दैनिक पुण्य नगरी, उरूस, २ ऑगस्ट २०१५
कूकू पुसलं पुसलं
आता उरले गोंदण
तेच देईल देईल
नशिबाला आवतण
जरी फुटल्या बांगड्या
मनगटी करतूत
तुटं मंगय सुतर
उरे गळ्याची शपथ.
सर्व शेतकरी बांधवांना
सुचित करण्यात येते की
यापुढे त्यांनी
स्वत:च्या जीवावर आत्महत्या कराव्यात
शासनाला जबाबदार ठरविण्याचा निर्णय
स्वत: जनतेनेच
निवडणूकी द्वारे रद्दबातल ठरविला आहे
शासकीय समित्यांवरील
शासकीय जिभेने बोलणार्या
विद्वानांनी
हे यापूर्वीच बेबींच्या देठापासून
ओरडून सांगितले होते पण
लोकशाही निष्ठ सरकारने
त्यावर समाधान न मानता
निवडणुकीद्वारे या निर्णयावर
शिक्कामोर्तब करून घेतले
सर्व सामान्यांचा कळवळा असणार्या नेत्यांनी
आपल्या पुढच्या पिढ्या
बहूमताचे कुंकू लावून
सज्ज केल्या आहेत
तरी सर्व शेतकरी बांधवांनी
आपल्या पुढच्या पिढ्या
आत्महत्येसाठी सज्ज करून ठेवाव्यात
आभाळात ढग येऊ लागले की, कुणब्याच्या काळजास पालवी फुटते. मृग लागला की पेरणी केली पाहिजे असे शेतकर्याच्या मनात वर्षानुवर्षे पक्के रूजून बसले आहे यावेळी सुरूवातीला पाऊस अतिशय चांगला झाला. पेरणी करण्यासाठी उत्साह शेतकर्यांत पसरला पण पेरणीसाठी हाताशी पैसा पाहिजे.
यवतमाळ जिल्ह्यातील पिंपरी बुट्टी गावच्या शांताबाई प्रल्हाद ताजणे या आत्महत्या केलेल्या शेतकर्याच्या विधवेने मोठ्या आशेने सगळ्यांकडे मदत मागायला सुरवात केली काहीतरी पैशाची सोय होईल मग आपण पेरणी करू मग आपले घर धान्यानी भरेल मग आपण पेरणी करू मग आपण नवर्याच्या माघारी घर स्वत:च्या हिमतीवर सांभाळू शांताबाई यांचा अंदाज चुकला. निगरगट्ट शासन (सुलतानी) आणि विचित्र झालेला पाऊस (आस्मानी) दोघांनीही तिची क्रुर थट्टा केली. शांताबाईना मदत मिळालीच नाही शेवटी शेतकर्याची विधवा असलेल्या शांताबाईनाही नवर्याच्या मार्गानेच जावे लागले. शांताबाईंनी या खरीप हंगामाच्या तोंडावर आत्महत्या केली.
आजही आपण शेतकर्यांचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याकडे लक्ष देत नाही. परिणामी शेतकर्यांच्या आत्महत्या थांबतच नाहीत. आपल्या माघारी आपल्या कुटूंबाला काहीतरी मदत मिळेल अशी आशा आत्महत्या करणार्या शेतकर्याला वाटायची. आता शांताबाईच्या आत्महत्येने ही छोटीशी अशाही संपून गेली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील निर्मिलाबाई रतन हिवाळे यांची वेगळीच शोकांतिका आहे.
पोटाच्या पोरीचे लग्न चौदा दिवसांवर आले होते. आणि नवर्याने आत्महत्या केली. निर्मलाबाईंनी हिमतीने पोरीचे लग्न केले. लहागन्या पोराला सागरला सांभाळले या पोरानेही छोटे मोठे कामं करत घराला मदत सुरू केली शेतीची परिस्थिती कठीण झाली तेंव्हा सागरला लक्षात आले शेतीच करत राहिलो तर आपल्यालाही आत्महत्ये शिवाय पर्याय नाही. त्याने सुकामेव्याचा गाडा लावला. रमझानच्या काळात थोडाफार नफा झाला. शेती सोडली तरच आपलं निभू शकतं हे निर्मलाबाई आणि सागरला चांगले उमजले आणि त्यांनी त्याप्रमाणे धडपड सुरू केली.
