उरूस, 13 मे 2021
उसंतवाणी- 46
(शिवसेना प्रवक्ते संजय राउत यांनी ममता बॅनर्जी यांची तुलना अहिल्याबाई होळकर यांचेशी केली. त्यामुळे इंदूर संस्थानच्या वंशजांनी त्यावर आक्षेप घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जाब विचारणारे एक पत्र लिहिलं. )
अहिल्या-ममता । करितो तुलना ।
संजय शहाणा । बडबडा ॥
नाव याचे ठेवू । बरळू राऊत ।
कुबुद्धीला ऊत । सदोदीत ॥
कुठे पुण्यश्लोक । राणी ती विचारी ।
कुठे हिंसाचारी । ममता ही ॥
जिर्णोद्धार तेव्हा । भग्न मंदिरांचा ।
जित्या माणसांचा । खुन आता ॥
उद्धवासी पत्र । लिहुनिया जाब ।
मागती हिसाब । होळकर ॥
संजयासी लावा । लगाम कडक ।
नसता धडक । ठोकु दावा ॥
बोलावे तो गप्प । नको तो वाचाळ ।
कांत हा ढिसाळ । कारभार ॥
(11 मे 2021)
उसंतवाणी- 47
(कृषी आंदोलनाचा काळा चेहरा महिला बलात्कार प्रकरणी समोर आला. ही तरूणी कोरोनाने मृत्युमुखी पडली. तिच्या वडिलांनी तिच्यावर झालेल्या बलात्काराची तक्रार नोंदवली. त्यानुसार सहा जणांवर हरियाणा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या महिलेने आपल्यावरील अत्याचाराची कल्पना योगेंद्र यादव सारख्या नेत्यांकडे केली होती हे पण आता उघड झाले आहे.)
कृषी आंदोलन । दावी चमत्कार ।
होई बलात्कार । तरूणीचा ॥
आता नाही मार्च । घेवून कँडल ।
कुणी ना सँडल । उगारली ॥
तिचा झाला मृत्यू । कोरोनाची बाधा ।
विचारी ना साधा । प्रश्न कुणी ॥
टिकैत यादव । हानन हा मौला ।
आज सारा कल्ला । शांत कसा? ॥
खाणे ‘पिणे’ मजा । वासनेचा खेळ ।
आंदोलन स्थळ । तमाशा हा ॥
कोरोना बाधेचा । बनलाय बॉंम्ब ।
कृषी हित बोंब । खोटी खोटी ॥
नाही शेतकरी । कांत हे दलाल ।
तोंड करा लाल । कायद्याने ॥
(12 मे 2021)
उसंतवाणी- 48
(अभियांत्रिकी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी बालाजी राठोड यांचे अगदी तरूण वयात 25 वर्षे कोरोनाने दिल्लीत निधन झाले. त्याच्या कुटूंबाला आमच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने 10 लाखाची मदत करण्यात आली. ही रक्कम अगदी साध्या व्हाटसअप मेसेजवर एका दिवसांत जमा झाली. कोरोनाशी सामान्य माणसं स्वत: लढत आहेत आणि इतरांना मदत करत आहेत ही मला फारच मोलाची गोष्ट वाटली. )
साध्या माणसांचा । हातामध्ये हात ।
कोरोनाला मात । देण्यासाठी ॥
कुठे ना प्रसिद्धी । कुठे नाही नाव ।
वेदनेचा ठाव । थेट घेती ॥
चांगल्या कामाची । ना कुठे बातमी ।
ना‘बात’ नाही‘मी’। त्यांच्यापाशी ॥
बुद्धीवान सारे । करतात चर्चा ।
सांभाळून खुर्च्या । आपापल्या ॥
स्वत:च्या दु:खाचे । दाबुनिया कढ ।
दूज्यांसाठी चढ । ओलांडिती ॥
साध्यांमुळे खरी । चालते दुनिया ।
मोठ्यांची किमया । प्रसिद्धीची ॥
कांत म्हणे धरा । जनहित कास ।
बाकी बकवास । ढोंग सारे ॥
(13 मे 2021)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
No comments:
Post a Comment