Wednesday, October 2, 2019

गांधी बाबाचा गंडा !


2 ऑक्टोबर 2019 

माझ्या हाताला सुताचा पांढरा दोरा गुंडाळलेला पाहून एका सन्मित्राने विचारले, ‘‘हा कुठला गंडा आहे?’’ त्याच्या प्रश्‍नातच मला उत्तर सुचले. मी सांगितले, ‘‘हा गांधीबाबाचा गंडा आहे. फार पावरफुल आहे. लगेच पावतो.’’ त्याला बिचार्‍याला माझ्या बोलण्यातील खोच कळली नाही. मी काहीतरी सामाजिक क्षेत्रात लुडबुड करत असतो. तेंव्हा बाबा महाराज करण्यातला नाही. मग हा गंडा कसा काय? शिवाय गांधीच्या नावानं कसा? विचारलं तर हा काहीतरी लंबेचौडे ‘लेक्चर’ हाणीन अशी भिती वाटल्याने असेल कदाचित त्याने मान डोलावत प्रश्‍न आवरत काढता पाय घेतला.

आज गांधींची 150 वी जयंती. तेंव्हा या दिवशी आपण गांधींच्या तत्त्वांची आठवण राखण्यासाठी म्हणून खादीचे सुत हाताला वर्षभर बांधायचे असा संकल्प मी तीन दिवसांपूर्वीच केला होता. त्याला कारण घडले ते महागामी गुरूकुलात संपन्न झालेला ‘सुत्रात्मन्’ हा कार्यक्रम. नृत्यगुरू पार्वती दत्ता यांनी महात्मा गांधींना अभिवादन करण्यासाठी अप्रतिम असा कलाविष्कार 28-29 सप्टेंबर रोजी सादर केला. दुसर्‍या दिवशी ‘सुत्रात्मन्’ ची प्रस्तावना करताना त्यांनी गांधी विचार आणि कला या बाबत विवेचन मधुर आयुर्वेदिक हिंदीत समोर ठेवले. उडिसी व कथ्थक या दोन्ही नृत्यप्रकाराचा समावेश करून एक आगळा वेगळा कलाविष्कार सिद्ध केला. कार्यक्रमाच्या शेवटी समृद्धी या सर्वात छोट्या नृत्यांगनेने समोर बसलेल्यांना एक एक सुताचा धागा दिला. यातला एक माझ्याही वाट्याला आला. त्याच दिवशी माझा निश्चय पक्का झाला की आपण हा धागा मनगटावर बांधायचा.
केवळ धागा बांधून काही होत नाही. नुसता धागा बांधणे ही तशी सहज सोपी प्रक्रिया आहे. काही एक संकल्प करणे हे पण सहज शक्य आहे (तो कितपत पाळला जाईल ते निराळे). पण माझ्या मनात संघर्ष सुरू झाला की यासाठी आपण पात्र आहोत का? किमान एखादी तरी अशी घटना आहे का की ज्यातून सिद्ध होवू शकेल की आपण गांधी विचारांनी प्रेरीत झालो आणि ते कृत्य केलं? आणि तसे नसेल तर हा धागा कसा काय बांधणार?

एकेकाळी शिष्याची परिक्षा घेवून मगच गुरू त्याला आपलेसे करायचे. मग मला गांधीना गुरू करायचे असेल तर एखादी तरी परिक्षा देणं आणि त्यात उत्तीर्ण होणं आवश्यक होतं. तसं शरद जोशींच्या विचारांत गांधींचा फार मोठा भाग आहे. त्या अनुषंगाने माझे नाते गांधींशी जूळत होते. पण मला माझ्या स्वत:च्या आयुष्यातील प्रसंग हवा होता.

दोन दिवस यात गेल्यावर शेवटी 30 तारखेच्या रात्री मला तो प्रसंग आठवला. औरंगाबाद शहरातील रस्त्याच्या प्रश्‍नांवर आंदोलन करत मी रस्त्यावर (अक्षरश: रस्त्यावरच) उतरलो होतो. लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. मोठा रस्ता रोको झाला. दुसर्‍या दिवशी कुणीतरी राजकीय नेत्याने अस्वस्थ होवून पोलिसांत तक्रार केली की इतके मोठे आंदोलन झाले आणि तुम्ही काहीच गुन्हे दाखल करत नाहीत? हे काय चालू आहे? मग पोलिसांनी आम्हाला (माझ्यासह चार जण) उस्मानपुरा पोलिस स्टेशनमध्ये बोलावून घेतले आणि गुन्हे दाखल केले. एक कागद माझ्या पुढे केला आणि सही करायला सांगितले. ‘‘हे काय आहे?’’ असे विचारताच,  ‘‘तुम्हाला जामीन घ्यावा लागेल.’’ असे पोलिसांनी संागितले. मी विचारले, ‘‘आणि नाही केली सही तर?’’ मग त्याने सांगितले की, ‘‘तुम्हाला अटक होईल. तुरूंगात जावे लागेल.’’

