उद्याचा मराठवाडा, रविवार 21 ऑक्टोबर 2018
कर्नाटक मंत्रीमंडळातील मायावतींच्या बहुजन समाज पक्षाचे एकमेव आमदार व मंत्री एन. महेश यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. सहाच महिन्यांपूर्वी कर्नाटकात निवडणुका होवून कॉंग्रेसच्या पाठिंब्यावरचे कुमारस्वामींचे सरकार स्थापन झाले होते. ही आघाडी तयार करण्यात खुद्द मायावती यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या एकुलत्या एक आमदाराला मंत्रीपदही मिळाले होते. कुमारस्वामींच्या शपथविधीला देशभरातील भाजपा विरोधी महत्त्वाचे सर्व नेते हजर झाले होते. त्यांनी हात उंचावून दिलेले छायाचित्र माध्यमांमधून गाजलेही होते. या छायाचित्रात मायावतींच्या डोक्याला डोके लावत सोनिया गांधींनी कॉंग्रेस-बसपा आघाडीचे स्वप्न रंगविण्याची संधी मोदि-भाजप विरोधी पत्रकार विचारवंतांना दिली होती. लगेच ‘महागठबंधन’ वैचारिक पतंगबाजी माध्यमांमधून डाव्या पत्रकारांना सुरू केली.
कर्नाटक राजीनामा नाट्यायापूर्वीच मायावतींनी तिखट हल्ला चढवत राजस्थान, छत्तीसगढ, मध्यप्रदेश इथे होणार्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेससोबत न जाण्याचे पत्रकार परिषद घेवून घोषित केले.
मायावतींच्या पाठोपाठ समाजवादी पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांनीही कॉंग्रेसला झटका देत आघाडी करणार नसल्याचे सांगितले. आश्चर्य म्हणजे कॉंग्रेसकडूनही कुणी तशी फारशी काही काळजी व्यक्त केली नाही. एरव्ही भारतभर विरोधी पक्षांची एकजूट करण्याची शक्यता वर्तवणार्या शरद पवारांनीही यात कुठे आपण मध्यस्थी करणार असल्याचे जाहिर केले नाही. महाराष्ट्राला लागून असणार्या छत्तीसगढ, मध्यप्रदेशातील मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसची भूमिका काय असेल हे पण जाहिर केले नाही. (यापूर्वी गुजरात आणि कर्नाटकात त्यांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या होत्या.)
केवळ सहाच महिने उलटत आहेत आणि ‘महागठबंधन’ म्हणजे खरेच डाव्या पत्रकारांची निव्वळ पतंगबाजीच होती ही शंका आता बळकट होत आहे.
कर्नाटकात आजही भाजपच सर्वात मोठा पक्ष आहे. पण हे वास्तव विसरून कॉंग्रेस-जनता दलाच्या आघाडी सरकारच्या रूपाने विरोधकांना भाजप पराभवाची स्वप्ने पडायला लागली. पण यासाठी वास्तव काय आहे हे समजून घ्यायला डावे पत्रकार घ्यायला तयार नाहीत.
आज संपूर्ण भारतात जे प्रादेशीक पक्ष आहे ते कॉंग्रेसला विरोध या तत्त्वावर जन्मलेले वाढलेले पक्ष आहेत. यातील बहुतांश पक्षांनी भाजपच्या कॉंग्रेस विरोधी आघाडीत सहभागी होत सत्तेची फळं चाखली आहेत. मायावती, ममता, नविन पटनायक, चंदाबाबू नायडू, उमर अब्दूल्ला, कुमारस्वामी, जयललिता (आता त्यांचे शिष्य) हे सर्वच कधीकाळी भाजप सोबत होते. मग आज अचानक हे कॉंग्रेस सोबत जातीलच याची खात्री काय?
मूळात भारतीय राजकारणात 1967 पासून अतिशय बळकट अशी कॉंग्रेसविरोधी रजाकीय आघाडी तयार होत गेली. याआघाडी द्वारे सत्ता मिळवता येवू शकते असाही विश्वास कॉंग्रेस विरोधी पक्षांना येत गेला.
1990 नंतर भाजप आणि विरोधी इतर अशी एक विभागणी तयार होत गेली. यातील भाजपचा हिंदूत्ववादी चेहरा बहुतांश पक्षांना आवडणार नाही असा एक समज पत्रकारांनी तयार करून दिला. निवडणुकीत दलित-मुस्लिम मते मिळवायची असतील तर हिंदूत्ववादी चेहरा ठेवून भागत नाही असे पण एक पक्के मत राजकीय पक्षांचे तयार होत गेले.
या सर्व मांडणीला पहिला मोठा धक्का 2014 च्या निवडणुकीत बसला. पारंपरिक दृष्टीने मुस्लिम (काही प्रमाणात दलितही) यांचा अनुनय न करता सत्ता प्राप्त करता येते आणि ती सक्षमपणे राबविताही येते हे मोदींनी सिद्ध करून दाखवले. आणि नेमके यातूनच आज जे उद्भवले आहे ते दुखणे सुरू झाले. राजकीय पक्ष कितीही आव आणत असले तरी ते सगळे सत्तावादी आहेत. आणि राजकीय पक्ष म्हटल्यावर तसं असण्यात गैर काहीच नाही. मग जर ही सत्ता मिळविण्यासाठी आत्तापर्यंत जे हत्यार वापरले ते बोथट झाले असेल तर ते परत कोण कशाला वापरणार?
कॉंग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधीही आता भगवी उपरणी अंगावर घेवून मंदिरांचे उंबरे झिजवायला लागले. मायावतींनी तर आता ब्राह्मणांच्या पायाला स्पर्श करून आशिर्वाद घेण्याचे अभियान जाहिर केले आहे.