शेतकर्यांना शेती करा असे सांगायचे आणि शेतमालाला भाव भेटू नये अशीच धोरणा आखायची असाच दुष्टपणा चालू राहिला म्हणून शेतकर्यांनी आत्महत्या करायला सुरवात केली. आता त्यांना केलेली मदत फसवी/तोकडी असल्याचे त्यांच्या विधवांनी आत्महत्या करून दाखवून दिले. शेतीत अडकलेल्या शांताबाईंना आत्महत्या करावी लागते तर शेतीतून बाहेर पडून पोराला काहीतरी दुसरं करायला प्रोत्साहन देणार्या निर्मलाबाई व सागर हिवाळे यांना जिवंत रहाता येतं या दोन उदाहरणावरूनच आपल्या शेती धोरणाचा भयानक चेहरा समोर आला आहे.
शेतकर्यांना मदत करतो / कर्जपुरवठा करतो असा आव शासनाकडून आणला जातो. याच वैजापूर तालुक्यातील पोपट ठोंबरे या तरूणाने शासनाचे हे ढोंग उघडे पाडले. गेली तीन वर्षे त्याच्या स्वत: सह १३ शेतकरी कर्जासाठी बँकेकडे खेटे घालत आहे. पूर्वीचे कुठलेही कर्ज नसणार्या या शेतकर्यांना बँक आजही कर्ज द्यायला तयार नाही. बँकेकडे पैसे नाहीत म्हटल्यावर हे शेतकरी भडकले. बॅकेत एसी बसवायला पैसे आहेत, नविन फर्निचर करायला पैसे आहेत, कर्मचार्यांचे पगार भत्ते सगळ्यासाठी पैसे आहेत. पण ज्याच्यासाठी बॅक उघडली, ज्याच्यासाठी रिझर्व्ह बॅकेकडून सगळ्या सवलती मिळवल्या, ज्याच्यासाठी खास योजना मंजूर करून घेतल्या त्या शेतकर्याला कर्ज द्यायचे म्हटले की या बँका हात वरती करतात. बॅकेचे नावच मुळी ग्रामीण बॅक आणि बॅक शेतकर्यांना दारात उभे करायला तयार नाही.
शांतपणे कर्ज मागणार्या शेतकर्यांना तीन तीन वर्षे कर्ज भेटणार नसेल तर आत्महत्ये शिवाय ते काय करतील?
नशिब अजूनही शेतकरी स्वत:चाच घात करून घेतो आहे. उद्या कर्ज नाकारले म्हणून बॅकेच्या मॅनेजरला गोळी घातली, तलाठ्याचा जीव घेतला, जिल्हाधिकार्याला दगडाने ठेचून मारले, आमदाराला डोंगरावरून ढकलून दिले, मंत्र्याला भर रस्त्यात जाळले असे अजून तरी आपल्याकडे धडले नाही.
शंभर वर्षांपूर्वी जळगाव जिल्ह्यातल्या एका सामान्य शेतकर्याच्या मृत्युनंतर त्याची बायको खंबीरपणे पोरांच्या पाठीशी उभी राहिली. निरक्षर असलेल्या या शेतकरी बाईने आपल्या साध्या शब्दांत असे काही लिहून ठेवले की आजही एखाद्या विधवेला तिच्या शब्दाने धीर यावा.
कूकू पुसलं पुसलं
आता उरले गोंदण
तेच देईल देईल
नशिबाला आवतण
जरी फुटल्या बांगड्या
मनगटी करतूत
तुटं मंगय सुतर
उरे गळ्याची शपथ.
म्हणजे एकीकडे बहिणाबाई सारखी निरक्षर अडाणी बाई नवर्याच्या माघारी धीराने कसे उभे रहायचे हे सांगते आणि शंभर वर्षानंतर हे सर्वशक्तीमान शासन शेतकर्याच्या विधवेला आत्महत्या करायला भाग पाडते.