दुपारची साधारण 12 ची ती वेळ होती. माझ्या सोबतच्या तिघांनी झटपट सह्या केल्या. त्यांचे ते मोकळे झाले. माझ्यात मात्र आता गांधी संचारायला सुरवात झाली. आपला निग्रह किती टिकतो? असा प्रश्‍न हा गांधी मला विचारायला लागला. मी पत्रकारांना आणि जवळच्या मित्रांना फोन केला आणि जामिन न घेता तुरूंगात जाण्याचा माझा निश्चय सांगितला. सगळ्यांना वाटत होते की अजून काही वेळ गेला की हा तयार होईल. मग प्रश्‍न संपून जाईल. बाकी कोर्ट कचेर्‍या कितीही काळ चालत राहो. त्यानं काय फरक पडतो.

मी जामिन नाकारला म्हणजेच मला न्यायालयात उभं करणं आलं. हे माझ्या अजून काही पत्रकार मित्रांना आणि वकिल मित्रांना कळताच त्यांची धावपळ सुरू झाली. मला सगळे समजावून सांगायला लागले. माझ्याातला गांधी माझ्याकडे मिश्किल नजरेने पहात होता. मी तसतसा शांत होत गेलो. माझ्या विचारांवर ठाम राहिलो.

जिल्हा न्यायालयात मला नेल्यावर अजून काही जण भेटायला आले. माझ्या वकिल मामाला वाटले माझ्या वडिलांना बोलायला लावले तर माझ्यावर दबाव येईल. पण झाले उलटेच. बाबांना कळल्यावर त्यांनाही माझ्या निश्चयाचे कौतुक वाटले आणि माझ्या निर्णयावर मी ठाम रहावे असे त्यांनी सुचवले. न्यायाधीश मॅडम समोर उभं केल्यावर त्यांनीही मला समजावून सांगितले. पण मी जामीनाला नकार देतोय म्हटल्यावर त्यांनी मला थांबायला सांगितलं. बाकीची कामं आटोपून मला आपल्या चेंबरमध्ये बोलावून घेतलं. तोपर्यंत त्यांनी मुख्य जिल्हा न्यायधीशांशी या पेचप्रसंगावर चर्चा केली होती. मला त्यांनी परत समजावून सांगितलं, ‘‘तुमची सामाजिक प्रश्‍नांबाबतची तळमळ कळली आहे. आम्ही त्याची गांभिर्याने दखल घेतो आहोत. पण तूम्ही जामिनावर सही करा आणि अटक टाळा.’’ आता माझ्यातला गांधी अजूनच माझ्याकडे मिश्किल पहायला लागला. त्या गांधीला न्यायाधीश महोदयांमागचा गांधीही साथ देत होता. मी शांतपणे त्या गांधीच्या नजरेला नजर देत म्हणालो, ‘‘महोदया, माझी काहीच चुक नाही. मी सामाजिक प्रश्‍नांसाठी कायदा मोडला आहे. मी सही करणार नाही. मी तुरूंगात जायला तयार आहे. तुम्हाला रस्ते खराब आहेत हे आम्ही आंदोलन करून सांगायची का गरज पडावी? तुमच्यासाठी काय वेगळे रस्ते आहेत का? तुम्हालाही ही परिस्थिती चांगलीच माहित आहे. तेंव्हा खड्डे असलेल्या रस्त्यांच्या जगात बाहेर राहण्यापेक्षा मी आत तुरूंगातच राहणे पसंद करेल.’’

शेवटी नाईलाजाने न्यायाधीश मॅडमनी मला तुरूंगात धाडण्याचा आदेश काढला. त्यावर यांच्यावतीने कुणी सही केली तर यांना तात्काळ बाहेर सोडा, परत न्यायालयात आणण्याची गरज नाही अशी सुचनाही लिहीली. (जी मला दुसर्‍या दिवशी माझी सुटका झाल्यावर कळली.)

आता तो समोरचा गांधी आणि माझ्या मनातला गांधी दोघेही माझ्या पाठीवरून हात फिरवत होते. मी खुपच शांत झालो. एव्हाना माध्यमांपर्यंत हा विषय गेला होता. रस्त्याच्या प्रश्‍नावर आंदोलन करणार्‍या एका सामान्य नागरिकाला सरकार तुरूंगात डांबतेय ही बातमी सर्वत्र पसरली होती.

मग पुढे ती संध्याकाळ, तुरूंगातली रात्र आणि दुसर्‍या दिवशीची सकाळ ही बातमी माध्यमांत गाजत राहिली. माझ्या मनातला गांधी आता मात्र माझ्या खांद्यावर हात ठेवून मला उर्जा पुरवत होता. माझे गुरू शरद जोशी यांना एव्हाना ही बातमी कळाली होती. माझा फोन बंद होता म्हणून त्यांनी बाबांना फोन करून माझं कौतुक केल्याचं मला नंतर कळलं.

तुरूंगातील ती रात्र गांधी माझ्या सोबतच होता. पहाटे बराकीत पेपर आले तेंव्हा पलिकडच्या कोपर्‍यातील सात आठ कैदी माझ्याकडे आणि पेपरांतील बातमीकडे आळीपाळीने पहायला लागले. तेंव्हा मला कळले की माझा फोटो तिथे आला आहे म्हणून. खरं तर असल्या प्रसिद्धीने हुरळून जाणं सहज शक्य होतं. पण हा माझ्या मनातला गांधी मला तसं काहीच करू देत नव्हता. त्यानं मला शांत केलं होतं.

