18 ऑक्टोबर 2019
राज ठाकरे यांची औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूरला प्रचाराची सभा होती. सभा कशी झाली? असा प्रश्न ग्रामीण भागातील एका तरूणाला विचारले. त्याने दिलेले उत्तर अतिशय मार्मिक आणि नेमके होते. भले भले पत्रकार जे लिहायला काचकुच करत आहेत किंवा मुद्दामहून लिहीत नाहीत ते या तरूणाने छानपैकी व्यक्त केले. तो म्हणाला, ‘राज ठाकरे म्हणजे राजकारणातले इंदुरीकर महाराज आहेत !’
राज ठाकरे भाषणांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांची भाषणं एकेकाळी टिव्ही चॅनलचा टिआरपी मिळवायची. त्यांच्या सभा नेमक्या 7 वाज. सुरू व्हायच्या. बहुतांश वाहिन्या या सभा लाईव्ह दाखविण्यात धन्यता मानायच्या. 2014 ला त्यांचा राजकीय फियास्को झाला आणि वाहिन्यांनी हात आखडता घेतला. राज ठाकरेंनी 2019 च्या लोकसभेला ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत उमेदवारांशिवाय प्रचार करण्याचा नवा टिआरपी खेचणारा फंडा शोधून काढला. या भाषण शोचे जेमतेम 9 एपिसोडच झाले. (मधल्या काळात शरद पवारांच्या मुलाखतीचाही एक शो राज ठाकरेंनी केला).
सर्व सभा संध्याकाळीच झाल्या होत्या. खाली मातीत लोक बसले आहेत, तळपत्या उन्हात नेत्याची वाट पहात आहेत, जीपा ट्रॅक्टर भरभरून लोक सभास्थळी आलेले आहेत असं कुठेच घडलं नाही. शांतपणे सगळ्या सभा रात्री पार पडल्या. लोकांना बसायला खुर्च्या मांडलेल्या होत्या. मुंबई पुण्यात मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमांना जशी गर्दी होते तशीच ही गर्दी होती. पण माध्यमांची या सभा मोदी विरोधात म्हणून गाजवायला सुरवात केली.
यांचा काडीचाही परिणाम मतदानावर झाला नाही. युतीची एकही जागा महाराष्ट्रात कमी झाली नाही. उलट टक्केवारी मतांमध्ये वाढच झाली. स्पष्टपणे 51 टक्के मते घेत 41 खासदार भाजप सेनेचे निवडून आले.
आता विधानसभेत नाही नाही म्हणत इव्हिएमवर टीका करत राज ठाकरेंनी 104 उमेदवार उभे केले. त्यांच्या प्रचारार्थ आता त्यांना सभा घेणे भागच होते. पण एव्हाना ‘लाव रे तो व्हिडीओ’ चा जोर ओसरून गेला होता. दिवसाला जेमतेम दोन किंवा तीन सभा सध्या राज ठाकरे घेत आहेत. कुठलीही वाहिनी आता या सभा लाईव्ह दाखवायला तयार नाही. त्यांच्या दृष्टीने राज ठाकरेंचा टिआरपी घसरला असावा.
राज ठाकरेंच्या सभा केवळ मनोरंजन म्हणून उरल्या आहेत. त्यांना कुणीच राजकीय दृष्ट्या गांभिर्याने घेत नाही. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या किर्तनांचा लोक मनोरंजन म्हणून किंवा स्टँड अप कॉमेडी म्हणून आनंद घेतात. पण कुणीही वारकरी सांप्रदायिक त्यांच्या किर्तनांना प्रमाण मानत नाही. त्यांचे दाखले कुणाला संदर्भ म्हणून चालत नाहीत. पारंपरिक ज्या गाथांवरच्या टीका वापरल्या जातात त्यांचाच संदर्भ वारकरी घेतात. जोग महाराज, साखरे महाराज, धुंडा महाराज देगलुरकर शंकर महाराज खंदारकर, सोनोपंत दांडेकर यांचा शब्द आजही वारकरी संप्रदायात प्रमाण आहे.