आज शेतकर्याची पोरे विलक्षण अस्वस्थ आहेत. शेतीचं काय करावं कळत नाही. शासन नावाच्या दगडावर डोकं आपटून काही होणार नाही हे त्यांना अनुभवावरून कळून चुकलंय म्हणूनच सागर हिवाळे सारख्या आत्महत्याग्रस्त शेतकर्याचा पोरगा शेती सोडून सुक्या मेव्याचा गाडा चालवतो. आत्महत्याग्रस्त शेतकर्याच्या कुटूंबाला सगळ्यात महत्वाचा सल्ला म्हणजे त्यांनी तातडीने शेती सोडली पाहिजे. शेती सुधारण्याचे सगळे उपाय हे दीर्घसुत्री आहेत. आजपासून प्रयत्न केले तरी त्याला कित्येक दिवस, कित्येक वर्ष लागतील. गेल्या पन्नास वर्षातलं शासनाचे हे पाप इतक्या लवकर धुवून निघणार नाही. चुकून माकून जी काही थोडीफार मदत हाती पडलीच तर तिचा उपयोग शेतीतून बाहेर पडून काहीतरी छोटा मोठा व्यापार/व्यवसाय करण्यासाठी करावा. शहरात मजूरी करावी. छोटी मोठी नौकरी करावी पण शेती करू नये.
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या सारख्या समस्याग्रस्त कुटूंबियांना आपणच आधार दिला पाहिजे. सागर हिवाळे आणि पोपट ठोंबरे यांनी स्वत: अडचणीत असताना आपल्याच परिसरातील आत्महत्याग्रस्त कुटूंबियांना धीर दिला. होईल ती मदत केली. आता बाहेरून कोणी पुढारी येईल, कुठला पक्ष मदत करेल, कुठल्या नेत्याला काही कळवळा येईल याची शक्यता नाही.
आपले महान कृषीमंत्री शेतकर्यांच्या आत्महत्येची ज्या पद्धतीने थट्टा करतात ते पाहता शासनाचा दृष्टीकोन स्पष्ट होतो. शासनाचा अलिखीत जीआरच आहे की शक्यतो शेतकर्यांच्या आत्महत्येची नोंद शेतीबाह्य कारणानेच करायची. दारू, शारिरीक व्याधी, इतर व्यसनं, प्रेम प्रकरण, नपुसकता, पोरीच्या लग्नाचे कर्ज अशी कुठलीही कारणं सांगायची आणि हात वर करायचे. म्हणूनच एका कविने उपहासाने असे लिहीले आहे.
सर्व शेतकरी बांधवांना
सुचित करण्यात येते की
यापुढे त्यांनी
स्वत:च्या जीवावर आत्महत्या कराव्यात
शासनाला जबाबदार ठरविण्याचा निर्णय
स्वत: जनतेनेच
निवडणूकी द्वारे रद्दबातल ठरविला आहे
शासकीय समित्यांवरील
शासकीय जिभेने बोलणार्या
विद्वानांनी
हे यापूर्वीच बेबींच्या देठापासून
ओरडून सांगितले होते पण
लोकशाही निष्ठ सरकारने
त्यावर समाधान न मानता
निवडणुकीद्वारे या निर्णयावर
शिक्कामोर्तब करून घेतले
सर्व सामान्यांचा कळवळा असणार्या नेत्यांनी
आपल्या पुढच्या पिढ्या
बहूमताचे कुंकू लावून
सज्ज केल्या आहेत
तरी सर्व शेतकरी बांधवांनी
आपल्या पुढच्या पिढ्या
आत्महत्येसाठी सज्ज करून ठेवाव्यात
आत्महत्या केलेल्या शेतकर्यांच्या कुटूंबाला तातडीने शेती नावाच्या बुडत जाणार्या गर्तेतून बाहेर काढून दुसरे काहीतरी करण्यास लावले पाहिजे. नसता शेतकर्यांच्या विधवा आत्महत्या करू लागतील शेतकर्यांची पोरेही आत्महत्या करतील.
रशियात स्टॉलिनने दीड कोटी शेतकर्यांवर रणगाडे घालून त्यांना ठार मारले. आपले लोकशाही समाजवादी सरकार त्याहून महान गेल्या पंधरा वर्षात त्याने लाखो शेतकर्यांना स्वत:हून आत्महत्या करण्यास भाग पाडले आहे.
सगळे विसरून बोला पुंडलिक वरदे हारी विठ्ठल! शेती उद्धवस्त झाली तरी बोला ज्ञानदेव तुकाराम! पंढरीनाथ महाराज की जय! महाराष्ट्र शासन की जय! भारत सरकार की जय!
जनशक्ती वाचक चळवळ, श्रीकांत उमरीकर ९४२२८७८५७५
No comments:
Post a Comment