Monday, October 3, 2016

युवा प्रतिभेचा आविष्कार ‘प्रतिभा संगम’

उरूस, पुण्यनगरी, 3 ऑक्टोबर 2016 

आता महाराष्ट्रात चांगला पाऊस पडत आहे पण दुष्काळाच्या आठवणी मात्र जातच नाहीत. एक कवी लिहीतो

माळावर हाडकांच्या ढिगावर
टपून बसलेला असतो दूष्काळ
चॅनेलवाल्यांच्या कॅमेर्‍या सारखा
काही वेगळी बातमी मिळते का 
ते पाहण्यासाठी

काळ दूष्काळ घाबरतात फक्त
मानवतेने मदत करणार्‍या माणूसकीला
धान्य-चारा पाठवणार्‍या हातांला
आणि झाड लावून जगवणार्‍या माणसाला

काळ आणि दूष्काळ घाबरतात फक्त
श्रमदानाने बांधलेल्या बंधार्‍याला
दानपेटीतील धन देणार्‍या ईश्वराला
आणि दूष्काळातही 
तडफडत जगणार्‍या जिद्दीला..

ही कविता जेंव्हा मंचावरून सादर होते तेंव्हा उपस्थितांकडून प्रचंड टाळ्यांचा प्रतिसाद मिळतो. ही घटना कुठल्याही प्रस्थापित कविंच्या कविसंमेलनातील नाही. ही कविता सादर करणारा कवी कुणी प्रस्थापित मोठा कवी नाही. सातार्‍याच्या उन्मेष पाटील या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची ही कविता आहे. आणि या कवितेला दाद देण्यासाठी महाराष्ट्राच्या 19 जिल्ह्यांतून 500 त्याच्याच वयाचे  विद्यार्थी साहित्यीक गोळा झालेले असतात. ही घटना आहे 23,24,25 सप्टेंबरला नाशिक येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने  भरविलेल्या ‘प्रतिभा संगम’ या विद्यार्थ्यांच्या साहित्य संमेलनातील.

1996 साली ज्ञानेश्वरीला सातशे वर्षे पूर्ण झाली म्हणून विद्यार्थ्यांसाठी  एक साहित्य संमेलन घेण्याचे विद्यार्थी परिषदेने ठरविले. तेंव्हापासून आजतागायत ही साहित्य संमेलने भरविली जात आहेत. नाशिकला संपन्न झाले ते 15 वे साहित्य संमेलन होते. प्रतिष्ठीत नामांकित साहित्यीकांना पाहूणा म्हणून बोलविले जाते. त्यांच्या मुलाखती, त्यांची भाषणे, परिसंवाद, चर्चा यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चांगले वाङ्मयीन सकस खाद्य दिले जाते. 

या संमेलनांचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांसाठी अयोजित केल्या जाणार्‍या गट चर्चा. वीस पंचेवीस विद्यार्थी साहित्यीकांचा एक गट करून एका मान्यवर साहित्यीकाकडे सोपविला जातो. आपला लेख, कविता त्या विद्यार्थ्याने तेथे वाचून दाखवायचा असतो. सर्वांच्या लेखनावर सविस्तर चर्चा होते. मान्यवर साहित्यीक अनौपचारिक रित्या त्यांच्याशी गप्पा मारून त्यांच्या साहित्यातील बलस्थाने व मर्यादा समजावून सांगतात. गट छोटा असल्याने प्रत्येकाशी बोलणे शक्य होते. विद्यार्थीही आपली मतं मोकळेपणाने मांडू शकतात. आपल्या बालीश वाटणार्‍या शंकाही विचारू शकतात. 

या गटश: चर्चांमधून जे कवी आहेत त्यांतील चांगल्या कवींची एक यादी तयार केली जाते. निमंत्रित कविंसोबत या विद्यार्थी कवींना  कविता म्हणायची संधी दिली जाते. या कविसंमलनाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व मान्यवर मंचासमोर बसतात. आणि विद्यार्थी कवी मंचावर विराजमान असतात. ज्या विद्यार्थ्यांनी वैचारिक लेखनात सहभाग नोंदवला असतो त्यांतील तीन विद्यार्थी निवडून त्यांना मान्यवर पाहूण्यांसह मंचावर बसविले जाते. उपस्थित विद्यार्थी त्यांना विविध प्रश्न त्या विषयावर विचारतात. 
ज्या विद्यार्थ्याला बक्षिस मिळते तो विद्यार्थी पुढच्या संमेलनात वाङ्मयीन कार्यकर्ता म्हणून आयोजनात मदत करतो.  इतकेच नाही तर जे विद्यार्थी या संमेलनात चमकले ते आता मान्यवर कवी म्हणून आमंत्रित केले जातात. या वर्षी कवी संमेलनाचे संचालन करणारा संदिप जगताप जो आता महाविद्यालयात प्राध्यापक आहे आणि मान्यवर तरूण कवि म्हणून महाराष्ट्रात त्याचा लौकिक आहे तो पूर्वीचा काव्यस्पर्धेचा विजेता होता. पूर्वीचे विजेते सागर संजय जाधव, दत्ता सोनवणे, विजय सुतार हे या वर्षी मान्यवर कवी म्हणून कविता सादर करीत होते.

