अक्षरमैफल, दिवाळी 2018
भालचंद्र नेमाडे हे महत्त्वाचे मराठी कादंबरीकार. अतिशय कमी पण मोलाची कविता त्यांनी लिहीली. त्यांच्या या सृजनाबद्दल त्यांना नेहमीच गौरविल्या गेले. पण त्यांच्या इतर समीक्षासदृश लिखाणाबद्दल मात्र असे घडत नाही. नेमाड्यांनी आपल्या टीकात्मक लेखनाने त्यांच्या भूमिकांबद्दल संशय निर्माण केला. त्यांचा वैचारिक गोंधळच त्यातून दिसून येतो. समीक्षा लेखनाची शिस्त, समीक्षा शास्त्राची परिभाषा, नियम असे काहीही नेमाडे पाळताना दिसत नाहीत.
वाङमयीन समीक्षेसोबतच संत वाङमयावर लिहीतानाही अर्थाची मोडतोड करताना ते आढळतात. असे गंभीर आरोप ठेवत समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांनी नेमाड्यांच्या या समिक्षा लेखनावर टीका केली आहे.
राजहंस प्रकाशनाने डॉ. सुधीर रसाळ यांचे ‘समीक्षक भालचंद्र नेमाडे’ या नावाचे पुस्तकच प्रसिद्ध केले आहे. ‘भालचंद्र नेमाडे यांची वाङ्मयसमिक्षा’ आणि ‘भालचंद्र नेमाडे यांची तुकाराम मीमांसा’ असे दोन दीर्घ लेख मिळून हे पुस्तक तयार झाले आहे.
सुधीर रसाळ यांनी दोन पथ्ये काटेकोरपणे या लेखनात पाळली आहेत. पहिले म्हणजे नेमाडे यांच्या समीक्षा लेखनाचाच विचार आपल्या विवेचनात केला आहे. नेमाड्यांच्या कविता किंवा कादंबरी लेखनाचा कुठेही संदर्भ रसाळ घेत नाहीत. कदाचित सृजनात्मक लेखक म्हणून नेमाडे यांचे महत्त्व मोठेपण रसाळांना मान्य असावे. शिवाय ते संदर्भ इथे प्रस्तुतही नाहीत. दुसरे पथ्य म्हणजे नेमाड्यांच्या कुठल्याही वैयक्तिक बाबींचा उल्लेख करत नाहीत. नेमाडे दीर्घकाळ औरंगाबादला होते. रसाळांसोबतच तत्कालीन मराठवाडा विद्यापीठात भाषाविषयाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केले. पण हे संदर्भ चुकूनही रसाळ येवू देत नाहीत. याचा चांगला परिणाम म्हणजे एरव्ही जी चर्चा वैयक्तिक बाबींकडे झुकून त्याचे गांभिर्य हरवते ते पूर्णपणे टळले आहे.
नेमाड्यांच्या ‘सोळा भाषणे’ या पुस्तकांतील त्यांच्याच एका संदर्भाने रसाळ पहिल्या लेखाची सुरवात करतात. नेमाडेंचे ते वाक्य असे आहे, ‘समीक्षेचं, मेटॅसमीक्षेचं आणि समीक्षकांचं हे प्रथम कर्तव्य आहे की, त्याला संकल्पनांचा संपूर्ण असा व्यूह करता आला पाहिजे. नाही तर अपुर्या तुकड्यातुकड्यांची समीक्षा कधीच स्वीकारार्ह नसते. असंबद्ध फुटकळ समीक्षा महत्त्वाची नसते.’
नेमाडे स्वत:च असे लिहीतात आणि त्यांचा जो पहिला समीक्षाग्रंथ आहे ‘टीकास्वयंवर’ ज्याला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला तो फुटकळ लेखांचा, पुस्तक परिक्षणांचा, मुलाखतींचा कसा? नेमाडे जी भूमिका मांडत आहेत त्या बद्दल ते स्वत:च गंभीर नाहीत का? असा एक साधा प्रश्न सुरवातीलाच उपस्थित होतो. रसाळ स्वत: प्रत्यक्षात तसे काहीच न म्हणता पुढील विवेचनाला सुरवात करतात.
