Wednesday, October 30, 2013

का उतरावं लागतं साहित्यीकाला रस्त्यावर....?

उरूस, दैनिक पुण्य नगरी, बुधवार 30 ऑक्टोबर 2013  

अपल्या हस्तीदंती मनोर्‍यात कवी-साहित्यीक-कलावंत बसून असतात असा आरोप नेहमी होतो. तो काही प्रमाणात खराही आहे. पण जेंव्हा सभोवतालची परिस्थिती अतिशय स्फोटक बनते, जगणेच अशक्य करून टाकते तेंव्हा काय करायचे? महान साहित्यीकाच्या घरासमोरचा रस्ता खराब झाला आणि त्याची बायका पोरे किंवा इतर कुटूंबिय त्यावर पडून जायबंदी झाले तर त्याचे पुरस्कार कामाला येणार आहेत का? भारतरत्न मिळालेल्या गायिकेच्या घरासमोर पावसाचे पाणी तुंबले आणि तिला घराबाहेर निघणे अशक्य झाले तर त्या भारतरत्नची नाव करून पाण्यावरून तरून जायचे का? पद्मश्री मिळालेल्या नटाच्या घराचा वीज पुरवठा 8 दिवस खंडित झाला. तर त्यानं काय प्रकाशाचा अभिनय करून अंधारावर मात करायची?
माझ्या घराकडे जाणारा रस्ता अतिशय खराब आहे. त्याबद्दल काय करता येईल याची आम्ही चर्चा करत होतो. अर्ज विनंत्या निवेदनं सर्व सर्व करून झालं. आणि सगळ्यात शेवटी काहीच होत नाही हे पाहून गुरूवारी (दि. 24 ऑक्टोबर 2013) रस्त्यांवरच्या खड्ड्यांसाठी मी रस्त्यावरच उतरलो. माझी मोटार सायकल रस्त्याच्या मध्यभागी लावली, माझा मित्र जीवन कुलकर्णी याने  आपले  वाहन रस्त्यात लावले. बघता बघता लोक गोळा होत गेले. महाविद्यालयातील तरूण आणि शाळेतील मुलांचा उत्साह प्रचंड होता. त्या भागातील नगरसेवक तिथे आले पण त्यांनी काही ठोस आश्वासन देण्यास नकार दिला. आम्ही रस्त्याच्या दुरूस्तीसाठी लेखी आश्वासन मिळेपर्यंत बसून रहायचं ठरवलं. महानगर पालिकेच्या अभियंत्याने आम्हाला अकरा वाजता रस्ता दुरूस्तीचे लेखी आश्वासन दिले. आणि हे आंदोलन मिटले.
हे आंदोलन मिटले असे आम्हाला वाटले पण ते मिटले होते फक्त आमच्यापुरते. सामान्य नागरिकांचा रोष स्थानिक नेत्यांवरती होता. तसेच प्रशासकीय अधिकार्‍यांवरही होता. या शिवाय न हलणारी निगरगट्ट नोकरशाहीसुद्धा सामान्य माणसाने आवाज उठवला म्हणून अस्वस्थ झाली होती. त्यांनी कधी नव्हे तर काहीतरी कृती करायला सुरवात केली. पण हे सगळं जनक्षोभ वाढविणारे ठरेल याची त्यांना कल्पना नव्हती.
तब्बल चोविस तासांनी आमच्यावर पोलिस ठाण्यात बोलावून गुन्हे नोंदविण्यात आले. माझ्यासोबतच्या दोन मित्रांनी जामिन घेतला. त्यांची लागलीच सुटकाही झाली. मी जामिन नाकारला आणि ती नोकरशाही हादरली. कारण याची त्यांनी कल्पनाच केली नव्हती. सामान्य माणसापाशी असहकाराचे हत्यार असते. आणि ते त्याने वापरले तर काय करावे याचे उत्तर नोकरशाहीपाशी नसते.  
मला न्यायालयासमोर उभे करण्यात आले. तिथेही मी जामिन घेण्यास नकार दिला. न्यायधीश एक महिला होत्या म्हणूनही असेल कदाचित त्यांनी वैयक्तिक पातळीवर मला जामिन घेण्याची विनंती केली. पण मी ते नाकारले आणि तुरूंगात जाणे पसंद केले. 
खरं तर या व्यवस्थेने हे माझ्यावर लादले होते. मी एका खड्ड्यासाठी छोटेसे माझ्यापुरते आंदोलन केले. ते बघता बघता मला तुरूंगात घेवून गेले. एक कवी साहित्यीक आंदोलन का करतो तर त्याला तसे करण्यास व्यवस्था भाग पाडते. 
तुरूंगातला माझा अनुभव मोठा मजेशीर होता. सामान्य कैद्यांना कळेना हा वेगळा दिसणारा व्यवस्थीत दाढी केलेला बर्‍यापैकी कपड्यातला माणूस तुरूंगात का आला. एका कैद्याची प्रतिक्रिया तर मोठी बोलकी आणि आपल्या व्यवस्थेवर ताशेरे उडविणारी होती. तो सरळ म्हणाला, ‘‘साहेब कोणत्या डिपार्टमेंटमधले तूम्ही? करप्शन मध्ये आला असाल.’’ त्याला जेंव्हा मी माझी सर्व माहिती सांगितली आणि तुरूंगात येण्याचे कारण सांगितले तेंव्हा ते सगळे कैदी आश्चर्य करीत राहिले. जामिन नाकारून कोणी तुरूंगात कसे काय राहू शकतो? हेच त्यांना कळेना.
माझ्यासोबत महाभारताचे पुस्तक होते. ते मी रात्री वाचायला सुरवात केली. सोबतचा दुसरा कैदी पत्नीचा खुन करून आलेला होता. त्याला दुसरा एक हात पाय तोडण्याच्या गुन्ह्यातील कैद्याने बोलावले आणि म्हणाला, ‘‘देख बे हरामी. तू औरत की वजह से अंदर आया. ये बॉस पढ रहे वो महाभारत भी औरत की वजहसेही हुआ है.’’
पहाटे सुर्याची किरणे बराकीत आली तेंव्हा ती बराक असूनही छान वाटले. बाकी जो काही रात्रभर त्रास झाला ते जावू द्या. जेवणाचे जे हाल झाले ते काय सांगणार. बराकीचा एक भाग प्रस्थापित कैद्यांचा होता. त्यातील एकाकडे सगळी वर्तमानपत्रे येत होती. त्याने इंग्रजी दैनिकातील माझी बातमी वाचली. मला खुणेनं स्वत: जवळ बोलावून घेतलं. मराठी वृत्तपत्रांतील माझी छायाचित्रे आणि मोठ मोठ्या बातम्या वाचल्या. मला तो गांभिर्याने म्हणाला, ‘‘साहेब तूम्ही रहाच इथे जास्त दिवस. बाहेरच्या गोष्टीसाठी तूम्ही आंदोलन करता आता जरा इथल्या समस्यांसाठीही करा. हे पोलिस फार ***** (ही पाच अक्षरी शिवी मी सांगायची गरज नाही सगळ्यांना माहित आहे) आहेत.’’
जो कैदी हात पाय तोडून आत आला होता तो दलित होता आणि त्याची बायको सवर्ण होती. यामुळे त्याच्याशी भांडण समोरच्याने काढले होते. याने कंटाळून त्याच्यावर हल्ला केला आणि आत आला. आता काय करावे याचा सल्ला तो मला मागत होता. वास्तविक त्याचा भाऊ नगरसेवक होता. मोठ मोठ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांशी त्याचे जवळीकीचे संबंध होते. पण ही सगळी व्यवस्था आपल्याला काहीच न्याय देवू शकत नाही. एक साधा प्रामाणिक माणूस आपल्याला खरं खरं काही तरी सांगू शकेल असे त्याला वाटले. 
चोरीची गाडी खरेदी प्रकरणी एक तरूण पोरगा घरचा एकूलता एक उगाच आतमध्ये आला होता. त्याने माझे ताट मला धुवू दिले नाही. नियमित जेलची वारी करणार्‍या एका कैद्याने माझ्यासाठी जास्तीचं दुध, केळं राखून ठेवली. मला तुरूंगातले जेवण जाणार नाही याची त्याला कल्पना होती.
एक साधा माणूस आपल्या हक्कासांठी आग्रह धरतो आणि व्यवस्था हादरते. त्यातही तो कवी साहित्यीक असेल तर त्याला याचे विविध पैलू चटकन लक्षात येतात. आणि त्याशिवाय महत्त्वाचे म्हणजे कवी-साहित्यीक-कलावंत यांच्याभोवतही असलेले अलिप्ततेचे आवरण गळून पडते. वास्तवाची हवा त्याला स्पर्शते आणि त्याच्यातील कलाकारालाच हादरून सोडते. त्याच्या जगण्याची मुळं सुस्त-सुखवस्तू मातीतून ती उपटून तपासते. तेंव्हा त्याचे डोळे उघडतात.  मी 25 वर्षांपूर्वी एक कविता लिहीली होती
बंद करून घ्याव्यात दारं खिडक्या
तर भिंतीच कोसळत चालल्या आहेत
हवेत विष भिनून 
श्वासांपर्यंत येवून पोंचले आहे
स्फोटाचे परिणाम पोंचत आहेत
गर्भातल्या बाळापर्यंत
आता कुठल्या आवरणाखाली जपून ठेवावा
माणूसकीचा कोवळा कोंब
आता रस्त्यावर यावंच लागेल
एखाद्या ओंडक्यामागे 
सगळी शक्ती एकवटून
माराव्या लागतील धडका 
बंद दरवाज्यावर

