दैनिक पुण्यनगरी, उरूस, ९ ऑगस्ट २०१५
सर्व रसिकांना कळाविण्यात आनंद होतो की आखिल भारतीय साहित्य महामंडळाने चौथे विश्व साहित्य संमेलन विकायला काढले आहे. ज्याला कुणाला हौस असेल, ज्याच्या खिशात पैसा खुळखुळत असेल त्याने या संधीचा फायदा घ्यावा.
चौथ्या विश्व साहित्य संमेलनाच्या संयोजकांनी रेट कार्ड जाहिर केले आहे. तुम्हाला साधे प्रतिनिधी म्हणून जायचे असेल तर ४० हजार रूपये लागतील. म्हणजे मुंबईहूून विमानाने चेन्नई आणि तेथून जहाजाने अंदमान. मुंबईहून सरळ अंदमानला विमानानेच जायचे असेल तर ४५ हजार रूपये. नूसते संमेलन पहायचे नसून ज्यांना अंदमानला फिरायचे आहे त्यांच्यासाठी ५० हजार. हे भाव फक्त प्रतिनिधींसाठी आहेत. समजा तुम्हाला संमेलनाचे उद्घाटक व्हायचे आहे. तर त्यांचाही ‘भाव’ ठरवून दिला आहे. फक्त १५ लाख रूपये दिले की तुम्ही त्या संमेलनाचे उद्घाटक. समजा तुम्हाला या संमेलनाचे स्वागताध्यक्ष व्हायचे आहे. मग त्यातही काही अडचण नाही. खिशात फक्त २० लाख रूपये असले पाहिजे. तेवढे असेल की झाले तुम्ही विश्व मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष.
खरं तर सगळं काही विकायला काढताना संमेलनाचे अध्यक्षपद विकायला काढायचे कसं काय विसरले बरे? म्हणजे उदाहरणार्थ शेषराव मोरे यांनी २५ लाख देण्याची तयारी दाखविली महानोर २० लाख देतो म्हणाले. यशवंत मनोहर यांनी १५ लाख तयार ठेवले. म्हणून मग शेषराव मोरे झाले अध्यक्ष. असे काही घडले नाही हे नशिब!
जे साहित्यीक सहभागी होणार आहेत त्यांची नावे अजून जाहिर झाली नाही. म्हणजे त्यांच्यासाठी किती पैशांची बोली लावायची? किंवा त्यांचे ‘रेटकार्ड’ काय कसे हे कळाले नाही. कविसंमेलनात कविता वाचायची एक लाख रूपये. परिसंवादात भाग घ्यायचा दोन लाख रूपये. स्वतंत्रपणे मुलाखत घ्यायची पाच लाख रूपये. असं एकदा का जाहिर करून टाकलं की मोकळं. म्हणजे साहित्य क्षेत्रातले मानापमान नकोच. साहित्य संमेलन एक मोठा ‘इव्हेंट’ आहे. ज्यांना कुणाला यात सहभागी व्हायचे आहे त्यांनी पैसा मोजा आणि याची मजा घ्या.. मजा वाटत असेल तर!
याचवर्षी घुमानला अखिल भारतीय साहित्य संमेलन संपन्न झाले. या संमेलनासाठी खास रेल्वे सोडण्यात आल्या. यात बसलेले बहुतांश लोक केवळ पर्यटनासाठी गेले हे सिद्ध झाले. हे लोक संमेलनाच्या मांडवात दिसलेच नाहीत. ते पंजाबात फिरत होते. वाघा बॉर्डरवर जाऊन भारत आणि पाकिस्तानच्या सैन्याच्या कवायती बघत होते. अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात फेरफटका मारत होते. संमेलनाच्या मांडवात बसले होते. पंजाबाच्या मुख्यमंत्र्यांनी त्या राज्यातल्या शिक्षकांना आणि इतर कर्मचार्यांना उपस्थितीची सक्ती केली होती. म्हणजे ज्यांना मराठी कळत होतं ते महाराष्ट्रातले रसिक पर्यटक म्हणून पंजाबात फिरत होते. आणि ज्यांचा मराठी भाषेशी काही संबंध नाही ते पंजाबी सरकारी नौकर नौकरीमुळे साहित्य संमेलनाच्या मांडवात बसून होते.
