उरूस, 5 ऑक्टोबर 2020
जून्या मंदिरांबाबत दोन मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. एक तर उद्ध्वस्त प्राचीन मंदिरांचे अवशेष इततस्त: विखुरलेले असतात. यातील काही दगड लोकांनी सरळ उचलून नेले आणि त्यांचा वापर घरगुती कामांसाठी (धुणे धुण्यासाठी) केला किंवा बिनधास्तपणे बांधकामांसाठी त्यांचा वापर केलेला दिसून येतो. तर काही ठिकाणचे दगड दुसर्याच मंदिराच्या बांधकामासाठी वापरले (बीडच्या कंकालेश्वराचे मोठे ठळक उदाहरण आहे).
दुसरी विचित्र अडचण अशी आहे की जिर्णोद्धार करण्याच्या नावाखाली अशा मंदिरांची नविन पद्धतीने सिमेंट वीटांत बांधणी केली जाते. त्यात पुरातन अवशेष नष्ट होतात. त्यांची हेळसांड होते. सौंदर्यदृष्ट्याही हा जोड विजोडच ठरतो. महत्त्वाचे म्हणजे मंदिरांवरची नक्षी छोटी शिल्पे त्या द्वारे सांगितलेली गोष्ट त्यातील गुढ अर्थ याची अपरिमित हानी होते. काही ठिकाणी जून्या दगडी मंदिराला रंग/वॉर्निश फासून विद्रूपता आणली गेली आहे.
अंभई (ता. सिल्लोड. जि. औरंगाबाद) येथील प्राचीन वडेश्वर शिव मंदिराबाबत दुसर्या प्रकारची अडचण आहे.
डॉ. देगलुरकर, डॉ. प्रभाकर देव सारख्या विद्वानांनी या प्राचीन मंदिराचे महत्त्व आपल्या ग्रंथांत संशोधन प्रकल्पांत नमुद केले आहे. यावर सविस्तर लिहून ठेवले आहे. हे मंदिर बहुतांश उद्ध्वस्त झाले होते. मुळ पाया मातीत बुजून गेलेला होता. मुखमंडप आणि मुख्य मंडप कधीच नष्ट झाले होते. तिन गर्भगृहे आणि त्यांच्या बाह्य भिंती तेवढ्या शाबुत होत्या. शिखरेही ढासळलेली होती. गावकर्यांनी मंदिराचा जिर्णाद्धार करताना सिमेंटचे बंदिस्त सभागृह समोर बांधले. त्यांचा हेतू आणि तळमळ गैर नव्हती. पण त्यामुळे मंदिराचे मुळ रूपच नष्ट झाले.
मराठवाड्यात एक गर्भगृह असलेली मंदिरे अकराव्या शतकातील अगदी मोजकीच अशी आहेत. त्यानंतर तिन गर्भगृह असलेली त्रिदल मंदिर शैली विकसीत झाली. अशा दुर्मिळ प्राचीन मंदिरापैकी एक म्हणजे वडेश्वरचे हे शिव मंदिर.
मंदिराच्या तिन्ही गर्भगृहांवर अप्रतिम असे कोरीव काम आहे. मुख्य गर्भगृहात महादेवाची पिंड आहे. चार पद्धतीच्या द्वारशाखा आढळून येतात. मुख्य गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर किर्तीमुख आहे. ललाटबिंबावर गणेशाची मुर्ती कोरलेली आहे. चालुक्य शैलीचे या गर्भगृहाचे छत आहे. गर्भगृहाच्या अंतराळात देवकोष्टके आहेत. (अंतराळ म्हणजे मुख्य मंडप आणि गर्भगृह यांना जोडणारी जागा.) यात ब्राह्मी, सरस्वती, वैष्णवी यांच्या मुर्ती आहेत. हे मंदिर बाराव्या शतकातील आहे.
डॉ. देगलुरकरांनी यातील एका विष्णु मुर्तीचा विशेष असा उल्लेख केला आहे. विष्णुची जी विविध नावे आहेत त्याप्रमाणे त्या त्या पद्धतीच्या मुर्ती मंदिरावर कोरलेल्या असतात. यातील उपेंद्र नावाने ओळखली जाणारी अतिशय दुर्मिळ अशी मुर्ती या मंदिरावर आढळून आली आहे. मुख्य गर्भगृहाच्या ललाटबिंबाच्या वर मध्यभागी ही उपेंद्र विष्णुची मुर्ती आहे. उपेंद्र मुर्तीची वैशिष्ट्य म्हणजे वरच्या उजव्या हातात गदा, खालचा उजवा हात वरदमुद्रेत, वरच्या डाव्या हातात चक्र आणि खालच्या डाव्या हातात पद्म असते.
या मंदिरातील काही मिथून शिल्पे परिसरात मातीत पडली आहेत. मुख्यमंडपाचे काही अवशेषही तसेच इतस्तत: विखुरले आहेत. मुख्य गर्भगृहासमोर नंदी नाही. तो मंदिराबाहेर एका वेगळ्याच चौथर्यावर दिसतो आहे. लक्षात असे येते की हे मंदिर मुलत: शिवाचे असण्याची शक्यता नाही. ते देवीचे असावे किंवा विष्णुचे. (असे बहुतांश मंदिरांच्या बाबत झाले आहे. आक्रमणाच्या भितीने मुख्य मुर्ती हलवल्या गेली. कालांतराने तेथे घडविण्यास सोपी असलेली महादेवाची पिंड बसविण्यात आली.)
