उरूस, 10 ऑक्टोबर 2020
भीमा कोरेगांव दंगल प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) तपास करत आहे. काल या तपासात आठ नक्षलींविरोधी आरोप पत्र दाखल करण्यात आले. आनंद तेलतुंबडे, गौतम नवलखा, स्टॅन स्वामी, रमेश गायचोर, ज्योती जगताप, हॅनी बाबू, सागर गोरखे आणि मिलींद तेलतुंबडे ही ती आठ नावे आहेत.
नोव्हेंबर 2018 पासून आनंद तेलतुंबडे न्यायालयीन खेळ करत आपली अटक चुकवत होते. त्यांना शेवटी सर्वौच्च न्यायालयाने फटकारले. त्यांचा जामिन नाकारून शरणागती पत्करण्यास सांगितले. त्यांनी बरोबर 14 एप्रिल 2020 हाच दिवस शरणागतीसाठी निवडला. ही संधी साधत सगळ्या पुरोगाम्यांनी तेंव्हा अशी बोंब केली की आनंद तेलतुंबडे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातजावाई (प्रकाश आंबेडकर यांच्या बहिणीचे पती) असून त्यांना बाबासाहेबांच्या जयंतीलाच कशी अटक केली?
वारंवार हे पुरोगामी अशा देशविघातक शक्तींच्याच बाजूने कसे उभे राहतात? वारंवार यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याची उबळ देशविरोधी बाबींतच कशी येते? आनंद तेलतुंबडे हे जसे बाबासाहेबांचे नातजावाई आहेत तसेच ते मिलींद तेलतुंबडे या फरार नक्षलवाद्याचे सख्खे भाऊ आहेत हे का नाही सांगितले जात? त्यांना सर्व कायदेशीर संधी उपलब्ध करून दिल्या होत्या. आपली बाजू न्यायालयासमोर मांडण्याची संपूर्ण मुभा दिली होती. दीड वर्ष त्यांना अटकेपासून पळता आले. असे असूनही त्यांना पोलिसांना शरण यावं लागलं आणि अटक व्हावं लागलं की लगेच ओरड सुरू होते.
आता रितसर त्यांच्यासह इतर आठ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. कायदा त्याचे काम करतो आहे. मग असं असताना त्यात अडथळा आणण्याचे काय काम?
मुळात भिमा कोरेगांव हे प्रकरण काय आहे? ब्रिटीशांसाठी लढलेल्या महार रेजिमेंटच्या सैन्याची गौरवगाथा ही अस्सल भारतीयांसाठी अभिमानाचा विषय कसा काय होवू शकते? याचे कारण काय दिले तर ही लढाई पेशव्यां विरूद्ध म्हणजेच ब्राह्मणशाही मनुवादी यांच्या विरोधात होती. यातही पुन्हा एक बौद्धिक भ्रष्टाचार हे शाहू फुले आंबेडकरांची जपमाळ ओढणारे पुरोगामी विचारंवत करत असतात. पेशवे हे सातारच्या छत्रपतींचे वजीर म्हणजेच पंतप्रधान होते. छत्रपतींच्या वतीने ते राज्यकारभार पहात होते. युद्ध करत होते. मग हे सैन्य पेशव्यांचे कसे ठरते? अगदी पानिपतची लढाई असो की दिल्ली जिंकून त्या तख्तावर मोगल वंशाच्या व्यक्तीस बसवून त्याच्या बादशाहीस मान्यता देणे असो ही सगळी कामं पेशव्यांनी केली ती कुणाच्या आदेशाने? छत्रपतींच्याच आदेशाने आणि नावाने केले ना? पेशवाईची वस्त्रे सातार्यातूनच येत होती ना. मग असे असताना या सैन्याला पेशव्यांचे सैन्य असे अभ्यासक विचारवंतांनी म्हणायचे काय कारण? बोलीभाषेत ‘पेशवाई’ हा शब्द रूढ होता हे एकवेळ ठीक आहे. प्रत्यक्षात शिक्का चालत होता तो छत्रपतींचाच.
स.गो.सरदेसाई यांनी जी रियासत लिहीली आहे त्याचे नाव ‘मराठी रियासत’ असेच आहे. हीची सुरवात शिवाजी महाराजांपासून होते आणि 1818 मध्ये पेशव्यांच्या पराभवापाशी संपते. याला वेगळे ‘पेशवे रियासत’ असे नाव दिले नाही. मग वैचारिक पातळीवर पेशवाई हा शब्द का वापरल्या जातो?
भीमा कोरेगांवच्या लढाईत ब्रिटीशांकडून जे काही दलित लढले गेले होते ते पोटार्थी सैनिक म्हणून लढले होते. जसे ते ब्रिटीशांकडून लढले हा त्यांचा दोष नाहीच तसेच त्यांनी काही मनुवादाविरूद्ध ब्राह्मणशाही विरूद्ध लढा दिला असेही नाही. मग हा विषय का उकरून काढला जातो?
स्वत: बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यात भीमा कोरेगांव येथे काही एक उत्सव दरवर्षी सुरू केला का? प्रकाश आंबेडकर आणि आनंद तेलतुंबडे यांनीही जानेवारी 2018 च्या पूर्वी भीमा कोरेगांव म्हणजे दलित अस्मितेचे स्मारक आहे असे काही कधी कुठे लिहीले भाषण केले तशी मांडणी केली आहे? मग भीमा कोरंगांव म्हणजे मनुवादा विरूद्धची लढाई आहे ही मांडणी कुठल्या वैचारिक आधारावर केली जाते? त्यासाठी कसला पुरावा आहे? राजकारण करण्यासाठी राजकीय नेते काहीही करतात याचा अनुभव आपण घेतो. पण विचारवंत कशाच्या आधारावर ही मांडणी करतात?