मला कल्पना नव्हती की माझी कविता माझ्या मेंदूतून माझ्या हातापायात उतरेल. मी खरंचच रस्त्यावर उभा राहीन. बघता बघता लोकं जमा होतील. माझ्यामागे जनशक्ती उभी राहून मला व्यवस्थेला धडक मारण्याचे बळ येईन. 
आता साहित्यीकालाच नाही तर सगळ्यांना रस्त्यावर उतरून व्यवस्थेला धडक मारण्याची गरज निर्माण झाली आहे. 
          
      
      श्रीकांत अनंत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. मो. 9422878575.

Tuesday, October 22, 2013

सांगा फ.मुं.शिंदे, खरे चंगळवादी कोण?

उरूस, दैनिक पुण्यनगरी, मंगळवार 22 ऑक्टोबर 2013 


सासवड येथे संपन्न होणार्‍या साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष फ.मुं.शिंदे बोलताना असे म्हणून गेले की, ‘..संमेलने खर्चिक होत चालली आहेत. साहित्यीकही चंगळवादीच आहेत.’ आता फ.मुं. संमेलनाचे नियोजित अध्यक्ष त्यामुळे त्यांच्या कुठल्याही बोलण्याची बातमी होणारच. नसता माजी संमेलनाध्यक्षांच्या बोलण्याच्या कुठे बातम्या होतात? त्यांनाही संमेलन संपल्यावरच संमेलनाच्या व्यवस्थेतील दोष, अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील दोष, मंचावरील राजकारण्यांची उपस्थिती हे सगळं जाणवायला लागते. 
फ.मुं.शिंदे यांनी साहित्यीक चंगळवादी आहेत असे म्हटलं ते कुठल्या आधारावर ते कळायला मार्ग नाही. कारण संमेलनाचा थाटमाट, डामडौल व त्यावरील खर्च पाहिल्यास यात साहित्यीकांचा सहभाग नेमका किती? हा प्रश्न आपण समजून घेतला पाहिजे. ठाण्याच्या साहित्य संमेलनातील एकूण 1 कोटी दहा लाख खर्चापैकी साहित्यीकांच्या मानधनावर खर्च झालेली रक्कम ही फक्त 4 लाख रूपये आहे. तर स्मृति चिन्हावर खर्च झालेली रक्कम ही 5 लाख आहे. म्हणजे एकूण रकमेपैकी दहा टक्केही रक्कम साहित्यीकांच्या तथाकथित चंगळवादावर खर्च झाली नाही. चंद्रपुर संमेलनातील मानधनाचा आकडा तर याहीपेक्षा कमी आहे. चिपळूण संमेलनात जो मांडव उभारला, जो खेडेगावाचा देखावा उभा केला त्याचा खर्च जवळपास सव्वा कोटी रूपये झाला होता. नितिन चंद्रकांत देसाई यांना हे काम दिलं होतं. मंचावरील निमंत्रित सहित्यीक पाहुण्यांना दिलेले मानधन 5 लाख रूपये. व तो मंच उभा करण्यासाठी नितीन चंद्रकांत देसाई यांना दिले सव्वा कोटी रूपये.
उद्या अशी स्थिती येईल की नितीन चंद्रकांत देसाई यांनी उभ्या केलेल्या ताज महालाच्या भव्य सेटला लोकांनी भेट द्यायला यावे. आणि लोकं येणार असतील तर एक छोटा मंच उभा करून, त्यावर ध्वनीक्षेपक लावून, साहित्य संमेलनाचे एक छोटे बॅनर लावून काय ते संमेलन बिम्मेलनही उरकून घ्यावे. 
चिपळूण संमेलन तर सोडाच आजकाल कुठल्याही साहित्य संमेलनात खर्च होतो तो मांडव, जेवणावळी, शुटिंग यांच्यावरच. इतकंच नाही तर पाहूणे असतात 100 किंवा 200 आणि जेवणावळी उठतात हजारोंनी. मग हा खर्च सगळा संमेलनाच्या बोडख्यावर पडतो तो कुणामुळे? सांगा फ.मुं.शिंदे यात साहित्यीकांचा काय संबंध?
गर्दी जमा करायची म्हणून अमिताभ बच्चन, माधुरी दिक्षीत, मकरंद अनासपुरे यांना बोलावायचे आणि या गर्दीसाठी भव्य मंडप उभा करायचा. त्यावर प्रचंड पैसा खर्च करायचा. ही गर्दी हे कलाकार गेले की गायब होते. मग संमेलनाचे इतर दिवस हा मांडव ओस पडलेला असतो. म्हणजे अमिताभ बच्चन यावा म्हणून साहित्य संमेलन आहे का? हा वाढलेला खर्च डामडौल संमेलनाच्या खात्यावर पडला तर त्याचा साहित्यीकाशी काय संबंध? 26/11 चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी नायगावच्या साहित्य संमेनात लावण्यांचा कार्यक्रम चालू होता. आता या लावण्यांचा खर्च कुठल्या खात्यावर टाकायचा?
राजकारण्यांनी संमेलनाच्या मंचावर यावे की नाही हा वाद नंतर बघू. पहिल्यांदा हे लक्षात घेतले पाहिजे कुठलाही साधा मंत्री संमेलनाला येता म्हटला की आजूबाजूची पाच पन्नास विश्रामगृह त्याचे चेलेचपाटे, त्याच्या खात्याचे अधिकारी, त्यांचे चमचे, अधिकार्‍यांची बायकामुले यांच्यासाठी आरक्षीत केले जातात. त्या विभागाचे त्या भागातील चपराशापासून सगळे कर्मचारी तीन दिवस संमेलनाच्या आजूबाजूला कारण नसताना घुटमळत बसतात. हा मंत्री दोन तासात येवून विमानानं/हेलिकॉप्टरने परतही जातो. पण ही बाकी पिलावळ तीन दिवस हटत नाही. शिवाय यांना जेवण्याचे मोफत पास संयोजकांकडून हवे असतात. हा मोठा खर्च संमेलनाने का सोसायचा? एका मराठवाडा संमेलनात साहेबांना भेट द्यायचे म्हणून मंत्र्याच्या चमच्याने पुस्तकांच्या दुकानांवरून पटापट पुस्तकं गोळा केली आणि गायब झाला. संमेलन संपले. साहेब तर केंव्हाच निघून गेले. पुस्तकाचे दुाकानदार वाटच पहात बसले बिलाची. आजतागायत हे पैसे दुकानदारांना मिळालेले नाहीत. हा त्रास परत वर सहन करायचा.
शासन साहित्य संमेलनासाठी साहित्य महामंडळाला 50 लाख रूपये दरवर्षी देते. तशी सोयच अर्थसंकल्पात केली आहे. कोणीही स्वागताध्यक्ष झाला तरी हे पैसे मिळणारच आहेत. त्यासाठी साहेबांचे वर वजन असण्याची काही गरज नाही. या पैशात अतिशय नेटक्या आणि देखण्या स्वरूपात साहित्य संमेलन पार पडू शकते. ज्या ठिकाणी साहित्य संमेलन होणार आहे तेथील नगर पालिका/महानगर पालिका यांनी जागा, पाणी, वीज यांची सोय करून द्यावी.
निवासाची सोय जर पाहूणे मर्यादित असेल तर कुठल्याही जिल्ह्याच्या ठिकाणी होणे काहीच अवघड नाही. आजकाल बर्‍याच मंगल कार्यालयांमध्ये चांगल्या सोयी आहेत. जेवणावळी जर मर्यादीत ठेवल्या तर तो खर्चही मर्यादीत होतो. 
शेगांव येथे शेतकरी संघटनेने शरद जोशी यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त एक मेळावा 10 नोव्हेंबर 2010 रोजी घेतला होता. आलेल्या सर्व 2 लाख लोकांच्या जेवायची सोय गजानन महाराज मंदिर समितीने केली होती. त्याचा कुठलाही ताण आयोजकांवर पडला नाही. कुणाला वाटेल की असल्या गोष्टी साहित्य संमेलनात शक्य नाहीत. पण जवळाबाजार येथे 1995 साली परभणी जिल्हा संमेलन घेण्यात आले होते. तेंव्हा तेथे चालू असलेल्या भागवत सप्ताहाच्या मांडवातच हे संमेलन भरले. व सर्वांच्या जेवणाची त्या सप्त्याच्या कार्यक्रमातच करण्यात आली. 
साहित्य संमेलनात असाहित्यीक लोक घुसखोरी करतात आणि त्याने संपूर्ण संमेलनाचे अर्थशास्त्र कोलमडून पडते.          पुस्तकांची प्रदर्शनं हे संमेलनातील प्रमुख आकर्षण असते. प्रकाशक हा व्यवसायिक असतो. मग या प्रकाशकांनीच मिळून संमेलनाच्या खर्चाची जबाबदारी का घेवू नये? नॅशनल बुक ट्रस्ट ही संस्था दरवर्षी एक पुस्तक मेळा भरवते. त्यासाठी मोठा खर्च शासनाच्या वतीने करण्यात येतो. साहित्य अकादमी पुस्तकांविषयी कार्यक्रमासाठी मोठा खर्च करते. मग शासनाचे 50 लाख रूपये, साहित्य अकादमी, नॅशनल बुक ट्रस्ट यांचा निधी व प्रकाशक परिषद यांच्या सहकार्याने तीन दिवसीय वाङ्मयीन उत्सवाचे आयोजन सहज होवू शकते. 
साहित्य संमेलनात कायमस्वरूपी उपेक्षीत राहिलेला घटक म्हणजे जागोजागची सार्वजनिक ग्रंथालये. यांना कुठेच समाविष्ट करून घेतले जात नाही. खरे तर मुंबई, पुणे वगळता उर्वरीत महाराष्ट्रात कुठेही संमेलन भरू द्या त्या भागातील सार्वजनिक ग्रंथालयांना ती मोठी पर्वणी असते. कारण त्यांची खरेदी मोठ्याप्रमाणावर त्या संमेलनात होवू शकते. त्यांना त्या काळात निधीही उपलब्ध करून देण्याची सोय करता येते. असा प्रयोग परभणी, नगर च्या साहित्य संमेलनात त्या त्या आयोजकांनी केला होता.
म्हणजे साहित्य संमेलनासाठी साहित्य महामंडळ, प्रकाशक परिषद, ग्रंथालय संघ, साहित्य अकादमी, नॅशनल बुक ट्रस्ट यांनी मिळून आखणी केल्यास कुठल्याही माजोरडी राजकारण्यांच्या पदराखाली लपण्याची गरज आयोजकांना राहणार नाही. 
दिवाळी झाली की लगेच वसमतला मराठवाडा साहित्य संमेलन होणार आहे. अजून संमेलनाची निमंत्रण पत्रिकाही नाही पण आत्ताच उद्घाटक म्हणून शरद पवार येणार अश्या बातम्या सुरू झाल्या आहेत. फ.मुं. शिंदे सर तूमच्याच जिल्ह्यात तूमच्याच गावाजवळ संमेलन होत आहे. मग तूम्ही, ‘‘ शरद पवार कुपया तूम्ही संमेलनाला येवू नका! तूमच्यामुळे खर्च विनाकारण वाढतो. शिवाय मराठवाड्यात संमेलनाच्या उद्घटनाचा तूमचा कोटा पूर्णपणे संपून गेला आहे. त्यापेक्षा इतर भाषेतील एखाद्या मोठ्या साहित्यीकाला आपण बोलवूत.’’ हे सांगणार का? हो त्यांनाच सांगावे लागेल. कारण साहित्य परिषदेच्या पदाधिकार्‍यांनी कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळले आहे मग कोणाला सांगणार?
एकीकडून अभिनेते, राजकारणी यांच्या कच्छपी आम्ही लागणार आणि दुसरीकडून चंगळवादी संमेलन झाले म्हणून ओरड करणार हा दुटप्पीपणा झाला. साहित्यीकांवर प्रत्यक्ष होणारा खर्च अतिशय कमी असतो. सोन्यासाठी चिंधी बाळगायची की चिंधीसाठी सोनं ते ठरवा. सांगा फ.मुं.सर चंगळवाद रोखण्यासाठी शरद पवारांना न येण्याची विनंती करणार का?      
      
