Sunday, August 30, 2015

शरद जोशी : हजार चंद्र पाहिलेला शेतकर्‍यांचा नेता !!


















उरूस, ३०  ऑगस्ट २०१५  दै. पुण्यनगरी

शेतकर्‍यांचे पंचप्राण शरद जोशी यांचा 3 सप्टेंबर हा 80 वा वाढदिवस. आपल्याकडे 80 वर्षे पुर्ण केलेल्या माणसाने आयुष्यात हजार पौर्णिमा पाहिल्या असे गृहीत धरून सहस्र चंद्रदर्शनाचा कार्यक्रम केल्या जातो. (काही जण 81 वर्षे पूर्ण झाल्यावर करतात) महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सव्वाशे वर्षांपूर्वी ‘शेतकर्‍याचा आसुड’ लिहून शेतीच्या प्रश्नावर पहिल्यांदाच आसुड उगारला होता. तर शरद जोशी यांनी ‘शेतकरी संघटनेच्या’ माध्यमातून हा आसूड शेतकर्‍याच्या प्रत्यक्ष हातात दिला.

स्वित्झर्लंड या पृथ्वीवरील स्वर्ग मानल्या गेलेल्या ठिकाणी युनोसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेत काम करत असताना तिसर्‍या जगातील दारिद्य्राचा प्रश्न आकडेवारीच्या स्वरूपात त्यांच्यासमोर आला. हवाबंद खोल्यांमध्ये बसून या विषयाचा अभ्यास करणे त्यांच्या मनाला पटेना. भारतातील दारिद्य्राचे मूळ प्रामुख्याने कोरडवाहू शेतीत असल्याचे त्यांना उमगले. आणि त्याच्या प्रत्यक्ष अनुभवासाठी सुखासीन नौकरीचा त्याग करून पुण्याजवळ चाकण तालूक्यातील अंबेठाण येथे 28 एकर कोरडवाहू जमिन त्यांनी खरेदी करून प्रत्यक्ष शेतीला वयाच्या चाळीशीनंतर सुरवात केली. हा काळा आणिबाणी आणि त्यानंतरच्या जनता राजवटीचा राजकीय धामधुमीचा काळ होता.

अंबेठाणचा परिसर म्हणजे तुकाराम महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेला देहू परिसर. याच ठिकाणी भामरागडचा डोंगर आहे. या डोंगराच्या पायथ्याशीच शरद जोशींची जमिन आहे. भामरागडच्या डोंगरावर तुकाराम महाराजांनी चिंतन केले. त्या चिंतनातून त्यांना अध्यात्मिक दिव्य दृष्टी प्राप्त झाली. त्यांची काव्यप्रतिभा त्या चिंतानातून झळाळली. याच भामरागडच्या पायथ्याशी शरद जोशींना शेतीच्या अनुभवातून आणि अभ्यासातून शेती प्रश्‍नाची दिव्य दृष्टी त्यांना प्राप्त झाली. हा एक योगायोगच म्हणायला हवा. 

बरे झाले देवा कुणबी झालो 
नसता दंभेची असतो मेलो

असे म्हणणारे तुकाराम महाराज. आणि साडेतीनशे वर्षांनंतर जाणिवपूर्वक कुणबीक स्वीकारणारे, शेती करणारे शरद जोशी. दोघांचेही वैशिष्ट्य म्हणजे त्यांची मांडणी रोखठोक. कुणाचाही मुलाहीजा न ठेवणारी. आणि म्हणूनच लाखोंच्या संख्येने सामान्य माणसांनी त्यांना आपल्या हृदयात स्थान दिलं. (इथे तुकाराम महाराजांशी तुलना करण्याचा हेतू नाही)

