Monday, August 8, 2016

समिक्षक कवीवर कविता लिहीतो तेंव्हा...



उरूस, पुण्यनगरी, 8 ऑगस्ट 2016

एखाद्या कवीवर समिक्षक टीका करतो किंवा त्याच्या कवितांचे सौंदर्य उलगडून दाखवतो हे आपणांस माहित असते. पण एखाद्या कवीच्या कवितांचा धांडोळा घेताना, त्याच्या लेखनाचे मर्म उलगडून दाखवताना समिक्षकाने चक्क कवीवरच कविता करावी असा प्रसंग दुर्मिळ. मराठीतील सुप्रसिद्ध कवी इंद्रजीत भालेराव यांच्या बाबतीत हा योग जूळून आला.

नुकतेच इंद्रजीत भालेराव यांनी वयाची 51 वर्षे पूर्ण केली. त्या निमित्त त्यांच्या आत्तापर्यंतच्या सर्व 10 संग्रहातील कविता एकत्र करून त्याचे सुंदर आकर्षक पुस्तक ‘सारे रान’ प्रकाशीत झाले. या पुस्तकावर बोलण्यासाठी चर्चा करण्यासाठी सुप्रसिद्ध विचारवंत समिक्षक चळवळीतील कार्यकर्ते विनय हर्डीकर यांना परभणी येथे आमंत्रित करण्यात आले होते. 115 वर्षे जूने असलेल्या परभणीच्या गणेश वाचनालयात इ.स.2001 च्या जागतिक ग्रंथदिना पासून ‘एक पुस्तक एक दिवस’ हा उपक्रम घेण्यात येतो. एखाद्या पुस्तकावर चर्चा, लेखकाचा वाचकांशी संवाद, त्यावर अभ्यासकांची भाषणे असा हा आगळावेगळा उपक्रम आहे.

31 जूलैला इंद्रजीत भालेराव यांचे ‘सारे रान’ हे पुस्तक यासाठी निवडले होते. या पुस्तकावर बोलताना विनय हर्डीकर यांनी इंद्रजीत भालेराव हे कसे खरे शेतकरी कवी आहेत हे मुद्देसूद प्रतिपादन केले. ग्रामीण कवी किंवा निसर्ग कवी यापेक्षा शेतकरी कवी कसा वेगळा असतो. पावसाचे उदाहरण देताना इंद्रजीत भालेराव यांच्या पहिल्याच कविता संग्रहातील कविता त्यांनी समोर ठेवली

आलं आलं हे आभाळ
आलं काळोख्या वानाचं
आता करील वाटोळं 
फुलावरल्या धानाचं

यात पावसानं शेतातील धान्याचं नुकसान होईल हे जे सुचित केलं होतं तसं मराठी कवितेत कधी आलं नाही. एरव्ही आपण मराठी कवितेत पावसाचे कौतुकच पहात आलो आहोत.

भाषणाच्या शेवटी विनय हर्डीकर यांनी इंद्रजीत भालेराव यांच्यावरच एक कविता सादर करून सगळ्यांनाच चकित केलं. त्या कवितेत भालेराव यांच्या कवितेचे मर्म तर आहेच पण एक समिक्षक विचारवंत कवितेच्या रसाळ परिभाषेत काही सांगतोय हे वेगळेपण आहे

1.
बोट बहिणाबाईचं जेंव्हा जाणून धरलं
कुल-शील कवितेचं तुझ्या तिथेच ठरलं

तुकारामाचं आकाश भूमी गाडगेबाबाची
जोतिरावाचा आसूड मुळं तुझ्या कवितेची

तशी ग्रामीण कविता होती आम्हालाही ठावी
एकसुरी नटवी ती नुस्ती पिवळी हिरवी

शेणामातीचा दर्वळ तुझ्या शब्दातून आला
बळीराजाचा चेहरा प्रथमच प्रकटला

बळीराजाच्या शेजारी उभी घरची लक्षुमी
सोसण्याचा जीचा वसा काही पडू दे ना कमी

माय बाप दादा वैनी दूर दिलेल्या बहिणी
कष्टकरी सालदार कोमेजल्या कुळंबिणी

रंग कोरडवाहूचे तुझ्या कवितेत आले
सारे काबाडाचे धनी माझे सोयरेच झाले

तुझ्या शब्दांच्या शेतात वाटा माझाही असू दे
शेतकरी वास्तवाचे भान सजग राहू दे !

2.
येत होता कवितेला तुझ्या नवीन बहर
देशभर केला आम्ही आंदोलनाचा कहर !

आंबेठाणच्या मळ्याचा हाती घेऊन अंगार
लुटारूंचं कारस्थान टांगलंच वेशीवर !

लाखो रस्त्यावर आले जाब विचारू लागले
किती तुरूंगात गेले काही जिवानिशी मेले !

घरोघरच्या लक्षुम्या रणरागिण्याच झाल्या
कारभार्‍यांच्याही पुढे दोन पावलं चालल्या

विसरलो घरदार आणि बारसं बारावं
तरी आमच्या हाताला का रे अपशय यावं?

ज्याच्या स्वातंत्र्याच्यासाठी दिल्या प्राणांच्या आहुत्या
तरी थांबत नाहीत शेतकरी आत्महत्या !