      श्रीकांत अनंत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. मो. 9422878575.

Tuesday, October 15, 2013

म.पैंगबर आणि जात्यावरच्या ओव्या

उरूस, दैनिक पुण्यनगरी मंगळवार 15 ऑक्टोबर 2013 


मराठी भाषेतील जात्यावरच्या ओव्या हा एक अमुल्य असा ठेवा आहे. आपल्या एका कवितेत इंद्रजित भालेराव यांनी वाईट वागणार्‍या अनैतिक चारित्र्यहीन पुरूषांवर टिका करत करत असं लिहीलं आहे
...अशा पुरूषांपासूनच इतिहासात 
कवितेला कायम भिती होती
म्हणून सातशे वर्षे
कविता फक्त जात्याभोवतीच जिती होती
 
या जात्यावरच्या ओव्यांचा मराठवाड्यात अतिशय सविस्तर व चिकित्सक अभ्यास डॉ. ना.गो.नांदापुरकर यांनी केला. मराठी स्त्री रचित रामकथा हे त्यांनी शोधलेलं प्रकरण तर केवळ अफलातून. जात्यांवरच्या ओव्यातून संपूर्ण रामायण नांदापुरकरांनी उभं केलं आहे. जगाच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडले की एखाद्या महाकाव्याची प्रमाण संहितेसोबत संपूर्ण समांतर अशी लोकसाहित्यात रचना सापडणे.
परभणी आणि परिसरात हिंडताना नांदापुरकरांना इस्लाम संबंधातील काही ओव्या सापडल्या. खरं तर या प्रदेशातील सर्वच लोक हे कष्टकरी/शेतकरी असल्याने त्यांच्या रोजच्या जगण्यात शेतीचे संदर्भ येणारच. स्वाभाविकच कला-साहित्य-संगीत यातही हे शेतीचे संदर्भ सापडणारच. शिवाय अगदी आत्ता आत्तापर्यंत (आणि लोड शेडिंगमुळे आताही) स्त्रीयांना रोज सकाळी जात्यावरती दळण दळावं लागायचं. मग ही कष्टकरी बाई आपल्या रोजच्या जगण्यालाच गाण्यातून सूर द्यायची. कलेसाठी कला की जीवनासाठी कला हा वाद घालणार्‍यांनी जात्यावरची ही ओवी लक्षात ठेवावी. जात्याला उद्देशून ही कष्टकरी बाई म्हणते आहे
दाण्याच्या जोडीनं जीण्याचा रगडा ।
गाण्याच्या ओढीनं तूला ओढीते दगडा ॥

इतक्या कलात्मक पातळीवर आपल्या रोजच्या जगण्याचे कष्ट आणि त्यातून कलेचा मिळणारा आनंद ती मांडते. इस्लाम या प्रदेशात आला तो सुफी तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून. या सुफी तत्त्वज्ञानानं स्थानिक चाली परंपरा यांचे बोट सोडले नाही. परिणामी पूर्वीच्या हैदराबाद राज्यात जी भाषा बोलली जाते ती दखनी या नावाने प्रसिद्ध आहे. ही उर्दूची बोलीभाषा असल्याचा गैरसमज काही विद्वान पसरवतात. पण ही भाषा उर्दूपेक्षाही जूनी असून या भाषेत उर्दूच्याही आधी ग्रंथरचनाही झाली आहे.
ही मुसलमान स्त्री आपल्या घरी जात्यावर दळण दळताना इतर हिंदू स्त्रीयांसारखीच ओव्या गाते आहे. आणि मग स्वाभाविकच ती आपल्या देवाचे गुणगान गात आहे.
देवा मंदी देव । पैगंबर हाय खरा ।
गावाच्या शेजारी । देलाय यानं डेरा ॥
 
