उरूस, 23 मे 2021
उसंतवाणी- 55
(सिंगापूरमध्ये आढळलेल्या नविन व्हायरसचा लहान मुलांना धोका आहे. याचा भारतावर परिणाम होवू शकतो म्हणून आंतरराष्ट्रीय विमानसेवा रद्द करण्यात यावी. कोरोनाच्या तिसर्या लाटेसाठी भारताने सज्ज असावे असे ट्विट अरविंद केजरीवाल यांनी केले. यातील खोटेपणा लगेच उघडा पडला. सिंगापूर सरकारने कडक शब्दांत केजरीवाल यांना सुनावले. परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांना यावर भारताची भूमिका स्पष्ट करावी लागली. )
सिंगापूरी नवी । कोरोनाची चाल ।
केजरी(ब)वाल । करितसे ॥
तिसर्या लाटेचा । मुलांना हा धोका ।
विमानांना रोका । सांगतसे ॥
अपुरी माहिती । मारितसे बाता ।
परदेशी लाथा । बसताती ॥
वर्षापासूनिया । बंद हे विमान ।
केजरूला ज्ञान । नाही जरा ॥
तिसर्या लाटेचा । मोदीला दे सल्ला ।
दुसरीचा हल्ला । पेला आधी ॥
मदतीला देश । सिंगापूर खडा ।
त्यांवरी शिंतोडा । उडवे हा ॥
‘कांत’ केजरूचे । ट्विट खोडसाळ ।
बदनामी आळ । देशावरी ॥
(20 मे 2021)
उसंतवाणी- 56
(कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नितीन गडकरी यांना देशाचा पंतप्रधान करण्यात यावे अशी मागणी करून धमाल उडवून दिली आहे. हेच पटोले 2019 च्या लोकसभेला याच नितीन गडकरी यांच्या विरोधात निवडणुक लढवताना हरलो तर राजकारणांतून सन्यास घेईन असे बोलून बसले होते. )
गडकरी यांना । करावे पीऐम ।
मोदींचा हो गेम । नाना म्हणे ॥
नाना पटोलेंची । काय झाली स्थिती ।
गडकरी स्तुती । करिती हे ॥
बेताल बोलणे । बदलला मुड ।
काळ कैसा सूड । उगवतो ॥
लोकसभे वेळी । बोलले हे खास ।
हारता संन्यास । घेणार मी ॥
गडकरी करी । पटोलेंचा खुर्दा ।
मिडियात गर्दा । बहु झाला ॥
पटोले निस्तरा । समस्य घरची ।
पक्षाध्यक्ष खुर्ची । रिकामीच ॥
‘कांत’ नाना उडे । कॉंग्रेस आकाशी ।
लक्ष भाजपाशी । गुंतलेले ॥
(21 मे 2021)
उसंतवाणी- 57
(माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त 21 मे 2021 कॉंग्रेस खासदार कुमार केतकर यांनी दै. लोकमत मध्ये एक लेख लेहिला. त्यात त्यांनी राजीव इंदिरा हत्या आंतर राष्ट्रीय कटाचा भाग आहेत असं परत एकदा सांगितलं. शिवाय यात तपास पूर्ण झाला नाही असाही आरोप केला. आता मुद्दा असा आहे की 1984 पासून 2021 पर्यंत एकूण 37 वर्षांपैकी 23 वर्षे कॉंग्रेसच सत्तेवर होती किंवा तिचा पाठिंबा होता सरकारला. किंवा कॉंग्रेसीच पंतप्रधान पदावर होते. मग का नाही तपास केला गेला? आता ज्या डिएमके सोबत युती केली आहे त्याच पक्षाचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी राजीव मारेकर्यांना मुक्त करण्याची मागणी केली आहे. मग हे कुमार केतकरांना दिसत नाही का? मग हा नेमका कोणता कट आहे? )
आंतरराष्ट्रीय । कटाची पिपाणी ।
‘कुमार’ मुखानी । वाजू लागे ॥
इंदिरा-राजीव । हत्या मोठा कट ।
तपासात फट । ऐसी शंका ॥
24 वर्षे ही । 84 पासून ।
सत्तेत बसून । कोण आहे? ॥
कटाच्या नावाने । चिवडिती शिते ।
संशयाची भुते । नाचविती ॥
स्टॅलिन बोलला । मोकळे सोडा रे ।
राजीव हत्यारे । झडकरी ॥
स्टॅलिन सामील । आहे का कटात? ।
त्याच्यात गोटात । कॉंग्रेस ही ॥
‘कुमार’ बुद्धीचा । सुमार हा कट ।
व्यर्थ खटपट । कांत म्हणे ॥
(22 मे 2021)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
No comments:
Post a Comment