उरूस, दैनिक पुण्य नगरी, १९ जुलै २०१५
इस्लामच्या अनुयायांना पवित्र असलेला रमझानचा महिना नुकताचा संपला रमझान ईदही साजरी झाली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी रमझानच्या निमित्ताने इफ्तार पार्टी ठेवली होती. त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिले नाहीत म्हणून चर्चेचा धुराळा उडाला किंवा उडवला गेला.
एका मुस्लिम युवकाने या चर्चेत धार्मिक मुद्दा प्रामाणिकपणे उपस्थित करून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे समर्थक व विरोधक दोघांचेही तोंड बंद केले. त्याच्या म्हणण्यानुसार रमझानच्या संपूर्ण महिनाभर लोक सूर्य उगवल्या पासून मावळेपर्यंत कडक उपास करतात. ज्यांनी असा उपवास केला आहे त्यांच्यासाठी दिवस मावळल्यावर ‘इफ्तार’चे आयोजन केले जाते. ज्यांनी रमझानचे रोजे ठेवले नाहीत, उपवास केला नाही त्यांचा इफ्तारशी काही संबंध नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा अजून कोणी ज्याने रोजे ठेवले नाहीत. उपवास केला नाही त्याचा ‘इफ्तारा’शी काय संबंध? अतिशय साधा मुद्दा आहे. आणि या दृष्टीने विचार केला तर जी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. ती तेढ निर्माणच होवू शकत नाही.
बरेच हिंदू चतुर्थीचा उपवास करतात. रात्री चंद्र उगवल्यावर दिवसभराचा उपास सोडून जेवण केले जाते. अशा चतुर्थीच्या व्रताचे उद्यापन करताना ज्यांनी चतुर्थीचे उपवास केले आहेत त्यांनाच बोलवावे असा प्रघात आहे. मग या ठिकाणी इतरांना बोलावले तर त्याचा काय उपयोग?
धार्मिक श्रद्धेच्या, आस्थेच्या बाबी ज्याच्या त्याच्यावर सोपवून तो विषय संपवला पाहिजे. त्याचे राजकरण करत बसलं तर आपले प्रश्न अजूनच बिकट होत जातील. सगळे मुसलमान रोजे ठेवतात असे नाही. ज्यांना शक्य आहे तेच असा उपवास करतात.
सरसकट सगळ्याच मुसलमानांना कट्टर समजून टिका केली करणार्यांनी हे समजून घेतले पाहिजे जगातील इतर व्यक्तिप्रमाणेच इस्लामचे अनुयायीही काळाप्रमाणे बदलत गेलेले आहेत. कोणीच जून्या व्यवस्थेला चिटकून राहू शकत नाही.
पैशावर व्याज ही संकल्पना इस्लामला मंजूर नाही. पण म्हणून आधुनिक जगात मुस्लिम देशांमध्ये बँकींग व्यवसाय बंद पडला आहे का? तेलाच्या निमित्ताने फार मोठा आर्थिक व्यवहार इस्लामिक देशांच्या ताब्यात आहे नफा कमावणे, व्याज आकारणे यावर कुठे काही गोंधळ उडला आहे का? प्रतिमेचे पूजन इस्लाममध्ये अमान्य केल्या गेले आहे. म्हणून इस्लामिक देशांमध्ये वर्तमान पत्रांमध्ये फोटोच छापल्या जात नाहीत का? या देशांमध्ये टिव्ही, दूरदर्शनला बंदी आहे का?
पूतळा ही संकल्पना म्हणजेच मूर्ती इस्लामला मान्य नाही. हैदराबादला निजाम सागरच्या काठावर विविध पुतळ्यांची उभारणं करून सुंदर बगिचा रस्त्याच्या कडेला निर्माण केला आहे. या पुतळ्यांमध्ये सुप्रसिद्ध उर्दू कवी मक्खदूम मोइनोद्दीन यांचाही पुतळा उभारण्यात आला आहे. हा पुतळा उभारला तो उर्दू कवितेतील मक्खदूम यांचे स्थान लक्षात घेता. ते मुसलमान होते म्हणून नाही.
औरंगाबाद शहरात समलिंगी व्यक्तिंची पाहणी चालू होती. त्यात इतर धर्मियांसोबतच काही मुसलमानही आढळले. जेंव्हा त्यांना विचारल्या गेले इस्लामला 'गे' असणे मंजूर नाही. मग तूमची काय प्रतिक्रिया आहे? त्या मुस्लिम युवकानं दिलेलं उत्तर फार महत्त्वाचे आहे. तो म्हणाला, ‘भैया सेक्स और मजहबका क्या संबंध?’
इतरांप्रमाणेच इस्लामच्या अनुयायांची नविन पिढी बदलत आहे. इतरांप्रमाणेच काळाशी सुसंगत बदल ते करून घेत आहेत. पण ते समजून न घेता टिका करीत राहणे हे फार घातक आहे. रमझानच्या काळातच समोर आलेला दुसरा प्रश्न रस्त्यांवरच्या हातगाड्यांच्या अतिक्रमणाचा. रमझानच्या काळात हातगाड्यांवर ‘मीना बाजार’ भरतो. प्रचंड गर्दी उसळते मग रस्ते बंद करावे लागतात. शहरातील दाट गर्दीचा मुसलमान वस्तीचा भाग असेल तर मुंगीला शिरायलाही जागा राहत नाही.
औरंगाबाद शहराच्या पोलिस आयुक्तांनी रस्त्यावर गाडे लावण्यास बंदी घातली म्हणून चर्चा सुरू झाली.