बरं नुसताच डेरा दिलाय म्हणजे मशीद उभी आहे असं नाही. इस्लाम मधील जे सण आहेत त्यांचेही वर्णन ती आपल्या ओव्यात करते आहे. रमझानच्या महिन्यातील रोज्याचा उपवास ही स्त्री पाळते आहे. श्रावणाचे महत्त्व जसे हिंदू स्त्रीला आहे तसेच हीला रमझानचे आहे. आणि हे महत्त्व इतके की युद्धाची वेळ आली तरी ते सर्व बाजूला ठेवून माझा देव रोज्याचा उपवास सोडतो आहे.
बारा हजार घोडा । येशी येऊन थोपला ।
रोजा सोडाया गुंतला । पैगंबर देव माझा ॥

पैगंबराचे गुणगान गाताना ही स्त्री आपल्या सोबतच्या इतर स्त्रीयांचे देव विसरत नाही. ही परंपरा हिंदू स्त्रीयांकडून तीनं उचलली आहे. त्यामुळे ती त्यांच्याही देवाला आपल्या ओव्यात गुंफण्याला मोकळ्या मनाने तयार होते. धर्मनिरपेक्षतेच्या पोकळ गप्पा मारणार्‍या विद्वानांनी या अडाणी स्त्रीयांचे हे अक्षरधन मनलावून वाचावे. आणि यातून इच्छा असेल तर काही बोध घ्यावा.
पहिली माझी ववी । मरोती शिलेदार ।
दर्ग्यामंदी जिम्मेदार । पैगंबर देव माझा ॥
 
तीला सर्व देव सारखेच आहे. यांना मिरवत न्यायचे तर कसे
मरोतीला पालखी । ब्रह्मनाथाला मेना ।
शिंगो ठान्यावरीली आता । पैगंबर देवाला ॥
 
ज्याप्रमाणे ही मुसलमान बाई पैगंबराला कंदूरी करते त्याच प्रमाणे ती मारोतीलाही शेरनी वाटते
पैगंबर देवाला । कदूंरी बकर्‍याची ।
मरोती देवाला । शेरनी वाटीते साखराची ॥
नवस बोलले । देवा सकलादिला कांही ।
गाड्यावरी गलफ । हौशा हारी चाल पायी ॥

मुसलमान पीराला केलेला नवस फेडण्यासाठी  या हिंदू स्त्रीचा लेक हौशा हरि गाड्यावर ‘गलफ’ घेऊन स्वत: पायी चालत जात आहे.
या जात्यावरच ओव्या हा एक मोठा पुरवा तर आहेच पण भारतीय सहिष्णु मानसितेबद्दल एक फार चांगलं निरीक्षण पुरव्यासह फिरोज रानडे यांनी नोंदवलं आहे. ते म्हणतात, ‘ इस्लाम जर भारतात सिंधऐवजी दक्षिणेतल्या केरळातून प्रसार पावला असता तर अतिशय वेगळं चित्र समोर आलं असतं’ (इमारत, मौज प्रकाशन, मुंबई.)  त्यासाठी त्यांनी एक मोठं विलक्षण उदाहरण दिलं आहे. भारतातील पहिली मशिद सन 627 मध्ये केरळात बांधली गेली. ही मशिद अगदी पैगंबरांच्या हयातीतच उभारल्या गेली. कोचिनला आलेल्या अरब व्यापारांकडून राजा चेरामन याला इस्लाम धर्माबद्दल माहिती कळाली. त्याला खुप उत्सूकता वाटली. त्यानं त्या आरबी व्यापारांबरोबर प्रवास करून मदिना गाठलं. प्रत्यक्ष पैगंबरांची भेट घेवून इस्लामचा स्वीकार केला. पैगंबरांच्या घराण्यातील रझिया बिबी या स्त्रीशी विवाह केला. भारतात परत येताना त्यांने सोबत शकुनाचे अठरा दगड आणले. प्रवासातच राजा चेरामन याचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्याची पत्नी रझिया, मुल्ला इब्न दिनार व इतर सहकार्‍यांनी भारतात परतल्यावर दर शुक्रवारी नमाज पढायला सुरवात केली. स्थानिक लोकांच्या मदतीने त्यांनी भारतातील पहिली मजीद बांधली. तीच ही चेरामन जामा मशीद. 
या मशीदीला मिनार, कमानी, घुमट असं काहीच नाही. कारण ही शैली नंतर बांधकामांत वापरल्या गेली. जेंव्हा प्रार्थनास्थळ बांधायचं ठरलं तेंव्हा तिथल्या लोकांनी स्थानिक इमारतींप्रमाणे बांधकाम केलं. शिवाय मंदिराप्रमाणे ब्रांझचा एक मोठा दिवा यात टांगला. नमाज पढणार्‍याचं तोंड पश्चिमेला असावं असा संकेत आहे. पण चेरामन मशिदीत नमाजीचे तोंड पूर्वेकडे असते.
फिरोज रानडे यांनी आपल्या "इमारत" याच पुस्तकात अजून एक मजेशीर निरीक्षण नोंदवलं आहे. चिपळूणला परशुरामाचं जे मंदिर आहे त्याची शैली ही पूर्णत: इस्लामी आहे. प्रवेशद्वाराची कमान तिच्यावरील दोन छोटे मीनार इस्लामी पद्धतीचे, मंदिराचा घुमट आणि कळस युरोपीय पद्धतीचा. मंदिराची एकूण रचना मशिदीसारखी वाटणारी. रानडे यांनी हे कोडं एका वृद्धाला विचारलं. त्यानं उत्तर दिलं, ‘‘हे मंदिर मशिदीसारखं वाटणारच. कारण हे बांधलंय जंजिर्‍याच्या हबशी सिद्धीने.’’
आमचे राज्यकर्ते तेंव्हा स्थानिक लोकांच्या भावभावना रिती परंपरा जपण्यासाठी प्रयत्न करायचे त्याची चेरामन मशिद व चिपळूणचे परशुराम मंदिर जिवंत उदाहरणं. सामान्य लोकांनी आपल्या काळजात काय जपलंय त्याचं जात्यावरच्या ओव्या हे तिसरं जिवंत उदाहरण. उद्याच्या बकरी इदीच्या निमित्तानं इतकं जरी आपण लक्षात ठेवलं तरी खुप आहे.    
  


     श्रीकांत अनंत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. मो. 9422878575.

Tuesday, October 8, 2013

देवीच्या आरत्या : अर्थ, अनर्थ आणि दुरूस्त्या !


उरूस, 
दैनिक पुण्यनगरी मंगळवार 8 ऑक्टोबर 2013 

माझ्या घराण्याची कुलदैवता तुळजापुरची भवानी आहे. त्यामुळे दर वर्षी अश्विन शुद्ध प्रतिपदेला घरी घटस्थापना होते. व नवरात्रात द्वितीयेपासून ते अष्टमीपर्यंत रोज संध्याकाळी आरत्या म्हटल्या जातात. एरवी अंधार पडेपर्यंत घराबाहेर उंडारणारी आम्ही मुलं नवरात्रात आरत्यांच्या आकर्षणानं लवकर घरी परतायचो. सध्याचे जे सार्वजनिक देवीचे प्रस्थ आहे ते तेंव्हा नव्हते. घरोघरी पारंपरिक चालीवर आरत्या म्हटल्या जायच्या. आमच्या घरात चुलत भाऊ, आत्ते भाऊ, वडिल अशी मोठी माणसं खड्या आवाजात आरत्या म्हणायचे, आम्ही पोरं त्यांच्या मागोमाग सुर मिसळायसाठी धडपडायचो. बायकांचे किनरे आवाज पुरूषांच्या पहाडी आवाजात अलगद मिसळायचे. आरत्या म्हणताना बहुतेकांच्या हातात पुस्तकं नसायची. एखाद्याकडे आरतीची जूनी, पानं पिवळी पडलेली हस्तलिखित  वही असायची. ‘माहूरच्या देवीच्या आरत्या’ असं लिहीलेलं  लाल, पिवळा, निळा अशा रंगाचे मुखपृष्ठ असलेले एकच पुस्तक होतं. तेही जीर्ण झालेलं.

