Sunday, October 18, 2020

महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती


उरूस, 18 ऑक्टोबर 2020 

तुकाराम महाराजांच्या या ओळी मराठी माणसांच्या ओठावरच्या आहेत. त्याचा अर्थही सर्वांना माहित आहे. याचे विश्लेषणही अभ्यासकांनी करून ठेवले आहे. काटकसरीने राहणार्‍या सामान्य भारतीय माणसांना संकटाच्या काळात ‘लव्हाळे’ बनून कसे वाचावे हे चांगले ज्ञात आहे. 

कोरोना आपत्तीत भले भले उद्योग मोठ्या आस्थापना संकटात सापडल्या असून त्यातून बाहेर पडण्यासाठी धडपडत आहेत. ज्यांनी आजपर्यंत व्यवस्थेचा फायदा उचलला ते या संकटाचा बाउ करून कातडी बचावू धोरण स्विकारत आहेत. मोठ्या प्रमाणात नौकर कपात करत आहेत. सरकारने सरळ खात्यात रक्कम द्यावी म्हणून ओरड चालू आहे. अगदी भले भले अर्थ तज्ज्ञ म्हणवून घेणारे लोकही ‘डायरेक्ट’ पैसे मिळावेत म्हणून आग्रही आहेत. अशा काळी अगदी सामान्य असे छोटे उद्योजक व्यापारी दुकानदार धाडसाने समोर येत आहेत आणि जिद्दीने आपला उद्योग व्यवसाय चालवत आहेत.

अगदी सामान्य असा शेतकरी सगळ्या संकटावर मात करून अन्नधान्य, भाजीपाला, फळे पिकवून दाखवतो आहे. दुग्ध संकलनात कुठेही जराही कमतरता आलेली नाही.

तीन छोटी ठळक उदाहरणं ओळखीच्या तरूण मित्रांनी समोर आणली आणि मी त्यांच्या जिद्दीने धाडसाने चकित झालो. नितीन पवार हा तरूण त्याने ‘गावाकडच्या गोष्टी’ नावाने मराठी वेब मालिका सुरू केली होती. तिला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला होता. बारा हजार सबस्क्रायबर्सचा टप्पा या मालिकेने गाठला आहे. तिच्या दर्शक संख्येने तर कोटीच्या कोटी उड्डाणे केली आहेत. लॉकडाउन काळात सर्वच बंद पडलेलं असताना मागील महिन्यापासून नितीन पवारने आपल्या मालिकेचे पुढील भाग नियमित स्वरूपात दर सोमवारी प्रदर्शित करण्यास सुरवात केली आहे. 

मराठी मातीतली ही अस्सल मालिका संकटांवर आर्थिक अडचणींवर मात करून परत टवटवीतपणे प्रेक्षकांना सामोरी जाते आहे हे विशेष. आजही इतके सातत्य इतकी दर्शक संख्या इतकी सफाई दुसर्‍या कुठल्याच मराठी वेब मालिकेला दाखविता आली नाही. यातील कलाकार गेली 4 वर्षे झाली तेच आहेत. हे सातत्य पण कौतुकास्पद आहे. शाळेत असणारी निल्या-गोट्या-बाब्या ही गोट्या खेळणारी लहान मुलं आता मोठी झाली, अव्या-माधुरीचे प्रेम प्रकरण संपून त्यांचे रितसर लग्न झाले, माधुरी गावची सरपंचही झाली, सुर्खीच्या विरहाचे दु:ख पचवून संत्या सारिकासोबत संसारात अडकला. कलाकारांचे वाढते वय (विशेषत: निल्या, गोट्या, बाब्या, अव्या) आणि त्या सोबत कथानकही पुढे सरकणे हा मुद्दाही या मालिकेचे वेगळेपण सुचित करणारा आहे.

ग्रामीण भागातील घटना प्रसंग, ती सहज ओठांवर येणारी ग्रामीण बाजाची मराठी, सारवलेल्या मातीच्या भिंती, मालिका पाहताना अगदी शेणा मुताचा वास आल्याचा भास होत रहातो.

मोठ मोठे मनोरंजनाचे उद्योग हातपाय गाळून बसले असताना नितीन पवार आणि त्याचे ‘कोरी पाटी प्रॉडक्शन’ हे धाडस करत आहे याचा खुप आनंदही आहे आणि कौतूकही वाटते.

दुसरे उदाहरण आहे ऍक्विन टूरिझम च्या आकाश धूमणे या तरूणाचे. अभियंता असलेला हा तरूण तैवानला भेटलेल्या व्हिन्सेंट पास्किनली या फ्रेंच मित्रामुळे पर्यटन व्यवसायाकडे वळला. भारतात परतून त्याने यात लक्ष घालायला सुरवात केली. शाश्‍वत पर्यटनाचा मुद्दा त्याला महत्त्वाचा वाटला. 

