दैनिक पुण्य नगरी, उरूस, ५ जुलै २०१५
चौथे विश्व साहित्य संमेलन परदेशात कुठे भरणार नसून भारतातच अंदमान येथे भरणार असल्याची बातमी आहे. गेली चार वर्षे विश्व संमेलनाचा धोका चालू आहे. मुळात हे संमेलन इतके रेंगाळले का, हे समजून घेतले पाहिजे.
पहिले विश्व साहित्य संमेलन अमेरिकेत सॅन होजे येथे झाले. आयोजकांनी जो आव आणला होता त्याचा फुगा पहिल्याच संमेलनात फुटला. परदेशी दौर्याची मजा शासनाच्या पैशावर करण्याची संधी असे हे हिडीस स्वरूप समोर आले. सतत तीन संमेलने अशा स्वरूपात भरल्यावर हा खेळ लवकरच आटोपेल हे कोणालाही कळत होते.
अखिल भारतीय साहित्य महामंडळ नावाची संस्था मराठीतील समग्र लेखक-वाचक-प्रकाशक-अभ्यासक यांची चिंता वाटण्यासाठी नसून आपल्याच कार्यकारिणी सदस्यांच्या मौजमजेसाठी आहे हे स्पष्ट झाले. सतत तीन वर्षे सुमार माणसे साहित्यिक म्हणून परदेश दौरा करून आली.
अशा लोकांच्या प्रवासखर्चाचा भार नेहमी नेहमी कोण उचलणार? दक्षिण आफ्रिकेत चौथे विश्व साहित्य संमेलन भरवण्याचे ठरले होते. साहित्यिकांच्या प्रवास खर्चाची तयारी आयोजकांनी ठेवली. पण साहित्य महामंडळाच्या सदस्यांची जबाबदारी त्यांनी घेण्यास नकार दिला. साहित्य महामंडळाचे सर्व कार्यकारिणी सदस्य ‘आम्हाला वगळा गत:प्रभ होतील संमेलने’ असा बाणा घेऊन बसले. त्यांनी आम्ही नाही तर संमेलनच नाही असा पवित्रा घेतला. शेवटी हेही संमेलन रद्द झाले. कारण कुठलेही साहित्यिक कर्तृव्य नसलेल्या महामंडळाच्या फुकट्या पदाधिकार्यांचा खर्च करण्यास कोणी आयोजक तयार होईनात.
आता विश्व संमेलनाच्या आयोजनासाठी अंदमानचा प्रस्ताव समोर आला आहे. गेली कित्येक वर्षे सावरकरांचे भक्त स्वखर्चाने दरवर्षी अंदमानला जातात. यावर्षी विश्व संमेलन तिथे भरवल्यामागे आयोजकांची अशीच भूमिका आहे. साहित्यिकांनी स्वखर्चाने अंदमानला यावे. तेथील सर्व व्यवस्था हे आयोजक घेण्यास तयार आहेत. प्रश्न असा आहे की, ही स्वावलंबी स्वखर्ची स्वाभिमानी व्यवस्था महामंडळाला मंजूर होईल का?
आजपर्यंत ज्या पद्धतीनं विश्व संमेलनं साजरी झाली ती पद्धत म्हणजे दुसर्याच्या पैशाने फुकट मजा करणे, त्यासाठी आपला सगळा स्वाभिमान गहाण ठेवणे. मग आयोजक गर्दी खेचण्यासाठी चित्रपट-नाटक-दूरदर्शन मालिका यातील कलाकरांना बोलावणार त्यांच्यासाठी गर्दी होणार. त्यांच्यावर भरपूर खर्चही होणार आणि हे सगळे आमचे साहित्यिक, महामंडळाचे पदाधिकारी उघड्या डोळ्यांनी विरोध न करता पाहात बसणार कारण काय तर आपल्याला फुकट आणले ना तेव्हा आपण कशाला काही बोलायचे?
आषाढीची वारी जवळ आली आहे. महाराष्ट्र नव्हे तर जवळपासच्या कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेशातून भाविक स्वखर्चाने या वारीत सामील होतात. गेली सातशे वर्ष ही परंपरा सामान्य माणसाने अखंडपणे जपली आहे. वारीसाठी कुणीही कुणाला आमंत्रण देत नाही. कोणीही प्रायोजक समोर येत नाही. अंतरीच्या ओढीने भाविक पांडुरंगाकडे धाव घेतात. कुठलेही अडथळे त्यांना रोखू शकत नाही. आधुनिक युगातही हे सारे तसेच चालू आहे.
मग एक साधा प्रश्न निर्माण होतो याच्या शतांश पटीनेही उत्साह साहित्य संमेलनाबाबत का दिसत नाही? म्हणजे एखाद्या गावात साहित्य संमेलन भरणार आहे हे कळाल्यावर गावोगावचे लेखक-वाचक-रसिक उत्स्फूर्तपणे स्वखर्चाने गटागटाने त्या गावाला जायला निघाले आहेत. वाटेत विविध गावातील साहित्यिक रसिक मित्र त्यांना भेटत आहेत अशा छोट्या मोठ्या दिंड्या तयार होत होऊन ज्या ठिकाणी मुख्य साहित्य संमेलन भरत आहे तिथे येऊन महासंगम तयार झाला आहे. लोक उत्साहाने एकमेकांच्या गळ्यात पडत आहेत. विक्रेत्यांनी पुस्तकांचे गठ्ठे आणून पुस्तकांची दुकाने थाटली आहेत. चार दिवस सगळे एकमेकांशी बोलून, अनुभवांची देवाण घेवाण करून तृप्त मनाने परतत आहेत.