देवीच्या या आरत्या म्हणताना काही शब्द आम्हा पोरांना अडायचे पण विचाराची हिंमत नसायची. मोठं झाल्यावर मग हे शब्द कानाला खुपायला लागले. वयाच्या पंचविसाव्या वर्षी मी अस्वस्थ होवून या आरत्यांचा शोध घ्यायची मोहिमच हाती घेतली. ‘विष्णूदासाची कविता’ नावाचे एक पुस्तक गल्लीत आईच्या मावशीकडे मुळावेकरांकडे सापडले. आरतीचे पुस्तक आणि ते कवितेसारखे छापलेले पाहून मला फारच आनंद झाला. नसता आरत्यांची पुस्तके ही गद्यासारखीच सपाट छापलेली असतात. म्हणजेच ओळींसमोर ओळी अशी. खरं तर कवितेची रचना ओळींखाली ओळी अशी असायला पाहिजे.  ‘विष्णुदासांची कविता’ या पुस्तकात मुळ रचना पहाताना मला आम्ही म्हणताना मला खटकणारे शब्द सापडायला लागले.

देवीच्या आरत्या ज्या म्हटल्या जातात त्यात बहुतांश रचना ह्या विष्णुदासांच्याच आहेत. नगर जिल्ह्यातील संगमनेर येथील कृष्णरावजी धांदरफळे म्हणजेच विणष्णुदास. त्यांचा जन्म 1844 मधला. स्वामी पुरूषोत्तमानंद सरस्वती या नावाने अध्यात्मिक क्षेत्रात ते परिचित आहेत. विष्णुदास या नावानं त्यांनी  विपूल काव्यलेखन केलं. देवीची जवळपास सव्वाशे पदे त्यांनी लिहीली. जानेवारी 1917 ला माहुर गडाच्या पायथ्याशी त्यांनी समाधी घेतली. माहुरला इतके जण दर्शन घेण्यासाठी जातात पण विष्णुदासांच्या समाधीचं दर्शन घ्यायचं मात्र विसरतात. 
‘जय जय जगदंबे’ नावाची विष्णुदासांची आरती आहे. यातली शेवटची ओळ आहे, 

‘विष्णुदास सदा बहुकष्टी । 
देशील जरि निज कोटी। तरी मज काय उणे ।’ 

या ओळीपाशी मी अडलो. मला कळेना आताही कोटी ही रक्कम मोठी आहे मग विष्णुदासांनी 100 वर्षांपूर्वी ‘देशील जरी निज कोटी’ कसे काय लिहीले असेल. मग ते पुस्तक शोधताना कळले की ती ओळ, ‘देशील जरी निज भेटी।’ अशी आहे. 

‘लोलो लागला’ नावाची एक मोठी प्रसिद्ध आरती आमच्या परिसरात म्हटली जाते. ती कोणी लिहीली कुणास ठावूक. त्यात पहिल्याच कडव्यात ओळ आहे, 

प्रपंच हा खोटा मृगपाणी घोरे फिरतो प्राणी । 
कन्यासुतधारा धन माझे मिथ्या वदतो वाणी । 

यात कन्यासुतधारा म्हणजे काय ते मला कळेना. कन्या, सुत आणि धन हे कळले पण धारा काही कळेना. मग जेंव्हा शोध घेतला तेंव्हा लक्षात आले की हा शब्द ‘कन्या-सुत-दारा-धन’ असा आहे. धारा नसून तेथे ‘दारा’ म्हणजे पत्नी हा शब्द आहे. शिवाय हे सगळे वेगवेगळे लिहीले की त्याचा अर्थ लागतो. 

‘श्री मूळपीठ नायिके’ नावाची एक अतिशय अप्रतिम आरती विष्णुदासांनी रचली आहे. त्यात शब्दांचे केलेले प्रयोग सुंदर आहेत. ही आरती पुस्तकात सपाट लिहीली असल्यामुळे ती कशी म्हणायची तेच कळत नाही. मी जेंव्हा कवितेसारखी तीची रचना करून पाहिली तेंव्हाच तिच्यातले सौंदर्य कळाले. आता बघा, ‘जय दुर्गे नारायणी विश्व स्वामिनी सगुण रूप खाणी । जय मंगल वरदायिनी सर्व कल्याणी जय महिषासुरमर्दिनी राजनंदिनी पंकज पाणी ।’ अशा ओळी लिहील्यावर त्या कशा कळणार? पण तेच ही रचना

जय दुर्गे नारायणी, विश्व स्वामिनी, सगुण रूप खाणी
जय मंगल वरदायिनी, सर्व कल्याणी
जय महिषासूरमर्दिनी, राजनंदिनी, पंकज पाणी
हे भार्गव जननी मला पाव निर्वाणी
जय प्रसन्न मुखत्रिंबिके, जगदंबिके, प्रसन्न तू होयी ॥

अशी केल्यास आणि योग्य ठिकाणी स्वल्प विराम दिल्यास कुठे थांबायचे ते लक्षात येते. याच कवितेत शेवटच्या कडव्यात ‘मी  थोर पतित पातकी, माझी इतुकी अर्जी एैकावी’ अशी ओळ आहे. मला कळेना की जर पतित पातकी असेल तर विष्णुदास स्वत:ला ‘थोर’ कसं काय म्हणून घेवू शकतो? मग पुस्तकातून हा शब्द कळाला. तो ‘थोर’ नसून ‘घोर’ आहे. आता असला थोरपणा आम्ही करणार असू तर काय होणार?

‘आरती त्रिपुरसुंदरीची’ नावाची एक आरती देवीला म्हटली जाते. हीचाही कवी कोण माहित नाही. या आरतीत अनुप्रासाचा अतिशय चांगला वापर केला आहे. ‘येऊनी गणपती, कि सेनापती, चकित सरस्वती’ अशी ओळ असो किंवा ‘ब्रह्मानंदी, नाव आनंदी, राहे स्वच्छंदी’ किंवा ‘लागली आस, तारी भक्तास, दिसे आभास’ हे चालीत म्हणताना मोठं छान वाटते. माझ्या दुसरीतल्या मुलीनं ही आरती पाठ केली आणि मला एके दिवशी म्हणाली, ‘बाबा, हे तर आनंदी आनदं गडे सारखेच आहे!’ आधी मला कळेना हीला ‘आनंदी आनंद गडे’ या कवितेसारखं काय सापडलं. कारण चाल तर अतिशय वेगळी आहे. मग त्या कवितेत, ‘मेघ रंगले, चित्त दंगले, गान स्फुरले’ किंवा ‘ कमल विकसले, भ्रमर गुंगले, डोलत वदले’ हे जे अनुप्रास वापरले आहेत ते या आरतीशी जुळणारे होते.

विष्णुदासांच्या काही आरत्यांचा काव्यगुणासाठी विशेष विचार करावा अशा आहेत. त्यांचे एक देवीचे पद आहे, 

विपुल दयाघन गर्जे तव हृदयांबदरी श्रीरेणुके हो । 
पळभर नरमोराची करूणावाणी ही आयके हो । 

किनवटच्या प्रा.मार्तंड कुलकर्णी  यांनी विष्णुकवींवर संशोधन करून पीएच.डी. मिळवली आहे.
रा.चिं.ढेरे यांनी आपल्या ‘करवीरनिवासिनी श्रीमहालक्ष्मी’ (प्रकाशक, पद्मगंध, पुणे-अशोक शहाणे यांच्या धाकाने आजकाल प्रकाशकाचा उल्लेख सर्वजण आवर्जून करत आहेत) या पुस्तकात मुक्तेश्वरांच्या महालक्ष्मी आरतीचे उदाहरण दिले आहे. ते मोठे विलक्षण आहे. या आरतीतील तिसरे कडवे पार बदलून टाकल्या गेले. हे बदल चुकून झाले असते तर समजण्यासारखं होतं. पण जाणीवपूर्वक काही उल्लेख वगळल्या गेले.

