उरूस, 1 ऑगस्ट 2020
आज 50 पेक्षा जास्त ज्यांचे वय असेल त्यांना 1 ऑगस्टचे वैशिष्ट्य एकदम लक्षात येईल. जूनमध्ये प्रवेशाची गडबड संपून शाळा जूलै महिन्यात स्थिरावलेल्या असायच्या. पहिल्या घटक चाचणीला अजून वेळ असायचा. अशा मोकळ्या दिवसांत, श्रावणाच्या प्रसन्न वातावरणात टिळक जयंती यायची. टिळक जयंती म्हणजे वादविवाद, वक्तृत्व आणि निबंध स्पर्धा यांचा सुळसुळाट असायचा. 1 ऑगस्टला यापैकी एखादी स्पर्धा घेतली नाही तर त्या शाळेची मंजूरी काढून घ्यावी असा काही अलिखित जीआर होता की काय कळायला मार्ग नाही.
टिळकांवर भाषण करताना काही ठराविक मुद्दे पोथीतल्या सारखे वारंवार सांगितले जायचे. चिखलातून कमळ उगवावे तसे चिखली या गावी बाळ गंगाधर टिळक नावाचे कमळ जन्मले, संत हा शब्द टिळकांनी कसा तीन प्रकारे लिहून दाखवला आणि मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी टरफले उचलणार नाही. या तीन भोज्यांना शिवल्याशिवाय टिळक जयंतीच्या भाषणाची गाडी पुढे सरकतच नसे.
खरं तर अपेक्षा अशी होती की या निमित्ताने मुलांनी टिळकांचे काही वाचावे. पुढे चालून मोठ्या वर्गांना या निमित्ताने विविध विषय वादविवाद/वक्तृत्व स्पर्धेसाठी दिले जायचे. त्यातही अपेक्षा हीच की त्या विषयाबाबत काही तरी वाचन या विद्यार्थ्यांनी करावे. आणि नेमकं घडायचं असं की वेगळं काहीच न वाचता घोकंपट्टी करून मुलं यायची. तीच तीच भाषणं त्याच शैलीत चालत रहायची.
मी बाल विद्या मंदिर परभणी या शाळेत शिकलो. आम्ही सातवीत असताना आमच्या वर्गशिक्षकांनी एकदा आमची फिरकीच घेतली. टिळक जयंती निमित्त एक भित्तीपत्रक काढायचे ठरवले. त्यासाठी चांगलं अक्षर असणारे शुद्धलेखन चांगले असणारे सोबतची चार पाच मित्र मैत्रिण निवडल्या गेले. पुढे त्यांनी त्यांचे काम चांगलं पार पाडलेही. पण या अंकासाठी मजकूर तयार करून द्यायची जबाबदारी माझ्याकडे होती. त्यासाठी शाळेचे ग्रंथालय आणि आमच्या गावचे अतिशय प्रसिद्ध गणेश वाचनालय इथे जावून मी ते पार पाडावे असे सरांनी सांगितले. घरच्यांची परवानगीच काय पण त्यांचे प्रोत्साहनच असायचे अशा कामासाठी. शिवाय वडिल गणेश वाचनालयाच्या कार्यकारी मंडळावर.
तिथे जावून पुस्तकं शोधताना न.र.फाटकांचे ‘लोकमान्य’ आणि न.चि.केळकरांच्या ‘टिळक चरित्राचे’ तीन खंड माझ्या हाती लागले. त्यातून काही एक मजकूर वाचून शाळेच्या हस्तलिखितासाठी आम्ही जमवा जमव केली. मजकुराचा दर्जा कसा होता सांगता यायचे नाही पण अंक चांगला तयार झाला. त्याला बक्षिसही मिळाले. वस्तूत: फार काही आम्ही केलं असं नाही पण निदान मुळ पुस्तके शोधून चाळली तरी. अंकाच्या देखणेपणाबद्दलच प्रतिक्रिया आल्या. मजकुराबाबत आमचे मुख्याध्यापक, वर्गशिक्षक, दोन चार इतर जाणकार शिक्षक आणि दोन चार सजग पालक वगळता कुणी फारसं काही बोललं नाही.
