Monday, August 1, 2016

देरसू उझाला- जंगलातल्या माणसाची गोष्ट


उरूस, पुण्यनगरी, 1 ऑगस्ट 2016

अतिशय घनदाट जंगल आहे. इतके की दोन फुटावरचेही काही दिसू नये. या जंगलात दोन माणसे चालली आहेत. त्यातील एकाला कशाची तरी चाहूल लागते. त्याला खात्री पटते तो वाघच असावा. बरोबरच्या दूसर्‍या माणसाला तो सांगतो की ‘अंबा (रशियातील आदिवासी भाषेत वाघाला अंबा म्हणतात) आपल्या मागावरच आहे. बघ त्याच्या पावलाचा ठसा उमटला आहे. अजून त्यात पावसाचे पाणी साठले नाही. म्हणजे तो ताजा असणार. अंबा शेजारच्या झाडीत उडी मारून बसला असणार.’

मग तो त्या वाघाच्या दिशेने तोंड करून म्हणतो, ‘का मागे येतोस अंबा? काय पाहिजे? आम्ही आमचा रस्ता, तू तूझा रस्ता पकड. त्रास देऊ नकोस. का मागे मागे येतोस? तैगा मोठ्ठे! तुला मला भरपुर जागा. मग मागे मागे काय?’ आणि आश्चर्य म्हणजे हे ऐकून तो वाघ दूसरीकडे निघून जातो. 

जंगलाची नस आणि नस ओळखणारा, प्राण्यांच्या प्रत्येक हालचालींना पंचेद्रियांनी टिपून घेणारा आणि त्याचा योग्य तो अर्थ लावणारा असा कुणी माणूस असेल याच्यावर आपला विश्वासच बसत नाही. पण हे सत्य टिपले आहे रशियन लेखक व्लादिमीर अर्सेनीव याने. ऑस्कर विजेता जगप्रसिद्ध सिने दिग्दर्शक अकिरा कुरासावा याचा ‘देरसू उझाला’ हा अतिशय गाजलेला चित्रपट. त्यावर भरपूर लिहील्या गेले आहे. हा चित्रपट ज्यावर बेतला आहे ती ‘देरसू उझाला’ नावाची रशियन कादंबरी आता मराठीत अनुवादीत झाली आहे. जयंत कुलकर्णी यांनी केलेला हा अनुवाद राजहंस प्रकाशनाने प्रसिद्ध केला आहे. त्याच कादंबरीतील हा प्रसंग आहे. 

ही आहे जवळपास 100 वर्षांपूर्वीची गोष्ट (१९०२ मधील). रशियन सैन्यात व्लादिमीर अर्सेनिव हा सर्व्हेयर म्हणून काम करत होता. चीन आणि रशियाच्या सरहद्दीवर सुसोरी नदीच्या आजूबाजूच्या प्रदेशाचे नकाशे तयार करण्याचे काम त्याच्या तुकडीला देण्यात आले. त्या काळात नकाशे तयार करण्यासाठी त्या भागात प्रत्यक्ष जावून अतिशय चिवटपणे काम करावे लागायचे. 

रशिया आणि चीनच्या सरहद्दीवरील तैगा जंगलात ही तुकडी फिरत असताना त्यांना वाटाड्या म्हणून त्या परिसरातील आदिवासी ‘देरसू उझाला’ भेटला. आणि इथून सुरू झाला हा दोन मित्रांचा प्रवास. व्लादिमीर आणि देरसू यांच्यातील सुंदर नातेसंबंधावर आधारीत ही कादंबरी आहे. खरं तर देरसू आणि जंगल या नात्याला शांतपणे निरखणारा व्लादिमीर असेच म्हणायला हवे. एक माणूस जंगलात किती गुंतून गेलेला असतो. त्याचे बारकावे त्याच्या रोमारोमात कसे भिनलेले असतात. त्याचं आयुष्य म्हणजे जंगलच. त्याशिवाय त्याला दूसरं काही आयुष्य असूच शकत नाही. जगातील श्रेष्ठ वाङ्मयात देरसू सारखे जंगलाचाच एक भाग होवून गेलेली दूसरी व्यक्तीरेखा सापडणे दूर्मिळ. 

व्लादिमीर आपल्या तुकडीसह जंगलात मुक्कामाला असताना काळवीटाची शिकार करत निघालेला त्याच्या मागावर असलेला देरसू जंगलात आग पाहून यांच्या तंबुपाशी आला. देरसूच्या पहिल्या दर्शनाचे वर्णन व्लादिमीरने केले आहे, ‘त्याच्या अंगावर हरणाच्या कातड्याचे जाकीट होते, खाली त्याच कातड्याची तुमान होती. त्याच्या डोईला कसलेतरी फडके गुंडाळलेले होते व पायात कुठल्यातरी प्राण्याच्या कातड्याचे जोडे घातलेले. पाठीवर झाडांच्या वल्कलांचा पिट्टू अडकवला होता. त्याने हातात एक बर्डिआंका बनावटीची जुनाट रशियन रायफल धरली होती व दूसर्‍या हातात नेम धरण्यासाठी उपयोगी असलेली बेचक्याची काठी.’

या वर्णनातूनच देरसूचे व्यक्तिमत्व आपल्या समोर येते. हा माणूस आयुष्यात कधीही झोपडीत घरात झोपला नाही. जंगलात पाऊस पडायचा तेंव्हा पानांचा लाकडाचा तात्पुरता आसरा करून आपल्याला झोपण्यासाठी तो जागा तयार करायचा. भयानक रोगाच्या साथीत घरचे सगळे मृत्यूमुखी पडले. हा एकटाच वाचला. मग याने जे काही घर म्हणून होते ते चक्क जाळूनच टाकले आणि आख्खे आयुष्यात जंगलाला वाहिले. 