‘तारा शक्ती अगम्य शिवभजका गौरी’ या ओळीत ‘शक्ती अगम्य’ हे अगम्य शब्द घुसले आहेत. मुळ शब्द ‘सुगतागमी’ असा आहे. शिवाय याच कडव्यात शेवटची ओळ ‘प्रकटे पद्मावती निज धर्माचारी’ यातील निज हा शब्द ‘जिन’ असा आहे. म्हणजे ‘प्रकटे पद्मावती जिनधर्माचारी’ अशी ती ओळ होते.  सुगतागमींची म्हणजेच बौद्धांची तू तारा आहेस, जिनधर्माचारी म्हणजे जैनांची तू पद्मावती आहेस, शैवांची तू गौरी आहेस, सांख्यांची तू प्रकृती आहेस, मीमांसकांसाठी तू ‘गायत्री’ आहेस अशी तू सर्वांचीच देवता आहेस.  म्हणजे वैदिक धर्मातील सहाही दर्शनं आणि अवैदिक असलेले जैन आणि बौद्ध ही दर्शनं यांचीही तू देवता आहेस असा व्यापक अर्थ मुक्तेश्वराला अभिप्रेत होता. आणि आम्ही मात्र संकुचित विचार करून ही आरतीच बदलून टाकली. हे मूळ कडवे असे आहे 

तारा सुगातागमी, शिव भजका गौरी |
सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी |
गायत्री निजबीजा निगमागम सारी |
प्रगटे पद्मावती जिनधर्माचारी || 


लहानपणापासून आरत्यांचे पठण करता करता तीच्यातील शब्दांचे अर्थ आम्ही विसरून गेलो. नुसतीच पोपटपंची करत राहिलो. मग हाती काय लागणार? गणपतीच्या आरतीतील एक कडवं विदर्भात म्हटलं जातं ते महाराष्ट्राच्या इतर भागात गाळल्या गेलं आहे. काव्यदृष्ट्याही हे अतिशय आशयघन आहे सौंदर्यपूर्ण आहे. गणपतीच्या आरतीतल हे दुसरं कडवं असं आहे,

चरणीच्या घागरीया रूणुझुणु वाजती । 
तेणे नादे देवा अंबर गर्जती । 
ता था ठुमकत ठुमकत नाचे गणपती । 
शंकर पार्वती कौतुक पाहती॥

आता इतके सौंदर्यपूर्ण कडवं आम्ही का गाळलं? जैन आणि बौद्धांचे उल्लेख आम्हाला नको वाटले त्यामागचा कट्टरपणा समजता येवू शकतो. पण हे शब्दसौंदर्य आम्ही का नाकारतो?  

     श्रीकांत अनंत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. मो. 9422878575

Tuesday, October 1, 2013

‘नॉट रिचेबल’ मुलीवर कविता लिहीणारा मुलगा

उरूस, दैनिक पुण्यनगरी मंगळवार 1 ऑक्टोबर 2013 

   लेखाचे शिर्षक कदाचित एखाद्या कवितेचे शिर्षक वाटू शकेल. स्त्री अत्याचाराबाबत सध्या जे भयावह वातावरण माध्यमांतून दाखवले जात आहे त्या पार्श्वभूमीवर चांदवडच्या सागर संजय जाधव या मुलाची कविता खरेच उठून दिसते. 
   
 नॉट रिचेबल

वासनांनी भरलेल्या 
‘डिजिटल’ कॅमेर्‍याच्या भितीने
बदलून घेतलाय तिने
स्वत:चा ‘वॉलपेपर’
अन् गुणगुणती ‘रिंगटोन’ बदलून
बसलीय ‘व्हाईब्रेट मोड’वर
तिला जायचंय
नेटवर्क नसलेल्या ठिकाणी..
‘कनेक्टेड पिपल्स’ च्या जगातून
व्हायचंय ‘नॉट रिचेबल’..
तिनं झाकून घेतलंय स्वत:ला
एका ‘क्रिस्टल कव्हर’ मध्ये,
‘स्क्रिन टच’च्या बचावापासून
अन् मनाला घातलाय 
बहुआयामी ‘पासवर्ड’
सावधानतेचा...
स्वत:वर ओढलंय
एकलेपणाचं ‘स्क्रिन सेव्हर’
ती आतल्या आत
स्वत:ला ‘डायल’ करते!
आणि ऐकत असते
‘‘इस मार्ग की सभी लाइने व्यस्त है !’’
    