यातून मराठी साहित्याची काय मोठी सेवा घडली हे अ.भा.म.सा. महामंडळच जाणो. आता अंदमानच्या बाबतीतही असेच घडणार आहे. जर ५० हजार भरून कोणी रसिक अंदमानला जाणार असेल तर तो संमेलनाच्या मांडवात कशाला बसून राहिला? तो इकडे तिकडे फिरत बसेल. सावरकरांना ज्या जेल मध्ये ठेवले होते ते जेल बघेल, निळाशार समुद्र, बघेन शुभ्र वाळूचे समुद्र किनारे बघेन.
बरं स्थानिक पातळीवरील जनता यात सहभागी होईल अशी अपेक्षा धरावी तर तेही मूळीच शक्य नाही. एक तर अंदमानवर राहणार्या आदिवासींना मराठी भाषा कळत नाही. शिवाय हे साहित्य संमेलन म्हणजे लिखित शब्दांचा उत्सव. भारतातीलच नाही तर जगभरातले आदिवासी जी भाषा बोलतात ती फक्त बोली भाषा आहे. तिला लिपी नाही. या भाषेतले साहित्य म्हणजे परंपरेने आलेली गाणी यांना अजूनही पूर्णपणे कुणी शब्दांमध्ये मांडून ठेवले नाही.
महाराष्ट्रात बर्याच भागात आदिवासींची वस्ती आहे. या आदिवासींची भाषा आपल्याला पूर्णपणे अवगत नाही. या भाषांची लिपी नसल्याने त्यातील साहित्य लिखीत स्वरूपात उपलब्ध नाही.
विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ना. धो. महानोर यांना सन्मानपूर्वक देण्यात आले होते.
महाराष्ट्रातील शेतीची भयाण परिस्थिती पाहून ना. धो. महानोर यांनी संमेलन कुठेही झाले तरी मला अध्यक्षपद भुषविणे पटत नाही. म्हणून नकार दिला. महानोरांच्या नकारानंतर काहीतरी शहाणपण महामंडळाला येण्याची अपेक्षा होती. पण महामंडळाचा बाणा ‘याल तर तुमच्या सह! न आला तर तुमच्याशिवाय दुसर्याला घेऊन! विश्व संमेलनाची लढाई लढायचीच' असा होता. मग त्यांनी शेषराव मोरे यांना विचारले.
शेषराव मोरे अभियंता आहेत. अभियंता विद्यालयात काही वर्षे त्यांनी शिकवले आहे. नौकरी सोडून लेखन वाचनाला पूर्णपणे त्यांनी वाहून घेतले आहे. शेषराव मोरे यांची सर्व पुस्तके खासगी प्रकाशकांनी प्रकाशीत केली आहेत. आत्तापर्यंत युजीसी चा कुठलाही प्रकल्प गलेलठ्ठ पगारासह अनुदानासह त्यांच्या नावाने मंजूर झाला नाही. शासनाच्या अनुदानावर चालणारी कुठलीही संस्था शेषराव मोरेंच्या हाताशी नाही.
अतिशय प्रामाणिकपणे निष्ठेने लेखनाचा अभ्यासाचा यज्ञ स्वत:च्या बळावर शेषराव मोरे यांनी चालविला आहे. त्यांना राहण्यासाठी शासनाने भलामोठा बंगला, हाताशी नोकर चाकर असे काहीही दिलेले नाही. नांदेडमधल्या पुस्तकांनी गच्च भरलेल्या आपल्या छोट्याश्या घरात शेषराव मोरे अहोरात्र काम करतात. अशा शेषराव यांना विश्व संमेलनाच्या अध्यक्षपदाने काय फरक पडणार आहे?
लोकांनी उत्स्फूर्तपणे पैसे गोळा करून असले उत्सव भरवले तर ते शेषराव मोरे यांना जास्त आवडले असते.
एकीकडे शासकीय अनुदानातून आमदार खासदार मंत्र्यांच्या आशिर्वादाने स्थानिक नगर पालिका, महानगरपालिका यांच्या मदतीने, आपल्याच संस्थेतील शिक्षकांच्या पगारातून सक्तीच्या कपातीतून जमविलेल्या पैशातून साजरी होणारी संमेलने आणि दुसरीकडे प्रायोजकत्वाच्या नावाखाली बाजारात सरळ सरळ विकायला काढलेली साहित्य संमेलने या दोन्हीतूनही मराठी साहित्याचे भले होणार कसे?