हे सगळे पाहिल्यावर ‘महागठबंधन’ चा रस्ता बंद झाला असून सगळेच पक्ष स्वतंत्रपणे आपआपल्या पद्धतीनं मतदाराला मनवायला तयार झाल्याचे दिसते. महागठबंधन चा पुरस्कार करणार्यांना या भाजपविरोधी धोरणाआडून कॉंग्रेसचे पुनर्जिवन करावयाचे होते. कारण कॉंग्रेसच्या राजवटीत डाव्या चळवळीतील बहुतांश अ-राजकीय स्वयंसेवी संस्थांना सरकारी अनुदाने तसेच परदेशी अनुदाने यांची खैरात मोठ्या प्रमाणात मिळत होती. आता ते सगळे बंद पडल्याने या वर्गात एक अस्वस्थता आहे. पण यांना कॉंग्रेसचे सरळ समर्थन करणे किंवा कुमार केतकरांसारखे प्रत्यक्ष कॉंग्रेसमध्ये जाणे शक्य नाही. मग ही सगळी मंडळी महागठबंधनच्या पडद्या आडून कॉंग्रेस बचाव मोहिम चालवत आहेत.
समाजवादी चवळीतील लोकांनी राष्ट्र सेवा दल बळकट करणे आणि त्या अनुषंगाने एक मोठं संघटन उभारून त्याचे रूपांतर राजकीय ताकदीत करणे ही गोष्ट आवश्यक आहे. आधी कांशीराम आणि आता मायावतींनी बामसेफच्या आधाराने असा प्रयत्न मोठ्या नेटाने चालविला आहे. बामसेफचा फायदा बसपा ला मिळत राहतो. महाराष्ट्रात इतकी पुरोगामी परंपरा असताना, साक्षात बाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकर नेतृत्व करत असताना त्यांच्यापेक्षा मायावती जास्त मते कसे काय घेतात? याचा व्यवहार्य विचार करायला पाहिजे.
‘महागठबंधन’ चा प्रयोग कॉंग्रेस शिवाय केला गेला पाहिजे असा विचार मात्र ही कॉंग्रेसची अप्रत्यक्ष लाभार्थी मंडळी मांडत नाही. शरद पवारांनी ‘पुलोद’ चा प्रयोग महाराष्ट्रात भाजपाला सोबत घेवून केला होता. जनता दलाच्या काळात भाजप आणि कॉंग्रेस यांना बाजूला ठेवून राजकीय आघाडीचा प्रयोग केला गेला होता. आज कॉंग्रेस राजकीय दृष्ट्या क्षीण होत चालली असेल तर तीला वाचविण्यासाठी कॉंग्रेस सोडून इतरच का धडपडत आहेत? यातील गोम समजून घेतली पाहिजे.
ज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्ता यांनी एक मोठा लेख लिहून असं प्रतिपादन केलं होतं की कॉंग्रेसने आपली राजकीय लढाई स्वत: लढावी. लेखक-पत्रकार-कलावंत-सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून लढू नये. आत्ता समोर असणार्या विधानसभा निवडणुकांसाठी महागठबंधनचा प्रयोग होणे शक्य नाही हे तर स्पष्टच झालंय. पण दुसरी आश्चर्याची गोष्ट म्हणजे निवडणुकीत प्रत्यक्ष मैदानात उतरून प्रचाराची हवा तयार करून देणे, त्या निमित्ताने आपला धोरणात्मक मसुदा घेवून लाकांसमोर जाणे, येणार्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी वातावरण तयार करणे असे कुठलेही प्रयत्न विरोधी पक्षांकडून होताना दिसत नाहीत.
कॉंग्रेस तर अजूनही सुस्तीतून बाहेर यायलाच तयार नाही. पण ज्या तीन तरूण नेत्यांबद्दल माध्यमे भरभरून लिहीत होती ते कन्हैया कुमार, जिग्नेश मेवाणी, हार्दिक पटेल हे कुठे आहेत? चौथा तरूण नेता म्हणजे अल्पेश ठाकुर. तो तर प्रत्यक्ष कॉंग्रेसच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडून आला आहे. अल्पेश सध्या उत्तर प्रदेश आणि बिहारी कामगारांविरूद्धच्या मतप्रदर्शनाने गाजत आहे. ही सगळी फौज सध्या कुठे आहे? या विधानसभा निवडणुकांत हे चेहरे विरोधी पक्षांकडून वापरले जाणे अपेक्षीत होतं. पण आता महागठबंधनचे स्वप्न विरल्यामुळे यांचा वापर कोण आणि कसा करणार हाच प्रश्न आहे. शरद पवार, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी हे कुणाच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार? का ते कांही प्रचार करणारच नाहीत?
भाजप आणि कॉंग्रेस या प्रमुख दोन पक्षात ही लढत होते आहे. यात विजय कुणाचाही होवो ‘महागठबंधन’चे भविष्य सांगणारे कुडमुडे ज्योतिषी यांचा वैचारिक पराभव झाला आहे. अशाच पद्धतीनं वास्तवावर आधारीत विश्लेषण न करता आपल्या मनाप्रमाणे हवेत पतंगबाजी करत राहिले तर येत्या लोकसभा निवडणुकांत यांच्या मतप्रदर्शानाची विश्लेषणाची खिल्ली सामान्य वाचक उडवत राहतील. डावी चळवळ सामान्यांशी संवाद साधण्यात जशी अपयशी ठरत चालली आहे तसेच त्यांच्या पदराखालचे पत्रकार विचारवंतही सामान्यांची भावना समजून घेण्यात अपयशी बनत चालले आहेत.
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
No comments:
Post a Comment