Friday, February 28, 2020

कशाळकरांनी उभारला "जोगकंस" स्वरकैलास


उरूस, २८ फेब्रुवारी, २०२०

सत्तरी ओलांडलेला बुजूर्ग गायक मंचावर येतो तेंव्हा रात्रीचे ९ वाजलेले असतात. कार्यक्रम उशीरा सुरू होणे, आधीच्या कलाकाराचे सादरीकरण लांबणे यातून कमी अवधी या बुजूर्गासाठी शिल्लक राहीलेले असतात. ध्वनी व्यवस्था, वाद्य जुळवणे, सुरवातीला आवाज लागणे स्थिरावणे यात अजून २० मिनीटे निघून जातात. समोर बसलेल्या जाणकार रसिकांचे चेहरे चिंताक्रांत होवून जातात. आज पदरी काही पडणार का? बघता बघता आवाज स्थिर होवून असा काही लागतो, असा काही तापतो की आख्खा मंडप त्या प्रभावाखाली डोलायला लागतो.

हा काही कल्पनेतला प्रसंग नाही. नांदेडला २७ फेब्रुवारीला संगीत शंकर दरबार कार्यक्रमात प्रत्यक्ष पद्मश्री पंडित उल्हास कशाळकरांच्या बाबत हे घडलं.

पं. जग्गनाथबुवा पुरोहीत यांचा म्हणून ओळखला जाणारा "जोगकंस" कशाळकरांनी आळवायला सुरवात केली. आळवायला म्हणायचे कारण एक लडिवाळपणा त्यांच्या सुरात होता. आणि काही मिनीटातच रसिकांच्या काळजाचा ताबा बुवांनी घेतला. 

फ्युजनच्या नावाखाली वाट्टेल तो स्वरगोंधळ घालत सांगितिक आतंकवाद माजवला जात असताना कशाळकरांनी घरंदाज गायकीचे, शंभर वर्षांपूर्वीच्या अस्सल बंदिशीचे अशा काही नजाकतीने सामर्थ्याने दर्शन घडवले की नाल्यावर अतिक्रमण करून बांधलेल्या बेढव इमारतीपुढे एकाच दगडात घडवलेले कलात्मक कैलास लेणे. 

कैलास लेण्याची उपमा देण्याचे एक कारण म्हणजे जसं हे लेणे पिढ्यान् पिढ्या घडत होते तसेच शास्त्रीय संगीतही घडत आले आहे. आता कशाळकरांनी आळवलेल्या जोगकंसाचाच विचार केला तर जग्गनाथबुवा पुरोहीत यांच्यापासून पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या पर्यंत आणि तिथून कशाळकरांपर्यंत हा जोगकंसचा प्रवास चालू आहे.

पंडितजींना साथ करायला मागे तेवढाच तोलामोलाचा त्यांचा ज्येष्ठ शिष्य शशांक मक्तेदार होता. त्याचाही आवाज अप्रतिम लागलेला. घराणेदार चीज सर्वांसमक्ष बुवा पुढच्या पिढीपर्यंत पोचवत होते. 

या कार्यक्रमात अजून एक योग जूळून आला. पंडितजींच्या साथीला मक्तेदारांशिवाय अगदी पंचेविशीतला तरूण तडफदार गायक पं. अजय चक्रवर्तींचा शिष्य अभिजीत अपस्तंभ होता. कशाळकरांना धरून शास्त्रीय संगीतातल्या तीन पिढ्या रसिकांसमोर एकाचवेळी गात होत्या. 

सुघर बरपा ही जग्गनाथबुबांची बंदिश गाताना तिघांचेही आवाज समेवर यायचे तेंव्हा एक वेगळीच सौंदर्य अनुभूती रसिकांना होत होती. तीन सांगितीक पिढ्यांचा सुंदर तिपेडी गोफ बनून त्याचे वळसेदार सुत्र तयार व्हायचे. पंडितजींचा आवाज विलक्षण सामर्थ्याने सर्व सप्तकांत फिरत होता. तबल्यावर भरत कामत आणि संवादिनीवर मिलींद कुलकर्णी मोजक्याच जागी आपले कौशल्य दाखवत या बुजूर्ग खानदानी गाण्याची आब राखत होते.  

