Thursday, October 10, 2019

छोट्या पक्षांची राजकीय भुरटेगिरी !


10 ऑक्टोबर 2019 

एका ‘राष्ट्रीय’ पक्षाने मोठ्या पक्षाशी युती केली. त्याला आपल्या वाट्याला ज्या जागा मिळाल्या त्या सर्व जागा लढवायला उमेदवारही मिळाले नाहीत. मग त्या पक्षाने बाहेरून उमेदवार आयात केले. या उमेदवारांना तिकीट वाटप करताना खर्‍याखुर्‍या राष्ट्रीय पक्षाने गुपचूप आपला ए. बी. फॉर्मही देवून टाकला. प्रत्यक्षात जेंव्हा अर्ज मागे घेण्याची तारीख उलटली तेंव्हा या ‘राष्ट्रीय’ पक्षाला कळाले की आपल्याला सोडलेल्या जागी ना आपला उमेदवार उभा आहे ना आपले चिन्ह त्याला आहे. मग यांनी उगीच उसना आव आणत ‘धोका’ झाल्याची ओरड केली.

ही काही कुठली कल्पित गोष्ट नाही. अगदी आत्ता घडलेला खराखुरा प्रसंग आहे. महादेव जानकर यांचा ‘राष्ट्रीय समाज पक्ष’ नावाचा एक पक्ष आहे (तो किती राष्ट्रीय आहे हे जानकर स्वत:ही सांगू शकत नाहीत). त्याला भाजप सेना युतीने तीन जागा सोडल्या होत्या. पैकी एक जागा त्यांचा आमदार निवडून आलेला आहे. बाकी दोन जागा परभणी जिल्ह्यातील गंगाखेड आणि जिंतूर अशा होत्या. जिंतूरला कॉंग्रेस मधून भाजपात आयात केल्या गेलेल्या मेघना बोर्डीकर यांना भाजपने तिकीट दिलं. चिन्हही दिलं. पण देताना सांगितलं की तूम्ही ‘रासप’ च्या उमेदवार आहात. गंगाखेडला शिवसेनेने आपला अधिकृत उमेदवार उभा केला. रासपला उमेदवारच मिळाला नाही. साखर कारखान्यामधील आर्थिक गुन्ह्यांसाठी तुरूंगात असलेले उद्योजक रत्नाकर गुट्टे यांना ‘रासप’ ने आपला उमेदवार बनवले आणि अर्ज भरायला लावला.

रामदास आठवले यांच्या पक्षाला अशाच पाच जागा मिळाल्या. पण त्यांचे उमेदवार भाजपच्या चिन्हावर उभे आहेत. मग आता ते अधिकृतरित्या कुणाचे उमेदवार? आठवले इतक्या वर्षांपासून राजकारणात आहेत. यांनी स्वत:चा म्हणून जो पक्ष आहे त्याचा काय आणि किती विस्तार गेल्या 25 वर्षांत केला? यांना स्वत:ला मंत्रिपद मिळालं (ते ही राज्यसभेवर खासदार म्हणून सत्ताधार्‍यांनी निवडुन आणल्यावर किंवा विधान परिषदेवर निवडुन आणल्यावर.) या शिवाय यांचा कोण सदस्य विधानसभेवर निवडुन आला व मंत्री झाला? गंगाधर गाडे यांना आमदार नसतानांच मंत्री केल्या गेलं. सहा महिने ते मंत्री राहिले. पण नंतर कुठल्याच सभागृहात निवडुन न आल्याने त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. सध्याच्या मंत्रीमंडळात अविनाश महातेकर हे पण असेच आमदार नसताना मंत्री बनवल्या गेले आहेत.

विनायक मेटे म्हणून असेच एक सद्गृहस्थ या भाजप सेना महायुती सोबत आहेत. त्यांचा म्हणून जो काही पक्ष आहे तो कुठे आणि नेमक्या किती जागा लढवत आहे ते कुणालाच माहित नाही. राजू शेट्टीं पासून बाजूला झालेले सदाभाऊ खोत यांनी ‘रयत क्रांती संघटना’ नावाचा एक पक्ष काढला. हा पक्ष कुठे आणि किती जागा लढवत आहे हे खुद्द सदाभाऊ यांना तरी माहित असेल का अशी शंका येते.

दुसरीकडे कॉंग्रेस राष्ट्रवादी सोबत असलेल्या छोट्या पक्षांची स्थिती यापेक्षा खराब आहे. राजू शेट्टी आघाडी सोबत आहेत. त्यांना लोकसभेत दोन जागा मिळाल्या. ते स्वत: वगळता दूसरा उमेदवाराच त्यांना मिळाला नाही. सांगलीची जागा न मागताच त्यांच्या गळ्यात पडली आणि वसंतदादांच्या घराण्यातील उमेदवार त्यांना आयात करावा लागला. आता विधानसभेला राजू शेट्टी आमदार होते तेवढा शिरोळ एकच मतदारसंघ आघाडीने त्यांना सोडला आहे. त्यांचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर आणि कोल्हापुरचे बहुतांश पदाधिकारी भाजपात गेले आहेत.

