उरूस, 2 ऑक्टोबर 2020
हजार वर्षांचे एक प्राचीन शिवमंदिर जामखेड (ता. अंबड जि. जालना) या गावात आहे. एकेकाळी बाहेरून पूर्णत: ढासळलेले हे मंदिर गाभारा, गर्भगृह, मुखमंडप व 20 कोरीव खांब असे संपूर्ण सुरक्षीत होते. परिसरांत बाभळी व काटेरी झुडूपे वाढली होती. मंदिराला अर्धचंद्राकार वेढा घातलेली घामवती नदी सहसा कोरडीच असायची. गावकर्यांनी या परिसराची स्वच्छता व मंदिराची दुरूस्ती करण्याचे मनावर घेतले. आज हे मंदिर अतिशय चांगल्या अवस्थेत उभे आहे. सर्व परिसर समतल करण्यात आला आहे. मंदिरासमोर पिंपळाचे मोठे झाड आहे. त्याची सावली संपूर्ण परिसराला आल्हाददायक बनविते.
जामखेडचे हे शिवमंदिर खडकेश्वर महादेव म्हणून ओळखले जाते. जामखेड या गावाबद्दल पौराणिक आख्यायिका आहे. जाबुवंत आणि हनुमानाची लढाई याच गावात झाल्याचे सांगितले जाते. गावजवळच्या टेकडीवर जाबुवंताचे मंदिर आहे. हे मंदिर म्हणजे डोंगरातील कपारीत कोरलेली एक गुहाच आहे. इथे लेणी कोरण्याचा प्रयास झाला होता. पण दगड ठिसुळ असल्याने हे काम अर्धवट सोडण्यात आले. याच जागी आता जांबुवंताचे मंदिर आहे. या परिसरांतील 12 गावांमध्ये हनुमानाचे मंदिर आढळत नाही. नसता मारूतीचे मंदिर नाही असे एकही गाव नसते. पण हा परिसर याला अपवाद आहे. जांबुवंत व हनुमानाच्या लढाईत जाबुवंताचा घाम गळाला म्हणून या गावच्या नदीचे नावच ‘घामवती’ असे आहे.
याच घामवती नदीच्या काठावर खडकेश्वर महादेवाचे हे प्राचीन मंदिर उभे आहे. या गावात नदीला पाणी आले असे म्हणत नाहीत. तर घाम आला असे म्हणतात.
मराठवाड्यात अकराव्या शतकांतील आठ मंदिरे नोंदवल्या गेली आहेत. खडकेश्वराचे मंदिर हे त्यातीलच एक. (याच ब्लॉगमधील पूर्वीच्या लेखात अशा मंदिरांची यादीच दिली आहे.) मूळचे मंदिर भक्कम उंच चौथर्यावर बांधल्या गेले असावे. आज हा चौथरा मातीत बुजला असून जमिन सपाटीवर आता मंदिराचा मुखमंडप आलेला आहे.
मुखमंडपाला चार देखणे कोरीव अर्धस्तंभ आहेत. हे स्तंभ चार फुट भिंतीवर उभारलेले असून त्यांनी छत तोलून धरले आहे. मंडपालाआठ कोरीव स्तंभ असून अष्टकोनी रंगपीठावर हा मंडप उभा आहे. या स्तंभांवर सुंदर असे कोरीव शिल्पकाम केले आहे. हत्तीवर बसून लढणार्या स्त्रीयोद्धा, शेषशायी विष्णू, नृत्यांगना अगदी हनुमान व जांबुवंत यांच्या लढाईचे पण शिल्प या स्तंभांवर कोरलेले आहे. मंदिराला एकूण 20 नक्षीदार स्तंभ आहेत.
मंदिराच्या बाह्य अंगावर अप्रतिम असे शिल्पकाम असावे असा अंदाज आहे. कारण मुखमंडपाच्या बाहेरच्या भागातील काही शिल्पे आजही चांगल्या अवस्थेत दिसून येतात. बाहेरचा भाग संपूर्णच ढासळलेला होता. तेंव्हा तो घडीव दगडांनी लिंपून घेत बाह्य भिंत उभारल्या गेली आहे. तेंव्हा आता इथे एकही शिल्प दिसत नाही.
मंदिराला मुख्य गर्भगृह आणि दोन उपगृहे वाटाव्यात अशा रचना आढळून येतात. डॉ. प्रभाकर देव यांनी आपल्या पुस्तकांत असे नोंदवले आहे की 11 व्या शतकांतील मंदिर शैली विकसित पावून 12 व्या शतकांत त्रिदल पद्धतीची मंदिरे मराठवाड्यात उभारल्या जावू लागली. हा जो मंदिर शैलीचा सांधा आहे त्याचा पुरावा या जामखेडच्या मंदिरात आढळून येतो. एकल गर्भगृह असलेले अन्वा (ता. भोकरदन जि. जालना) आणि त्रिदल पद्धतीतील आता उद्ध्वस्त असलेले केसापुरी (ता. माजलगांव, जि. बीड) या दोन मदिरांच्या अंतराच्या दृष्टीने अगदी मध्ये खडकेश्वर महादेव मंदिर आहे. आणि नेमके शैलीच्या दृष्टीनेही हे मंदिर मध्यभागी आहे. हा एक विलक्षण योगायोग आहे.
