Saturday, October 5, 2019

जनीची अद्भूत वाकळ



काव्य तरंग - दै. दिव्य मराठी ५ ऑक्टो २०१९ 

पीठ शेल्याला लागले झाला राऊळी गोंधळ
कुण्या घरचे दळण आला दळून विठ्ठल ॥धृ०

पीठ चाखले एकाने म्हणे आहे ही साखर
पीठ हुंगले दुज्याने म्हणजे सुगंधी कापूरी
खरे कुणा आकळेना मनी उठले वादळ ॥१

कुणी शेला झटकला पीठ उडून जाईना
बुचकळला पाण्यात पीठ धुवून जाईना
झाली सचिंत पंढरी वाढे राऊळी वर्दळ ॥२

ठिगळाच्या पांघरूणा शेला म्हणती सकळ
फक्त जनीस दिसले होती तिची ती वाकळ
कशी मागावी कळेना जनी रडे घळघळ ॥३

- श्री.दि. इनामदार (दिंडी जाय दिगंतरा, प्रकाशक- साहित्य सेवा, औरंगाबाद, पृ. 38)

सध्या सर्वत्र वातावरण आषाढी वारीचे भारलेले असे आहे. गेली 700 वर्षे हा वारकरी संप्रदाय उभ्या महाराष्ट्रला व्यापून मनामनात ठाण मांडून बसलेला आहे. काळ नवा येतो आहे तसतशी वारी अजूनच उत्साहाने आनंदाने उर्जेने न्हाऊन निघत आहे. नविन पिढीलाही ती आपल्याकडे खेचून घेते आहे.  

जनाबाईंचे स्थान संत साहित्यात अतिशय वेगळे असे आहे. ही जनाबाई स्त्रीसुलभ भावना आपल्या अभंगांमधून मांडण्यासाठी प्रसिद्ध आहे. देवाशी भांडण करण्याची तिची ताकद पाहिली की पुरूषांपेक्षा स्त्रीची अभिव्यक्ती कशी वेगळी आहे हे दिसून येते. देवाला अगदी जवळचा समजून सखा समजून ती व्यक्त होते म्हणूनच त्याच्याशी तिला मनसोक्त भांडताही येते. 

जनाबाईच्या घरची कामं विठ्ठल करायचा अशी अख्यायिका आहे. त्याचा साधा मतितार्थ आजच्या काळात इतकाच घेता येतो की रोजच्या तिच्या जगण्यात विठ्ठलभक्ती अगदी ओतप्रोत भरून राहिली होती. रोजची कामं हीच तिची देवपुजा होती. अशा जनाईवरची औरंगाबादचे दिवंगत कवी श्री.दि. इनामदार यांची ही अतिशय गोड प्रसादिक रचना. संतांच्या रचनांची जी जातकुळी आहे त्याच शैलीत श्री.दि.नी संतांविषयी रचना केल्या आहेत. अशा रचनांचा एक आख्खा कविता संग्रहच ‘दिंडी जाय दिगंतरा’ या नावाने प्रसिद्ध आहे. त्याच संग्रहातील ही रचना. 

जनाबाईच्या घरचे दळण दळण्यासाठी विठ्ठल हातभार लावतो. पहाटे मंदिरात परत येताना थंडी असल्याने असेल कदाचित पण तो तिच्या घरची वाकळ अंगावर पांघरून घेता. मंदिरात ही वाकळ विठ्ठल मुर्तीच्या खांद्यावर आढळून येते आणि सर्वत्र गहजब उडतो. त्याचे वर्णन करणारी ही साध्या शब्दकळेतील पण प्रभावी कविता. देवाशी भांडणारी जनी जेंव्हा देवाच्या खांद्यावर आपलीच वाकळ पाहते आणि तिच्या डोळ्यातून खळखळा अश्रू वहायला लागतात. या साध्या कृतीतून तिची भक्ती काय प्रतीची असते याचा उलगडा रसिकांना ही कविता वाचताना होतो.

वारकरी संप्रदायात देव आणि भक्त यांच्यातील वेगळ्या नात्याचा उलगडा यातून होतो. हे नाते हृदयाचे आहे. हे नाते इतर संप्रदायांत वर्णन केल्याप्रमाणे रूक्ष कर्मकांडांने युक्त पाप पुण्याच्या धाकाने दबलेले नाही. जनाबाईंनीच एका अभंगात असे म्हटले आहे, ‘धरिला पंढरीचा चोर । गळा बांधांनिया दोर ॥ हृदय बंदिखाना केला । आत विठ्ठल कोंडिला ॥
ˆ
ˆ  
श्रीकांत उमरीकर  जनशक्ती वाचक चळवळ,244-समर्थ नगर, औरंगाबाद 431-001. मो. 9422878575

No comments:

Post a Comment