देरसू व्लादिमीर यांच्या तुकडीबरोबर त्यांना वाटाड्या म्हणून राहिला. त्याला जंगलाचे अतिशय बारिक ज्ञान होते. आभाळात ढग दिसताच ही सगळी तुकडी पावसापासून वाचायची तयारी करायची तेंव्हा देरसू मजेत असायचा. आणि यांना सांगायचा, ‘घाई नाही. आज रातच्याला पाऊस. आत्ता नाही.’ यांना कळायचे नाही ढग तर दाटून आलेत मग हा पाऊस नाही कसा म्हणतो. मग तो समजावून सांगायचा.  ‘तुम्हीच बघा. छोटे पक्षी येतात जातात. चिवचिव. पाऊस येणार हे गप्प बसतात. झोपतात.’ आणि खरंच दिवसभर पाऊस यायचा नाही. तो रात्री यायचा. देरसू अतिशय कमी आणि तुटक बोलायचा. त्याची भाषा नेमकी असायची. त्याच्या या भाषेची गंमत लेखकाने फार बारकाईने नोंदवून ठेवली आहे. 

या जंगलात फिरताना काही वस्त्या, त्यात राहणारे लोकं, त्यांच्या देवतां यांचीही फार सुंदर वर्णनं या पुस्तकात आली आहेत. ती वाचली की लक्षात येतं जगात कुठेही जा माणूस इथून तिथून एकच. दूसर्‍या सर्वेक्षणाच्या दौर्‍यात देरसू परत भेटतो तेंव्हा ते ज्या भागात फिरत असतात तिथे त्यांना लाकडाच्या ओंडक्यांनी बांधलेले एक देऊळ दिसले. ‘त्यात चिनी देवदेतांच्या ओबडधोबड कोरलेल्या मुर्ती उभ्या होत्या. त्या मुर्तीसमोर लाकडाच्या दोन पेट्या होत्या, ज्यांवर मेणबत्त्यांचे मेण पडले होते. दुसर्‍या बाजूला खडीसाखरेचे तुकडे व तंबाखु पउली होती. बहुधा तो त्या जंगलच्या देवाला नैवेद्य असावा. जवळच्याच एका झाडाच्या फांदीवर लाल रंगाचा झेंडा फडफडत होता ज्यावर लिहीले होते ‘पर्वतदेवाला अर्पण !’

हे वर्णन वाचताना आपल्याला वाटते की सह्याद्रीच्या जंगलात एखाद्या कपारीत दगडाला शेंदूर फासून त्याची पुजा करण्याची जी मानसिकता आहे तिच्यात आणि यात काही फरकच नाही. 

जंगलातल्या या माणसाला माणसात आणण्याचा प्रयत्न व्लादिमीरने केला. त्याला आपली मोहिम संपली तसे सोबतच आपल्या गावी घेवून आला. आपल्या घरातली एक खोली त्याला रहायला दिली. पलंगावर झोपताना तो त्याच्या जवळचे मेंढीचे कातडे गादीवर अंथरून मगच झोपायचा. घरातील शेकोटीची जागा (फायर प्लेस) त्याला आवडायची. त्यात जळणारे लाकुड तेवढे त्याला त्याच्या जंगलातल्या दिवसांची आठवण करून द्यायचे. लाकडे पैसे देवून आणावी लागतात हे देरसूला पटले नाही. एकदा त्याने बागेतील झाड शेकोटीसाठी तोडले. त्या शहरातील नियामप्रमाणे त्याला पोलिसांनी पकडून नेले. या सगळ्याचा देरसूवर जास्तच भयानक परिणाम झाला. शहरातील माणूस आपल्या मनाप्रमाणे जगू शकत नाही हे त्याला मनोमन पटले. पाण्यासाठीही पैसे द्यावे लागतात हे जेंव्हा त्याला कळले तेंव्हा तर तो पुरता ढासळला. दोन दिवसात तो घर सोडून निघून गेला. 

कांही दिवसांतच व्लादिमीरला एक तार आली. ‘तूम्ही तैगाला पाठवलेल्या माणसाचा खुन झालाय.’ पोलिस स्टेशनला देरसूला नेले तेंव्हाच त्याच्या जवळ व्लादिमीरने आपले ओळखपत्र ठेवून दिले होते. म्हणून त्याला तार आली होती. काही तरी विसरलेले आठवावे असे भाव देरसूच्या चेहर्‍यावर होते. झोपेतच त्याचा खुन झाला असावा. त्याची रायफल चोरण्याच्या इराद्याने त्याला मारण्यात आले असावे. दोन भल्यामोठ्या देवदार वृक्षांच्या सान्निध्यात देरसूला पुरण्यात आले. त्याच्या कबरीवर त्याच्यापाशी असायची ती नेहमीची बेचक्याची काठी व्लादिमीरने खोचून ठेवली. एक जंगलातला माणूस जंगलातल्या मातीत गाढ झोपी गेला. 

एक फार मोठी विलक्षण अशी कथा व्लादिमीर अर्सेनीव यांनी लिहून ठेवली आहे. झाडे, पक्षी, पाखरे, प्राणी, पाऊस, नदी, डोंगर यांच्यासारखाच देरसू एक जीव होता. तो त्यांच्यात पूर्ण एकरूप झालेला होता. हे पुस्तक वाचताना जंगलाचे, आदिमतेचे माणसाच्या रक्ताला कसे आकर्षण आहे हे जाणवते. कारण आपणही नकळतपणे देरसूच्या भूमिकेत शिरलेलो असतो.     

       श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

No comments:

Post a Comment