दैनिक पुण्य नगरी, उरूस, २३ ऑगस्ट २०१५
गेली ४४ वर्षे ‘बालभारती’ च्या वतीने मुलांसाठी ‘किशोर’ मासिक प्रकाशीत होते आहे. मोठ्या आकाराची बहुरंगी ५२ पाने आणि किंमत फक्त ७ रूपये. सर्व शालेय पुस्तके प्रकाशीत करणार्या महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाकडूनच हे मासिक प्रसिद्ध होते. एरव्ही शासनावर विविध कारणांसाठी टिका करणार्या माझ्यासारख्याला ‘किशोर’ साठी शासनाचे कौतूक करावेसे वाटते.
शालेय अभ्यासक्रमाची पुस्तके प्रसिद्ध करण्यासोबतच अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतरही काही पुस्तके या मंडळाने प्रकाशित केली आहेत. दुर्देवाने एरव्ही स्वत:ची जाहिरात करून टिमकी वाजविणार्या शासनाने आपल्याच या अतिशय चांगल्या उपक्रमाची जाहिरातच केलेली नाही.
१९७१ पासून ‘किशोर’चे प्रकाशन होते आहे. मराठीतल्या जवळपास सर्व मोठ्या लेखकांनी ‘किशोर’साठी लिहीले आहे. गेल्या ४४ वर्षातील या मासिकांमधील निवडक साहित्याचे १४ खंडही आकर्षक स्वरूपात आता प्रकाशीत झाले आहेत. कथा, कादंबरी, कविता, ललित, कोडी, लोककथा, छंद, चरित्र असे विविध प्रकार या खंडामध्ये आहेत.
आज पस्तीशी चाळीशी गाठलेल्या पिढीच्या लहानपणी हे मासिक बर्यापैकी लोकप्रिय होते. त्याचा मोठा संस्कार या पिढीवर होता.
या मासिकांमधून अतिशय सुंदर चित्र काढली जायची. मजकुरांना पुरक अशा चित्रांचा एक चांगला संस्कार मुलांवर व्हायचा. व्यंकटेश माडगुळकरांसारखा मोठा लेखक एक चांगला चित्रकार होता हे फारच थोड्या जणांना माहिती आहे. माडगुळकरांचे एक सुंदर चित्र ‘निवडक किशोरच्या’ पहिल्या खंडावर घेण्यात आले आहे.
आज टिव्हीवर लहान मुलांना चिक्कार कार्टून्स पहायला मिळतात. पण चाळीस वर्षांपूर्वी ही सोय उपलब्ध नव्हती. साहजिकच तेंव्हाच्या पिढीवर संस्कार होता तो अशा चित्रांचाच. ‘इंद्रजाल कॉमिक्स’, ‘चांदोबा’, ‘चंपक’, ‘विचित्रवाडी’ (वॉल्ट डिस्नेचे मराठी मासिक) यांनी या पिढीच्या बालपणाचा फार मोठा भाग व्यापलेला होता. किशोरचा वाटा यात फार महत्वाचा होता.
ही सगळी मासिके, नियतकालीके मुलांपर्यंत पोचवण्याचे एक फार महत्वाचे ठिकाण म्हणजे शाळेचे ग्रंथालय! या शालेय ग्रंथालयाने मुलांमध्ये वाचनाची आवड रूजवली. त्यांच्यावर गाढ संस्कार केला. एखादा पोरांना जीव लावणारा मराठीचा शिक्षक आणि पुस्तकांवर प्रेम करणारा ग्रंथपाल इतक्या मोजक्या भांडवलावर या पिढीचे वाचनप्रेम वाढीस लागले. (माझे शालेय ग्रंथपाल शिक्षक बापु लोनसने, मराठी चे शिक्षक गणेश घांडगे, उज्वला कुरूंदकर मला आवर्जुन आठवतात.)
आज परिस्थिती फारच भयानक होऊन गेली आहे. शालेय ग्रंथालये पूर्णपणे उद्धवस्त झाली आहेत. मुलांची वाढलेली प्रचंड संख्या आणि पुस्तकांची थांबलेली खरेदी यात वाचन संस्कृतीची वाट लागून गेली आहे. शिक्षकांना वेतन आयोग मिळाला. कर्मचार्यांना पगार वाढवून मिळाले. पण त्या तुलनेत पुस्तकांसाठी निधी वाढवावा असे काही कुठल्या शासनाला सुचले नाही. शासनाने स्वत:च काढलेले ‘किशोर’ सारखे मासिकही सगळ्या शाळांमध्ये पोचविणे शासनाला जमले नाही.
काही जणांना वाटते या बदलत्या काळात पुस्तकं/मासिकं हवीत कशाला? शास्त्रज्ञांनी, संशोधकांनी हे सिद्ध केले आहे. की वाचनाचा जो परिणाम मानवी मनावर विशेषत: बालमनावर होता तो जास्त महत्वाचा असतो. हलणारी चित्रे पाहताना मनही अस्थिर होत जाते. स्थिर चित्रे, शब्द पाहताना/वाचताना आपण जास्त विचार करतो. यामूळे आपल्या मेंदूला चालना मिळते.
वाचताना जशी एकाग्रता साधते तशी टिव्ही बघताना साधू शकत नाही. त्यामूळे आजच्या बदलत्या काळातही वाचनाचे महत्व तसेच शिल्लक रहाते.
ही मासिके पुस्तके कागदावर छापण्यापेक्षा टॅबवर देता येतील का? असाही प्रश्न उपस्थित केल्या जातो. हे मात्र होण्यासारखे आहे. तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन पुस्तके डिजीटल स्वरूपात जास्तीत जास्त मुलांपर्यंत स्वस्तात पोंचवता येतील. कागदाचा मोठ्या प्रमाणात वापर गेल्या शंभर दोनशे वर्षातला आहे. मुद्रणाचा शोध लागला. पुस्तके छापल्या जाऊ लागली. आणि वाचन संस्कृतीचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला.
