Sunday, March 1, 2020

आभाळ म्हणाले नाही, भूमीहि म्हणाली नाही । मग विनायकाने त्यांची आळवणी केली नाही ॥


काव्यतरंग, दै. दिव्य मराठी

मी मुक्तांमधले मुक्त - तू कैद्यांमधला कैदी ।
माझे नि तुझे व्हायाचे - ते सूर कसे संवादी ? ॥

माझ्यावर लिहीते गीते - या मंद समीरण लहरी ।
माझ्यावर चित्रित होते - गरुडाची गर्द-भरारी ॥

जड लंगर तुझिया पायी - तू पीस कसा होणार?।
माझ्याहुन आहे योग्य - भूमीला प्रश्‍न विचार ॥

आभाळ म्हणाले ‘नाही’ - भूमीहि म्हणाली ‘नाही’ ।
मग विनायकाने त्यांची - आळवणी केली नाही ॥

पापण्यांत जळली लंका - लाह्यांपरि आसू झाले ।
उच्चारून होण्याआधी - उच्चाटन ‘शब्दा’ आले ॥

की जन्म घ्यायच्या वेळी - गंगेस हिमालय नाही?।
शाई न स्पर्शली असुनी - हे अभंग नदिच्या ‘बाही’॥

(ती पहाट लालम् लाल - अनपेक्षित झाली काळी)
दगडाची पार्थिव भिंत - तो पुढे अकल्पित सरली
‘‘मी कागद झाले आहे  चल लिही’’ असे ती वदली ॥
-मनमोहन(आदित्य, कॉन्टिनेंटल प्रकाशन, पृ. 94, पहिली आवृत्ती)

सावरकरांना कविता सुचली आणि ती लिहीण्यासाठी अंदमान तुरूंगात कागद उपलब्ध नव्हता. लोककवी मनमोहन यांनी यावर ही कविता लिहीली. सावरकरांनी आभाळाला विचारले, भूमीला विचारले अशी अतिशय गोड कल्पना मांडत पुढे कोळश्याने भिंतीवर कविता लिहीली असा तो प्रसंग मनमोहन यांनी चितारला आहे.

26 फेब्रुवारी सावरकरांची जयंती. त्यांच्या कविता आणि त्यांच्या विचारांवर भरपुर चर्चा या दिवशी केली जाते. पण मनमोहन यांची ही कविता मात्र फारशी कुठे रसिकांसमोर येताना दिसत नाही.

मनमोहन यांच्यासारख्या दुर्लक्षीत कविची एक ओळ मात्र रसिकांमध्ये अतिशय लोेकप्रिय आहे.

शव हे कविचे जाळू नका हो
जन्मभरी तो जळतच होता
फुलेहि त्यावरि उधळू नका हो
जन्मभरी तो फुलतच होता.

‘हे अंगा भरलेले वारे’या 33 कडव्यांच्या दीर्घ कवितेचा शेवटचा तुकडा म्हणजे या चार ओळी. या ओळींचा वापर आजही केला जातो. पण बर्‍याचदा त्या मनमोहन यांच्या आहेत हेच सांगितल्या जात नाही.

सावरकरांवर लिहीलेल्या या कवितेचे शिर्षक ‘ज्ञानेश्वरानंतर भिंत पुन्हा एकासाठी चालली’ असे आहे. ‘भिंत चालणे’ याचा शब्दश: अर्थ न घेता लक्षणार्थ घेवून त्याचा सुंदर उपयोग मनमोहन यांनी केला आहे.

कविता कळायला तशी सोपी आहे. यात कलेविषयक जागतिक सत्य मनमोहन सांगून गेले आहेत. कुठलाही उच्च प्रतीचा कलाविष्कार त्याची आंतरिक उर्जा इतकी प्रचंड असते की त्याला व्यक्त होण्यापासून रोकता येत नाही. तो सगळ्या अडथळ्यांवर मात करून व्यक्त होतोच. सावरकरांना लिहीण्याची प्रचंड उर्मी होती. कारागृहात बंदिस्त केले, विविध बंधनं घातली तरी या उर्मीला रोकता आले नाही.

सावरकरांचा बंदीवास हा मोठाच सामाजिक राजकीय विषय आहे. पण एरव्हीही कलाकारा लेखकाला विविध बंधने अडथळे अडचणींना तोंड द्यावे लागते. 

नागराज मंजूळे ‘उन्हाच्या कटाविरूद्ध’ या कविता संग्रहात असं लिहून जातो, ‘मी उपसतच राहिलो असतो हा गाळ, माझ्या हातात नसती लेखणी, तर असते छिन्नी, असते गिटार’. कलाकाराला ती उर्मी शांत बसू देत नाही. तो कुठल्याही प्रकारे आपला आविष्कार व्यक्त करतो.  मनमोहन यांना या कवितेतून कलाकाराच्या तीव्र उर्मी बद्दल तीव्रतेनं सांगायचे आहे. ते समजून घेतलं पाहिजे.

काही कलाप्रकार परंपरेने चालत येतात. आजच्या कलाकाराला माहित नसते की तो काय वाहून आणतो आहे. पण तो प्रमाणिकपणे ही कला पुढच्या पुढच्या पिढीकडे सोपवत जातो. महान संगीतकार शारंगदेवाने आपल्या ‘संगीत रत्नाकर’ ग्रंथात ‘किन्नरी वीणा’ नावाच्या एका वाद्याचा उल्लेख केला आहे. त्यावर वाजविल्या जाणार्‍या अवरोहात्मक संगीताची माहिती दिली आहे. आज हीच किन्नरी वीणा ‘किंगरी’ नावाने तेलंगणातील दलित समाजातील वादक दर्शनम मोगुलय्या वाजवतो. त्याला लिहीता वाचता येत नाही. तेलगुशिवाय दुसरी भाषाही येत नाही. त्याने संगीत रत्नाकर मधील शारंगदेवाचे विवेचन वाचले असण्याची जराही शक्यता नाही. मग रसिक मनाला असा प्रश्‍न पडतो की कुठल्या अदम्य उर्मीने हा या प्रकारचे संगीत आयुष्यभर वाजवत आला असेल? केवळ मौखिक परंपरेतून त्याला जे काही मिळाले ते तो प्राणपणाने जतन करून ठेवतो आहे आणि रसिकांपर्यंत पोचवतो आहे. 

वरवर सावरकरांवर वाटणारी ही कविता कलानिर्मितीच्या गभ्यापाशी पोचते. व्यक्त होण्याची अदम्य उर्मी शब्दांत मांडते हे या कवितेचे वेगळेपण आहे.
     
श्रीकांत उमरीकर  जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. मो. 9422878575

1 comment:

  1. २६ फेब्रुवारी हा सावरकरांचा स्मृतिदिन आहे, जयंती नव्हे.

    ReplyDelete