Monday, July 25, 2016

मुबारक तू न आयेगी पलट कर, तूझे लाख हम बुलाये

उरूस, दै. पुण्यनगरी, 25 जूलै 2016

‘हमारी याद आयेगी’ या गाण्यानं रसिकांच्या मनात घर केलेल्या मुबारक बेगम यांनी 18 जूलैला या जगाला  खुदा हाफिज केला आणि वयाच्या 80 व्या वर्षी निरोप घेतला. गेल्या कांही वर्षांपासून त्यांची तब्येत अतिशय खालावल्याच्या बातम्या येत होत्या. विविध संस्था, महाराष्ट्र शासन, दिनानाथ मंगेशकर ट्रस्ट यांनी त्यांना काही मदतही केली. पण खालावलेली तब्येत आणि वय यावर काही उपाय निघाला नाही. 

त्यांच्या गाण्यांवर लिहीतांना आवर्जून ‘हमारी याद आयेगी’ (1962) या चित्रपटातील स्नेहल भाटकरांच्या याच गाण्याचा उल्लेख केला जातो. त्याशिवाय बाकीच्या गाण्यांबाबत फारसं सांगितलंच काही जात नाही. 

मुबारक बेगम यांचा आवाज उपशास्त्रीय संगीत विशेषत: ठुमरी, मुजरा, कव्वाली साठी फार कल्पकतेने मोठमोठ्या संगीतकारांकडून वापरल्या गेला. त्यांचे वरील गाजलेले गाणे शिवाय ‘हमराही’ (1963) मध्ये शंकर जयकिशन च्या संगीतात गाजलेले ‘मुझको अपने गले लगा लो, ए मेरे हमराही’, शगुन (1964) मध्ये खय्याम यांनी तलत महमुद सोबत गावून घेतलेले ‘इतने करीब’ किंवा मदन मोहनने ‘आंधी और तुफान’ (1964) मध्ये गाऊन घेतलेली गोड अंगाई ‘चांद गगन मे’ ही गाणी चांगलीच आहेत. पण ज्या पद्धतीनं त्यांचा आवाज ठुमरी-मुजरा-कव्वालीत खुलला तसा इथे नाही. 

बिमल रॉय (ज्यांचा जन्मदिवस नेमका याच महिन्यात आहे 12 जूलै) यांचा ‘देवदास’ (1955) हा गाजलेला चित्रपट. दिलीपकुमार-वैजयंतीमाला-सुचित्रा सेन यांच्या अभिनयाने नटलेल्या या चित्रपटाला सचिन देव बर्मन यांचे संगीत होते. या चित्रपटात एक फार चांगली ठुमरी मुबारक बेगम यांच्याकडून सचिनदांनी गाऊन घेतली आहे.  ‘वो न आयेंगे पलट कर उन्हे लाख हम बुलाये, मेरी हसरतों से केह दो के ये ख्वाब भूल जाये.’ या साहिरच्या शब्दांत चंद्रमुखीची वेदना वैजयंतीमालाने पडद्यावर जिवंत केली आहे. सारंगी-तबला-पेटी इतक्यांचा माफक वापर कुठेही मुबारक बेगमच्या आवाजाला वरताण होत नाही. हे मुबारक बेगम यांचे पडद्यावरचे पहिले गाणं ज्याची मोठ्या प्रमाणावर दखल घेतल्या गेली. (त्यापूर्वीही त्या चित्रपटात गायल्या होत्या)

उत्तर भारतात नौटंकी हा प्रकार फार लोकप्रिय आहे. संगीतकार रोशन यांनी मुबारक यांच्या आवाजाचा पोत ओळखून रंगीन राते (1956) चित्रपटात ‘घुंघट हटाके, नजरे मिलाईके, बलमासे कह दूंगी बात’ हे गाणे दिलेले आहे. सुधा मल्होत्रासोबत हे गाणे गाताना मुबारक बेगमचा आवाज मस्त फुलला आहे. समोरचे रसिक शिट्ट्या मारतात तेंव्हा एक शिट्टी मुबारक बेगमची पण या गाण्यात आली आहे. त्याने तर गाण्याची मजा अजूनच वाढली. 

