औरंगाबादला सध्या दैनिक दिव्य मराठीच्या वतीने लिटरेचर फेस्टिवल चालू आहे (दि. 23 नोव्हें ते 25 नोव्हें 2018). 25 तारखेच्या कविसंमेलनात माझं नाव पत्रिकेत छापल्या गेलं आहे. पण 24 नोव्हें. संध्या. 7 वा. पर्यंत मला अधिकृतरित्या कसलेही आमंत्रण मिळाले नाही. कुणी साधा फोनही केला नाही. व्हॉटसअपवर मेसेजही नाही. शेवटी मी या कवी संमेलनाला न जाण्याचा निर्णय घेत आहे.
हा मुद्दा केवळ वैयक्तिक असला असता तर मी त्याची जराही वाच्यता केली नसती. एक कवी म्हणून चांगली कविता लिहीणे हेच माझे ध्येय असू शकते. कविता सादर करणे, संमेलनात मिरवणे हे असू शकत नाही. त्यामुळे मला उद्या प्रकाश झोतात राहता येणार नाही याची जराही खंत नाही. इतर कवी लेखक वर्तमानपत्रांशी कशाला भांडा पुढे मागे आपलेच नुकसान होवू शकते असा दृष्टीकोन बाळगून गप्प बसतात. पण मला त्याचीही फिकीर नाही. आयोजन करणारे बहुतांश लोक माझ्याशी कित्येक वर्षांपासून संबंधीत आहेत. हे आयोजन करताना माझ्याशी राजहंसच्या कार्यालयात आयोजकांपैकी एक अनिकेत सराफ यांनी सविस्तर चर्चा केली. बर्याच जणांचे संपर्क क्र. माझ्याकडून घेतले. काही कार्यक्रम पण मी सुचवले. पण चुकूनही माझ्याशी नंतर संपर्क केला नाही. हे फेस्टीवल नाशिकला का घेता औरंगाबादला का नाही असा प्रश्न मी तत्कालीन संपादक प्रशांत दिक्षीत यांना केला होता. औरंगाबादला हे आयोजन करा असा लकडाच मी लावला होता. पण प्रत्यक्षात जेंव्हा औरंगाबादला हे आयोजन ठरले तेंव्हा मलाच बाजूला ठेवल्या जाईल याचा अंदाज नव्हता.
त्यांनी मुद्दाम आकसाने द्वेषाने असं काही केलं असा आरोप मी करणार नाही. पण याची जाहिर वाच्यता करण्याचे कारण म्हणजे मराठी लेखकांना गृहीत धरण्याची वाईट प्रवृत्ती. या महोत्सवात इतर जे कलाकार सहभागी झाले आहेत त्यांची संपूर्ण शाही इतमामाने सरबराई केलेली आहे.पण या तुलनेनं मराठी लेखकांकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आले हा माझा आरोप आहे. चंद्रशेखर सानेकर यांनी 22 तारखेला अशाच बेदखली बद्दल खेद व्यक्त केला होता. त्यांनाही प्रवासाची कुठलीही व्यवस्था न करता वेळेवर या म्हणून सांगण्यात आले तेंव्हा त्यांनी येणार नाही हे स्पष्ट सांगितले. तशी पोस्टही त्यांनी फेसबुकवर टाकली. त्यावर चर्चा झाली तेंव्हा अयोजकांपैकी अनिकेत सराफ यांनी दिलगिरी व्यक्त केली. त्यात मी लेखक कविंना निमंत्रण नसल्याचा उल्लेख केला. अनिकेत सराफ यांनी कुणाला आमंत्रण मिळाले नाही असे विचारल्यावर मी स्पष्ट केलं की मला आमंत्रण मिळालं नाही.
यालाही दोन दिवस उलटून गेले. पण मला निमंत्रण आलं नाही. मग मात्र मी लिटरेचर फेस्टीवल मध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला.
लिटरेचर फेस्टीवल मध्ये मंडप कसा टाकला आहे, त्याची रचना कशी केली आहे, मंचावर नेपथ्य कसे उभारले आहे, महोत्सवाच्या आधी पंचतारांकित हॉटेलात कॉकटेल पार्टी कशी आयोजीत केली आहे या बाबी आयोजकांना महत्त्वाच्या वाटत असाव्यात. याला कार्पोरेट कल्चर म्हणतात. पण ज्याच्या नावाने हा महोत्सव भरवला जात आहे त्या लेखकाला मात्र फारशी किंमत देण्याची गरज वाटत नाही. किंमत तर सोडाच त्याला किमान विचारले जात नाही हे आक्षेपार्ह आहे. धार्मिक नेते, गायक, नट या सेलिब्रिटींना अतोनात महत्त्व देणार्या महोत्सवात साहित्यीक नकोच असतील तर त्यांना तोंडदेखलं बोलवूही नका. नाव फक्त ‘लिटरेचर फेस्टीवल’ आणि साहित्यीकांशिवाय हव्या त्या इतर लोकांना बोलावून फेस्टीवल साजरा करा. अशी जर संस्कृती रूजवायची असेल तर त्याबद्दल काही न बोललेलंच बरं.
वर्तमानपत्राचा वाचक हा केंद्रभागी असेल तर त्यासाठी लेखक महत्त्वाचा असतो असा एक बाळबोध समज माझा होता. पण दिव्य मराठीने तो दूर केला त्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद !
अतिशय वाईट आहे हे आणि साहित्यिकाना गृहीत धरण्याची प्रवृत्ती वाढत आहस ! याला स्वतः लेखक कवी ही तितकेच जवाबदार आहेत. या पार्श्वभूमीवर आपली भूमिका रास्तच आहे !
ReplyDeleteअहो हे आपले लेखक फारच लाचारीने वागतात..
ReplyDelete