जिथे वाहिला एकदा स्वातंत्र्याचा झंझावात
तिथे हताश हुंदके कसं घडले आक्रित?

म्हणजे भोळा बळीराजा वागे कसा विपरीत
स्वत:हून धाव घेतो कसायाच्या जबड्यात

नाही विसरत जात आणि खानदानी वैर
ज्यांना मारावं जोड्याने चालू देतो त्यांचे थेरं !

सांग कविराजा सांग काय आमचं चुकलं
बळीराजाचं स्वातंत्र्य कसं हातून हुकलं?

बळीराजाचं गणित मला सुटता सुटेना
स्वत:शीच घेतलेली माझी होडही मिटेना !

तूच म्हणाला होतास ‘लागे करावा उपाय’
चल तोच ध्यास धरू आणि तुला सांगू काय?

- विनय हर्डीकर     


इंद्रजीत भालेराव यांची कविता शेतकरी चळवळीचं तत्त्वज्ञान आपल्या शब्दांत व्यक्त करते हे फार मोठं काम मराठी साहित्यात त्यांनी केलं आहे. त्यामुळे विनय हर्डीकर यांच्यातला विचारवंत समिक्षक बाजूला सारून त्यांच्यातला शेतकरी चळवळीतील कार्यकर्ता या कवितेकडे ओढल्या जातो. आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जाचक अटीतून फळे भाजीपाला यांना वगळण्याचा आध्यादेश महाराष्ट्र शासनाने काढला आहे. एक टन कांदा विकून टेंपोचे भाडे, हमाली, तोलाई, आडत वजा जाता शेतकर्‍याच्या हातात केवळ 1 रूपया कसा पडतो हे विषद करणारे एक मोंढ्यातील बील  सर्वत्र चर्चेचा विषय नुकताच झाले होते. इंद्रजीत भालेराव यांनी 25 वर्षांपूर्वी ‘आम्ही काबाडाचे धनी’ या दीर्घ कवितेत या समस्येवरच एक फार अप्रतिम तुकडा लिहीला होता. कापुस विकायला आडतीवर गेल्यावर सगळा कापुस विकून परत अडत्यालाच पैसे द्यायची वेळ येते. पोराने बोंदरी बोंदरी वेचून गोळा केलेला कापूस या घरच्या कापसात ठेवलेला असतो. त्याचे पैसे येतील आणि आपण चांगलं शर्ट घेवूत असं त्या छोट्या पोराला वाटते. पण बापाच्या हातात सगळा कापूस विकून पैसे तर सोडाच उलट अंगावर काही पैसे फिरतात

कापसाचा भाव आज
उतरला एकाएकी
सारी काटून उचल
आडत्याची हाय बाकी

अशी शेतकर्‍याच्या मालाच्या शोषणाची वेदना समोर येते. आपल्या कापसाचे पैसे मागणार्‍याा छोट्या पोराची पाठ बाप चाबकानं फोडून काढतो. ते सगळे वळ आपल्याच पाठीवर पडत आहेत असं वाचकाला वाटत रहातं. शेतकरी चळवळीनं मांडलेली उणे सबसिडीची आकडेवारी जी की डंकेल प्रस्तावावर सह्या करताना भारतीय शासनाला लाजेकाजेखातर कबूल करावी लागली ती  इंद्रजीत भालेराव यांनी आपल्या कवितेतून अतिशय कलात्मकतेने मांडली.
खुद्द इंद्रजीत भालेराव यांनी आपल्या कवितेच्या बाबत जी भूमिका मांडून ठेवली आहे ती तर फारच स्वच्छ आणि प्रामाणिक आहे.  या भूमिकेमुळे ही कविता रसिकांना समजून घ्यायला सोपं जाईल. खरं तर इंद्रजीत भालेराव हे जे काही लिहीत आहेत ती केवळ त्यांचीच नव्हे तर जगभरच्या कवी, कलाकार, चित्रकार, संगीतकार, अभिनेते या सगळ्यांचीच आपल्या कलेबद्दलची भूमिका आहे. सर्व कलाकारांचे साहित्यीकांचे प्रतिनिधी म्हणून हे इंद्रजीत भालेराव लिहीत आहेत
माझ्या कवितेला यावा

शेणा मातिचा दर्वळ
तिने करावी जतन 
काट्या कुट्यात हिर्वळ

माझ्या कवितेने बोल 
काळजातला बोलावा
उन्हाळ्यात खापराला 
जसा असतो ओलावा

असो काळा सावळाच 
माझ्या कवितेचा रंग
गोर्‍या गोमट्या कपाळी 
बुक्का अबिराच्या संगं

माझ्या कवितेचा हात 
असो ओबड धोबड
नांगरल्या मातीवानी 
व्हावं काळीज उघड

काळीज उघडं करून दाखविणार्‍या या कवीच्या कवितेचा सन्मान एक समिक्षक कवितेतूनच करतो हे मोठं विलंक्षण आहे. मातीचे गुणगाण गाणार्‍या मातीची वेदना सांगणार्‍या या कवीची कविता त्याच्या पन्नाशीत एकत्रित स्वरूपात रसिकांच्या समोर यावी हे मराठी कवितेचे आणि त्या कवीचे भाग्यच म्हणावे.

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575    
   

No comments:

Post a Comment