Wednesday, October 19, 2016

वेरूळ महोत्सवाची महती । कुणाच्या ट्रॅकवर कुणाचे ओठ हलती ॥



उरूस, 19 ऑक्टोबर 2016 

मध्ये बर्‍याच वर्षांपासून बंद पडलेला वेरूळ महोत्सव एकदाचा या वर्षी पार पडला. पण अशा पद्धतीनं पार पडला की यापेक्षा तो बंद होता हेच चांगले होते असे म्हणायची पाळी आली.

मूळात महाराष्ट्र शासनाचे पर्यटन विकास महामंडळ एकूणच पर्यटनासाठी करते काय हा प्रश्न आहे. शासनाने किमान पायाभूत सोयी पर्यटन स्थळांच्या ठिकाणी उपलब्ध करून द्याव्यात. इतके प्राथमिक काम केले तरी खुप आहे. पण आजही जगप्रसिद्ध पर्यटन स्थळांपर्यंत जाण्यासाठी चांगले रस्ते उपलब्ध नाहीत. त्या ठिकाणी पिण्याचे पाणी, प्रमाणबद्ध नकाशे, माहिती सांगणारे निर्दोष फलक, पर्यटन स्थळांची माहिती देणारे गाईड, त्यांच्या प्रशिक्षणाची चांगली सोय, रेल्वे स्टेशन व बस स्टँडवर माहिती देणारे कक्ष अशा किमान सोयी शासनाने करणे अपेक्षीत आहे. बाकी हॉटेल वगैरे व्यवस्था खासगी व्यवसायीक करू शकतात.

पण ही करायची कामं सोडून शासनाला पर्यटन महोत्सव आयोजित कर, पर्यटन महामंडळाकडून हॉटेल चालव, संगीत महोत्सव आयोजीत कर यांची मोठी हौस आहे. जे काम करायचे ते सोडून इतर कामं करण्यात अधिकार्‍यांना का रस असतो? याचे महत्त्वाचे कारण म्हणजे अशा कामांमध्ये बर्‍यापैकी ‘ग्लॅमर’ असते. जगप्रसिद्ध कलाकरांशी सलगी साधता येते. त्यांच्यासोबत आपले, आपल्या कुटूंबाचे फोटो काढून घेता येतात. या कार्यक्रमांना वर्तमानपत्रांमधून, इतर माध्यमांमधून चांगली प्रसिद्धी मिळते. सांस्कृतिक क्षेत्रावर सत्ता गाजवता येते. या निमित्ताने आपली उठबस मोठ्या कलाकारांमध्ये होते.

यासोबतच दुसरे कारण म्हणजे असे महोत्सव हाती असले म्हणजे त्या गावातील एकूणच सांस्कृतिक क्षेत्रावर आपल्याला प्रभाव टाकता येतो. छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी स्थानिक कलाकारांना सरकारची, प्रायोजकांची गरज असते. ते आपल्या दारात आले की हळूच आपली बायको, मुलगी, मेहुणी, मेहुणा कुणाला तरी या क्षेत्रात संधी देण्यासाठी घुसडता येते.

मध्यंतरी वेरूळ महोत्सवात जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, पोलिस आयुक्त यांच्या बायकांनी पण गाण्यासाठी नृत्यासाठी सहभाग नोंदवला होता. कलाकार म्हणून त्यांचे सादरीकरण अतिशय सुमार होते. पण ती कलाकार पडली अधिकार्‍याची बायको. तिच्या कलेबाबत परखड मत कोण व्यक्त करणार?

दुसरीकडून काही दुय्यम दर्जाच्या कलाकारांनाही या अधिकार्‍यांचे लांगूलचालन करायला आवडते. कारण देशी परदेशी मोठ्या महोत्सवांमध्ये हजेरी लावायची असेल तर दुय्यम दर्जाच्या कलाकारांना वशिला हवाच असतो. त्याशिवाय त्यांना बोलवतेच कोण. याचा परिणाम म्हणजे असे सरकारी महोत्सव कलेच्या दृष्टीने सामान्य किंवा फारसे काहीच न देणारे ठरतात.

या वर्षी औरंगाबादेतील वेरूळ महोत्सवात (आता त्याचे नाव वेरूळ अजिंठा औरंगाबाद आंतरराष्ट्रीय महोत्सव असले तरी मूळात हे नाव वेरूळ महोत्सव असेच होते. आणि हा महोत्सव प्रत्यक्ष वेरूळ इथे कैलास लेणीच्या परिसरातच भरायचा.) अजय-अतूल, अदनान सामी यांना आमंत्रित केले होते. मूळ प्रश्न असा आहे की अशा व्यावसायीक कलाकारांना आमंत्रित करण्याचे काय कारण? या कलाकारांना कोणत्या प्रोत्साहनाची गरज आहे? यांच्यामुळे अभिजात भारतीय संगीताला अशी कोणती चालना मिळाली आहे? यांचे कार्यक्रम इतर मोठ्या इव्हेंट कंपन्या घेतच असतात.

जास्तीत जास्त रसिकांनी यायला पाहिजे. म्हणून अशा लोकप्रिय कलाकारांना आमंत्रित करावे लागते. हे समर्थन अतिशय लंगडे आहे. मुळात जर हा महोत्सव पर्यटनाला चालना देण्यासाठी, भारतीय अभिजात संगीताला चालना मिळण्यासाठी भरविण्याचे उद्दीष्ट आहे तर मग अजय-अतूल आणि अदनान सामी यांच्या बोलावण्याने ते कसे काय साध्य होते? आणि जास्तीत जास्त लोक गोळा करायचे, जास्तीत जास्त तिकीटं विकल्या गेली पाहिजे, खर्च भरून काढता आला पाहिजे असे जर असेल तर हा उठारेटा शासनाने करूच नये. कारण हे करणारे इतर लोक आहेत.