लेखाच्या अगदी सुरवातीलाच रसाळांनी नेमाड्यांवर ‘1961 पासून ते आजपर्यंत ते सतत नकारात्मक आणि प्रतिक्रियात्मक समीक्षालेखन करीत आलेले आहेत.’ असा आरोपच केला आहे. यासाठी नेमाड्यांच्या लेखांची सविस्तर चिकित्सा रसाळांनी केलेली आहे.
नेमाड्यांची भाषा अतिशय चुकीची असून शिष्टसंमत नाही असाही एक आक्षेप आहे. उदा. ‘काही लेखक प्रकाशकाच्या रखेल्याच आहेत’, ‘...वाङ्मयीन फॅशन म्हणून शेंबडे समीक्षक तीचे नाव घेत राहतात..’, ‘मराठी वर्तमानपत्राचे संपादक नुसते निर्बुद्धच नाहीत, तर अडाणीपणामुळे येणारी मग्रुरी आणि प्रसिद्धीच्या सत्तेचा मद त्यांच्यात दिसून येतो.’
नेमाडे ही जी भाषा समीक्षालेखनात वापरतात ती अतिशय अयोग्य असून यामुळे विषयाचे गांभिर्यच हरवते. समीक्षेचे एक शास्त्र आहे. त्यानुसार आपले सिद्धांत मांडावे लागतात. या मांडणीची एक शिस्त आहे. पण नेमाडे हे काहीच जुमानत नाहीत.
नेमाडे पुराव्यांशिवाय पुरेसा अभ्यास न करता टीका करतात असाही आक्षेप रसाळांनी नोंदवला आहे. रा.भा.पाटणकरांवर आरोप करताना ‘पाटणकर अचानक राजवाड्यांचं भूत अंगात शिरल्यासारखे करू लागले’ असं नेमाडे यांनी म्हटलं आहे. पाटणकरांचे पूर्वीचे लिखाण तात्त्विक स्वरूपाचे असल्याने तिथे राजवाड्यांचा संदर्भ येणे शक्य नाही. पुढच्या लिखाणात देशीवादाची चर्चा सुरू होते तिथे राजवाडे आणि नेमाड्यांच्या विचारांची दखल पाटणकर घेतात. हे विसरून नेमाडे बिनधास्त चुक आरोप करून मोकळे होतात.
केवळ वाङ्मयीन संकल्पनांबाबत नेमाडे गोंधळ करतात असे नव्हे तर सामाजीक ऐतिहासिक बाबींचीही ते मोडतोड करतात. ‘हिंदू नावाची काही एक ‘कॅटेगरी-वर्ग’ आपल्याकडे नव्हता. तो इंग्रजांच्या खानेसुमारीने 1861 पासून सुरू केला’. असं एक वाक्य नेमाडे ठोकून देतात. वस्तुत: अगदी नामदेवांच्या रचनांपासून, एकनाथांच्या रचनांमध्येही ‘हिंदू’ शब्द धर्मवाचक म्हणून वापरात असल्याचे रसाळांनी सोदाहरण स्पष्ट केले आहे. हीच गोष्ट ‘मराठा’ शब्दाची. नेमाड्यांच्या विवेचनानुसार 1911 पर्यंत आपल्याकडे मराठा ही कोटी जात म्हणून नव्हती. खरे तर अगदी शिवकालीन बखरीपर्यंत मागे जात मराठा हा शब्द जात म्हणून वापरात असल्याचे स्पष्ट आहे. तसे दाखलेही रसाळांनी दिले आहे. पण नेमाडे स्वत:च्या सोयीसाठी ऐतिहासिक तथ्यांची मोडतोड करतात.
भारतातील जातींच्या संदर्भात इतकी उलट सुलट विधाने नेमाडे यांनी केलेली आहेत की ती नुसती एकमेकांसमोर ठेवली तरी सामान्य वाचकांना नेमाडेंचा उडालेला गोंधळ लक्षात येतो. जातीव्यवस्थेवर ज्या नविन जागतिकीकरण पर्वात मोठा हल्ला होण्यास सुरवात झाली त्याचा तर नेमाडे कुठे उल्लेखही करत नाहीत. जागतिकीकरणा बाबत ते असेच जातीसारखे गोंधळाची उलट सुलट भूमिका मांडत राहतात.