सुघर बरपा या विलंबीत बंदिशीतून पीर परायी या दृत मध्ये प्रवेश करताना गाडीने रूळ बदलताना खडखड करावी असं एरवी बहूतांश कलाकारांच्या बाबत अनुभवयाला येतं तसं इथे घडलं नाही. मजबूत, कलात्मक पाया भिंती तयार झाल्यावर त्यावर कळसाचे काम सुरू व्हावं अशी अभुतपूर्व अनुभव रसिकांना आला. पाउणतासात बुवांनी जोगकंसच्या मंदिराचे सांगितीक बांधकाम संपवले तेंव्हा रसिकांच्या डोळ्यासमोर पीर पराईचा सोनेरी कळस झळाळत होता. 

सध्याच्या दूषित सांगितीक वातावरणाबद्दल कुठला शब्दही जास्तीचा न बोलता पंडितजींनी सणसणीत कृतीशील उत्तर दिले. 

भारतीय संगीताचे काय होणार? म्हणून आंबट चेहर्‍याने प्रश्न विचारणार्‍यां समोर जग्गनाथबुवा, अभिषेकी, स्वत: कशाळकर, मक्तेदार आणि अपस्तंभ या पाच पिढ्यांनी जोगकंसचा स्वरकैलास उभारून दाखवला. 

कार्यक्रम वेळेत सुरू झाला असता तर पंडितजींना अजून वेळ मिळाला असतो. रसिकांना पोट भरून ऐकता आले असते. भरल्या ताटावरून अर्धपोटी उठावे लागले नसते. 

नांदेड शहरात संगीताच्या क्षेत्रात काम करणारी भरपूर व्यक्तीमत्वं आहेत. त्यांचे विद्यार्थी आणि त्या विद्यार्थ्यांचे पालक असा विचार केला तर ही संख्या फार मोठी होते. मग असं असताना अर्धा मंडप रिकामा कसा? हा नतद्रष्टपणा का? 

आज हयात असणार्‍या आणि मंचावर गावू शकणार्‍या चार दोन बुजूर्ग गायकांतले एक नाव म्हणजे पंडित उल्हास कशाळकर. त्यांना ऐकायला बाहेरगावातून रसिक धडपडत येतात. आणि नांदेडकर घरात बसून रहातात याला काय म्हणावे? 

आयोजकाने त्याचे काम केल्यावर रसिकांची किमान जबाबदारी म्हणजे उपस्थित राहणे. सांगितिक कार्यक्रमाची सगळ्यात मोठी अडचण म्हणजे तिचे "कान" असणार्‍यांचीच गर्दी असावी लागते. फापट पसारा तिथे येवून भागत नाही. आणि कशाळकरांसारखा घराणेदार माणूस गातो तेंव्हा तर रसिकांची जबाबदारी अजूनच वाढलेली असते.  आपण ती पार पडताना दिसत नसू तर ते आपलेच दूर्देव! 

एक अप्रतिम स्वराविष्कार उपस्थित रसिकांना अनुभवायला मिळाला. त्यासाठी संयोजक अशोक चव्हाण, डि.पी. सावंत यांचे आभार. त्यांच्या सर्व सहकार्‍यांना धन्यवाद. संजय जोशी यांच्या सारख्या गायक कलाकारांनी महोत्सवाची सांगितिक नियोजनाची बाजू सांभाळली. त्यांचे मन:पूर्वक आभार. 

श्रीकांत उमरीकर, औरंंगाबाद, ९४२२८७८५७५
(छायाचित्र सौजन्य होकर्णे बंधु, नांदेड)

No comments:

Post a Comment