या कलाकारांनी आपली कला ‘लाईव्ह’ सादर करण्याऐवजी साऊंड ट्रॅक वापरून गाणी म्हटल्याचे उघड झाले. यातून कला म्हणून जे काही चालू आहे त्याचेही पितळ उघडे पडले.

या सोबतच अभिजात कलाप्रेमींची नाराजी होवू नये म्हणून वेरूळलाही एक दिवस स्थानिक कलाकारांना बोलावून कार्यक्रम सादर करण्यात आला. शिवाय लोक कलाकारांसाठी सिडकोतील कलाग्रामचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. म्हणजे स्वत: शासनानेच अशी विभागणी मान्य करून टाकली. कैलास लेण्याच्या पायथ्याशी स्थानिक कलाकार अभिजात संगीत सादर करणार. कलाग्राममध्ये लोक कलाकार आपली कला सादर करणार. त्यांच्याकडे कुणी ढूंकूनही पहायलाही तयार नाही. आणि सोनेरी महालच्या कार्यक्रमात अजय-अतूल आणि अदनान सामी भव्य धांगड धिंगा साउंड ट्रॅकवर घालणार. त्याला मात्र झाडून सगळे अधिकारी बायका पोरांसह हजर राहणार. कलेसाठी चळवळ करणार्‍या संस्थाही आवर्जूृन याच ठिकाणी हजार तिकीटं आरक्षीत करून आपण कसे ‘कलेचे सागर’ आहेत हे सिद्ध करणार.

हे असं का होतं? कलाकाराने आपली निष्ठा रसिकांच्या काळजापाशी न ठेवता सरकारी अधिकार्‍यांच्या पायाशी गहाण ठेवणे आणि रसिकांनीही कलेशी प्रतरणा करून झगमगाटाला महत्त्व देणे यातून हे अपघात घडतात.
याच वेरूळ महोत्सवाचा पूर्वरंग म्हणून हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरीवादनाचा कार्यक्रम 1 ऑक्टोबर रोजी ठेवण्यात आला होता. वयाने थकलेल्या चौरसियांना दमदार फुंक मारता येत नव्हती. हात कापत होते. बासरीचे सूर स्वच्छ उमटत नव्हते. त्यांना साथ करणार्‍या विवेक सोनार तरूण कलाकाराने अतिशय ताकदीने वाजविले. तबला वादक रिंपा शिवा या तरूणीनेही आपल्या बोटांची जादू दाखविली. पण कार्यक्रम संपल्यावर सगळ्या अधिकार्‍यांनी, त्यांच्या कुटूंबियांनी हरिप्रसाद चौरसियांसोबत सेल्फी काढण्यासाठी जी गर्दी केली त्यावरूनच या आयोजनाचा हेतू स्वच्छ कळला.

कर्नाटकात रस्त्यावर गाणी म्हणत फिरणारी एक जमात आहे. ही मंडळी कन्नड मराठी भजनं मोठ्या गोड गळ्यानं गातात. कुणाला काहीच न मागता पहाटे दारात उभं राहून गाणं म्हणतात. कुणी काही दिलं तर घेतात. घरात बोलावलं तर आत येवून खाली बसून गातात. नसता दारात उभं राहूनच आपली कला सादर करतात. वेरूळ महोत्सवाचे महागडे तिकीट सरकारी अधिकार्‍यांच्या दबावाने खरेदी करणारे या रस्त्यावरच्या गोड गळ्याच्या गायकांना पैसे देताना हात आखडता घेताना पाहून मला फार वाईट वाटले होते. वेरूळ महोत्सवाचा झगमगाट आणि या कलाकारांचा साधेपणा यांच्यावर 2007 मध्ये लिहीलेली ही कविता. माझा पहिला आक्षेप सामान्य रसिकांवरच आहे.


उतरा की जरा
अपार्टमेंटी मनोर्‍यातून खाली

निमंत्रणाविना
प्रयोजकांच्या झगमगीत व्यासपीठाविना
रस्त्यावर उभं राहून
गाणार्‍याचा सच्चा सूर 
पडला नाही का तूमच्या कानावर
कानातले संस्कृती रक्षणाचे बोळे
काढून फेका की बाहेर

घाला नं खिशात हात
का फक्त शासकीय अधिकार्‍यांनी माजवलेल्या
‘महोत्सवी अय्याशी’लाच
सलाम करतात तूमच्या नोटा

तूमच्या श्रीमंत खिशातली
दरिद्री रक्कम
डोळे झाकून लावतो तो भाळी
हळूच सरकतो पुढच्या दारी

का बावचळलात असे
मी कुठं तूम्हाला म्हणालो
सांस्कृतिक भिक़ारी

रसिकांनी सांस्कृतिक व्यासपीठं आपल्या हिंमतीवर चालवली पाहिजेत. कलाकारांनी त्यांना सर्वतोपरी मदत करून कलेचा विकास घडवून आणला पाहिजे. समाजाची एकूणच कलाविषयक अभिरूची उंचावली पाहिजे. सरकारला रस्ते वीज पाणी कचरा या मुलभूत समस्यांवर काम करू द्या.
           
                  श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575    
   

No comments:

Post a Comment