उरूस, 26 मे 2021
उसंतवाणी- 58
(गडचिरोलीच्या ऐटापल्ली गावात जंगलात 13 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. कांही दिवसांपूर्वीच अर्बन नक्षलींच्या याचिका फेटाळून त्यांना तुरूंगात डांबण्यात आले. या अर्बन नक्षलींचे कोडकौतुक करणारे आज मात्र काहीच बोलताना दिसत नाहीत. नुकतेच 22 जवान नक्षलींच्या हल्ल्यात शहिद झाले त्यावरही हे मानवाधिकारवाले काहीच बोलत नाहीत. )
नक्षलवाद्यांचा । होत असे खात्मा।
शांत होई आत्मा । सैनिकांचा ॥
शूर जवानांनी । बाराच्या भावात ।
तेरांना ढगात । पोचविले ॥
धोकादायक हे । भागात जंगली ।
अर्बन नक्षली । त्यांच्याहूनी ॥
पत्रकार आणि । कलाकार मुर्त ।
ऐसे सारे धूर्त । पुरोगामी ॥
नक्षली क्रांतीचे । बोल हे बोबडे ।
तुकडे तुकडे । ऐकू येती ॥
स्वतंत्र देशात । मागती आझादी ।
पूर्ण बरबादी । विचारांची ॥
‘कांत’ म्हणे सोपी । शस्त्रांची चढाई ।
मेंदूची लढाई । आव्हान हे ॥
(23 मे 2021)
उसंतवाणी- 59
(उद्धव ठाकरे यांनी कोकणचा चक्रिवादळ नुकसान पाहणीचा दौरा केवळ 5 तासांत आटोपला. जनतेच्या भावनाही त्यांनी जिल्ह्याधिकार्यांच्याच तोंडून समजून घेतल्या. आणि याच भागात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर चार दिवस लोकांना भेटत नुकसानीची पाहणी करत फिरत होते तर त्याला यांनी फोटो सेशन करतात म्हणून टोमणा मारला. विरोधी पक्ष वैफल्यग्रस्त आहे म्हणून सांगितले. )
चक्रिवादळाच्या । वेगाहूनी भारी ।
सीऐमची फेरी । कोकणाची ॥
काय त्यांची गती । काय तो झपाटा ।
परतीचा टाटा । लागलीच ॥
सकाळचा नाष्टा । दुपारी जेवण ।
यामध्ये कोकण । उरकले ॥
लोकांचा आक्रोश । कलेक्टर ओठी ।
किती सिद्धी मोठी । उद्धवाची ॥
मोडून पडला । संसार रिकामा ।
आधी पंचनामा । महत्त्वाचा ॥
विरोधी नेत्यांचा । म्हणे फोटो दौरा ।
सीऐमचा तोरा । सरकारी ॥
‘कांत’ आधी नोंद । येत्या वादळाची ।
मग मदतीची । आस धरा ॥
(24 मे 2021)
उसंतवाणी- 60
(कृषी आंदोलन एका विचित्र अवस्थेत पोचले आहे. गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार होतो आहे. पण अडमुठपणा करत आंदोलन जिद्दीवर अडून बसले आहेत. 26 मे ला आंदोलनाला 6 महिने पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने त्यांनी मोठा मोर्चा धरणे कार्यक्रम करण्याचे घोषित केले आहे. )
कृषी आंदोलक । कोरोना लाटेत ।
बैसले वाटेत । आडमुठे ॥
भाव मिळताच । गेले शेतकरी ।
दलाल व्यापारी । उरलेले ॥
गव्हाची खरेदी । खात्यामध्ये पैसा ।
तडफडे कैसा । बिचोलिया ॥
कृषी कायद्यांत । काय शब्द उणा? ।
सांगता येईना । कुणालाच ॥
कुणीच पाळेना । कोरोना नियम ।
आमंत्रिती यम । दुष्टबुद्धी ॥
बागायती साठी । आंदोलन खेळ ।
जिरायती वेळ । संकटाची ॥
‘कांत’ ना कामाचे । वैचारिक मुद्दे ।
कायद्याचे गुद्दे । हाणा यांना ॥
(25 मे 2021)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
No comments:
Post a Comment