या रस्त्यावरील अतिक्रमणांचा शांतपणे विचार केला तर वेगळीच वस्तुस्थिती लक्षात येते. बहुतांश मुसलमानांची शैक्षणीक, आर्थिक, सामाजिक परिस्थिती हालाखीची आहे. हे सांगायला कुठल्याही ‘सच्चर’ आयोगाची गरज नाही. ते दिसूनच येते. बहुतांश सामान्य मुसलमान हातावर पोट घेऊन जगणारे आहेत. सगळ्या समाजाला या मजूरांची गरज असते. गाड्यांवरील वस्तू स्वस्त असतात. तेंव्हा त्या खरेदी करायला सामान्य हिंदूही धाव घेतात. सगळ्यांची गरज असते म्हणूनच रस्त्यावरची अतिक्रमणे जन्म घेतात. याला जसा तो गाडेवाला जबाबदार असतो तेवढाच त्याच गाड्यावर खरेदी करणाराही जबाबदार असतो. पण आपण नेमका दुसरा भाग विसरतो आणि पहिल्यावरच टिकेची झोड उठवतो.
‘नो हॉकर्स झोन’ असं म्हणल्यावर सगळ्यात पहिला प्रश्न निर्माण होतो ‘हॉकर्स झोन’ कुठे आहे.
मोठ्या व्यापार्यांनी नगर पालिका/महानगर पालिका यांच्याकडून गाळे बांधून घेतले आणि पैसे मोजून स्वताच्या पदरात पडून घेतले. या उलट सामान्य गाडेवाल्यांसाठी ‘फेरीवाला कॉम्लेक्स’ तयार केल्या गेले का? याचा आपण विचार करणार आहोत की नाही.
बरं या फेरीवाल्यांना रस्त्यावर फिरण्यात, पोलिसांचे दंडूके खाण्यात त्यांना हप्ते देण्यात काही फार आनंद वाटतो का?
औरंगाबाद शहरातच शहानूरमिया दर्ग्याच्या चौकात पावभाजीच्या गाडीवाल्यांनी एकत्र येऊन एका जागी स्वतंत्र्य अशी पावभाजी, भेळ, चाटसाठी चौपाटी विकसित केली. सगळ्यांनी मिळून एका जागी सोयी करून घेतल्या. सगळ्यांनी मिळून आपला व्यवसाय वाढवून घेतला. म्हणजे एकीकडे शासनाकडून जागा पदरात पाडून घेऊन त्यावरूची सुट सबसीडी खावून, करांमधील सवलतींचा फायदा घेऊन मोठे मोठे मॉला उघडून बंद पाडलेले आम्ही बंद डोळे करून दुर्लक्षीत करतो. आणि रस्त्यात गाड्यांवर विक्री करणार्या फाटक्या माणसाला पोलिसांनी दंडूका मारला की खुश होतो! हा काय दांभिकपणा?
रमझानच्या निमित्ताने हा विषय समोर आलाय. बहूतांश गाड्यावरचे व्यवसाय हे मुसलमानांचे आहेत. कारण त्यांची आर्थिक परिस्थिती नाही. आपल्याला घाण वाटणारे आणि अतिक्रमण वाटणारे भंगार/रद्दीची दुकाने ही मुसलमानांची आहेत.
खरे तर आपल्या हातात काही तरी मोबदला देऊन, थोडेफार पैसे देऊन आपल्या दारात येऊन भंगार/रद्दी घेऊन जाणार्यांचे आपण आभारच मानलो पाहिजेत. कारण शहराची घाण साफ करायची तर या स्थानिक स्वराज्य संस्था करोडो रूपये खर्च करतात. त्यातही परत भ्रष्टचार होतो. ठिक ठिकाणी कचर्याचे ढीग साठतात यासाठी सामान्य माणसांडून कर रूपाने घेतलेला पैसा कचर्यातच जातो. आणि उलट ज्याच्यावर टिका केली जाते तो सामान्य मुसलमान भंगारवाला तुमच्या हातावर काहीतरी पैसे ठेऊन तुमचे भंगार गाड्यावर टाकून घेऊन जातो.
औरंगाबाद महानगर पालिकेचा कचरा सफाईचा वार्षिक खर्च १४ कोटी इतका प्रचंड आहे. इतका पैसा खर्च करूनही कचरा हटलेला काही दिसतच नाही आणि उलट रस्त्यावर कचरा वेचणार्या बायका ज्या की बहुतांश दलित आहेत आणि भंगार वाले जे की मुसलमान आहेत यांचे वार्षिक उत्पन्न २००० लोकांचे मिळून १२ कोटी आहे. शासन १४ कोटी रूपये खर्चून काहीच करीत नाही. आणि दलित बायका व भंगार गाडेवाले मुसलमान या फेकून दिलेल्या कचऱ्यावर वर्षाला १२ कोटी कमवतात. यात रद्दीचा आणि भंगारचा मोठा व्यापार करणारे घावूक व्यापारी पकडलेच नाहीत.
अतिक्रमणाचा प्रश्न असा एका बाजूनं पाहून चालणार नाही. सामान्य कष्टकरी मुसलमान हा नेहमीच सुट, सवलती, राखीव जागा, अनुदान, शासकीय योजना या सार्यांपासून वंचित राहिला आहे. तो रस्त्यावर उतरून काम करतो म्हणून आपल्याला स्वस्त मजूर उपलब्ध घेतात, वस्तू-भाज्या फळे फूले स्वस्त भेटतात याचाही एकदा डोळे कान मन उघडे ठेऊन स्वच्छ विचार केला पाहिजे.
जनशक्ती वाचक चळवळ, श्रीकांत उमरीकर ९४२२८७८५७५
No comments:
Post a Comment