मंदिराचा परिसर गावकर्यांनी स्वच्छ ठेवला आहे. मंदिरासमोर आणि बाजूला पेव्हर्स ब्लॉक बसवून त्यांनी जमिन समतल केली आहे. पण मागचा भाग व आपण प्रवेश करतो त्याची विरूद्ध बाजू मात्र अजूनही खराबच आहे. त्याच ठिकाणी शिल्पं विखुरलेली आहेत.
जून्या मंदिरांचे जतन चांगल्या पद्धतीने कसे करता येवू शकते याचे तीन नमुने याच मराठवाड्यात समोर आहेत. अन्वा (ता. भोकरदन जि. जालना) येथील मंदिराचा जिर्णोद्धार पुरातत्त्व विभागाने चांगल्या पद्धतीने केला आहे. सर्व परिसरांत दगडी फरशी बसवली आहे. आधारासाठी लोखंडी खांब उभे केले आहेत. निखळलेले दगड नीट बसवले आहेत. जिथले दगड सापडत नाहीत तिथे त्याच आकारात नविन दगड तासून बसवलेले आहेत. (पुरातत्त्व खात्यानेच गडचिरोली येथील मार्कंडा मंदिराचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने चालविले आहे. अंबाजोगाई जवळ धर्मापुरी येथील मंदिराचे कामही याच खात्याने चांगले केले आहे.)
दुसरे अतिशय चांगले काम इंटॅक्ट या देश पातळीवरील नावाजलेल्या संस्थेने होट्टल (ता. देगलुर जि. नांदेड) येथे केले आहेत. दोन मंदिरांचा जिर्णोद्धार अतिशय शास्त्रीय पद्धतीने एक एक दगड हुडकून त्याची जागा शोधून तिथे तो बसवून करून दाखवला आहे.
तिसरे काम जामखेड (ता. अंबड, जि. जालना) येथील खडकेश्वर शिव मंदिराबाबत गावकर्यांनी करून दाखवले आहे. साध्या दगडी घोटीव दगडांव बाह्य भिंत उभारून मंदिर सावरून धरले आहे.
कुठल्याही जून्या मंदिराचे काम करावयाचे असल्यास कृपया त्या विषयातील तज्ज्ञांना विचारून करा. सिमेंट वीटांचा वापर करून रसायनिक रंग दगडांना फासुन विद्रुप करू नका. काहीच जमणार नसेल तर जसे आहे तसेच ठेवून किमान जागेची स्वच्छता आणि जवळपास विखुरलेले दगड शिल्पं एका ठिकाणी आणून ठेवले तरी पुरे. जनावरे येवू नयेत म्हणून जागेला संरक्षक असे तारेचे कुंपण घालण्यात यावे. तातडीने इतके तरी काम करा. शिवाय गावात इतरत्र आढळून येणारी शिल्पे कोरीव दगड मंदिर परिसरांत आणून ठेवा.
दृश्य स्वरूपात जी मंदिरे किमान अस्तित्वात आहेत ज्यांचा अभ्यास झाला आहे अशा 11 व्या ते 14 व्या शतकांतील महाराष्ट्रातील 93 मंदिरांची यादी डॉ. गो.ब. देगलुरकरांनी आपल्या ग्रंथात दिली आहे. या शिवाय मराठवाड्यातील अगदी किमान अवशेष सापडले अशी ठिकाणे शोधून त्यांची एक यादी डॉ. प्रभाकर देव यांनी दिली आहे. अशी 114 ठिकाणं/ मंदिरे आहेत. आपआपल्या गावांत अशी पुरातन मंदिरे अवशेष कोरीव दगड वीरगळ, सतीचे दगड काही आढळूनआले तर आम्हाला जरूर कळवा. त्यांची छायाचित्रे पाठवा. संपूर्ण महाराष्ट्रातील मंदिरांचा कोश तयार करण्याची गरज आहे. या कामासाठी सहकार्य करण्याचे विविध संस्था/ व्यक्तींनी मान्य केले आहे. त्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू या. हे काम संपूर्ण महाराष्ट्रात करावयाचे आहे. माझ्या स्वत:च्या मर्यादांमुळे सध्या मी मराठवाड्यात फिरतो आहे. पण तशी प्रदेशाची मर्यादा या कामाला नाही.
(छायाचित्र सौजन्य Akvin Tourism)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
सुंदर लेख बर्याच ठिकाणी जेथे पुरातन मंदिर आहे स्थानिक पातळीवर लोकांना डागडुजी अथवा रंगसंगतीची जाण नसल्याने तु कथन केलेले प्रकार होतात.
ReplyDeleteछान माहिती 👍
ReplyDeleteसर, खूप छान माहिती.आम्ही गेलो होतो तेंव्हा तिथे गट्टू बसविले नव्हते .
ReplyDeleteमंदिराच्या शिल्पशैलीवरुन ते भूमिज प्रकारातले आहे आणि हे मंदिर शंकराचेच आहे
ReplyDelete