बुद्धीभेद करण्याची विचारवंतांची खोडी अगदी सर्वौच्च न्यायालयात नुकत्याला लागलेल्या राम जन्मभुमी प्रकरणांतील निकालांतूनही ही बाब समोर आली आहे. रोमिला थापर आणि इरफान हबीब सारखे इतिहासकार यांनी खोटी शपथपत्रं देवून सांगितले होते की बाबरी मस्जिद ही समतल जागेवर उभारल्या गेली होती. तेथे कुठलेही मंदिर पूर्वी नव्हते. जे की उत्खननात खोटे सिद्ध झाले.
त्याच प्रमाणे भीमा कोरेगांवचा स्तंभ हा या लढाईत मृत्यू पावलेल्या दलित सैनिकांचे (त्यात इतरही नावे आहेत) स्मारक आहे इतपत ठीक आहे. पण त्याला चातुर्वर्ण्याविरूद्धच्या लढाईचे प्रतिक बनवून जो गौरव केला गेला आणि त्यासाठी एक वैचारिक मांडणी केल्या गेली हा शुद्ध वैचारिक भ्रष्टाचार आहे.
एल्गार परिषदेत एकावर एक चार मडके ठेवण्यात आले होते. हे म्हणजे चातुर्वण्याचे प्रतिक असे सांगण्यात आले. परिषदेची सुरवात हे मडके फोडून करण्यात आली. सर्वात वरचे मडके म्हणजे ब्राह्मण म्हणून त्यावर काठी मारताना खालची मडकी पण फुटली. म्हणजे चारही वर्णांवर आघात झाला. आता हे नेमके कशाचे प्रतिक झाले? वर्ण्य व्यवस्था नाकारायची आपण म्हणतो ती तर तशी कायद्याने नाकारली आहेच. घटना स्विकारली तेंव्हाच हा विषय कागदोपत्री संपला.
पेशवाई विरोधात जो काही संताप व्यक्त करायचा असेल तो जरूर करावा, त्यासाठी पेशव्यांनी केलेले अपराध साधार समोर आणावेत. त्यावर वैचारिक मंथन करावे. पण त्यासोबतच सातारचेआणि कोल्हापुरचे छत्रपतीं पण त्याला जबाबदार धरावे लागतील. शाहू महाराजांचे नाव घेत पेशवाईवर आघात असला ढोंगीपणा चालणार नाही. केवळ पेशवेच नाहीत तर गायकवाड, होळकर, शिंदे, पवार हे सगळे प्रमुख सरदार/संस्थानिक यासाठी जबाबदार धरावे लागतील.
मुळात भीमा कोरेगांव हा एक मोठा वैचारिक भ्रष्टाचार आहे. या विचारवंतांनी जो नैतिक पाठिंबा या प्रकरणाला दिला त्याचा फायदा घेत नक्षलवाद्यांनी यात घुसून हिंसाचार केला.
रानावनातला नक्षलवाद त्यांच्या विरूद्धच्या कडक पोलिस कारवायांमुळे आटलेल्या जनसमथर्सनामुळे जेरीस आलेला होता. गेली 20 वर्षे हा नक्षलवाद शहरात शिरला फोफावला. त्याला विचारवंत लेखक पत्रकार कलाकार यांनी आश्रय दिला. ‘शहरी नक्षलवाद’ हा शब्दप्रयोग कॉंग्रेसच्याच काळात केल्या गेला. पी. चिदंबरम, शिवराज पाटील चाकुकर हे गृहमंत्री असताना त्यांची संसदेतील वक्तव्ये तपासा. या शहरी नक्षलींवर वारंवार कारवायी होत आलेली आहे. हे काही आत्ता घडले असे नाही. शाहिनबाग आंदोलनातीही नक्षलवादी सक्रिय राहिले आहेत. देशभरात कुठेही कोणत्याही कारणाने अस्वस्थता पसरत असेल तर त्यात तेल ओतायचे काम नक्षलवादी करत आहेत. अर्बन नक्षली आपले काम शहरी भागात लिखाण, पत्रकारिता, सामाजिक चळवळी, कला या माध्यमांतून करत आहेत. याचा अतिशय बारकाईने तपास पोलिस यंत्रणा करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या आठ अर्बन नक्षलींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हे दाखल होत नाहीत मग कसे काय आरोप करता? अशी ओरड करणार्या पुरोगाम्यांचा गळा आता बसला आहे.
पाक धार्जिणे आतंकवादी, नक्षलवादी, चीनचे समर्थन करणारे देशविरोधी डावे आणि इतर पुरोगामी यांची सगळ्यांची मिळून तयार झालेली ‘तुकडे तुकडे गँग’ आता कायद्याच्या जाळ्यात पुरती अडकत चालली आहे. ज्या बाबासाहेबांचे नाव हे उठता बसता घेतात त्यांना बाबासाहेबांच्याच लोकशाहीवादी स्वतंत्रताप्रिय संविधानाने अडकवून टाकले आहे.
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
चांगली चिरफाड केली शहरी नक्षल्यांची
ReplyDeleteउत्तम लेख 🌹🙏
स्वतःच्या आईची चिरफाड करणारे लोक. त्यांना शिक्षा झालीच पाहिजे.
ReplyDeleteफारच छान विश्लेषणात्मक लेख.
ReplyDeleteअतिशय मुद्देसुद, भिमा कोरेगांव संबंधाने समाजात पसरवल्या जात असलेल्या विषाची चिकीत्सा करुन वास्तव आपण मांडले.खुप छान.वाचनीय ब्लॉग.
ReplyDeleteKhupach chan ahe
ReplyDelete