रसाळांनी नेमाड्यांची समीक्षा अभ्यासताना नेमाड्यांची विवेचनपद्धती, समीक्षेची उद्दीष्टे आणि स्वरूप, देशीयता आणि देशीवाद, नेमाड्यांचा वास्तववाद आणि कादंबरीसमीक्षा अशी एकूण 9 प्रकरणं पाडली आहेत.
या पहिल्या भागाचा समारोप करताना सुधीर रसाळांनी नेमाड्यांची समीक्षा त्यांनीच नोंदवलेल्या कसोट्यांवर उतरत नाही असे स्पष्ट नोंदवले आहे.
पुस्तकाचा दुसरा भाग म्हणजे नेमाडेंच्या तुकाराममीमांसेवर लिहीलेला लेख आहे. नेमाड्यांनी इंग्रजीत लिहीलेला लेख ‘वारकरी चळवळीची अविष्कार शैली’ (अनुवादक चंद्रशेखर जहागिरदार), नेमाड्यांनी साहित्य अकादमी साठी लिहीलेली पुस्तिका ‘तुकाराम’ (अनुवाद चंद्रकांत पाटील) शिवाय तुकारामांच्या निवडक पाचशे अभंगांच्या पुस्तकाला लिहीलेली प्रस्तावना असा इतका मजकुर रसाळांची विचारार्थ इथे घेतला आहे. यातील पहिले दोन लेख नेमाड्यांनी मूळ इंग्रजीतून लिहीले आहे. त्यांचे मराठी भाषांतर नेमाड्यांच्या नजरेखालून गेलेले असल्या कारणाने ते विचारात घेतले आहेत.
‘शिवाजी ते गांधीजी या काळातील बंडखोर चळवळींवर वारकरी संप्रदायाचा कमीअधीक सर्जनशील प्रभाव पडला आहे’ असे विधान नेमाडे करतात. पण आश्चर्य म्हणजे याच्या पुष्ट्यर्थ कुठलाही पुरावा नेमाडे देत नाहीत. दुसरे एक विधान असेच नेमाडे करून जातात. ‘वारकरी चळवळीने पुरस्कारलेली एकेश्वरवाद, समानता आणि बंधुभाव ही क्रांतिकारक तत्त्वे इस्लाम आणि भारतात प्रवेशलेला ख्रिस्ती धर्म यांच्याशी झालेला संस्कृतिसंयोगाचा परिणाम असावा.’
खरं तर महाराष्ट्रात इस्लामचे आगमन ज्ञानेश्वरांच्या समाधीनंतर झाले तेंव्हा वारकरी संप्रदायाने जी विठ्ठल भक्ती स्विकारली त्याचा इस्लामच्या एकेश्वरवादाशी संबंधच येत नाही. शिवाय सर्वच भारतीय पंथांमध्ये (बसवेश्वरांचा व शीखांचा पंथ वगळल्यास) एकेश्वरवादच कुठे नाही. केवळ प्रधान देवतेची आराधना करताना इतरांना गौणत्व देणे इतकेच फार तर दाखवून देता येते. आजही बहुतांश हिंदू हे एकेश्वरवादी नाहीतच. हे दाखवून देतानाच रसाळांनी वारकरी संप्रदाय सुद्धा कसा एकेश्वरवादी नाही हे पण वारकरी संप्रदायातीलच दाखले देत स्पष्ट केले आहे. तुकारामांचे गुरू बाबाजी चैतन्य हे वारकरी नव्हते. त्यांची गुरूपरंपरा ही दत्तसंप्रदायी होती. तसेच एकनाथांनी पांडुरंगासोबतच दत्ताची उपासना केलेली आहे. या दत्तसंप्रदायींना सुफी संतांचे रूपही काही ठिकाणी दिल्या गेले आहे. (एकनाथांचे गुरू जनार्दन स्वामी. त्यांचे गुरू चांद बोधले हे सुफी संत होते. त्यांची समाधी देवगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी आहे. तिथे आजही भजनं होतात शिवाय कव्वाल्याही होतात. हे चांद बोधले शेवटपर्यंत हिंदूच राहिले. त्यांनी इस्लाम स्वीकारला नाही पण ते सुफी होते.) तेंव्हा नेमाडेंचा एकेश्वरवादाचा दावाच खोटा ठरतो.
मूळात महाराष्ट्रात इस्लाम येण्यापूर्वी फार काळ वारकरी संप्रदाय अस्तित्वात होता.
