उरूस, 9 ऑक्टोबर 2020
‘समजावून सांगितल्यावर ज्याला कळते ते मुल, समजावून सांगूनही ज्याला कळत नाही तो राहूल’
अशी एक दोनोळी व्हाटसअपवर सध्या फिरत आहे. चीनप्रश्नावर राहूल गांधी यांनी केलेले वक्तव्य पाहून या दोनोळीचा नेमकेपणा माझ्या लक्षात आला.
एक प्रचार सभेत भाषण करताना राहूल गांधी यांनी नेहमीप्रमाणे बौद्धिकतारे तोडले. त्यांच्या बोलण्याकडे आता तसं कुणी फारसं लक्ष देत नाही. हे एक बरं आहे. पण त्यातील देशाच्या संरक्षणासंबंधी विषय गंभीर आहे म्हणून त्याची त्यादृष्टीने दखल घेणं भाग आहे.
एक तर 1962 च्या चीन युद्धात आपल्या भूमीचा एक भाग चीनने बळकावला आहे हे विदारक कटू सत्य आहे. त्यावेळेस झालेल्या करारात जैसे थे परिस्थिती ठेवण्यात यावी असे ठरले. प्रत्यक्ष ज्याच्या ताब्यात जो प्रदेश आहे तो सध्यातरी तसाच राहिल असे ठरले. अर्थात हे अंतिम नाही. अंतिम निर्णय सवडीने ठरविण्यात येईल (यावर तज्ज्ञांनी सविस्तर लिहीलं आहे. जिज्ञासुंनी ते जरूर वाचावे). ही ताबा रेषा म्हणजेच लाईन ऑफ ऍक्चुअल कंट्रोल म्हणजेच एलएसी. यातही परत एक गुंता आहे. भारत आणि चीन यांच्या ताबा रेषात परत एक नो मेन्स लँड अशी भूमी आहे. त्या ठिकाणी दोन्ही देशांना केवळ पहारा देण्यासाठी अथवा टेहेळणीसाठी फिरण्याची गस्त घालण्याची मुभा आहे.
पण हे काहीच राहूल गांधी यांना समजून घ्यायचे नाही. खरं तर त्यांना जाणीवपूर्वकच असा धूराळा उडवून द्यायचा आहे. चौकीदार चोर है या प्रकरणांत सर्वौच्च न्यायालयाने कान उपटल्यावरही ते सुधरायला तयार नाहीत. याचा अर्थ स्पष्टच होतो तो म्हणजे हे सर्व ठरवून ठरवूनच चालू आहे.
आपण संविधान पाळणारे लोक आहोत. आपली घटनात्मक लोकशाही आहे. यात संसद सर्वौच्च आहे. मग हेच राहूल गांधी त्यांचे जे काही प्रश्न/शंका होत्या त्या घेवून आत्ता चालू असलेल्या लोकसभेच्या सत्रात का नाही सामील झाले? त्यांनी संसदेच्या पटलावर हे प्रश्न का नाही उपस्थित केले? कोरोना संकटकाळात सर्व खबरदारीचे उपाय घेवून कठीण परिस्थितीतही हे अधिवेशन बोलावण्यात आले होते. तेंव्हा राहूल गांधी यांची जबाबदारी होती की त्यांनी या अधिवेशनाला उपस्थित राहूल सरकारला खडे प्रश्न विचारायला हवे होते. पण हे नेमके त्याच काळात परदेशी पळून गेले. (मी जाणीपूर्वक असा शब्द वापरत आहे. कारण वारंवार राहूल गांधी यांनी संसद अधिवेशनांकडे पाठ फिरवली आहे. ते संसदीय लोकशाहीत विस्तृत नेमके मुद्दे उपस्थित करून प्रश्न विचारून सरकारला कोंडित पकडणे टाळत आले आहेत.)
आपल्या बेताल बडबडीत राहूल गांधी यांनी असेही एक विधान केले की केवळ 15 मिनीटांत चीनला उचलून 100 किमी दूर फेकणे शक्य आहे. त्यांचे सरकार असले असते तर त्यांनी फेकले असते.