35 वर्षांनी पुढे औरंगाबादला एक नामंकित शाळेत 1 ऑगस्टला वादविाद स्पर्धेसाठी मला परिक्षक म्हणून बोलविण्यात आले होते. ज्यांना बक्षिसं मिळाली त्यांच्यासोबत अल्पोपहार करत गप्पा मारताना मी उत्सुकतेने विचारले की तूम्ही टिळकांचे/टिळकांवरचे काय वाचले? त्या मुलांनी एकमेकांच्या तोंडाकडे पहायला सुरवात केली. त्यांना त्यांच्या शिक्षकांनी आणि घरी आई वडिल मोठा भाउ बहिण यांनी जी काही तयारी करून दिली होती तेवढीच. त्यांनी स्वतंत्रपणे काहीच वाचले नव्हते. त्यांना मी वाचन करण्याचा सल्ला दिला. किमान वर्तमानपत्रे तरी वाचा असे सांगितले.
पण मला खरा झटका पुढे महाविद्यालयीन पताळीवरील विद्यार्थ्यांनी दिला. एका महाविद्यालयात मराठवाड्यातील मोठ्या नावाजलेल्या स्पर्धेसाठी मला परिक्षक म्हणून आमंत्रित केले. तेथे वक्त्यांचा दर्जा पाहून मी प्रचंड नाराज झालो. बक्षिस मिळालेल्यांसोबत चर्चा करताना त्यांचेही वाचन अतिशय तोकडे असल्याचे लक्षात आले. निदान शाळेतली मुले काहीशी निरागस होती. साधेपणा त्यांच्या बोलण्यात होता. पण महाविद्यालयीन मुलं परिक्षकांना काय आवडतं त्या प्रमाणे आपले वक्तृत्व बेतावे, ठरवून काही कवितांच्या ओळी वापराव्या, शब्दांचे खेळ करावेत अशी इरसाल बनली होती. हे तर अजूनच धोकादायक. म्हणजे स्पर्धा स्पर्धा असा खेळच काही वक्त्यांच्या बाबतीत होवून बसला असल्याचे मला लक्षात आले.
मला स्वत:ला सातवीत असताना माझ्या शिक्षक/पालक यांच्यामुळे जाणीव झाली की मुळ पुस्तके शोधली पाहिजेत. हे काही कुणा अभ्यासकाच्या दृष्टीने नाही सांगत. किमान सजग वाचक म्हणून आपण मुलांकडून काही एक वाचून घेतले पाहिजे. त्यांच्यापैकी ज्यांना गोडी आहे त्यांना पोषक वातावरण तयार केले पाहिजे.
मी ही केवळ कोरडी सुचना करतो आहे असे नाही. पार्थ बावस्कर हा माझ्या लहान मुलाचा वर्गमित्र त्याला आवडीच्या विषय अभ्यासाकडे वळताना मी पाहिले आहे. माझ्या स्वत:च्या लहान मुलाला अश्विन उमरीकर याला आवडीची संगीतावरची, नामंकित कायदेतज्ज्ञांची चरित्रे आत्मचरित्रे विकत घेवून वाचण्याची सवय लागलेली मी पाहिले आहे. माझी लहान मुलगी अवनी हीला संत नामदेवांचा अभंग ‘जैसे वृक्ष नेणे मान अपमान’ अभ्यासक्रमाला (इ. 9 वी मराठी) आहे. मी तिच्या हातात नामदेवांची सटीप गाथाच ठेवली. आणि त्यातून अर्थ शोधून काढायला सांगितलं. असं आपण जर प्रोत्साहन देत असू तर किमान ज्याला गोडी आहे त्याची तर वाढ होवू शकेल.
पण या ऐवजी आपण नुसते पोपट तयार करणार असू तर त्याचा काय फायदा? कुठल्याही चांगल्या वक्त्याला शालेय महाविद्यालयीन पातळीवर चांगली पुस्तके उपलब्ध करून त्याला वाचनाकडे अभ्यासाकडे वळवले पाहिजे.
मला माझ्या शालेय अनुभवाच्या अधीचे फारसे काही माहित नाही. पण इ.स. 1983 पासून ते इ.स. 2017 पर्यंत असा जवळपास 35 वर्षांचा माझा अनुभव आहे आपण 1 ऑगस्टच्या निमित्ताने भरपूर कचरा निर्माण केला आहे. शेंगा कुठे हरवून गेल्या कळत नाही नुसती टरफलंच ढीगानं गोळा झाली आहेत.
(टिळकांचे छायाचित्र निवडताना पुस्तकांसोबतचे घेतले आहे )
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575