काव्यतरंग, दै. दिव्य मराठी रविवार २२ मार्च २०२०
तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा
घरदार टाकुनी मी जाईन दूर गावा.
पाण्यांत ओजळीच्या आला चुकून मीन
चमकून हो तसाच गाण्यांत अर्थ जावा
शिंपीत पावसाळी सर्वत्र या लकेरी
याचा अनाम पक्षी, स्पर्शू मलाच यावा
देतां कुणी दूरून नक्षत्रसे इशारे
साराच आसमंत घननीळ होत जावां
पेरून जात वाळा अंगावरी कुणी जो
शेल्यापरी कुसुंबी वार्यावरी वहावा
तारांवरी पडावा केव्हा चुकून हात :
विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडावा
-आरती प्रभु
(नक्षत्रांचे देणे, पृ. 88, मौज, 8 वी आवृत्ती.)
आरती प्रभुंच्या साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ‘नक्षत्रांचे देणे’ या कवितासंग्रहातील ही कविता. याच सदरात मागच्या वेळी कवी मनमोहन यांच्या सावरकरांवरील कवितेवर लिहीतांना ही कविता कला निर्मितीची उर्मी सांगते असं लिहीलं होतं. आणि ते लिहीत असताना अचानक आरती प्रभुंची ही कविता आठवली. ही कविताही परत कला निर्मितीबाबतच आहे.
कुठल्याही कलाकाराला कलेची निर्मिती नेमकी कशी होते हे संागता येत नाही. तो स्वत: या प्रक्रियेतून जात असतो, तो स्वत: त्याचा मुख्य हिस्सा असतो पण तो नेमकं नाही सांगू शकत. आणि ज्या वेळी उत्कृष्ठ अशी कलाकृती निर्माण होते तेंव्हा त्याची काय अवस्था असते?
कवितेच्या शेवटच्या कडव्यात ‘तारांवरी पडावा केंव्हा चुकुन हात’ असं मांडत असताना हे कसे घडले हे सांगता येत नाही असंच तो म्हणतो आहे. कलाकाराच्या हातातून ही कलाकृती घडते, ‘विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडावा’ असा तो सापडतो आणि हा कलाकार स्वत:च चकित होतो.
सुप्रसिद्ध ठुमरी गायिका बेगम अख्तर यांच्या आयुष्यातला एक अप्रतिम असा प्रसंग अंबरिष मिश्र यांनी नोंदवला आहे. अहमदाबार येथे एक मेहफिल होती. अतिशय सुरेल असे तंबोरे लागलेले होते. अख्तरीबाईंनी सूर लावला. अप्रतिम असा षड्ज लागला. आपल्या आवाजातील हा सुरेल असा ‘सा’ ऐकून बाई स्वत:च स्तब्ध झाल्या. ‘अल्ला क्या सूर लग गया.’ म्हणत त्या अंतर्मुख झाल्या.
नेमकी हीच अवस्था आरती प्रभु यांनी या कवितेत मांडली आहे. या नंतरची त्या कलाकाराची अवस्था काय असते तर ‘तेंव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा’ अशी असते. मग हा कलाकार सर्व व्यवहारीक जगाला विसरून ‘जाईन दूर गावा’ असं म्हणतो.
हे दूर गावाला जाणं म्हणजे एका ठिकाणाहून दूसर्या ठिकाणी जाणं असं नव्हे. एका गजबज गोंगाटातून दूसरीकडे जाणे असं नव्हे. हे दूर जाणं म्हणजे आदिम अशा शांततेच्या शोधात निसर्गाच्या सान्निध्यात जाणं होय. यासाठी भौतिक पातळीवर जास्त दूर जाण्याची गरज नसते. गरज असते ती व्यवहारिक कोलाहालातून सुटण्याची.
वेरूळच्या जगप्रसिद्ध कैलास लेण्यांत जेंव्हा फारशी बंधनं पर्यटकांवर घातली जायची नाही त्या काळांत कुमार गंधर्व यांनी एक मैफिल सादर केली होती. (साधारणत: 1965 चा काळ) कुसल्याही ध्वनीवर्धकाचा वापर न करता ही अप्रतिम मैफल रंगल्याची आठवण विनय हर्डीकर यांनी लिहून ठेवली आहे. तेंव्हा कैलास लेण्यांत जी शांतता असेल त्याची अतीव ओढ कुमार गंधर्वांना असणार. आणि त्या ओढीपासून ते दूर म्हणजे या जागी आले आणि आपला अप्रतिम असा स्वराविष्कार सादर केला.