जनता दलाने आघाडीतून बाहेर पडून 9 जागा लढविण्याचे ठरविले आहे. समाजवादी पक्षाचे असेच हाल आहेत. आबु आझमी (मानखुर्द शिवाजीनगर) आणि कलीम कुरैशी (औरंगाबाद पूर्व) अशा दोनच जागा त्यांना सोडण्यात आल्या आहेत. तिसर्‍या भिवंडी (पूर्व) मध्ये समाजवादी पक्षा विरोधात कॉंग्रेसने आपला उमेदवार दिला आहे.

डाव्या पक्षांची तर अजूनच वाताहत आघाडीने करून टाकली आहे. भाकप आता 16 जागांवर स्वतंत्र लढणार आहे. कळवणमध्ये विद्यमान माकप आमदार जे.पी.गावित यांच्या विरोधात राष्ट्रवादीने उमेदवार दिला आहे. केवळ एक डहाणूची जागा माकपसाठी आघाडीने सोडली आहे. माकप 4 जागा लढवत आहे.

विनय कोरे यांचा 'जनसुराज्य' नावाचा एक पक्ष आहे. ते स्वत: शाहुवाडी मतदारसंघातून निवडणुक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात आघाडीने उमेदवार दिलेला नाही.

शेतकरी कामगार पक्षाला उरण आणि पनवेल या दोनच जागा आघाडीने सोडल्या आहेत. सांगोल्याची गणपतराव देशमुखांची परंपरागत जागाही राष्ट्रवादीने लाटली. आपला अधिकृत उमेदवार उभा केला. नंतर आता पत्रक काढून शेकापच्या उमेदवाराला (गणपतराव देशमुखांच्या नातवाला) पाठिंबा देण्याचे जाहिर केले आहे.

प्रहार संघटनेचे बच्चु कडू म्हणून आमदार आहेत. त्यांच्या विरोधात कॉंग्रेसने आणि वंचित बहुजन आघाडीनेही उमेदवार दिला आहे.

एकीकडे पुरोगामी म्हणवून घेणार्‍या बहुजन विकास आघाडी, भाकप, माकप, जनता दल, समाजवादी पक्ष, शेकाप, जनसुराज्य, प्रहार, स्वाभिमानी, भारीपचे काही तुकडे (गवई, कवाडे, इ.) या सगळ्यांची बोळवण आघाडीने एखाद दुसरी जागा देवून केलेली दिसते आहे. हे सगळे आघाडीत आहेत की नाहीत हे त्यांनाही सांगता येईना.

महाराष्ट्रातील या छोट्या पक्षांची अवस्था अतिशय दयनीय अशी झाली आहे. या पक्षांनी निवडणुकांच्या आधी जी विधाने केली आहेत ती तपासून पहा. म्हणजे यांचा भूरटेपणा दिसून येईल. एकेकाळी डाव्यांना (शेकापसह) काही एक विचारसरणी म्हणून मान तरी होता. भले त्यांच्या जागा कमी असो. त्यांना सामाजिक प्रतिष्ठा होती. आता त्यांची आंदोलनेही नि:संदर्भ होवून बसली आहेत. इतरांना तर विचारसरणी नावाची काही गोष्टच नाही.

वंचित बहुजन आघाडी, मनसे आणि एम.आय.एम. हे तीन पक्षही स्वतंत्रपणे लढत आहेत. वंचितने जास्तीत जास्त म्हणजे 244 जागी उमेदवार दिले आहेत. असला उपद्व्याप एकेकाळी बहुजन समाज पक्ष करायचा. (आताही त्यांनी उमेदवार उभे केले आहेतच.) त्या खालोखाल मनसेने 102 जागी उमेदवार दिले आहेत. त्यानंतर एम.आय.एम. चा नंबर लागतो. त्यांनी 24 उमेदवार उभे केले आहेत.

वंचित बहुजन आघाडी आणि मनसे यांनी इतक्या कोलांटउड्या मारल्या आहेत की त्यांनी आपणहून आपली विश्वासार्हता धोक्यात आणली आहे. एकीकडे प्रकाश आंबेडकर सगळ्या जागा लढवत आणि दुसरीकडे राज ठाकरे यांनी एकही जागा न लढवता जो काही खेळ लोकसभेसाठी केला तो कशासाठी होता याचे उत्तर अजूनही मिळाले नाही. कारण वंचितचा फायदा घेत एम.आय.एम. चा खासदार निवडून आला . राज ठाकरेंचा ‘लाव रे तो व्हिडीओ’ कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या पराभवाला रोकू शकला नाही. मग यांनी मिळवलं ते काय? आणि इतकी आपली प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ताकद सिद्ध करून कुणाशी युती आघाडी केलीच नाही. उलट एम.आय.एम. शी असलेली व्यवहारीक तडजोड वंचितने गमावली.