    ही अप्रतिम कविता भेटण्यासाठी निम्मित्त घडले ते ‘प्रतिभा संगम’ साहित्य संमेलनाचे. याच कवितेला महाराष्ट्रातून आलेल्या सर्व कवितांमधून पहिला क्रमांक देण्यात आला. पद्मश्री ना.धो.महानोर यांच्या हस्ते या मुलाचा सत्कार झाला. 
    अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने महाविद्यालयीन युवकांसाठी 1996 पासून हे संमेलन भरविण्यात येते. या वर्षी 12 वे प्रतिभा संगम जळगावला भरविण्यात आले होते. एरवी साहित्य संमेलन म्हणजे जो साहित्य बाह्य झगमगाट दिसतो, लाल दिव्यांच्या गाडीतील हासर्‍या तूपकट चेहर्‍यांवरची माजोरडी राजकीय नजर, कार्यकर्त्यांच्या चेहर्‍यावरचे लाचारीचे ओघळ असं काहीच या संमेलनात नव्हतं. अतिशय साधेपणाने सजवलेलं व्यासपीठ, महाराष्ट्रभरातून प्रतिनिधी म्हणून नोंदणी करणारी 350 तरूण मुलं मुली, साधेपणानं तीन दिवस त्यांच्यात मिसळणारे निमंत्रीत मान्यवर  आणि या सगळ्यांची व्यवस्था आत्मियतेने पाहणारे कार्यकर्ते असं एरवी दुर्मिळ दिसणारं दृश्य या संमेलनात पहायला मिळतं.
एवढ्या मोठ्या संख्येने आलेले हे मुलं मुली तीन दिवस एकमेकांच्या हातात हात घालून मिळून मिसळून वावरत होते. सभागृहात मुलांची आणि मुलींची वेगळी बसायची व्यवस्था नव्हती. ‘गट-चर्चेत’ या तरूणांशी बोलताना त्यांनी जी मतं मोकळेपणाने मांडली ती थक्क करणारी होती. जे एक विचित्र मत समाजानं स्त्री अत्याचाराबाबत करून घेतलं त्याला पूर्ण छेद देणारी मतं मुलं मुली मोकळेपणानं मांडत होती. 
प्राजक्ता नावाची मुलगी आपलं धाडसी मत मांडताना म्हणाली, ‘‘बलात्कार करणार्‍यांचे विचार जुन्या काळाचे आहेत. माझ्या पिढीची मुलं असा विचार करत नाहीत.’’ चंद्रकांत नावाचा मुलगा आपल्या कवितेत मैत्रिणीला व्हॅलेंटाईन डेला हक्कानं घरी नेतो आणि घरच्या सामान्य स्थितीचा परिचय करून देतो. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून आणि त्यातही परत ग्रामीण भागातून आलेली ही मुलं मुली विचार करताना पाहून खरंच फार समाधान वाटत होतं.
रात्री कविसंमेलन संपलं तेंव्हा दीड वाजला होता. पण इतक्या उशीराही सर्व मुलींना इतर महिलांना त्यांच्या निवासापर्यंत तरूणांनी कार्यकर्त्यांनी सुखपरूप पोंचवले. गडचिरोलीतील देसाईगंज असो, नंदूरबार असो, महाराष्ट्राच्या मध्यबिदूंपाशी असलेलं अंबाजोगाई असो अशा महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील मुलंमुली यात सहभागी झाली होती. पाहुण्यांची व्यवस्था करणारा समीर किंवा अजिंक्य सारखा विद्यार्थी कार्यकर्ताही पुस्तकं खरेदी करून त्यावर मान्यवर साहित्यीकांची स्वाक्षरी घेत होता. अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या माजी अध्यक्षा प्रा.डॉ.उषा तांबे यांनीही प्रमाणिकपणे अशी कबुली दिली की ‘‘जितकी काळी डोकी इथं दिसतात तितकी मोठ्या संमेलनातही दिसत नाहीत.’’
शिवाय एक मुद्दा सर्वच मान्यवरांना विचारात पाडणारा होता. महानगरांतून जी मराठीची ओरड ऐकू येते तिचा मागमुसही या ग्रामीण मुला-मुलींमध्ये आढळला नाही. खान्देशची अहिरणी असो की गडचिरोलीची आदिवासींची भाषा असो त्यात कविता लिहून ही मुलं समर्थपणे आपल्या भावना व्यक्त करत होती. मुलांना वाचन संस्कृतीकडे ओढण्यासाठी ‘‘आठवड्याचे काही दिवस टिव्ही बंद ठेवला पाहिजे’’ असं मत मंचावरून मान्यवर वक्त्यांनी मांडताच बहुतांश मुलं एकमेकांकडे पहात राहिली. त्यांना परिसंवाद संपल्यावर आम्ही आवर्जून विचारलं की यावर तूमचं मत काय. मुलं आमच्याकडे ‘काहीही विचारता का..’ असल्या भावनेतून पहात म्हणाली, ‘‘सर एरवीच आमच्याकडे 12 तास लोडशेडींग आहेच की.’’ त्यांच्या उत्तरानं शहरात बसून कृत्रिम समस्या आणि त्यांची कृत्रिम उत्तरं शोधणार्‍यांची फार मोठी पंचाईत झाली. 
ग्रामीण भागात मुलामुलींची वाचनाची भुक प्रचंड आहे. त्यांच्या लेखनात नवनव्या उर्मी आढळून येतात. आपणच ते जाणून घ्यायला कमी पडतो. 
संमेलनाच्या आयोजकांनी कुठल्याच पाहूण्याचे स्वागत फुलांनी केलं नाही. सर्वांना पुस्तकेच भेट दिली. मग ते साहित्य अकादमी प्राप्त विश्वास पाटलांचे ‘झाडाझडती’ असो, नाहीतर शिरवाडकरांचे ‘नटसम्राट’ असो, नाही तर जयंत पवार यांचे ‘फिनिक्सच्या राखेतून उडाला मोर’ असो. मंचावर एकाही अगंतुक माणसाला बसायला खुर्ची ठेवलेली नव्हती. अगदी जळगावचे खासदारही पाहुण्यांचे स्वागत करण्यापुरते मंचावर आले आणि समोर रसिकांच्या सोबत बसून कार्यक्रमाचा आस्वाद घेत राहिले. सर्व निमंत्रित आणि प्रतिनिधी मुलामुलांची खाण्याची व्यवस्था एकत्रच होती. पाहुण्यांसाठी कुठलीही ‘खास’ सोय केलेली नव्हती हे विशेष. 
आजच्या तरूणांच्या मनात काय आहे हे समजून घ्यायचे असेल तर ते अशा निकोप आणि साध्या वातावरणातच शक्य आहे.अन्यथा राजकारण्यांनी नासून टाकलेल्या आणि साहित्य महामंडळाच्या लाचारीने ग्रासून टाकलेल्या संमेलनातून काय चांगलं निष्पन्न होवू शकते? 12 संमेलने आजपर्यंत आयोजित करणारे प्रा.नरेंद्र पाठक यांनी कदाचित मुलांमधील ही सांस्कृतिक भूक ओखळली आणि त्याला प्रतिसाद देत ही चळवळ उभी केली. फक्त तरूणांपुरतेच नाही पण संमेलनाचे आयोजन कसे करावे यासाठी हे प्रारूप विचार करायला लावणारे आहे. 
आता अखिल भारतीय साहित्य संमेलनाची निवडणुक चालू आहे. सासवड येथे हे संमेलन होणार आहे. त्या संयोजकांनी हा आयोजनातला साधेपणा समजून घेतला तर शासनानं दिलेल्या 50 लाखात अतिशय नेटके आणि चांगले संमेलन होवू शकते. शिवाय यासाठी कुठल्याही राजकीय नेत्याच्या पायाशी लाळ घोटायची गरज नाही. आणि असं आपण करू शकलो तरच सागर जाधव सारख्या मुलाची कविता बाहेर येवू शकेल. नसता असे कित्येक तरूण गावोगावी उपेक्षा सोसत तसेच राहतील. नुसते वाङ्मयच नाही तर एक प्रगल्भ सामाजिक दृष्ठि सामोरी येते तीही येणार नाही.

Tuesday, September 24, 2013

अनंतमुर्ती, ओवैसी पंतप्रधान झाल्यास भारत सोडाल?