शरद जोशींवर असा आरोप केला जातो की ते कॉंग्रेस विरोधी आहेत. पण सत्यस्थिती बरेचजण डोळ्याआड करतात. शेतकरी संघटनेचे पहिले आंदोलन झाले तेच मूळी जनता पक्षाच्या राजवटीत, आपल्या महाराष्ट्राचे, त्यातही परत पुण्याचे मोहन धारीया व्यापार मंत्री असताना, पुण्याजवळ चाकण येथे. तेंव्हा हा आरोप मुळातच खोटा आहे.  शरद जोशींनी ‘उत्पादन खर्चावर आधारीत रास्त भाव मिळालाच पाहिजे’ ही सोपी वाटणारी पण अतिशय विचार करून आलेली घोषणा शेतकरी संघटनेसाठी तयार केली. कमी किंवा जास्त नाही तर रास्त भावची ही मागणी होती.

देशातील सत्ता पालटली. जनता राजवट जावून परत एकदा इंदिरा गांधी सत्तेवर आल्या. आपण कोणालाही निवडून देवो आपले दिवस काही पलटणार नाहीत याचे प्रात्यक्षिकच या काळात भारतीय शेतकर्‍याने अनुभवले. जनता राजवटीतही शेतकर्‍यांचे हाल कमी झाले नाहीत. तेंव्हा शेतकरी संघटनेने केलेली मांडणी सामान्य शेतकर्‍यांना पटायला लागली. किंबहुना त्याच्या मनातलीच ही गोष्ट होती. शरद जोशींनी तिला योग्य शब्दांत मांडले. मग शेतकरी संघटनेची दुसरी घोषणा या काळापासून लोकप्रिय झाली. ‘सरकार समस्या क्या सुलझाये सरकार खुद समस्या है !’

आज ज्या विविध विषयात सरकारने हात घातला त्याचे वाटोळे झालेले दिसते आहे. काळ जसा जसा पुढे सरकतो आहे तसे तसे सरकारी हस्तक्षेपाचे दुष्परिणाम जास्तच जाणवत आहेत. तेंव्हा ही घोषणा फक्त शेतकर्‍यांपुरती न राहता सर्व क्षेत्रालाच लागू पडते आहे. सरकारी टेलीफोन वापरणारी पिढी आणि आजचा खासगी मोबाईल फोन वापरणारी पिढी ही तूलना केली तर कुणाच्याही ही बाब सहजच लक्षात येईल.

जो नेता काळावर खरा ठरतो तो जास्त मोठा असतो. 1991 साली भारतात संपूर्णत: डंकेल प्रस्तावाच्या विरोधात वातावरण होते. कुणीही या प्रस्तावाचे समर्थन करायला तयार नव्हते. खासगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण म्हणजे ‘खाउजा’ ही काही शिवी आहे असेच वातावरण तयार केले होते. या काळात  पंतप्रधान नरसिंहराव, अर्थमंत्री मनमोहन सिंग आणि तिसरे शरद जोशी अशी तिनच माणसे होती याचे समर्थन करणारी. पंतप्रधान आणि अर्थमंत्री यांना निदान आंतरराष्ट्रीय दबाव होता म्हणून हे करावे लागले. पुढे मनमोहन सिंग यांनी स्वत: पंतप्रधान झाल्यावर खुलीकरणाची गती मंद करून, सुधारणांची दिशा मागे फिरवून हे दाखवूनच दिले. पण शरद जोशी एकटे असे नेते होते ज्यांनी नि:संदिग्धपणे या धोरणाचा पुरस्कार केला. यासाठी आंदोलन केले. सामान्य शेतकर्‍याला हा विषय समजावून सांगितला. बड्या बड्या विद्वनांनीही बौद्धिक घोळ या काळात घालून ठेवला होता. अजूनही हा गोंधळ काही विद्वानांच्या डोक्यातून गेलेला नाही. असे असताना लाखो शेतकर्‍यांनी हा विषय समजावून घेतला. शेतकरी संघटना हे केवळ एक आंदोलन नसून शेतकर्‍यांचे खुले विद्यापीठच आहे हे यातून सिद्ध झाले. 

