Monday, October 10, 2016

शेंदूर फासलेले ओबडधोबड मुखवटे देवी म्हणून का पुजायचे?

  
उरूस, 10 ऑक्टोबर 2016 

सध्या नवरात्र जोरात आहे. जिकडे तिकडे देवीच्या मंदिरांमध्ये आणि परिसरात धूम आहे. या काळात आवर्जून कुठे कुठे देवी आहे ती मंदिरे शोधून त्यांचे फोटो वर्तमानपत्रांत प्रसिद्ध केले जातात. बहुतांशवेळा दगडाला शेंदूर फासलेला असतो आणि त्याला महालक्ष्मी, अंबा, महाकाली असे काहीतरी नाव दिले जाते. या सगळ्यां ठिकाणांच्या कथा साधारणत: सारख्यात असतात. देवीचा कुणी भक्त (ही महिला का नाही कुणास ठाऊक. नेहमी पुरूषच असतो.) तिच्या मंदिरात नियमित जात असतो. मग कालांतराने त्याला वयपरत्वे जाणे होत नाही. मग तो देवीला विनंती करतो. देवी त्याच्यावर प्रसन्न होवून तूझ्याच गावी मी येते असं सांगते. पण अट असते की त्याने मागे वळून पहायचे नाही. हा भक्त मागे वळून पहातोच. आजतागायत एकही अशी कथा हाती लागली नाही की या भक्ताने देवीने सांगितलेले सर्व नियम पाळले. मग देवी अंतर्धान पावते. तिथे जो दगड असतो त्यालाच शेंदूर फासून देवी समजले जाते. मग त्याची पूजा केली जाते वगैरे वगैरे. 

देवीचा तांदळा (फक्त मुखवटा) का पूजला जातो याच्या काही साधार कथा पुराणात आहेत. त्यांच्यात मी पडत नाही. हा तांदळा बर्‍याच ठिकाणी अतिशय सुबक सुंदर आहेही. अशांबाबत स्वतंत्रपणे लिहीता येईल.

पण मुद्दा आहे की जागोजागी जे शेंदूर फासलेले ओबडधोबड मुखवटे आहेत त्यांना अजूनही तशाच स्वरूपात का पुजल्या जाते आहे? का नाही असा निर्णय झाला की हा शेंदूर खरवडून काढू. आत काय मूर्ती आहे ते शोधून काढून. नसेल तर चांगली मूर्ती आणून बसवू. स्वातंत्र्यापूर्वी परकीयांची राजवट होती. त्यातील मूर्तीपूजेच्या विरोधातील राजवटींच्या भितीखाली जर असा काही प्रकार घडला असेल तर त्याचा आता पुनर्विचार करायचा का नाही? काय म्हणून जून्या गोष्टी उगाळत बसायचे? 

केवळ मुखवट्याची पूजा करणे हे एकवेळ समजता येईल. पण नुसताच ओबडधोबड शेंदूर फासलेला दगड काय म्हणून पुजायचा? मराठवाड्यात जालना जिल्ह्यात अंबडला मत्स्योदरी देवीचे मंदिर आहे. मला बरेच दिवस असे वाटत होते की ही एकच देवी आहे. प्रत्यक्षात मंदिरात गेल्यावर कळले की एक नसून या तीन देवता आहेत. बरे एक साधा बालीश प्रश्न यातील महाकाली कोणती, महासरस्वरती कोणती आणि महालक्ष्मी कोणती? कारण सगळ्याच सारख्यात ओबडधोबड आहेत.
 
असं काही बोललं की लगेच भक्तांच्या भावना दुखावल्या जातील म्हणून कुणी काही बोलतच नाही. अंबाजोगाईला योगेश्वरी देवीचे मंदिर आहे. इथेही मूर्ती वगैरे काहीच नाही. केवळ देवीच्या नावाखाली एक भलामोठा शेंदूर फासलेला दगड ठेवलेला आहे. त्याला चांदीचे डोळे बसवलेले आहेत. आता यात नेमके काय सौंदर्य आहे ते मला आजतागायत कळाले नाही. माहूरला रेणुका माता आहे. इथेही केवळ मुखवटा आहे. कुणीही सौंदर्यशास्त्राच्या दृष्टीने पाहून सांगावं या मुखवट्याचे डोळे, नाक, तोंड हे कोणत्या प्रमाणात आहेत? आणि हे जे काही पुराण काळापासून चालू आहे ते तसेच का ठेवले जाते आहे? निदान यात बदल करून चांगला सुंदर मुखवटा का बसवला जात नाही.

