । सांगतो कोर्टाला ।
भीती या जिवाला । पोलिसांची ॥
तान्हे रडू रडू । सांगते दाईला ।
आवरा आईला । वैरीण ती ॥
‘परम’ कौतुके । तेंव्हा भरे घडा ।
अर्णवला धडा । शिकविता ॥
मनसुख हत्या । चांडाळ चौकडी ।
‘परम’ तंगडी । अडकली ॥
वाटणीवरूनी । भांडणे चोरांची ।
नावे ही थोरांची । गुंतलेली ॥
आपुल्या पिल्लाला । खातसे मांजर ।
बगीचा बंजर । माळ्यामुळे ॥
कांत सत्तेचा या । अनैतिक पाया ।
नको ते पहाया । भेटणार ॥
(24 नोव्हेंबर 2021)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

No comments:

Post a Comment