आज प्रत्यक्ष किर्तन करणार्यांत चैतन्य महाराज देगलुरकर, चंद्रशेखर महाराज देगलुरकर, राउत महाराज, मुकूंदकाका जाटदेवळेकर, गहिनीनाथ महाराज औसेकर, भास्करगिरी महाराज ही मंडळी अग्रेसर आहेत. वारकरी संप्रदायात यांना किंमत आहे. निवृत्ती महाराज इंदुरीकर किंवा त्या पूर्वीचे अशी शोबाजी करणारे बाबामहाराज सातारकर यांना नाही.
याच प्रमाणे राजकारणात राज ठाकरेंचे होवून बसले आहे. स्वाभाविकच त्यांच्याकडे कुणीही पर्यायी पक्ष म्हणून किंवा विरोधी पक्ष म्हणूनही पहात नाही. शरद पवार उतारवयात रोज जितक्या सभा घेतात तितक्याही राज ठाकरेंना घेता येत नाहीत. आजही कॉंग्रेस राष्ट्रवादीचेच उमेदवार भाजप सेनेला पर्याय म्हणून दुसर्या स्थानांवर आहेत.
आज कुणी कितीही टिक़ा करो कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांचे गावोगावी कार्यकर्त्यांचे जाळे आहे. पण भाजप सेनेला पर्याय म्हणून बढाया मारणार्या राज ठाकरेंना 288 उमेदवारही मिळालेले नाहीत. बुथनिहाय कार्यकर्ते मिळणे तर दूरची गोष्ट. त्यांच्या सर्व उमेदवारांच्या मतदारसंघात प्रचार करणे त्यांना शक्यही नाही.
बीड जिल्ह्यात आणीबाणीपूर्वी बाबुराव आडसकर आणि बापु काळदाते यांचा किस्सा प्रसिद्ध आहे. बापु काळदाते समाजवादी परिवारातले. अतिशय उत्तम भाषणं करण्यासाठी प्रसिद्ध. पण बाकी पक्षाचा सगळा कारभार भोंगळ. कॉंग्रेसचे बाबुराव आडसकर आपल्या कार्यकर्त्यांना म्हणायचे, ‘चांगलं बोलतो तर मानधन देवून पैसे लावून त्याची भाषणं ठेवू. मतं कशाला द्यायला पाहिजेत.’ आणि खरंच बीडच्या मतदारांनी बाबुरांवांना आमदार केले आणि बापु काळदातेंची भाषणं ऐकली (बापु आमदार आणि आणिबाणीत खासदार म्हणून निवडून आले ही बाब अलाहिदा).
आज राज ठाकरेंचा बापु काळदाते झाला आहे. भाषणं ऐकण्यासाठी लोक तयार आहेत. पण पाठीशी पक्षाची काहीच संघटना नाही, विश्वासार्ह कार्यकर्त्यांचं जाळं नाही, स्वत:शिवाय दुसरा कुणी नेता नाही. केवळ भाषणं आणि भाषणं. आधून मधून व्यंगचित्रं. कधी कधी खळ्ळ खट्याक. त्या निमित्ताने जोरदार प्रसिद्धी. बाकी काहीच नाही.
प्र.के. अत्रें असेच जोरदार भाषणं करायचे. पण लोक मतं देवून कॉंग्रेसला सत्तेवर बसवायचे. आज हीच परिस्थिती भाजपबाबत झाली आहे. राज ठाकरेंनी केलेली टीका लोकांनी ऐकून घेतली. टाळ्या वाजवल्या. हशा उसळला. पण सत्ता मात्र भाजपला बहाल केली.
विधानसभेत फारसं काही वेगळं होण्याची शक्यता नाही. युतीला दोनशे पेक्षा जास्त जागा मिळत असल्याचे सर्वेक्षणांतून पुढे आलं आहेच. मनसेचे मात्र खातंही उघडतं की नाही अशी शंका आहे. राज ठाकरे अध्यात्मात असले असते तर इंदूरीकर महाराजांना जबरदस्त स्पर्धा तयार झाली असती. पण इंदूरीकर महाराजांचे नशिब चांगलं आहे. राज ठाकरे किर्तन करत नाहीत.
श्रीकांत उमरीकर जनशक्ती वाचक चळवळ, 244-समर्थ नगर, औरंगाबाद 431-001. मो. 9422878575
No comments:
Post a Comment