आताची अडचण म्हणजे दूरदूरच्या खेड्यापाड्यात पुस्तके पोचवणे अवघड होऊन बसले आहे. मग ज्याप्रमाणे मोबाईल भारतात सर्वत्र पोचू शकला, गोरगरिबाच्या हातात आला. तसेच जर ‘किंडल’ च्या रूपाने डिजीटल पुस्तके वाचण्याचे साधन स्वस्तात पोचले तर सामान्य मुलांनाही न मिळालेली पुस्तके उपलब्ध होतील.
‘किशोर’ मासिक काढणार्या शिक्षण मंडळाने त्यासोबत जी इतरही पुस्तके काढली आहेत त्यांचेही मोल मुलांसाठी मोठे आहे. जुन्या पाठ्यपुस्तकातील मराठीचे धडे निवडून ‘उत्तम संस्कार कथा’ या नावाने तीन पुस्तके प्रकाशीत झाली आहेत. फक्त मराठीच नाही तर इतर भारतीय भाषांमधील अभ्यासक्रमाचे धडेही मराठीत अनुवाद करून लहान मुलांसाठी उपलब्ध करून दिले आहेत.
हसन गंगू बहामनी या बहामनी राजाची गोष्ट १९६९ च्या उर्दुच्या दुसरीच्या पुस्तकात होती. ही छोटीशी गोष्ट मराठीत अनुवाद करून या संस्कार कथेत आहे. किंवा सिंधी भाषेतील भक्त कंवररामची १९७९ च्या २ रीच्या अंकात पुस्तकातील कथा किंवा ‘पप्पू आणि चिमणीचं घरटं’ ही सहावीच्या पुस्तकातील गुजराती कथा, अशा कितीतरी कथा या पुस्तकांत घेण्यात आल्या आहेत.
कुमार केतकरांसारख्या जेष्ठ पत्रकाराने ‘कथा स्वातंत्र्याची’ (महाराष्ट्र) हे पुस्तक मुलांसाठी मोठी मेहनत घेऊन सोप्या भाषेत लिहून ठेवले. साडेतीनशे पानाचे हे पुस्तक केवळ त्र्याहत्तर रूपयात उपलब्ध आहे. थोर समाजवादी नेेते ग. प्र. प्रधान यांनी ‘गोष्ट स्वातंत्र्याची’ लिहून दिली आहे. स्वातंत्र्यलढ्याचे शिल्पकार असलेल्या दादाभाई नौरोजी, गोखले, टिळक, गांधी, सावरकर, आंबेडकर, नेहरू, पटेल, जयप्रकाश अश्या १९ जणांवर राजा मंगळवेढेकर सारख्यांनी लिहून ठेवले आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ‘ग्रामगीता’ याच मंडळाने उपलब्ध करून दिली आहे.
बाबासाहेब पुरंदरे व त्यांचे पुस्तक ‘राजा शिवछत्रपती’ यावरून मोठा गदारोळ माजला आहे. पण बालभारतीने शिवाजी महाराजांवरचा परिश्रमपूर्वक तयार केलेला, मुलांसानी आवर्जून वाचावा असा ग्रंथ मात्र कुणाच्या गावीही नाही. जी अतिशय चांगली पुस्तके शासनाने कमी पैशात उपलब्ध करून दिली आहेत ती आम्ही वाचत नाही. त्यांना प्रतिसाद देत नाही. आणि बाकीच्या पुस्तकांवर नाहक वाद घालत बसतो.
लहान मुलांसाठी चांगले शब्दकोश तयार केले आहेत. शिक्षकांसाठी हस्तपुस्तिका आहेत. ‘किशोर’ मासिकाच्या सोबतीला कितीतरी महत्वाचे काम पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने करून ठेवले आहे. अजूनही हे काम चालू आहे.
आजच्या सर्व महत्वाच्या मोठ्या प्रतिभावंत मराठी लेखकांची ही जबाबदारी आहे की त्यांनी ‘किशोर’ सारख्या सरकारी मासिकांत मुलांसाठी लिहिले पाहिजे.
रविंद्रनाथ टागोरसारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता पावलेला भारतीय लेखक लहान मुलांसाठी आवर्जून लिहायचा. स्वत:ला बालसाहित्यीक म्हणवून घेण्यात गौरव मानायचा. मग हे मराठीत घडतांना का दिसत नाही?
साने गुरूजी हे सर्वश्रेष्ठ मराठी लेखक आहेत असे मानणारे भालचंद्र नेमाडे यांना लहानमुलांसाठी का लिहावे वाटत नाही? विंदा करंदीकर, मंगेश पाडगांवकर यांच्यापासून ते आजच्या इंद्रजित भालेराव अशा फार थोड्या अव्वल दर्जाच्या मराठी कविंनी लहानमुलांसाठी कविता लिहिल्या इतरांना का लिहाव्या वाटत नाही.
ऑगस्ट २०१५ ‘किशोर’च्या अंकावर एक सुंदर चित्र आहे. मुले आणि मुली हातात तिरंगा घेऊन चेहर्यावर हसू खेळवत निघाले आहेत. या मुलांच्या हातात त्यांना आवडतील, गोडी वाटेल, संस्कार होतील अशी पुस्तके/मासिके आम्ही कधी देणार!
जनशक्ती वाचक चळवळ, श्रीकांत उमरीकर ९४२२८७८५७५
No comments:
Post a Comment