वारकरी संप्रदायाने समानता आणि बंधुभाव ही क्रांतीकारी तत्त्वे इस्लामकडून व ख्रिस्तांकडून स्विकारली असाही दावा नेमाडे करतात. याही विधानाला रसाळांनी आक्षेप घेतला आहे. मुळात वारकरी संप्रदाय वर्णाश्रम धर्म नाकारतो हे खरं नाही. वारकरी संप्रदायाने लौकीक अर्थाने समाज जीवनात चातुवर्ण्य नाकारला नाही. जाती व्यवस्थेतील उच्चनीचताही स्विकारली आहे. किंवा तिचा धिक्कार कधीही कुठेही केला नाही. पण अध्यात्मिक साधनेत मात्र बंधुभाव व समानता स्विकारली इतकेच म्हणता येते.
वारकरी संप्रदायाने मौखिक परंपरेचा पुरस्कार केला याबद्दल नेमाडे गौरवोद्गार काढतात. याही विधानाची मर्यादा रसाळांनी लक्षात आणून दिली आहे. मुळात मध्ययुगीन कालखंडात वाङ्मयनिर्मिती टिकवून ठेवण्यासाठी ती लिहून ठेवणे आणि मौखिकतेतून तिचा प्रचार करणे इतकाच पर्याय उपलब्ध होता. त्या अनुषंगाने वारकरी संप्रदायातील ग्रंथ लेखी स्वरूपात उपलब्ध आहेत. अगदी ज्ञानेश्वरांपासून ही लेखी ग्रंथांची परंपरा आहे. पुढे चालून एकनाथांनी ज्ञानेश्वरीच्या विविध पोथ्या एकत्र करून त्यांचा अभ्यास करून पहिली चिकित्सक प्रत तयार केली. हे सगळे सतत चालू आहे. मग नेमाडे कशाचा आधारावर मौखिकते बद्दल गौरवाने बोलतात? अगदी तुकारामांच्या अभंगांतीलच लेखनाचे पुरावे रसाळांनी विवेचनात दिले आहेत.
‘वारकरी संप्रदायावर जैन, बौद्ध मतांचा प्रभाव होता.’ असे नेमाडेंनी नोंदवले आहे. शंकराचार्यांच्या मायावादाचा प्रभाव वारकरी संप्रदायावर होता. शंकराचार्यांना प्रच्छन्न बौद्ध म्हटले जाते. त्या नात्याने अप्रत्यक्षरित्या बौद्ध मताचा प्रभाव होता असे दुरान्वये म्हणता येते. पण प्रत्यक्ष बौद्ध मताचा प्रभाव दाखवून देता येत नाही. जैन मताचा तर प्रभाव सिद्धच करता येत नाही. पण नेमाडे मात्र असले विधान पुराव्यांशिवायच करून जातात.
‘सनातनी ब्राह्मणांचा गीतेला विरोध होता’, ‘तुकारामांच्या शिकवणीमुळे संस्कृत विद्येचे महत्त्व कमी होत गेले आणि त्यामुळे वैदिक ब्राह्मणांचे उत्पन्न अटले’ असली काही निराधार विधाने नेमाडेंनी केलेली आहेत. मुळात ब्राह्मणांचा गीतेला विरोध होता हे त्यांनी ज्या वा.सी.बेंद्रेंच्या आधाराने म्हटले आहे तो आधारच चुक आहे. शिवाय ‘मंत्रगीता’ ही तुकाराम महाराजांची नसून तुका पांडुरंगदास या ब्राह्मण संताची आहे असे रा.चि.ढेरे यांनी स्पष्ट केले असतानाही नेमाडे हे मत विचारात घेत नाहीत. पुजा करणार्या ब्राह्मणांचे उत्पन्न हे संस्कृत गीतेवर नसून व्रतवैकल्यावर आधारीत होते. आजही ही व्रत वैकल्ये कमी झाली नाहीत. फार काय पीरालाही नवस आपल्याकडे बोलले जातात. आधुनिक धार्मिक स्थळे शिर्डी, शेगांव इथेही नवस बोलले जातात. याही ठिकाणी व्रत वैकल्ये साग्र-संगीत पार पडले जातात. मग नेमाडे कशाच्या आधारावर ‘ब्राह्मणांचे उत्पन्न घटले’ असे विधान करतात?