मूळात ज्याला हिंदू/वैदिक संस्कृती म्हणून गौरविले जाते ती कधीच स्थितीवादी नव्हती. ती सतत बदलत राहिलेली आहे. जूने आहे तेच कवटाळून बसणे हा हिंदू म्हणविल्या जाणारा जीवन पद्धतीचा गुणधर्म नाही. कितीतरी गोष्टी बदलत बदलत आत्ता आपल्याला जे दिसते आहे तिथपर्यंत आल्या आहेत. मांसाहार हा या वैदिक धर्मात सर्रास होत होता. हळू हळू शेतीचा प्रदेश वाढत गेला. धान्याची उपलब्धता जास्त जास्त होत गेली. तस तसा शाकाहाराचा टक्क़ा वाढत गेला.

याच शाकाहाराला धर्म-परंपरेचा गोंडस साज चढवून आज त्याचा प्रचार केला जातो आहे. वेदात मूर्तीपूजा नाही. पण आज मूर्तीपूजा मोठ्या प्रमाणात केली जाते आहे. जे देव देवता आपण आज पुजतो त्यांची नावंही वेदांत नाहीत. 

इतके कशाला हा महाराष्ट्र ज्या विठ्ठलाची पुजा करतो तो विठ्ठलही फार पुराणकालीन देव नाही. वारकरी संप्रदायाने गेल्या 700 वर्षांत जे बदल आणले ते आधी कुठे होते? गुरू करायचा नाही, सोवळे ओवळे न पाळता केवळ धुतवस्त्र नेसायचे, प्रत्येकाने प्रत्येकाच्या पाया पडायचे, गळ्यात तुळशीची माळ घालायची, शाकाहाराचे पालन करायचे, महिन्यातील दोन एकादशींना उपवास करायचा, वर्षातून निदान एक वेळ पंढरीची यात्रा करायची (या चार यात्रा आहेत आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैती. नसता पंढरपुर म्हटलं की आषाढीची यात्राच फक्त डोळ्यासमोर येते).

हे सगळे धार्मिक बदल आपण स्विकारलेच ना? तेंव्हा आपला धर्म कुठे आड आला होता? यासाठी काय कुणी विरोध केला? का काही दंगल उसळली? 

जागोजागी मंदिरांचे निर्णाद्धार केल्या गेले. खुद्दा शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर तुळजा भवानीची स्थापना केली. तेंव्हा काही दगडाला शेंदूर नाही फासला. चांगली सुरेख काळ्या पाषाणातील देवीची मूर्तीच स्थापन केली. 

या दगडी ओबड धोबड मुखवट्यांमध्येही एक दुष्टावा आहे. केवळ ग्रामीण भागातच हे मोठ्या प्रमाणात आढळतात. नव्याने शहरात जी देवीची मंदिरे होत आहेत तेथील मुखवटे सुबक आहेत. त्यांना सोन्या चांदीची आभुषणे आहेत. मंदिरांचा परिसर स्वच्छ आढळतो. या मंदिरात नियमितपणे पुजा पाठ करणार्‍यांची व्यवस्थित सोय केली जाते. याच्या नेमके उलट खेड्यांतील जूनी देवीची मंदिरं आढळतात. मंदिर म्हणून फार काही भव्य चिरेबंदी बांधकाम आढळतच नाही. जूनं मंदिर म्हणायला आपण म्हणतो पण त्यात कुठेही पुरातन भारतीय स्थापत्य शैली म्हणून काही आढळत नाही. 

अशी मंदिरं महादेवाची आहेत. देवीची जी मोठी मोजकी मंदिरं आहेत तेथील स्थापत्य अप्रतिम आहे. तुळजापुर किंवा कोल्हापुर येथील मंदिरं अप्रतिम आहेत. पण माहुर किंवा वणी येथील मंदिरांमध्ये स्थापत्य शैलीचे सौंदर्य म्हणून काहीही नाही. खरं तर या परिसराचा जिर्णोद्धार व्हावा म्हणून का प्रयत्न केला जात नाही?

