Tuesday, May 4, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग १३

     
उरूस, 4 मे 2021 

उसंतवाणी- 37

(पाच राज्यांतील निवडणुकांचे एक्झिट पोल चे निकाल जाहिर झाले आणि त्यात कॉंग्रेस सफाचाट होताना दिसत आहे)

अंदाज सांगती । एक्झिट हे पोल ।
पूर्ण पोल खोल । कॉंग्रेसची ॥
प्रचाराच्याविना । हारतो बंगाल ।
आसामात हाल । सभांमुळे ॥
पावे ना डुबकी । केरळी निराळी ।
पक्षात बंडाळी । माजलेली ॥
तामिळनाडूत । ठरे लिंबु टिंबू ।
पद्दुचेरी तंबू । उखडला ॥
आजमल कुठे । कुठे हा फुर्फुरा ।
ओढी फराफरा । कॉंग्रेसला ॥
बंगालात डावे । गळ्यातमध्ये गळा ।
केरळात विळा । विरोधाचा ॥
राहूल साधतो । कांत म्हणे मौका ।
बुडविण्या नौका । कॉंग्रेसची ॥
(1 मे 2021)

उसंतवाणी- 38

(पाच राज्यांतील निवडणुकांचे निकाल जाहिर झाले. असम, बंगाल, केरळात सत्ताधारी कायम राहिले. बंगालात ममतांचा मोठा विजय झाला पण त्या स्वत: मात्र हरल्या. )
आसाम बंगाल । केरळात सत्ता ।
सांगतसे पत्ता । पूर्वीचाच ॥
तामिळनाडूत । द्रमुक स्टॅलीन ।
सावध चालीनं । डाव जिंकी ॥
गड आला पण । सिंहीणीच गेली ।
सुवेंदूू टिपली । बंगालात ॥
डाव्यांची कमाल । केरळात खुर्ची ।
बंगालात मिर्ची । लालेलाल ॥
केरळात हाफ । असामात माफ ।
बंगालात साफ । कॉंग्रेस ही ॥
बंगाली कमळ । झाली दमछाक ।
वाचविले नाक । कसेबसे ॥
कांत मतदार । शहाणा नी सुज्ञ ।
पार पाडी यज्ञ । लोकशाही ॥
(3 मे 2021)


उसंतवाणी- 39

(पंढरपुर मतदार संघात विधानसभेची पोटनिवडणुक होती. यात भाजपच्या समाधान अवताडे यांनी राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके यांचा पराभव केला. भारत भालके यांच्या निधनामुळे ही पोट निवडणुक होत होती. प्रचारात अजीत पवारांनी ‘कोण तो माईचा लाल’ अशी भाषा वापरली होती. )
बंगाली विजय । वाजविती डंका ।
पंढरीत लंका । पेटलेली ॥
तिघाडीची नौका । पंढरपुरात ।
भाजपे पुरात । बुडविली ॥
सहानुभूतीचा । बांधला भोपळा ।
रचला सापळा । वाया जाई ॥
दादा म्हणे कोण । माईचा तो लाल ।
आपुलाच गाल । थोबाडीला ॥
‘भगीरथ’ केल्या । किती तडजोडी ।
‘समाधान’ गोडी । नाही त्यात ॥
‘पुन्हा मी येईन’ । वाटू लागे भिती ।
धडधडे छाती । मातोश्रीची ॥
कांत सत्ता माज । दावी जो अट्टल ।
तसाची विठ्ठल । हाणी रट्टा ॥
(4 मे 2021)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

No comments:

Post a Comment