2004 ते 2014 या काळात राहूल गांधी हे 34 ते 44 वर्षे अशा प्रौढ वयात होते. शिवाय कॉंग्रेस पक्षाच्या सर्वेसर्वा त्यांच्या मातोश्री सोनिया गांधी याच होत्या. राहूल गांधी हे प्रत्यक्ष लोकसभेत खासदार म्हणून याच काळात निवडूनही आले होते. त्यांच्याकडे काय आणि किती अधिकार आहेत याचा पुरावा त्यांनी सगळ्या जगाला पत्रकार परिषदेत सरकारचा अध्यादेश फाडून दिला होता. मग याच राहूल गांधी यांना 2004 ते 2014 या संपूर्ण 10 वर्षांच्या कालखंडात चीनला 100 किमी दूर फेकण्यासाठीची 10 मिनीटे मिळाली नाहीत का? का त्या काळात अशी 15 मिनीटे आलीच नाहीत?
नरेंद्र मोदी या व्यक्तीवर टीका करणे ही एक वेगळी बाब आहे. पण हेच नरेंद्र मोदी जेंव्हा देशाचे पंतप्रधान असतात तेंव्हा ते एका सर्वौच्च अशा संविधानिक पदावर बसलेले असतात. अशावेळी त्यांच्यावर चीनसारख्या नाजूक संवेदनशील लष्करीदृष्ट्या अतिशय गुंतागुंतीच्या अशा आंतरराष्ट्रीय विषयावर इतकी बालीश टीका करणे योग्य आहे का?
याबाबतीत माध्यमांची पण कमाल आहे. ही माध्यमे राहूल गांधी किंवा त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते यांना याबाबत जाब का विचारत नाहीत? देशाच्या सुरक्षेशी संबंधीत हा गंभीर प्रश्न आहे. ही काही केवळ राजकीय टीका म्हणून सोडून द्यायची गोष्ट नाही.
मनाली-लदाख प्रदेशातील अतिशय महत्त्वाच्या ‘अटल टनल’ बोगद्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात आणि नेमके तेंव्हाच अगदी बरोबर वेळ साधत राहूल गांधी हे विधान करतात. यात काही एक आंतरराष्ट्रीय कट आहे अशी शंका येत राहते. अर्थात असे कट कुमार केतकरांना आता दिसत नाहीत. त्यांना मुळात भारताने अटल टनेल बांधून आपली सुरक्षा व्यवस्था मजबूत केली हाच एक आंतरराष्ट्रीय कट वाटू शकतो. भारत ज्या जोरकसपणे लदाख मध्ये लष्करी कारवाया सुलभ जाव्यात म्हणून सीमेवर रस्ते पुल यांची कामं करत आहे हे मुळीच रूचलेले नसणार.
या नविन बोगद्यामुळे लष्कराच्या हालचाली सुलभ गतीमान होणार आहेत. पण या सोबतच त्या भागातील नागरिक जे वर्षानुवर्षे मुख्य भूमीपासून तुटलेले होते. त्यांना संपर्काच्या अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत होते ते मुख्य भूमीशी जोडले जातील आणि भारताच्या मुख्य भूमीतील नागरिकही या प्रदेशाशी जोडले जातील. हे फार महत्वाचे आहे. राहूल गांधीं पुरेपुर मनापासून आत्तापासूनच प्रयत्न करत आहेत की 2024 च्या निवडणुकांत भाजपला 350 ते 400 जागा मिळाव्यात. राहूल गांधी यांच्या या प्रयत्नाला मनापासून शुभेच्छा. कॉंग्रेसचा अवतार संपविण्याचे जे व्रत त्यांनी हाती घेतले आहे ते लवकरात लवकर पूर्णत्वास जावो.
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
या माणसाला नक्कीच मेंदूचा आजार असावा.परदेशात उपचारासाठी जात असावा.कुणीही याला महत्त्व द्यायचं कारण नाही व तो त्या लायकीचा ही नाही.उत्तम .विश्लेषण
ReplyDeleteबालीश बहु बायकांत बडबडला
ReplyDeleteमनोरंजनाचा खळखळता झरा,,,
राहुलबाबा आगे बढो, जनता आपके मनोरंजन की दिवानी है 😂👍
याला पागलखाना हीच योग्य जागा आहे.
ReplyDelete