बिमल रॉय यांना मुबारक यांच्या आजावाचा लहेजा भावला असावा म्हणूनच कदाचित त्यांच्या मधुमती (1958) मध्येही त्यांनी मुबारक बेगम यांचे एक गाणे वापरले आहे. सलिल चौधरी यांचे संगीत या चित्रपटाला आहे. जो मुजरा मधुमती मध्ये घेतलेला आहे त्याचा ठेका, शैलेंद्रचे शब्द आणि मुबारक बेगम यांचा आवाज असा मस्त त्रिवेणी संगम झालेला आढळतो. ‘हम हाल ए दिल सुनायेंगे, सुनिये के न सुनिये’ असे त्या गाण्याचे बोल आहेत.  ‘तूम्हारा दिल मेरे दिल के बराबर हो नही सकता, वो शिशा हो नही सकता ये पत्थर हो नही सकता’ असा जीवघेणा शेर फेकुन मुबारक बेगम यांनी या गाण्याची सुरवात केली आहे. आता या ठिकाणी दुसरा आवाज आपण कल्पनेत आणूच शकत नाहीत.

इक्बाल कुरेशी या हैदराबादच्या संगीतकाराने ‘ये दिल किसको दू’ (1963) मध्ये आशा-मुबारक  यांच्या आवाजात एक मुजरा गीत दिलेले आहे. यात जयश्री गडकर नऊवारीत नृत्य करताना दिसते. ‘हमे दम दै के सौतन घर जाना’ असे त्या गाण्याचे बोल आहेत. सारंगीसोबत सतारीचाही चांगला वापर इक्बाल कुरेशीने केला आहे. गाण्यात शेवटचा तुकडा लावणीच्या शैलीत घेवून मजा आणली आहे. मुजर्‍याचा धागा तसाही लावणीशी जूळतोच.  

अतिशय कमी चित्रपटांना संगीत देणारे संगीतकार खय्याम यांनीही ‘मोहब्बत इसको कहते है’ (1965) मध्ये एका सुंदर मुजरा गाण्यात मुबारक बेगम यांचा आवाज वापरला आहे. ‘मेहफिल मे आप आये, जैसा की चांद आया, ये रूख पे काली जूल्फे, ये बादलों का साया’ अशा मजरूहच्या शब्दांमध्ये सुमन कल्याणपुरसोबत मुबारक  यांनी रंग भरला आहे. सुमन कल्याणपुरच्या आवाजाच्या पार्श्वभूमीवर मुबारक बेगम यांचा धारदार आवाज मुजर्‍यासाठी जास्त उठून दिसतो. किंवा तशा उद्देशानेच ही योजना केली असावी. (u tube वर चुकून सुमन कल्याणपूर सोबत आशा भोसले यांचे नाव पडले आहे.)

शंकर जयकिशन यांनी याच वर्षी ‘आरजू’ मध्ये आशा सोबत मुबारक बेगमच्या आवाजात ‘जब इश्क कही हो जाता है’ ही वेगळ्या धाटणीची कव्वाली दिली आहे. तिथेही आशा भोसले पेक्षा मुबारक बेगम यांचा वेगळा ठोकर आवाज मुजरा-कव्वाली-ठुमरीला जास्त पोषक आहे हे स्पष्ट लक्षात येते. या कव्वालीत तर पियानोचाही वापर शंकर जयकिशन यांनी केला आहे.

मदन मोहन यांनी ‘नींद हमारी ख्वाब तुम्हारे’ (1966) मध्ये एक मुजरा दिला आहे. ‘साकिया एक जाम वो भी तो दे, जो तेरी आंख से छलकता है, जो भरी है तेरी सुराही से, उसका दौर तो रोज चलता है’ असे राजेंद्रकृष्ण यांच्या गझलेचे बोल आहेत. आशा भोसले सोबतचा हा मुजरा मुबारक बेगम यांनी त्याच ठसक्यात गायला आहे.