म्हणजे एकीकडे सरकारी पैशातून राजसत्तेपुढे झुकणे आहे आणि दुसरीकडे एक वस्तू म्हणून बाजारात विकणे आहे. आता मराठी रसिकांनीच ठरवले पाहिजे काय करायला पाहिजे. नुसती टिका करून काहीच होणार नाही. सामान्य रसिकांनी आपआपल्या परिने मार्ग शोधले पाहिजेत.
मोठ्या शहरांमध्ये छोट्या वसाहती/कॉलेज्यांमध्ये ग्रहनिर्माण संस्था कार्यरत असतात त्यांचे विविध उपक्रम स्वखर्चाने पार पडतात. त्यात किमान एक साहित्यीक उपक्रम असावा त्या कॉलनीतल्या मंदिरात/सार्वजनिक सभागृहात पुस्तकांचे एक कपाट असावे. आपली वाचून झालेली पुस्तके इतरांनी वाचावी म्हणून दान करण्यात यावी. छोट्या गावांमध्ये/ खेड्यांमध्येही असेच करता येईल. विविध सण, समारंभ, उत्सव आपल्याकडे दणक्यात साजरे होत असतात. याचाच एक भाग म्हणून साहित्यीक उपक्रम साजरे व्हावेत. गावातल्या मंदिरात पुस्तकांचे एक कपाट असावे. निदान सर्व वर्तमानपत्रे, मासिके, साप्ताहिके तरी सर्वांसाठी वाचण्यास उपलब्ध असावीत.
एखाद्या ठिकाणी साहित्य संमेलन/विश्व संमेलन अचानक भरवून काहीही साध्य होत नाही. असा नियमच केला पाहिजे ज्या गावात सलग पाच वर्षे साहित्यीक उपक्रम चालू आहेत. या ठिकाणच्या शाळांमधून सलग पाच वर्षे मराठी पुस्तके मुलांना वाचायला दिल्या गेली आहेत. पाच वर्षात किमान पंचेवीस लेखक, कवी, व्याख्याते त्या ठिकाणी येऊन गेले आहेत. वर्षातून एक पुस्तक प्रदर्शन भरले आहे. त्या गावच्या परिसरातील वाचनालयांना पाच वर्षे जास्तीचा निधी ग्रंथ खरेदीसाठी दिला गेेला आहे. अशा ठिकाणीच साहित्य संमेलन भरेल.
साहित्य संमेलन हे त्या भागातील साहित्यीक चळवळीचा चेहरा/उत्सव व्हायला पाहिजे. कित्येक दिवस चाललेल्या उपक्रमाचे ते फलीत झाले पाहिजे.
आपल्याकडे घडते ते उलट. साहित्य संमेलन म्हणजे सुरवात असे आपण मानतो. पण या सुरवातीनंतर पुढे काहीच घडत नाही. आत्तापर्यंत जी तीन विश्व संमेलने झाली त्या ठिकाणी सध्या काय चालू आहे? हा प्रश्न कोणीच विचारीत नाही. साता समुद्रापार मराठीचा झेंडा फडकवला असे म्हणून टिमकी गाजवणारे त्या ठिकाणी सध्या काय चालू आहे याचा आढावा घेणार आहेत का?
साहित्य संमेलनाचे आयोजन करणार्या साहित्य महामंडळाचे साधे सुत्र उरले आहे एक तर साहित्य संमेलनास हवी राज्यसत्तेची भीक!
ती मिळणार नसेल तर साहित्य नसेल तर साहित्य संमेलन बाजारात विक! हे दोन्ही सोडून सामान्य रसिकांवर विश्वास ठेऊन त्यांना विश्वासात घेऊन, साहित्याला केंद्रभागी ठेऊन, साहित्यीकांचा सन्मान करून संमेलन भरविण्याची बुद्धी महामंडळास यायला हवी!!!
जनशक्ती वाचक चळवळ, श्रीकांत उमरीकर ९४२२८७८५७५
No comments:
Post a Comment