‘पाण्यात ओंजळीचा आला चुकून मीन’ या ओळीत आरती प्रभु कलेसाठी काही एक ठराविक चाकोरी नाही हेच सांगू पहातात. अन्यथा जाळे पसरून बसा अन्यथा गळ लावून बसा मासा सापडेलच असे नाही. इथे परत एक व्यवहारिक संदर्भ येतो. करिअर घडविण्यासाठी काय असे प्रयत्न केले पाहिजेत याचे धडे दिले जातात. कलेसाठी असं काही कामा येईल असे नाही. आधुनिक काळात चांगले झब्बे, दागिने घालून कलाकार दिखावू पणाच करत आहेत असा आरोप प्रसिद्ध सतारवादक उस्ताद सुजात खान यांनी केला आहे. त्याचा उद्देश इतकाच असावा की जास्त वरवरचे दिखावू प्रयत्न कलेसाठी पोषक असतातच असे नाही.
कलेसाठी पोषक वातावरण आपण निर्माण करू शकतो. कलाकाराची काळजी घेवू शकतो. पण नेमकं ठराविक साच्यात काही प्रयत्न केले आणि मेहनत केली तर त्यातून कलेचा गणपती बाहेर पडेल असे नव्हे. कारागिर आणि कलाकार यात त्यामुळेच फरक आहे.
घरदार टाकूनी जाईन दूर गावा यातील दूसरा अर्थ असाही आहे की कलाकार जेंव्हा केवळ या वरवरच्या व्यवहारि आकर्षणांतच अडकून पडतो तेंव्हा कला संपत जाते. कला नेहमीच प्रयोगशील रहात आली आहे. अकबर बिरबलाच्या गोष्टीतली एक प्रसिद्ध अशी गोष्ट आहे. तानसेनापेक्षा जास्त कोण चांगले गातो असं अकबराने विचारल्यावर त्याने आपल्या गुरूचे स्वामी हरिदास यांचे नाव सांगितले. त्यांना दरबारात बोलावून घ्या असा आदेश बादशहाने सोडल्यावर तानसेन भीत भीत बिरबलाला सांगतो की त्याचे गुरू असे दरबारात कुणा बादशहाच्या आज्ञेने येतील ही शक्यता नाही. त्यांचे गाणे ऐकायचे तर आपल्यालाच त्यांच्याकडे जावे लागेल. बादशहाला हे पटून तो वेष पालटून तानसेन व बिरबल यांना घेवून तानसेनाच्या गुरूकडे जातो. त्यांचे अप्रतिम असे गाणे ऐकून तो तानसेला विचारतो, ‘तूझ्यापेक्षा हे गाणे चांगले कसे?’ तेंव्हा तानसेनाने जे उत्तर दिले ते आरती प्रभुंच्या कवितेतील भावनेशी मेळ खाते. तानसेन म्हणाला, ‘महाराज मी तुमच्यासाठी तुमच्या आज्ञेने गातो, माझे गुरू स्वत:साठी गातात’
कलाकाराची स्वत:शी स्वत:ची तार जूळते आणि त्यातून उत्कृष्ठ अशी कलाकृती निर्माण होते. ही कलाकृती निर्माण झाल्यावर त्याला विरक्ती येते. तो त्यात परत अडकून पडत नाही.
श्रीकांत उमरीकर जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. मो. 9422878575
विरक्तितुन होणारी अव्यक्ताची अभिव्यक्ती कलाकार स्वतःअनुभवतो,तो कवीही असेल तर ती शब्दबध्द करतो,आणि त्याचवेळी तो माऊलींप्रमाणे संतकवी असेल तर त्या अनुभुतीच्या विश्वात्मकतेची प्रचिती सर्व प्राणिमात्रांना देऊन अवघे विश्व आनंदाने भरुन टाकतो.
ReplyDeletebhandarpk2013@gmail.com
ReplyDelete