हे असे दृश्य दिसणार कधी? साहित्य संमेलनाची १०० वर्षांची उज्ज्वल परंपरा आहे मग हा उत्स्फूर्तपणा आम्ही का नाही निर्माण करू शकलो? ही गोष्ट विश्व साहित्य संमेलनाच्या बाबतीत तरी व्हावी अशी आशा होती पण आम्ही तेही नाही करू शकलो.
ज्या देशात विश्व साहित्य संमेलन भरविणार आहोत त्या देशातील जास्तीत जास्त मराठी माणसांना आम्ही गोळा करू शकलो का? तर याचेही उत्तर नाही असेच येते.
हे असे घडले याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ज्याप्रमाणे साहित्य संमेलन हे शासनाच्या व प्रायोजकांच्या पैशामुळे पंगू झाले त्याप्रमाणे विश्व संमेलन हेही जनतेच्या रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाअभावी शासकीय अनुदान व प्रायोजकांचा निधी यांचा स्टिरीऑइडवर टिकून होते. त्यांनी हात आखडता घेताच हा डोलारा कोसळला.
गावोगावी उरूस, जत्रा भरतात त्यासाठी कोणीही प्रायोजक नसतो. शासनाचा कुठलाही निधी त्यांना नसतो सर्वसामान्य माणसांनी अंतरस्फूर्तीने हे सगळे सण-उत्सव जपलो म्हणून ते निर्वेधपणे टिकून आहेत. अजूनही ते चालू आहेत.
साहित्य सोहळे गावोगावी विविध संस्था गेली काही वर्षे सातत्याने घेत आहेत. त्यांना कुठलाही भक्कम निधी शासनाकडून उपलब्ध नसतो. स्थानिक पातळीवर स्वत:च्या खिशाला खाद लावून ही मंडळी उपक्रम साजरे करतात. मग हाच नियम मोठ्या साहित्य संमेलनांना लावावयास काय हरकत आहे?
साहित्य महामंडळाने दरवर्षी स्थानिक लोकांच्या मदतीने एक ठिकाण निश्चित करावे. स्थानिक स्वराज्य संस्था (महानगर पालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत) यांनी स्थानिक सोयी सवलती पुरवाव्यात कार्यक्रमाची आखणी स्थानिक महाविद्यालये, शाळा यांच्या मदतीने करण्यात यावी हे सर्व जाहीर करून साहित्यिकांना सहभागी होण्याचे खुले आवाहन करावे.
विश्व साहित्य संमेलनाबाबतही असंच करता येईल पण हे असे होत नाही कारण साहित्य महामंडळाला भीती आहे की आपण सर्व लोकांना साहित्यिकांना स्वखर्चाने येण्याचे आवाहन केले आणि कोणी आलेच नाही तर? पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी युद्धकाळात सर्व भारतीय जनतेला एकवेळ जेवणाचे आवाहन केले होते. तेव्हा शास्त्रींच्या मनात कुठलीही भीती नव्हती कारण शास्त्री स्वत: एकवेळ जेवत होते. त्यांना नैतिक अधिकार प्राप्त झाला होता. महामंडळाचे पदाधिकारी व सदस्य यांनी फुकटेपणा व लाचारीचे दर्शन घडविल्याने त्यांना इतरांना स्वखर्चाने या असे सांगण्याचा नैतिक अधिकार नाही म्हणून त्यांना भीती वाटते.
चौथे विश्व साहित्य संमेलन अंदमानमध्ये भरणार असेल तर महामंडळाच्या फुकटेपणावर काळाने उगवलेला सूडच म्हणावा लागेल. कित्येक वर्षांपासून सावरकरप्रेमी स्वखर्चाने स्वाभिमानाने अंदमानात जातात. आता हीच सवय साहित्य क्षेत्रातील सर्वांना लागावी.
चौथ्या विश्व साहित्य संमेलनाला काळाने दिलेली ही ‘काळ्या पाण्याची’ शिक्षाच आहे. ती भोगून काहीतरी शहाणपणा साहित्य महामंडळाने घ्यावा. यापुढे सर्व साहित्य संमेलनांचे आयोजन नेटकेपणा, साधेपणा किमान खर्च, भपकेबाजपणा टाळून करण्यात यावे. सातशे वर्षांपूर्वी आपल्या संतांनी कुठलीही अनुकूलता नसताना पंढरीच्या वारीची समृद्ध परंपरा तयार केली. आधुनिक काळात साहित्य महामंडळाच्या सर्व धुरिणांनी सामान्य रसिकांच्या उत्स्फूर्ततेच्या बळावर साहित्य संमेलनाची परंपरा बळकट करावी.
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद ९४२२८७८५७५
No comments:
Post a Comment