आज आरक्षणाचा प्रश्न मुद्दामहून पेटवला जात आहे. आरक्षणाला विरोध करणारेही आता तीस वर्षानंतर आरक्षणाची मागणी करून आपला बौद्धिक र्‍हास किती झाला हे सिद्ध करत आहे. अशा वातावरणात ‘सुट सबसिडीचे नाही काम । आम्हाला हवे घामाचे दाम ।’ अशी स्वाभिमानी घोषणा शरद जोशींनी सामान्य शेतकर्‍यांना शिकवली. 

आज परिस्थिती पालटली आहे. ‘उत्पादन खर्चावर आधारीत रास्त भाव’ ही मागणी सरकारकडे करण्याचे दिवस निघून गेले आहेत. सरकार जेंव्हा स्वत: मोठ्या ताकदीने शेतीमालाच्या बाजारपेठेत हस्तक्षेप करत होते तेंव्हा ही मागणी केली जायची. आता बाजारपेठ खुली होत चालली आहे. बर्‍याच प्रमाणात बंधने कमी झाली आहेत. अशावेळी शरद जोशींनी शेतकर्‍यांना नविन मंत्र शिकवला तो ‘तंत्रज्ञान आणि बाजारपेठेच्या स्वातंत्र्याचा !!’

आम्हाला नविन नविन तंत्रज्ञानाचा वापर करू दिला पाहिजे, आमच्या शेतीचे आधुनिकीकरण झाले पाहिजे, आमचा शेतमाल विकण्यासाठी जगाची नव्हे तर विश्वाची बाजारपेठ आम्हाला खुली असली पाहिजे अशी मागणी आता शेतकरी करतो आहे. शरद जोशींनी शेतकर्‍यांनाच नव्हे तर शेतकर्‍यांच्या माध्यमातून सर्वच जनतेसाठी ‘बाजारपेठ स्वातंत्र्याची’ मागणी केली आहे. बाजारपेठेत ग्राहक हाच राजा आहे. सामान्य ग्राहकाला परदेशातून एखादी वस्तू स्वस्त भेटत असेल तर ती खरेदी करण्याचा त्याला हक्क आहे. पण दुसर्‍या बाजूने आम्हालाही जगाच्या बाजारपेठेत आमच्या मालाला जास्त भाव भेटेल तेथे विकायची परवानगी हवी. आमचा माल बाहेर जावू दिला जाणार नाही आणि बाहेरचा माल मात्र आमच्या माथी मारल्या जाणार असे होणार नाही. कापसाला भाव जास्त मिळाला म्हणून भारत सरकारने शरद पवार कृषी मंत्री असताना निर्यातबंदी केली होती याचा कडाडून विरोध शेतकरी संघटनेने केला होता. 

शरद जोशी यांच्या सहस्रचंद्र दर्शनाच्या निमित्ताने कालपर्यंत सरकारी धोरणाने शेतकर्‍याचा गळा कापणारे शेतकर्‍याच्या पोटी जन्मलेले आज विरोधी बाकावर बसलेले शेतकर्‍यांच्या प्रश्नांसाठी आता रस्त्यावर उतरत आहेत. हा काळाने त्यांच्यावर उगवलेला सुडच म्हणावा लागेल. आज शरद जोशी वयाने व्याधीने थकले आहेत. फारशी हालचाल करू शकत नाहीत. पण त्यांच्या विचाराने आता भल्या भल्यांच्या डोक्यात थैमान घालायला सुरवात केली आहे. सामान्य शेतकरी आसमानी आणि सुलतानीने पुरता गारद झाला आहे. सुट, सबसिडी, राखीव जागा, सरकारी अनुदाने हे काही काही कामी येताना दिसत नाही. अशावेळी शरद जोशींची स्वाभिमानी विचारांची मांडणीच शेतकर्‍यांना आणि एकूणच भारतीय समजाला तारण्याची शक्यता जास्त आहे. 
शरद जोशींना त्यांच्या 80 व्या वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!     

   श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575    

No comments:

Post a Comment