उरूस, 8 मे 2021
उसंतवाणी- 43
(बेळगांव मध्ये लोकसभेची पोटनिवडणुक झाली. यात दिवंगत शरद अंगडी यांच्या पत्नी मंगला अंगडी यांना भाजपने तिकिट दिले होते आणि त्याच विजयी झाल्या. कॉंग्रेस उमेदवार दुसर्या क्रमांकावर राहिला. पण ही निवडणुक महाराष्ट्र एकिकरण समितीने पण लढवली होती. त्यांच्या उमेदवाराला केवळ 11 टक्केच मते मिळाली. शिवसेनेचे संजय राउत या उमेदवाराचा प्रचार करायला मोठ्या उत्साहाने गेले होते.)
बेळगांवमध्ये । झाला पराभव ।
कडू झाली चव । अस्मितेची ॥
मराठीचा मुद्दा । मागे पडे आता ।
कशासाठी गाता । व्यथा गान ॥
नि:संदर्भ झाले । महाराष्ट्रवादी ।
फुका वादावादी । कानडीशी ॥
नवे तंत्रज्ञान । भाषेला वापरू ।
मराठी उद्धरू । प्राणपणे ॥
महाराष्ट्र नको । मराठीची सीमा ।
गोदावरी भीमा । ओलांडावी ॥
ज्ञाना तेंव्हा म्हणे । ‘विश्वात्मके देवे’ ।
आज हेवे दावे । कशासाठी? ॥
कांत झळकू द्या । मराठीचा झेंडा ।
ऐसा राजबिंडा । विश्वभर ॥
(8 मे 2021)
उसंतवाणी- 44
(लॉकडाउन मध्ये दारू दुकानं बार बंद पडल्याने त्याची चिंता वाटून यांना वीज बिलात माफी द्या, कर सवलत द्या अशी मागणी करणारे पत्र शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले.)
दारूवाल्यांसाठी । पवारांचे पत्र ।
दर्शविते सुत्र । जिव्हाळ्याचे ॥
रसिक हे राज्य । राहू नये गद्य ।
म्हणूनिया मद्य । मोलाचे हे ॥
शुगर इंडिस्ट्री । निर्मिते मळीला ।
या तळमळीला । जाणा जरा ॥
तहानेला जणू । महाराष्ट्र तान्हा ।
सोमरस पान्हा । फुटे यांना ॥
पाणी गढूळ नी । दारू हो नितळ ।
चमके पितळ । व्यवस्थेचे ॥
दारूच्या कल्याणा । नेत्यांच्या विभुती ।
वाईट प्रकृती । असताना ॥
कांत म्हणे नका । मारू कुठे बोंब ।
डोळा यांच्या थेंब । मद्यार्काचा ॥
(9 मे 2021)
उसंतवाणी- 45
(नागपाडा मुस्लिम वस्तीत 7 कि.ग्रॅ. युरेनमचा साठा सापडला. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. अबू ताहिर अफजल हुसेन आणि महोम्मद जिगर अशी त्यांची नावे आहेत. हा तपास 9 मे रोजी एनआयए ने ताब्यात घेतला आहे.)
जिलेटीन झाले । आता युरेनम ।
नरम गरम । मुंबई ही ॥
शांतीदुता घरी । सापडला साठा ।
नको रे बोभाटा । करू कुणी ॥
पवित्र हा सुरू । रोज्याचा महिना ।
कुणी ना पाहिना । त्यांच्याकडे ॥
सणासुदी पोर । लावी फुलझडी ।
युरेनम लडी । तैसेची ही ॥
काका मशीदीत । स्फोट करी खोटा ।
तैसा खेळ छोटा । जाणा जरा ॥
एनआयए ताब्यात । घेतला तपास ।
झाला रे खल्लास । खेळ सारा ॥
इथे ना स्वातंत्र्य । करण्यास हल्ला ।
वाचव रे अल्ला । कांत म्हणे ॥
(10 मे 2021)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
No comments:
Post a Comment