शेवटचा कृष्णधवल चित्रपट म्हणजे सरस्वतीचंद्र (1968). त्यातल्या ‘फुल तूम्हे भेजा है खत मे’ किंवा ‘ओ मै तो भूल चली बाबूल का देस’ सारख्या गाण्यांना अपार लोेकप्रियता लाभली. कल्याणजी आनंदजींना सुरवातीच्या काळात मोठे नाव मिळवून देणारा हा चित्रपट. याच चित्रपटात मुबारक बेगम यांच्या आवाजात एक लक्षणीय मुजरा आहे. ‘वादा हमसे किया, दिल किसी को दिया, बेवफा हो बडे, हटो जावो पिया’ असे इंदिवर यांनी लिहीलेले बोल आहेत. मुजर्‍याची जी पारंपरिक धाटणी आहे तिच्यात कुठेही बदल न करता वेगळा रंग कल्याणजी आनंदजी यांनी भरला आहे. मोठ मोठ्या लोकांनी ज्यापद्धतीने आधी संगीत दिले त्याचे दडपण त्यांच्यावर नक्कीच असणार.

मुबारक बेगम यांच्या आवाजात चित्रपटांशिवाय अजून काही ठुमर्‍या आल्या असत्या तर उपशास्त्रीय संगीताचे दालन समृद्ध झाले असते. या शिवाय गझलही त्यांच्या आवाजात शोभली असती. जी की फारशी आढळत नाही. बेगम अख्तर यांनी सुरवातील चित्रपटांत पार्श्वगायन केलं आहे. नायिका म्हणून कामही केलं आहे. पण नंतर त्यांनी पूर्णत: ठुमरी-गझलेला वाहून घेतलं. ठुमरी गायिका निर्मला देवी (गोविंदाची आई) यांनीही सुरवातीला चित्रपटांमध्ये पार्श्वगायन केलं. पण नंतर पूर्णत: ठुमरीला वाहून घेतलं. लक्ष्मीशंकर यांच्या सोबतच्या त्यांच्या जुगलबंदीतील ठुमर्‍यांनी तर मोठी लोकप्रियता मिळवली. सिद्धेश्वरी देवी-रसूलनबाई-निर्मला दवी-लक्ष्मी शंकर-गिरीजा देवी-शुभा गुर्टू या परंपरेत मुबारक बेगम यांनी नक्कीच स्थान मिळवलं असतं. 

सुरवातीला चित्रपटांमध्ये ठुमर्‍यांना विशेष जागा होती. पाकिजा चित्रपट गुलाम मोहम्मद यांनी संगीतबद्ध केला. पण त्यांच्या निधनानंतर नौशाद यांनी या चित्रपटाचे अपुरे काम पुर्ण केले. त्यात तीन ठुमर्‍या त्यांनी परवीन सुलताना, वाणी जयराम आणि जुन्या पिढीची गायिका राजकुमारी यांच्या आवाजात गाऊन घेतल्या होत्या. नंतरच्या काळात चित्रपटांमधुन ठुमरी-मुजरा-नौटंकी प्रकारातील गाणी हद्दपार झाली. साहजिकच मुबारक बेगम सारख्या आवाजाची गरज कुणाला वाटेनाशी झाली. आणि ही गुणी गायिका बाजूला पडली. 

देवदास मधली ठुमरीचे बोल आता रसिक मुबारक बेगम यांच्यासाठी म्हणतील ‘वो ना आयेंगे पलटकर, उन्हे लाख हम बुलाये !’
श्रीकांत अनंत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, 9422878575

1 comment:

  1. Quite informative...पाकिझा मधल्या परवीन सुलताना, वाणी जयराम
    आणि राजकुमारी ह्यांच्या ठुम-या सिनेमातून हद्दपार
    झाल्या असाव्यात. फ़क्त पार्श्वभूमिवर राजकुमारीचा आवाज येतो..Thanks..

    ReplyDelete