तुकारामांच्या विद्रोही विचारांचा त्यांच्या शिष्यांनी प्रचार केला अशीही एक मांडणी नेमाडे करतात. तुकारामांचा विद्रोही विचार त्यांच्या शिष्यांना कळला आणि त्यांनी तो जनतेपर्यंत पोचवला यासाठी हे शिष्य विलक्षण बुद्धीमान असायला हवे. असे नेमके कोण कोण शिष्य होते? त्यांनी ही मांडणी कशापद्धतीनं केली?
तुकारामांचे शिष्य त्यांच्या विद्रोही विचारांनी प्रभावित झालेले नसून त्यांच्या अध्यात्मिक अधिकाराचे महत्त्व पटून त्यांनी त्यांना गुरू मानले असे स्पष्ट साधार मत रसाळांनी नेमाडेंची मांडणी खोडून काढताना मांडले आहे. त्यासाठी रामेश्वर भटांचेच उदाहरण त्यांनी दिले आहे.
तुकाराम अभंगांचे अर्धवट संदर्भ घेत नेमाडे आपली मते मांडतात. उदा. ‘महारासी शिवे । कोपे ब्राह्मण तो नव्हे ॥ तया प्रायश्चित्त कांही । देहत्याग करितां नाही ॥ या ओळीतून ब्राह्मणांनी अस्पृश्यता पाळू नये असे तुकारामांना अभिप्रेत होते आणि समतावादी असलेल्या तुकोबांनी जातिव्यवस्था नाकारली होती; आसे नेमाडे सांगतात.
आता या अभंगाचा उर्वरीत भाग तपासला तर ब्राह्मण त्याचे विहित काम करत नाहीत ही तक्रार तुकारामांची असल्याचे स्पष्ट होते. तुकाराम जातीभेद पाळत नसल्याचे कुठलाही स्पष्ट उल्लेख त्यांच्या रचनांमधून मिळत नाही.
खरं तर ‘कवी’ तुकाराम शोधण्यापेक्षा नेमाडे त्यांच्या मनात असलेला ‘विद्रोही समाजसुधारक’ तुकाराम शोधत गेले. आणि आपला आधीच काढलेला निष्कर्ष पक्का करण्यासाठी सोयीच्या ओळी तुकाराम गाथेतून हुडकत बसले.
दुसर्या प्रकरणाचा समारोप करताना रसाळांनी नेमाडेंवर आरोप केला आहे की, ‘नेमाड्यांनी तुकारामांबद्दलचे अतिशय संकुचित, चिंचोळे क्षेत्र निवडून आपली तुकाराममीमांसा सादर केली आहे.’
नेमाडे यांच्या समीक्षा लेखनाची सविस्तर दखल घेत रसाळांनी त्यांची मर्यादा सौम्य शब्दांत दाखवून दिली आहे. ते नेमाड्यांसारखी संतापी भाषा कुठेही वापरत नाहीत. जे दाखले देतात त्याला पुरावे म्हणून संदर्भ देत जातात.
नेमाडेंच्या बाबत सतत एक अडचण अशी येत राहिली आहे की त्यांच्यावर टीका करणारे आणि त्याला उत्तर देणारे नेमाडे भक्त बहुतांशवेळा त्यांच्या काही वैयक्तिक बाबींवर घसरत राहतात. मग टीका करणार्यांच्याही वैयक्तिक बाबी काढल्या जातात. यातून टीकेचे गांभिर्य हरवते. रसाळांनी हे सगळं कटाक्षाने टाळले आहे. शिवाय टीका करताना टीकेची समीक्षेची शिस्तही पाळली आहे. त्यामुळे हे छोटे 116 पानांचे पुस्तक महत्त्वाचे ठरते. कुठलीही बोजड भाषा रसाळांनी न वापरल्याने सामान्य वाचकांलाही हे पुस्तक सुरवातीपासून शेवटपर्यंत वाचणे सहज शक्य होते. लेखाचे शीर्षक रसाळाच्या भाषेला शोभणारे नाही.. पण नेमाडेंच्या शैलीत बसणारे आहे.
(समीक्षक भालचंद्र नेमाडे, लेखक-सुधीर रसाळ, प्रकाशक राजहंस, पुणे. पृष्ठे 116. किंमत रू. 140, आवृत्ती पहिली ऑगस्ट 2018)
श्रीकांत उमरीकर, जशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. मो. 9422878575