गेली तीन वर्षे मराठवाडा भागात देवगिरी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या माध्यमांतून शास्त्रीय संगीताचे उपक्रम करत असताना जूनी मंदिरे, किल्ले, समाध्या, वाडे, गढी, दर्गे, मकबरे यांच्या जिर्णोद्धाराचा दुरूस्तीचा त्या बाबत जागृतीचा एक प्रकल्प आम्ही सुरू केला. यातून शाश्‍वत पर्यटनाचा विषय पुढे आला. ही अपरिचित ठिकाणं सामान्य लोकांना माहित करून दिली तर त्यांना तिकडे पर्यटनासाठी नेता येईल असा विचार पुढे आला. पण ही ठिकाणं अपरिचित असल्याने पर्यटकांना तिकडे खेचणं हे एक आव्हान होतं. शिवाय शाश्‍वत पर्यटन म्हणत असताना स्थानिक अन्न, अगदी शेतात बसून खाणं हा पण एक वेगळा घटक यात होता. हे आव्हान आकाश याने पेललं व 18 डिसेंबरला आपली पहिली सहल घेवून अजिंठा डोंगरातील वेताळवाडीचा किल्ला, रूद्रेश्वरची प्राचीन लेणी, अन्व्याचे 12 व्या शतकातील अप्रतिम शिल्पसौंदर्याने नटलेले मंदिर येथे आयोजित केला. 

अजिंठा लेणी जगप्रसिद्ध आहे. पण त्या डोंगर रांगांमध्ये इतर अनेक सुंदर ठिकाणं आहेत याची फारशी कल्पना पर्यटकांना नाही. नुसती माहिती होवून उपयोग नसतो. आमच्या सारखे या विषयातील लोक केवळ याबद्दल माहिती देवू शकतात. अशा आमच्यासारख्यांना तिकडे जाण्यास प्रोत्साहन देवू शकतात. पण सामान्य पर्यटकांना या ठिकाणी नेणं हे एक आव्हान आहे. हे आकाश सारख्या तरूणांनी स्विकारलं याचे विशेष कौतूक. 

मोठ्या प्रवासी कंपन्या या छोट्या स्थळांचा विचार करत नाहीत. किंवा जरा वेगळा विचार करून आपल्या सहलींची आखणी करत नाहीत. हौस मौज मजा या पलीकडे पर्यटनाचा विचार होत नाही. पण आकाश सारखे छोटे व्यवसायीक हे धाडस करत आहेत हे महत्त्वाचे. शाश्‍वत पर्यटन हा मोलाचा विचार रूजविण्यासाठी प्रयत्न होत आहेत.

तिसरे उदाहरण अभिजीत शेजूळ या तरूण मित्राचे आहे. याने एक वर्षापूर्वी व्लॉग सुरू केला. औरंगाबाद परिसरांतील अतिशय वेगळी अपरिचित ठिकाणं निवडून त्याचे व्हिडिओ आपल्या छोट्या मोबाईलवर तयार करून हा तरूण यु ट्यूबवर टाकतो आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व 10 किल्ल्यांचे व्हिडिओ टाकणारा तो पहिलाच ठरला आहे. पेंडका आणि लांजा हे दोन किल्ले तर कुणाला माहितही नव्हते. शिवाय तुर्काबाद खराडी येथील भुईकोट किल्लाही त्यानेच पहिल्यांदा यु ट्यूब वर आणला. जिल्ह्यातील धबधबे, रम्य ठिकाणं देवस्थानं शोधून तिथपर्यंत जावून धडपडत हा तरूण त्यांचे व्हिडिओ तयार करतो आहे. त्याचे चॅनेल आता मॉनिटाईजही झाले आहे. याची भाषा अगदी साधी बोली स्वरूपातली आहे. कुठेही पांडित्याचा आव न आणता प्रमाणिकपणे आपल्याला माहित नसलेल्या बाबी तो गावकर्‍यांना विचारून दर्शकां समोर मांडतो. मोटार सायकलवर सोबत एखाद्या तरूण मित्राला घेवून साध्या मोबाईलच्या सहाय्याने चालविलेला त्याचा हा प्रयास कौतुकास्पद आहे. 

कोरोना काळात घरोघरी भाज्या, किराणा पोचविण्यासाठी काही तरूण धडपड करत आहेत. ऑन लाईन पोर्टल चे प्रयत्न काही तरूण करत आहेत. यु ट्यबच्या माध्यमातून नविन काही तरी मांडण्यासाठी ‘व्लॉगर्स’ धडपडत आहेत. अशा तरूणांची धडपड ही आशादायक आहे. (असे खुप तरूण आहेत. माझ्या परिचयातले असल्याने वानगी दाखल ही उदाहरणं दिली.)  

तुकाराम महाराजांनी म्हटल्या प्रमाणे ही ‘लव्हाळी’ महापुरात टिकून राहताना दिसत आहेत याचे कौतुक. अशा उपक्रमांना आपण पाठिंबा द्यायला पाहिजे. त्यांना सहकार्य करायला पाहिजे. 

 

      श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

    

 

4 comments:

  1. सर आपण धडपडणारी मुले शोधून त्यांना प्रोत्साहन देत आहात आपल्या कामास सलाम.

    ReplyDelete
  2. ह्या लव्हळ्यांचा परीचय करुन दिला धन्यवाद सर्व उपक्रम स्तुत्यच

    ReplyDelete
  3. Shree उम्रिकर सर , नमस्ते. Your each article given to us informative and useful piece. Many Thanks 👍

    ReplyDelete
  4. या छोट्या छोट्या लव्हाळींना आपण उजेडात आणले त्याबद्दल धन्यवाद!

    ReplyDelete