खडकेश्वर मंदिराच्या गर्भगृहाला चार द्वारशाखा आहेत. या द्वारशाखांच्या पायाशी शैव द्वारपाल आहेत. मंदिरातील देवकोष्टकांत एका ठिकाणी गणेशाची मुर्ती आहे. दुसर्यात विष्णुची वराह अवतारातील मुर्ती आहे. उमा महेश्वराची पण मुर्ती आढळून येते.
मंदिराच्या बाहेर परिसरांत दोन भग्न मुर्ती आणि भव्य नंदीचे अवशेष आढळून येतात. हे जर मंदिरातील असतील तर मुळ मंदिर अतिशय भव्य असावे असा अंदाज बांधावा लागतो. सध्या जो नंदी आहे तो लहान आहे. नंदीला स्वतंत्र असा मंडप आहे. या मंडपाचेही छत ढासळले होते. गावकर्यांनी मंदिर दुरूस्त करताना नंदी मंडपाचेही छत दुरूस्त केले. चार खांबांवर हा छोटासा देखणा नंदीमंडप मंदिराच्या समोर उभारलेला आहे. खडकेश्वर मंदिर पश्चिममुखी आहे.
या परिसरांत पर्णकुटी बांधून सच्चीदानंद श्रीधर स्वामी कावसानकर (नाना काका महाराज) यांनी वास्तव्य केले. शिवस्वरूप वैकुंठवासी विनोदबाबा दाणे यांनीही या मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम मनावर घेतले. या दोन सत्पुरूषांची प्रेरणा मिळाल्यावर गावकर्यांनी उत्साहाने कामाला सुरवात केली.
गावकर्यांची या मंदिरावर श्रद्धा असल्याने त्यांनी उत्स्फुर्तपणे वर्गणी गोळा करून मंदिराचा जिर्णाद्धार केला. दगडूअप्पा सांगोळे आणि अशोक जाधव यांच्यासारखी मंडळी आजही तळमळीने मंदिरासाठी झटत आहेत. या मंदिराची नोंद पुरातत्त्व विभागाकडे आहे. पण कुठलाही निधी याला मिळालेला नाही. एकीकडे आपल्याकडे प्राचीन मंदिरांची दूरावस्था आढळून येते आणि दुसरीकडे जामखेडची मंडळी स्वयंस्फुर्तपणे काम करत आहेत तर त्याकडेही आपण लक्ष द्यायला तयार नाहीत. ही एक शोकांतिकाच आहे.
जामखेडच्या खडकेश्वर महादेव मंदिराकडे अभ्यासकांचे लक्ष्य जाण्याची गरज आहे. यातील शिल्पांवर अजून बारकाईने अभ्यास व्हायला हवा. डॉ. प्रभाकर देव, डॉ. देगलुरकर, डॉ. अरूणचंद्र पाठक यांनी मंदिराची दखल आपल्या पुस्तकांत घेतली आहे. त्यामुळेच या मंदिराचे महत्त्व समोर आले. मंदिर परिसरांत उत्खनन केल्यास मंदिराचा विस्तारीत पाया सापडू शकतो. मंदिर एका उंच चौथर्यावर उभे असण्याची शक्यता आहे. संपूर्ण उत्खनन झाल्यास मंदिराचा तलविन्यास संपूर्णपणे लक्षात येईल. हे मंदिर अगदी प्राचीन मंदिरांपैकी एक असल्याने त्याचे महत्त्व फार मोठे आहे.
औरंगाबाद बीड रस्त्यावर अडूळच्या अलीकडे जामखेडकडे जाणारा फाटा फुटतो. मुख्य रस्त्यापासून आत वळल्यावर अगदी चार किमी अंतरावर हे गाव आहे. गावापर्यंत अगदी चांगला रस्ता आता तयार झाला आहे. मंदिर स्थापत्याच्या अभ्यासकांनी, इतिहासप्रेमींनी, हौशी पर्यटकांनी या मंदिराला जरूर भेट द्यावी. आतापर्यंत कुणाच्या लक्षात आले नसेल असे काही पैलू समोर आणावेत.
(जामखेड मंदिरा संबंधी काही माहिती हवी असल्यास अशोक जाधव 9763892727 यांच्याशी संपर्क करावा.)
(देवगिरी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने प्राचीन मंदिरे मुर्ती वास्तू समाध्या मकबरे गढी वाडे यांच्या संवर्धन जतन संरक्षणासाठी अभियान राबविले जात आहे. आपल्या गावच्या अशा स्थळांबाबत माहिती आमच्यापर्यंत पोचवा. आमच्या अभियानात आपण सहभागी व्हा आणि आपल्याही गावच्या अशा कामासाठी आम्हाला सांगा.) (छायाचित्र सौजन्य Akvin Tourism)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
चांगली माहिती 👍🙏🌹
ReplyDeleteसुंदर माहिती. उत्सुकता वाढली
ReplyDeleteसुंदर. उत्सुकता वाढली
ReplyDeleteछान माहिती दिलीत. धन्यवाद 🙏🏼
ReplyDeleteMast mahiti. विशेष म्हणजे माझा जन्म तिथलाच। आणि २ ऑक्टोबरला वाढदिवस झाला। माहिती बद्दल धन्यवाद
ReplyDelete