केवळ दगडाला फासलेला शेंदूरच नाही तर सगळा परिसरच भक्तीचा ओबड धोबड शेंदूर फासलेला का जाणवतो? का नाही नव्या पद्धतीनं ही देवीची ठिकाणं सुंदर करावयाची? 

ज्या काही दंतकथा आहेत त्या देवीच्या मुर्तीबाबत किंवा मुखवट्याबाबत असतात. पण देवीचे मंदिर कसे असावे याचाही काही दृष्टांत देवी देवून ठेवते का? हा सगळा परिसर स्वच्छ, सुंदर, शिल्पांनी मढलेला, जिथे येताच भक्तीभाव दाटून यावा असा का केला जात नाही?

आधुनिक काळात माणसाला हे जे ताणतणाव आहेत ते सहन करण्यासाठी उबदार कुटूंबव्यवस्था हवी त्याचप्रमाणे धार्मिक स्थळंही हवी असतात असे मानसोपचार तज्ज्ञ सांगतात. एकीकडे आपण कितीही बुद्धीवादी म्हणवून घेवो. दुसरीकडे मनाला आधार म्हणून बहुतांशजणांना मंदिरात गेलेलं चांगलं वाटतं ही वस्तुस्थिती आहे. जून्या काळी ज्या मंदिरांची रचना केलेली आहे ती अतिशय अप्रतिम आहे. स्थापत्याच्या दृष्टीने तर ही मंदिर अवर्णनीय आहेत. 

नेमका मध्ययुगीन कालखंड असा आहे की ज्या काळात कळाहीन मंदिरं स्थापन झाली. याचे खापर कुणावरही ठेवा पण हे घडलं हे मात्र खरं आहे. 

जूना सगळा काळ आपण मागे सोडून देवू. त्याची फारशी चर्चा करूनही काही घडणार नाही. सध्या नवरात्र चालू आहे म्हणून मी देवीच्या मंदिरांबाबत लिहीतोय. पण हे सर्वच मंदिरांबाबत खरं आहे. मुर्तीला हात लावणे म्हणजे भावनेला दुखावणे कुणाला वाटत असेल तर निदान मंदिराचा परिसर तरी भव्य, सुंदर, स्वच्छ, प्रसन्न राहिल याचा विचार करावा. त्याला काय हरकत आहे?    
    
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

5 comments:

  1. हा ब्लॉग वाचून ब-याच वर्षापासून साचलेल्या प्रश्नांची उत्तरे मीळाली.

    अप्रतिम लेख...

    ReplyDelete
  2. देवी देवतांचे मंदिर स्थापन करताना त्यावेळची परिस्थती, स्थापन करणाऱ्यांचा उद्देश प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा असू शकतो. श्रद्धा हा एकमात्र उद्देश नसतो. परंतु संगीत मध्ये जसे सात सूर पूर्वीही होते आजही आहेत. म्हणून आपण राजा महाराजांच्या काळातील संगीत ऐकतो असे नाही, त्यात पिढी दर पिढी बदल होत गेला आणि होत राहील. परंतु सात सूर कायम राहतील. म्हणून श्रीकांत सर, तुम्ही शेवटच्या दोन ओळीत म्हटल्याप्रमाणे मंदिर किंवा मंदिराचा परिसर सुशोभित करून मनाला शांत व प्रसन्न वाटेल असा केला पाहिजे.

    ReplyDelete
  3. देवी देवतांचे मंदिर स्थापन करताना त्यावेळची परिस्थती, स्थापन करणाऱ्यांचा उद्देश प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा असू शकतो. श्रद्धा हा एकमात्र उद्देश नसतो. परंतु संगीत मध्ये जसे सात सूर पूर्वीही होते आजही आहेत. म्हणून आपण राजा महाराजांच्या काळातील संगीत ऐकतो असे नाही, त्यात पिढी दर पिढी बदल होत गेला आणि होत राहील. परंतु सात सूर कायम राहतील. म्हणून श्रीकांत सर, तुम्ही शेवटच्या दोन ओळीत म्हटल्याप्रमाणे मंदिर किंवा मंदिराचा परिसर सुशोभित करून मनाला शांत व प्रसन्न वाटेल असा केला पाहिजे.

    ReplyDelete