Wednesday, August 3, 2016

चतुरंग शेती : एक अभिनव संकल्पना




रूमणं, बुधवार 3 ऑगस्ट 2016  दै. गांवकरी, औरंगाबाद

मागच्या लेखात झिरो बजेट शेतीवर केलेली टिका काही पाळेकर भक्तांना आवडली नाही. त्यांनी तसा आक्षेप नोंदवला. खरे तर शेती कशी करावी याचे साधे उत्तर परवडणारी शेती करावी. जर झिरो बजेट शेती करून फायदा होत असेल तर कुणाला काहीही न सांगता, त्याची शिबीरं न घेता त्याचा प्रसार होत जाईल. बघता बघता सगळे झिरो बजेट शेतीच करतील. बी.टी. कॉटनचे उदाहरण अतिशय बोलके आहे. जेंव्हा याचा वापर पहिल्यांदा सुरू झाला तेंव्हा प्रचंड प्रमाणावर विरोध झाला. पण  बी.टी. बियाणांची उत्पादन क्षमता पाहता शेतकर्‍यांनी त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू केला. कापुस आयात करणारा देश दहा वर्षांत निर्यात करणारा पहिल्या क्रमांकाचा देश ठरला. त्यासाठी कुणालाही पैसे घेवून शिबीरं  भरवावी लागली नाही. त्यासाठी कुणालाही पद्मश्री दिलं गेलं नाही.

याचा अर्थ असा नाही की निसर्गशेती किंवा झिरोबजेट शेतीला आमचा विरोध आहे. याबाबत तब्बल 20 वर्षांपूर्वीच शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांनी अतिशय सविस्तर असे विचार मांडले होते. त्यांनी ‘चतुरंग शेती’ नावाची एक संकल्पना शेतकर्‍यांसमोर ठेवली होती. ही संकल्पना काळाच्या फार पुढची असल्याने तेंव्हा त्याचे पूर्ण आकलन शेतकर्‍यांना झाले नाही. आज जेंव्हा झिरो बजेट शेतीचा विषय समोर येतो आहे. त्या पार्श्वभूमीवर ही संकल्पना समजून घेणे उचित ठरेल. 

शिवाय दुसराही एक अतिशय महत्त्वाचा विषय सध्या चर्चेत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जाचक अटीतून कांदा-बटाटा-फळे-भाजीपाला यांना वगळ्याने जणू काही आता शेतकर्‍यांना कुणी वालीच उरला नाही. शेतकरी आपला माल कुठे आणि कसा विकणार? असे गळे काढले जात आहेत. लगेच या संदर्भातील अतिशय नकारात्मक बातम्या वर्तमानपत्रांमधून छापून आणल्या जात आहेत. याही विषयाला शरद जोशी यांनी ‘चतुरंग शेती’ संकल्पनेत हात घातला आहे. 

काय आहे ही ‘चतुरंग शेती’ ची संकल्पना? यात सीता शेती, माजघर शेती, व्यापार शेती आणि निर्यात शेती अशी चार भागात विभागणी केली आहे. 

शेतीचा शोध बायकांनी लावला असे समाजशास्त्रज्ञ सांगतात. बाईने हातातील काटक्यांनी जमिनीत बियाणे खोलवर पेरले. तिच्यातून परत तेच पीक येतं असं लक्षात आलं आणि शेतीचा शोध लागला. अन्नासाठी वणवण करण्याची गरज नाही. आपले अन्न आपल्या घराजवळच आपण पेरून मिळवू शकतो हे माणसाला कळले. आता हा प्रयोग होता आणि तो बाईने आपल्या घराजवळ केला. शरद जोशी असे मांडतात की आजही शेतकरी महिलेने आपल्या शेतातील काही भागात पीकांसंदर्भातील छोटे मोठे प्रयोग करून पाहिले पाहिजेत. त्यात निसर्ग शेती, झिरो बजेट शेती पण आली. या प्रयोगातून जो काही निष्कर्ष हाती येईल त्या अनुषंगाने शेतात मोठ्या प्रमाणावर त्याचा वापर केला पाहिजे. त्याच्या नोंदी नीट ठेवल्या पाहिजेत. एक वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगून हे सर्व केले गेले पाहिजे. कुणी गोमुत्रात भिजवून दाणे पेरा म्हणत असेल तर त्याला प्रश्न करता आला पाहिजे की म्हशीच्या मुत्रात भिजवून का नाही करायचे? आणि जर करायचेच असेल तर तूम्ही सांगाता म्हणून नाही. आम्ही स्वत: प्रयोग करून पडताळणी करू. आणि त्या अनुषंगाने त्याचा वापर करू. ही झाली सीता शेती. यात रसायनांचा वापर करून फायदा होतो हे कळले तर बायका त्याचाही अवलंब करतील. स्वयंपाकघरात विविध प्रयोग वर्षानुवर्षे करून चविष्ट टिकावू खुसखुशीत चटकदार पदार्थांची निर्मिती त्या करतच आल्या आहेत. हेच शेतीबाबत केले जाईल. जशी पाळेकरांची बुवाबाजी खपवून घेतली जाणार नाही तशीच बहुराष्ट्रीय कंपन्यांची दुकानदारीही खपवून घेतली जाणार नाही. जे काही आमच्या फायद्याचे आहे ते आम्ही पारखून प्रयोगानी सिद्ध करून अनुभवांना प्रमाण मानून घेवू.