प्रतिभा संगम मधून लेखक म्हणून पुढे आलेले कित्येक जण आज मराठी साहित्यात आपले नाव कमावून आहेत. कादंबरीकार कवी बालाजी इंगळे, कवी अनुवादकार प्रा. पृथ्वीराज तौर, कवी केशव खटींग, साम टिव्हीत सध्या कार्यरत असणारा दुर्गेश सोनार, निकिता भागवत, किशोर मासिकाचा कार्यकारी संपादक असलेला किरण केंद्रे, भुषण राक्षे, नामदेव कोळी, ललित अधाने अशी कितीतरी नावे आहेत.

संपूर्ण तीन दिवस ज्या परिसरात हे संमेलन आयोजित केले जाते त्याचे एक पावित्र्य जपण्याचा सगळेच मन:पूर्वक प्रयत्न करतात. पाचशे महाविद्यालयीन मुलं मुली जिथे अहोरात्र एकत्र आहेत तिथे गडबड गैरप्रकार होण्याची खुप शक्यता असते. पण असले काही आजतागायत या संमेलनांमध्ये घडले नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे हे एक निव्वळ संमेलन नसून हा एक महत्त्वाचा वाङ्मयीन संस्कार आहे. संमेलनाचे संस्थापक आणि अजूनही आपल्या करड्या नजरेने सर्व काही न्याहाळणारे प्राचार्य नरेंद्र पाठक यांना याचे मोठे श्रेय जाते. त्यांना नुकतेच राष्ट्रपतींनी उत्कृष्ठ शिक्षक पुरस्कार देवून गौरविले आहे.

संमेलनाच्या परिसराचे पावित्र्य याबाबत एक घडलेला प्रसंग मोठा लक्षणीय आहे. एका ज्येष्ठ कवीला संमेलनासाठी आमंत्रण होते. ते इतर मान्यवरांसोबत त्या परिसरात वावरत असताना आपल्या दूसर्‍या मान्यवर कवी मित्राला हळूच बाजूला घेवून म्हणाले, ‘मित्रा जरा बाहेर जावून येवू.’ दूरवर जावून त्यांनी एक पानटपरी शोधली. सिगारेट घेतली आणि  खुलासा केला, ‘मित्रा मला सिगारेटची तलफ येते. पण इथे कसा ओढणार? यांनी वातावरण इतकं पवित्र राखलं आहे. आपण कशाला त्याला गालबोट लावा.’

दूसर्‍या एका मान्यवर कवींचा किस्सा याच्या नेमका उलटा आहे. सर्व मान्यवर कवी संमेलन स्थळी गोळा झाले पण हे महाशय आलेच नाही. दूसर्‍या दिवशी त्याचा खुलासा झाला. या मान्यवर कवी महाशयांना कवितेची नशा चढायच्या आधी दूसर्‍या ‘नशेची’ सवय होती. प्रतिभा संगमचे संयोजक तसे या बाबत अतिशय खमके. त्यांनी आमंत्रित कवीला तसेच वापस पाठवणे पसंद केले. पण त्याला काव्यरसाच्या ‘नशेत’ आपल्या मंचावर चढू दिले नाही. 

विद्यापीठाच्या पातळीवर युवक महोत्सव घेतला जातो. पण स्वतंत्रपणे विद्यार्थी प्रतिभेला वाव देण्यासाठी साहित्य संमेलनाचे आयोजन मात्र कुठेच करण्यात येत नाही. त्यासाठी विद्यार्थी परिषद चिवटपणे गेली 20 वर्षे हे काम करत आहे यासाठी त्यांना धन्यवाद द्यायला हवे. 

या कार्यक्रमाच्या आयोजना दर्जा वाढविण्याच्या दृष्टीने अजून बर्‍याच गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. विद्यार्थी साहित्यीकांमधील प्रतिभा शोधून त्यांना आधी विभागीय किंवा विद्यापीठीय पातळीवर निवडाल्या गेले पाहिजे. मग अशा निवडक विद्यार्थ्यांना राज्य पातळीवर एकत्र केले जावे. सरधोपट सगळेच बरे वाईट लिहीणारे एकत्र गोळा करून तसा फार फायदा होता नाही.

दूसरी सगळ्यात मोठी अडचण वाचनाच्या बाबत आहे. मूळात या तरूण लेखकांनी चांगले वाचन केले पाहिजे. त्यासाठी महाविद्यालयीन पातळीवर वाचक मंच सारखे उपक्रम राबविले जायला हवे. निवडक 100 पुस्तकांची यादी करून ही पुस्तके या लिहीणार्‍या वाचणार्‍या प्रतिभावंत मुलांपर्यंत पोचवायला हवी. अनौपचारिक रित्या ही सगळी मुलं स्थानिक पताळीवर अशा साहित्यीक आयोजनांमध्ये जोडून घ्यायला हवी. मग अशांची मिळून राज्याच्या पातळीवर एक मोठी चळवळ वाढीस लागेल.

पक्षीय मतभेद बाजूला सारून या संमेलनाला मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या श्रीमती निलीमाताई पवार यांनी उदार आश्रय दिला, स्वागताध्यक्षपद स्विकारलं आणि यशस्वीरित्या निभावलं याचीही दखल घेतली पाहिजे. 
     
          श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

No comments:

Post a Comment