Thursday, October 31, 2019

मनसे-वंचित : ‘पाड’काम जास्त, ‘बांध’काम किंचित !!


उरूस  31 ऑक्टो 2019 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांत ‘एक हात लाकुड आणि दहा हात धिलपी’ या प्रमाणे मनसे आणि वंचित या दोन पक्षांचे नेते प्रवक्ते भरमसाठ दावे करत होते. प्रत्यक्षात यांची ताकद अतिशय नगण्य होती. पण यांनी केलेले दावे आणि त्याला मिळालेली प्रसिद्धी यांनी माध्यमांमध्ये एक ठराविक जागा व्यापलेली होती. मनसेने आम्हाला विरोधी पक्ष म्हणून निवडा असे आवाहन करून जागा लढवल्या केवळ 104. पैकी एकच आमदार निवडून आला आणि संपूर्ण महाराष्ट्रात एकूण मिळून 2.25 टक्के इतकीच मते मिळाली.

मनसे सारखेच मोठे दावे वंचित बहुजन आघाडीने केले होते. वंचितची तर भाषा कॉंग्रेसलाच आम्ही 40 जागा देतो अशी उद्धट राजकीय होती. या वंचितला 24 लाख मते म्हणजेच 4 टक्क्यांच्या जवळपास मतदान झाले. म्हणजेच लोकसभेला मिळालेल्या 41 लाख मतांच्या अर्धीच मते या वेळेस वंचितला मिळाली. एकूण 235 जागा वंचितने या विधानसभेत लढवल्या होत्या.

या दोन्ही पक्षांची चर्चा करत असताना मनसेने सेना भाजपच्या 10 जागा पाडल्या आणि वंचितने कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या 25 जागा पाडल्या असे आकडेवारीने सिद्ध केले जाते. हे आकडे खरे आहेत पण ते फसवे आहेत. वंचितची सगळी मतं ही कॉंग्रेस राष्ट्रवादीची आहेत तसेच मनसेची सगळी मते ही भाजप सेनेची आहेत असे एक गृहीतक मान्य करून ही मांडणी केली जाते.

वस्तुत: या आकड्यांच्या भ्रमातून बाहेर येवून या पक्षांचा आता विचार करणे भाग आहे. किती दिवस वारंवार कुणाला तरी पाडणारे पक्ष म्हणून यांचे मुल्यमापन केले जाणार आहे? मुळात प्रश्‍न असा निर्माण होतो की एखादा पक्ष ‘वोट कटुआ’ म्हणून सतत ओळखला जाणार असेल तर त्याला काही तरी भवितव्य असणार का?
गेली 13 वर्षे मनसे हा एक पक्ष म्हणून मतदारांसमोर आहे. प्रकाश आंबेडकरही वंचित या नावाने नसतील पण गेली 35 वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत. इतकी वर्षे झाल्यानंतरही यांचे मुल्यमापन यांनी कुणाच्या जागा पाडल्या असेच होणार असेल तर ते त्यांच्यासाठी अतिशय नामुष्कीचे आहे.

या निवडणुकीत कुठल्याही नोंदणीकृत पक्षा शिवाय जवळपास 20 टक्के इतकी प्रचंड मते बंडखोर किंवा सक्षम असे अपक्ष यांना गेली आहेत. यांची संख्याही 15 इतकी आहे. आता मनसे किंवा वंचितला हा सवाल विचारला गेला पाहिजे की प्रस्थापित पक्षां विरोधात तुमची आघाडी होती. त्यांना पर्याय म्हणून तूम्ही मतदारांना सामोरे गेला होता. मग या प्रस्थापित पक्षांना किंवा अगदी इतर छोट्या पक्षांना नाही म्हणणारा हा मतदार तूमच्या कडे का नाही आला?

नोटा किंवा अपक्ष यांच्याकडे वळलेला हा मतदार हे प्रस्थापित मोठ्या पक्षांपेक्षा जास्त वंचित आणि मनसेचे अपयश आहे. सांगली आणि लातूर ग्रामीण या दोन मतदारसंघात ‘नोटा’ ला दुसर्‍या क्रमांकाची मते मिळाली. हे मनसे आणि वंचितचे अपयश मानावे लागेल. कारण मनसेने मतदारांना सक्षम विरोधी पक्ष म्हणून निवडून द्या असा दावा केला होता. वंचित सतत असं सांगत आली होती की आपण प्रस्थापितांच्या विरोधात वंचितांना सोबत घेवून लढतो आहोत. मग त्यांना ही मते का नाही मिळाली?

मनसे आणि वंचित यांना अजून एक प्रश्‍न विचारला पाहिजे. हितेंद्र ठाकुर यांची बहुजन विकास आघाडी, अबू आझमी यांचा समाजवादी पक्ष, बच्चु कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष, विनय कोरे यांचा जनसुराज्य पक्ष, रवी राणा यांचा स्वाभिमानी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांना सोबत घेण्यात वंचित-मनसेला का अपयश आले? कॉंग्रेस राष्ट्रवादी सोबत फरफटत गेलेला राजू शेट्टी यांचा पक्ष यांच्या आघाडीत का नाही येवू शकला?

आज महाराष्ट्रात अशी परिस्थिती आहे की प्रस्थापित पक्षांशिवाय 29 आमदार इतर छोट्या पक्षांचे म्हणून किंवा अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. यातच वंचितने साथ सोडून दिलेल्या एमआयएम चे दोन आमदारही आहेत.
29 इतक्या मोठ्या संख्येने प्रस्थापित 4 राजकीय पक्षांशिवाय आमदार निवडून येतात शिवाय 25 टक्के इतकी प्रचंड मतेही या सर्व इतर उमेदवारांना प्राप्त होतात मग ज्या पर्यायी राजकारणाचा दावा मनसे किंवा वंचित करत होते त्यांच्याकडे ही मते का नाही गेली? या मतदारांना त्यांचा पर्याय विश्वासार्ह का नाही वाटला?

मनसे आणि वंचितचे अपयश अजून एका दृष्टीने बघायला पाहिजे. ज्या ठिकाणी त्यांचे उमेदवार उभे नव्हते त्या ठिकाणी त्यांनी इतर सक्षम अपक्ष किंवा छोट्या पक्षांच्या उमेदवाराला पाठिंबा का दिला नाही? वंचितने 235 जागी आपले उमेदवार उभे केले होते. साहजिकच उर्वरीत 53 जागी त्यांना इतर कुठल्याही सक्षम अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देता आला असता. मनसेने केवळ 104 उमेदवार उभे केले होते. त्यांनाही उर्वरीत 184 जागी इतर उमेदवारांना पाठिंबा देता आला असता. केवळ आदित्य ठाकरेंना वरळीत पाठिंबा देवून राज ठाकरेेंनी काय मिळवले? वैयक्तिक नात्याला महत्त्व आणि पक्षाला महत्त्व नाही का?

या दोन्ही पक्षांनी आपली विश्वासार्हता गमावली आहे. परत जेंव्हा हे मतदारांना सामोरे जातील तेंव्हा त्यांना अशाच किंवा या पेक्षाही मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागेल. सत्ताधार्‍यांना पर्याय शोधणारे राजकारण हे मनसे किंवा वंचितकडून होईल याचा विश्वास मतदारांना नाही. आजही भाजप सेनेला पर्याय म्हणून मतदार कॉंग्रेस राष्ट्रवादीकडेच पाहतो हे या निवडणुकीने स्पष्ट झाले आहे. हे पक्ष बदलले तर यांना भवितव्य आहे. नसता नाही. 

  

No comments:

Post a Comment