दुसरा जो भाग शरद जोशींनी विषद केला तो आहे माजघर शेती. आपल्या शेतात जो काही माल तयार होतो तो जसाच्या तसा बाजारात आणायचा नाही. त्यावर किमान काही प्रक्रिया करून बाजारात आणायचा. मालाची स्वच्छता करायची. त्याची प्रतवारी करायची. त्याला चांगल्या कमी वजनांच्या पिशव्यांमधून भरायचे. आणि मगच बाजारात विकायला आणायचे. आपल्या मालावर प्रक्रिया करणारे मोठ मोठे कारखाने उभे राहतात, आपल्या मालावर केवळ प्रक्रिया करून ते नफा कमावतात आणि आपण त्याचे उत्पादन करून तोट्यात राहतो. तेंव्हा किमान छोटी मोठी प्रक्रियातरी आपल्याच माजघरात झाली पाहिजे. शिवाय फुटाणे, लाह्या, कुरड्या, पापड्या, लोणची यासारखे पदार्थ तयार करून आपण ते बाजारात विक्रीला नेले पाहिजे. शेतमालावर किमान प्रक्रिया करण्याची वृत्ती आपण बाळगणे म्हणजे माजघर शेती.

तिसरा प्रकार शरद जोशींनी सांगितला तो म्हणजे व्यापार शेती. आपल्या शेतमालाच्या व्यापार आपणच करावा. वाजपेयी सरकारच्या काळात ‘कृषी कार्य बला’ची स्थापना शरद जोशींच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली होती. त्याच्या अहवालात शेतीसंबंधी अतिशय मोलाच्या सुचना शासनाला या समितीने केल्या होत्या. त्यात व्यापारासंबंधी एक सुचना होती. शेतकर्‍याला त्याच्या धान्याच्या साठवणुकीसाठी मोठ्या गोदामांची सोय असावी. आणि या मालाच्या बदल्यात 70 टक्के इतकी रक्कम त्याला त्वरित देण्याची पतपुरवठ्याची सोय असावी. जेणे करून अन्नधान्याच्या बाजारात जे प्रचंंड चढ उतार होतात ते होणार नाहीत. शिवाय शेतकर्‍याला आपल्या धान्याची योग्य किंमत मिळेल. आज तुरीची दाळ 70 रूपयांपासून ते 230 रूपयांपर्यत हेलकावे खाते आणि याचा कुठलाच फायदा शेतकर्‍याला होत नाही. शिवाय ग्राहकाचा खिसा कापला जातो तो वेगळाच. तेंव्हा व्यापार शेती करताना माल बाजारात आणल्याबरोबर तो न विकता केवळ गोदामात साठवून ठेवता यावा. आणि त्या बदल्यात किमान 70 टक्के रक्कम तेंव्हाच्या बाजारपेठे प्रमाणे शेतकर्‍याला मिळावी. यासाठी शेतकर्‍यांनी प्रयत्न करावेत. तसेच छोटे आठवडी बाजार जवळपास भरतात त्या ठिकाणी जावून आपल्या मालाच्या विक्रीचा प्रयत्न शेतकर्‍यांनी करावा. आज गावोगावी दहावी बारावी शिकून कामाशिवाय बेकार बसलेल्या तरूण मुलांचे घोळके नाक्या नाक्यावर रिकामे उभे असतात. ही शेतकर्‍यांची तरूण पिढी या व्यापारात कामाला येवू शकते. त्यांना यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळू शकतो.

शेवटचा जो प्रकार शरद जोशी यांनी विषद केला आहे तो आहे निर्यात शेतीचा. काही प्रकारचा शेतमाल हा असा असतो की ज्याला परदेशात चांगला भाव मिळू शकतो. त्यासाठी परदेशात जे निकष लावले जातात त्याप्रमाणे हा माल  असला पाहिजे. म्हणजे मागणी प्रमाणे विशिष्ट दर्जाचा माल आपल्या शेतात तयार करणे आणि त्याला परदेशी बाजारपेठ मिळवणे. यातून जास्तीचा नफा शेतकर्‍याला मिळू शकतो. हापूस अंबे, द्राक्ष, फुलं याबाबत आपल्या शेतकर्‍यांनी परदेशी बाजारपेठ मिळवून दाखवली आहे. अर्थात निर्यात शेती हा काही सर्वच शेतकर्‍यांना जमाणारा भाग नाही. शिवाय काही जणांना या व्यापारातील खाचेखोचे उमगत नाहीत. त्यासाठी परवानगी देणारी जी दिल्लीतील सरकारी यंत्रणा आहे तिचीही डोकेदुखी शेतकर्‍यांना जाणवते. पण चिवटपणे यासाठी प्रयत्न केले तर फायदा होवू शकतो. 

अशा प्रकारे विविध प्रयोगांनी शेतात चांगले उत्पादन घेणे, त्यावर प्रकिया करणे, त्याचा व्यापार करणे आणि प्रसंगी निर्यातही करणे अशा माध्यमातून शेतात घेतलेल्या कष्टाला जास्तीत जास्त मोबदला मिळवता येवू शकतो. अशी एक व्यवस्थित विचारपूर्वक मांडणी शरद जोशी यांनी 1994 मध्ये केली होती.  आता शेतीच्या व्यापारांवरील बंधनं शिथिल होत चालली आहेत. शेतकर्‍यांची बाजारपेठेतील ताकद वाढत आहे. अशा परिस्थिती झिरो बजेट शेती का निसर्ग शेती का रासायनिक शेती? शेतमाल विकायचा कसा? विकत घेणार कोण? शेतकर्‍यांना शासनाशिवाय वाली कोण? असल्या उथळ चर्चा न करता शेतीच्या विकासाचा समग्र विचार करावा. ज्यातून शेतकर्‍यांचा आणि देशाचाही फायदा होईल.    
    
           
श्रीकांत अनंत उमरीकर, औरंगाबाद. 9422878575

No comments:

Post a Comment