Tuesday, November 16, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ७८

 

उरूस, 15 नोव्हेंबर  2021 

उसंतवाणी- 232

(सलमान खुर्शीद यांनी इसिस बोकोहराम सारख्या धार्मिक कट्टरवाद्यांशी हिंदुत्वाची तुलना त्यांच्या आयोध्येवरच्या पुस्तकांत केली.)

आयोध्या पुस्तक । खुर्शीद सल्मान ।
करी अपमान । हिंदूत्वाचा ॥
‘इसिस’शी करी । हिंदूंची तुलना ।
बुद्धीची गणना । काय त्याची ॥
कधी कुणावर । केले आक्रमण ।
अंगी कण कण । सहिष्णुता ॥
विश्वाला म्हणतो । सदा माझे घर ।
दयेचा सागर । उरामध्ये ॥
त्याच्यात विरूद्ध । ओकती गरळ ।
बोलती बरळ । कुबुद्धीने ॥
तोडीला लचका । करूनी फाळणी ।
म्हणती आळणी । मीठ तुझे ॥
जीभेवर सदा । टीकेसाठी हिंदू ।
सडलेला मेंदू । कांत म्हणे ॥
(13 नोव्हेंबर 2021)

उसंतवाणी- 233

(त्रिपुरात न घडलेल्या जाळपोळीचे ट्विट करून जाणीवपूर्वक महाराष्ट्रात दंगल पसरवल्या गेली. महाविकास आघाडी सरकारने त्याला प्रोत्साहन दिले. आरोपींना पाठिशी घालण्याचा प्रयत्न केला.)

जुन्या व्हिडिओंचे । करूनिया ट्विट ।
नियोजन नीट । दंगलीचे ॥
अशांतीचा हेतू । करावया पुरा ।
पेटवी त्रिपुरा । देशद्रोही ॥
महाराष्ट्र पेटे । त्रिपुरा निमित्त ।
धर्मद्वेष फक्त । ओळखा हा ॥
राऊत काढतो । आक्रोशाचा मोर्चा ।
हिंसाचार चर्चा । थांबविण्या ॥
सत्ताधारी करू । लागे आंदोलन ।
विधानभवन । कशाला हे? ॥
पेटवला तरी । महाराष्ट्र शांत ।
‘नवाबी’ आकांत । ऐकू येतो ॥
देश पेटविण्या । चाले धडपड ।
बसते थप्पड । कांत म्हणे ॥
(14 नोव्हेंबर 2021)

उसंतवाणी-234

(रझा अकादमीचा हात महाराष्ट्रातल्या दंगलीमागे असल्याचे समोर येते आहे. रझा अकादमीला शिवसेना आता वाचवत आहे जेंव्हा की 2012 च्या आझाद मैदानावरील रझा अकादमीच्या दंग्यांविरोधात शिवसेनेने कडाडून विरोधाची भूमिका घेतली होती. )

दोन हाणा पण । मुख्यमंत्री म्हणा ।
शिव‘रझा’सेना । विनविते ॥
याचसाठी दिले । होते ‘ते’ वचन ।
सत्ता अपचन । होवू दे रे ॥
‘हिरव्या’ पट्ट्याचा । वाघ हा पाळीव ।
हप्त्याचा गाळीव । इतिहास ॥
त्रिपुरा निमित्त । घडवू दंगल ।
हिरवे मंगल । होण्यासाठी ॥
सत्ताधारी करू । लागे आंदोलन ।
विधानभवन । काशाला हे ॥
‘खान की बाण’ ही । घोषणा विरली ।
लाचारी उरली । सत्तेसाठी ॥
सत्तेसाठी सोडी । विचारांचे सत्व ।
शून्य हो महत्व । कांत म्हणे ॥
(15 नोव्हेंबर 2021)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

No comments:

Post a Comment