दुपारपर्यंत हा विषय सर्वत्र गाजला. शहरांतील प्रतिष्ठीत नागरीक पोलिस आयुक्तांकडे शिष्टमंडळ घेवून गेले. माझ्या तुरूंगवासातील तांत्रिक बाबींची सोडवणूक करून माझी तातडीने सुटका करण्याची तजवीज आयुक्तांनी केली. दुसर्‍या दिवशी दोन वाजता माझी सुटका झाली. आतले कैदी ज्यांना एव्हाना माझा अटकेचा विषय नीटच समजला होता, मोठ्या काकुळतीनं म्हणाले, ‘‘बॉस बाहर मत जावो यार. इधर बहोत प्रॉब्लेम है. बाहर तो बहोत सारे लोग लढते है. हमारे लिये कौन लढेगा? तुम जैसे लोग चाहीये.’’ तो कैदी मित्र सुभाष याच्या वाक्यावर माझ्याकडे काहीच उत्तर नव्हते.

पुढे या प्रश्‍नावर बराच गदारोळ झाला. योगायोगानं औरंगाबाद शहरांतील 13 रस्त्यांनी कामं त्यानंतर मार्गी लागली. मी प्रत्यक्ष आंदोलन केलं तो रस्ता अजून तसाच आहे. पण त्या चौकातले इतर तिनिही रस्ते सिमेंटचे झाले.
आज सहा वर्षांनंतर मी त्या सगळ्या घटनेकडे तटस्थपणे पाहतो तेंव्हा कळतं की हा आपल्यातला गांधी आपल्याला धीर देत होता. किंवा तोच आपल्याकडून हे करवून घेत होता.

प्रचंड तटबंदी असलेला मनावर दबाव आणणारा भव्य दरवाजाचा तो तुरूंग, दरवाजा नसणारे संडास, वापरायचे पाणी आणि प्यायचे पाणी यात काहीच फरक नसणे, एका लांबलचक सतरंजी शिवाय त्या प्रचंड मोठ्या हॉल मध्ये दुसरं काहीच नसणे, आयुष्याचे सर्व रंग उडून गेलेले ते भकास चेहरे, पोपडे उडालेल्या रंगहीन कळाहीन भिंती, त्या खिडक्यांचे भक्कम भितीदायक गज, पाहताच जरब निर्माण करणारी बराकी बाहेरच्या भव्य अंगणाची दगडी फरशी, पहाटे काहीच कारण नसताना पोलिसांनी एका तरूण पोराच्या पार्श्वभागावर रट्टा मारत हाणलेली गच्चाळ शिवी हे सगळं एरव्ही मला पचवणं मुश्किल होतं. मनातला गांधी प्रचंड ताकद पुरवत होता. म्हणून शांतपणे सोबत नेलेलं महाभारतावरचं पुस्तक वाचत पडून राहता आलं. (आंदोलन आणि तुरूंगावारीवर सविस्तर कांदबरी लिहायची आहे.)

आज बरोब्बर सहा वर्षांनी गांधींच्या 150 व्या जयंती निमित्त सुताचा धागा बांधण्यासाठी हे सगळं आठवलं. निर्णय पक्का झाला. आपण पात्र असल्याची खात्री मनोमन पटली. आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून अंगणात आलो. पावसाळी हवा जावून स्वच्छ उन पडलं होतं. गांधी बर्‍यापैकी समजून घेतलेल्या वकिली शिकणार्‍या छोट्या मुलाला सांगितलं हाताला धागा बांधायला. आपला बाप असं काहीतरी उटपटांग करत असतो हे त्याला जन्मापासून माहित असल्या कारणाने त्याने उत्साहाने झटपट धागा बांधून दिला.

सर्वोदय भवनात जावून ‘वैष्णव जन तो तेणे कहीऐ’ हे भजन ऐकलं. समाधान वाटलं.

गांधी आश्रम, स्मारकं,  खादी, गोपालन अशा कितीतरी गोष्टी आज कळकट होवून गेल्या आहेत. बर्‍याच ठिकाणचे गांधींचे पुतळे पण कळाहीन आहेत. अप्रतिम शिल्प सौंदर्य असलेले गांधी पुतळे फार थोडेच आढळतील. बाह्य जगातील इतर उपचारांपेक्षा आपण आपल्या मनात गांधी जपणं हेच जास्त महत्त्वाचं. त्याचीच खुण म्हणून हा पांढरा धागा मनगटाला. 
   
        श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

 
   

5 comments:

  1. अत्यंत हृदयस्पर्शी

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर व वास्तववादी लिखाण. गांधी वरून सध्या समाजा मध्ये दोन उभे तट पडले आहेत व दोघेही टोकाची भूमिका घेतात . खरा गांधी आपल्यांला अजूनही कळाला नाही हि आपली शोकांतिका आहे

    ReplyDelete