2009 मध्ये मनसेेचे 13 आमदार निवडून आणले होते शिवाय युतीचे सर्व खासदार मुंबईत पाडून दाखवले होते. एकेकाळी बसपाने विदर्भात असेच लाख लाख मते 6 मतदारसंघात घेवून दाखवले होते. याच वर्षी रामदास आठवले यांनी रिडालोआ (रिपब्लिकन डावी लोकशाही आघाडी) चा फसलेला प्रयोग सादर केला होता. 2014 मध्ये ‘आम आदमी पक्षाने’ लोकसभेला सर्वच जागी उमेदवार उभे करून एक वगळता सर्वांची अमानत गमावली होती.

पण या सगळ्या प्रयोगांतून कुठलेच शहाणपण तिसरी आघाडी शिकली नाही. 

प्रमुख राजकीय पक्ष वगळता उर्वरीत जे पक्ष आहेत ते एकत्र येवून का नाही काही एक आव्हान उभं करू शकले? किमान सगळ्यांना मिळून एकत्र प्रचाराची आघाडी तर निर्माण करता आली असती. ज्या मतदारसंघात आपला उमेदवार नाही त्या ठिकाणी दुसर्‍या छोट्या पक्षाला मते द्या असे तरी सांगता आले असते. पण जितके पक्ष छोटे तितके त्यांचे अहंकार मोठे. सत्ताधार्‍यांसोबत असलेल्यांना निदान सत्तेचा काही तरी तुकडा चाखायला मिळतो. पण विरोधातले पक्षही एकत्र येत नाही ही एक कमाल आहे.

युती आणि आघाडीतील प्रमुख पक्ष वगळता आज फारशी राजकीय ‘स्पेस’ छोट्या पक्षांना महाराष्ट्रात शिल्लक नाही. जी काही आहे ती व्यापत निवडुन येण्यासाठी जी राजकीय तडजोड करावी लागते ती कुणीच केलेली दिसत नाही. याचा मोठा तोटा या पक्षांना भोगावा लागणार आहे. आश्चर्य म्हणजे प्रस्थापित पक्षांतील बंडखोर स्वतंत्र लढणे पसंत करत आहेत पण ते अशा कुठल्याच छोट्या पक्षाच्या दावणीला गेलेले दिसत नाहीत. म्हणजे त्यांचाही या पक्षांवर भरवसा नाही.

वंचित बहुजन आघाडीला एक मोठी संधी तिसरी आघाडी उभारण्याची होती. पूर्वीचे सगळे मतभेद बाजूला ठेवून, सगळे पूर्वग्रह दूर सारून एक सक्षम अशी तिसरी आघाडी प्रस्थापितांना पर्याय म्हणून समोर आली असती तर त्याचा एक चांगला संदेश सामान्य मतदारांपर्यंत गेला असता. या तिसर्‍या आघाडीने खर्‍याखुर्‍या विरोधी पक्षाची भूमिका निभावली असती. भविष्यात या आघाडीला जनतेने अजून प्रतिसाद दिला असता. पण प्रमुख पक्षांच्या पेक्षाही यांच्यात जास्त मतभेद आहेत. वैयक्तिक  राग लोभ यांच्या तडजोडी आड आलेले दिसतात.

निवडणुकीची घोषणा होण्याआधी राजू शेट्टी राज ठाकरेंना कसे भेटले, प्रकाश आंबेडकर आणि राज ठाकरे ई.व्हि.एम. विरोधात कसे एकत्र येणार, किसान लॉंग मार्च मुळे डाव्यांची कशी ताकद वाढली आहे अशा फुगवलेल्या बातम्या पत्रकार देत राहिले. याचा काडीचाही परिणाम निवडणुकीत दिसून येत नाहीये. आज महाराष्ट्रातील मतदारांसमोर युती आणि आघाडी यांच्या शिवाय फारसा पर्याय दिसत नाही. दलित मुसलमान वंचित मतांचा मोठा टक्का वंचित आणि एमआयएम कडे वळला होता. तो आता परत आघाडीच्या सक्षम उमेदवाराकडे वळताना दिसतो आहे.

2009 ला ‘रिडालोस’चे, 2014 ला ‘आप’चे अपयश महाराष्ट्राने अनुभवले. आणि आता 2019 ला ‘वंचित’ आणि ‘मनसे’चे तसेच अपयश समोर येण्याची शक्यता आहे. तिसर्‍या आघाडीतील पक्षांसाठी ही धोक्याची घंटा आहे.

        श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

 
 

 
   

No comments:

Post a Comment