उरूस, दैनिक पुण्यनगरी,  मंगळवार 24 सप्टेंबर 2013 


    ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कन्नड साहित्यीक यु.अनंतमुर्ती  म्हणाले की, ‘‘जर मोदी पंतप्रधान झाले तर मी देश सोडून जाणे पसंत करेन.’’ दहा वर्षांपूर्वीचा प्रसंग आठवून बघा. ‘‘सोनिया गांधी पंतप्रधान झाल्या तर मी मुंडन करेन’’ असे सुषमा स्वराज म्हणाल्या होत्या. त्यांच्या वक्तव्यावर टिका करण्यात सगळेच पुरोगामी आघाडीवर होते. आता यु.अनंतमुर्ती सारख्या पुरोगामी डाव्या लेखकाने असे आततायी विधान केल्यावर काय करायचे? 
मराठी पुरोगामी विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांनी तर ‘अनंतमुर्तींच्या मुखाने संविधानच बोलत आहे’ असा सविस्तर लेखच लिहीला. चला यानिमित्ताने एक बरे झाले की मराठी साहित्यीक राजकीय प्रश्नांबाबत काहीतरी भूमिका घेत आहेत. नसता बोटचेपेपणाची मराठीत मोठी परंपरा आहे. दुर्गा भागवत यांचे नुसते नाव घ्यायचे पण कृती मात्र राजकीय नेत्यांच्या पायाशी बसून लाळघोटेपणा करण्याची करायची. 
जानेवारी महिन्यात चिपळूणला अखिल भारतीय साहित्य संमेलन संपन्न झाले. उद्घाटनाच्या कार्यक्रमाला संमेलन अध्यक्ष व माजी अध्यक्ष हे दोघे वगळता एकाही साहित्यीकाचे नाव पत्रिकेत नव्हते. स्वाभाविकच पंधरा राजकीय नेत्यांच्या भव्य उपस्थितीत हे उद्घाटन सत्र पार पडले. बोटचेपी परंपरा असलेल्या मराठी साहित्यीकांना याचे काहीच वाटले नाही.  त्याच्या आधी पैठण येथे मराठवाडा साहित्य संमेलन पार पडले. बाबा भांड हे संमेलनाचे अध्यक्ष होते. संमेलनाचे उद्घाटन महान साहित्यीक, विचक्षण असे रसिक, अतिशय चोखंदळ वाचक (?) येवला नरेश माननिय नामदार छगन भूजबळ यांच्या हस्ते पार पडले. मंचावर अर्थातच राष्ट्रवादीच्या वाङ्यमप्रेमी, वाचनप्रेमी, साहित्यप्रेमी कार्यकर्त्यांनी गर्दी केली. या गर्दीतील एक कार्यकर्ता ज्येष्ठ साहित्यीक, साहित्य संस्कृति मंडळाचे माजी अध्यक्ष प्राचार्य रा.रं.बोराडे यांना असं म्हणाला, ‘‘ सर तूम्ही जरा मागच्या रांगेतील खुर्चीत बसा. एवढा उद्घाटनाचा कार्यक्रम होवू द्या, माझा भुजबळ साहेबांसोबत फोटो निघू द्या, मग आम्ही तूम्हाला पुढच्या रांगेत आणून बसवतो.’’बोराडे सर सगळंच टाळून सरळ खाली प्रेक्षकांमध्ये जावून बसले. 
आताही मराठवाडा साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी शरद पवार येणार अशा बातम्या येत चालल्या आहेत. आजपर्यंत एकाही ज्येष्ठ मराठी साहित्यीकाने, ‘‘एखाद्या ज्येष्ठ साहित्यीकाला उद्घाटक म्हणून का नाही बोलवत?’’ असा साधा प्रश्नही साहित्य परिषदेला विचारला नाही. 
मराठीतील साहित्यीकांची ही मोठीच बोंब आहे. ते राजकीय भूमिका तर घेतच नाहीत शिवाय राजकीय नेत्यांपुढे आपली नांगी टाकतात. आणिबाणीच्या विरोधात मोठे आंदोलन देशभर उभे राहिले. साहित्यीकांनीही यात आपली भूमिका बजावली. दुर्गा भागवतांसारख्या काही मराठी साहित्यीकांनी तेंव्हा कठोर निषेधाची भूमिका घेतली होती. विनय हर्डीकर सारखे साहित्यीक तर 18 महिने तुरूंगात होते. याचवेळी  रा.भा.पाटणकर यांना ‘सौंदर्यमिमांसा’ या ग्रंथासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहिर झाला. शासनाच्या निषेधार्थ हा पुरस्कार परत करा अशी मागणी दुर्गाबाईंनी केली. पाटणकरांनी आपले पुस्तक हे अराजकीय विषयावरचे आहे, साहित्य अकादमी ही संस्थासुद्धा अराजकीय आहे असं म्हणत पुरस्कार परत करायचं टाळलं.
अनंतमुर्तींनी आततायीपणाने का होईना राजकीय विषयाबाबत जाहिर भूमिका घेतली हे चांगले झाले. पण त्याचसोबत जे प्रश्न उपस्थित होतात त्याची उत्तरे मिळायला हवी. ज्या पद्धतीनं हिंदू अतिरेकीपणाला आपल्या कठोर शब्दांनी फटकारे मारणे अनंतमुर्तींना आवश्यक वाटले तसे मुस्लिम अतिरेकीपणाला फटकारावे असे का नाही वाटले? आजपर्यंत अशी कृती किंवा वक्तव्य अनंतमुर्तीं किंवा त्यांचे समर्थन करणारे मराठी कवी यशवंत मनोहर यांनी का नाही केली? भारताचा विचार केला तर आपले लेखक फार मोठ्या प्रमाणावर मध्यममार्गी अथवा डाव्या विचारांचा प्रभाव मानणारे आहेत. उजवा विचार म्हणल्या जातो अशा हिंदुत्ववादी विचारांचे समर्थन करणारे किंवा तसे लेखन करणारे फारच थोडे लेखक आहेत. मग हे अपेक्षित होते की सर्वच अतिरेकीपणाचा निषेध पुरोगामी चळवळीतील लेखकांकडून व्हायला हवा होता. पण हे असे घडताना दिसत नाही. 
आज सरसकट अशी प्रतिमा तयार झाली आहे की जो काही शहाणपणा आमचे पुरोगमी नेते, लेखक सांगतात तो फक्त हिंदूनाच. परिणामी त्यांच्या म्हणण्यातील जी खरी बाजू आणि पटणारी बाजू आहे तीही लपली जाते. आणि दिसतो तो फक्त त्यांचा एकांगी दृष्टीकोन. ज्येष्ठ पत्रकार सीमा मुस्तफा या औरंगाबादला जयदेव डोळे यांनी अनुवादित केलेल्या असगर अली इंजिनिअर यांच्या पुस्तक प्रकाशनाला आल्या होत्या. त्यांना ऐकायला जमा झाले ते जवळपास सगळे हिंदूच. आणि त्यांनी पुरोगामीत्वाचा डोस पाजला तो परत हिंदूनाच. कार्यक्रम पुरोगामी चळवळीतल्या लोकांनी आयोजित केला होता. मग पुरोगामी चळवळी ही काय फक्त हिंदूचीच मक्तेदारी आहे? तिथे पुरोगामी मुस्लिमवर्ग का नव्हता? म्हणजे असंघटित कष्टकरी असा मुस्लिम समाज इतर कष्टकरी हिंदूसारखाच निमूटपणे हाल सोसत जगतो आहे. पण मध्यमवर्गीय असा जो मुस्लिम समाज आहे त्याच्यावर पुरोगामी चळवळींच्या पाठीशी उभी राहण्याची जबाबदारी आहे ती तो निभावताना दिसत नाही. आणि हे अनंतमुर्तीसारखा लेखक कधी सांगत नाही. ‘‘ओवैसी पंतप्रधान झाले तर मी भारत सोडेन’’ असे ते म्हणतील का?  पुरोगामी विचारवंत/लेखक उठसुठ पुरोगामी मध्यमवर्गीय हिंदूनाच फटकारत बसतो. उलट या मुळे धोका हा निर्माण झाला आहे की अतिशय संतुलीत विचार करणारा मध्यमवर्गीय हिंदूही अशा वक्तव्यामुळे मोदींकडे झुकू शकतो.
अनंतमुर्ती यांच्या बोलण्याचा परिणाम झाला असता जर त्यांनी कबीरासारखी दोन्ही समाजाला फटकारण्याची भूमिका घेतली असती तर. कबीराचा दोहा आहे
उंचे सूर मे बांग दिलाये । तेरा खुदा क्या बहरा है ।चिंटी के पग नेवर बाजे । तो भी अल्ला सुनता है ॥ (चिंटी के पग नेवर-मुंगीच्या पायातील घुंगरू)
आता एवढंच लिहून थांबेल तो कबीर कसला. त्याने हिंदूंनाही फटकारले
मुंड मुडाये हरी मिले । हर कोई लेही मुंडाए ।
बार बार जो मुंडते । भेड बैकुंठ न जाए ॥

अशा पद्धतीने आमचे पुरोगामी विचारवंत लेखक बोलत नाहीत. 
हेच पुरोगामी लेखक/पत्रकार बघता बघता दिल्लीच्या पदराखाली येतात आणि त्यांची भाषाच बदलून जाते. नारायण कुलकर्णी कवठेकर यांनी लिहील्याप्रमाणे, 
त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवला
आणि माझ्या लक्षात आले की
माझ्या पाठीचा कणाच गायब झाला आहे.

मोंदीवर टिका करण्याचे बक्षिस म्हणून राजकीय पदं भेटणार असतील तर अशा लेखकांच्या वक्तव्याला तरी काय किंमत द्यायची? यु.अनंतमुर्ती साहित्य अकादमीचे अध्यक्ष होते. आजही शासनाच्या विविध समित्यांवर ते काम करतात. मग जर त्यांनी मोदींसोबतच इतरही अतिरेकीपणा करणार्‍यांवर तोंडसुख घेतलं असतं तर त्यांची प्रतिष्ठा वाढली असती.
पण दुसरा एक मुद्दा लेखक, विचारवंत, कलाकार, शास्त्रज्ञ यांच्याबाबतीत जास्त गंभीर आहे. अशी वाचाळ, उठवळ विधानं यांनी करावीतच का? हे तर सर्वसामान्य माणसे करतात. किंवा जे करतात त्यांच्याविरोधातातील उद्गार म्हणजेच साहित्य. मग स्वत: लेखकानेच असा आततायीपणा करावा का? तेंडूलकर हेही असेच मोदीला गोळी घालायला निघाले होते. हा मार्ग लेखकांचा आहे का?

श्रीकांत अनंत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. मो. 9422878575.

Wednesday, September 18, 2013

मराठवाड्याने तेलंगणात जावे का?

दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 17 सप्टेंबर 2013 
--------------------------------------------------

बरोबर एक वर्षांपूर्वी मराठवाड्यातील एका मित्राशी बोलताना मी म्हणालो, ‘‘आज 17 सप्टेंबरच्या मुहूर्तावर आपण तेलंगणात जाण्याची मागणी करायला पाहिजे. पिण्याचं पाणीही नाकारणार्‍या महाराष्ट्रात रहायचंच कशाला?’’ आमच्या सोबत असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील तिसरा मित्र आश्चर्याने म्हणाला, ‘‘वेगळं राज्य वगैरे ठिक आहे पण हे तेलंगणाचे झंझट कशाला? आपला त्यांच्याशी काय संबंध?’’ म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेला (1 मे 1960) 53 वर्षे पूर्ण झाली पण राज्यातील इतर भावांना अजून माहित नाही की मराठवाडा हा हैदराबाद राज्याचा भाग होता. मराठवाड्याची राजधानी ही हैदराबाद होती. आणि इतकंच नाही तर ज्या संपूर्ण दक्षिण भारताला ‘इडली-वडा-दोसा सांबर’ म्हणून आपण चिडवतो हे पदार्थ या हैदराबादचे नाहीत. हैदराबाद भोवतीचा जो तेलंगाणा प्रदेश आहे ज्याचे आता स्वतंत्र राज्य करण्यास केंद्र शासनाने मंजूरी दिली आहे त्यांचे जेवण हे मरावाड्याप्रमाणेच ‘ज्वारी/बाजरीची भाकरी, वांग्याची भाजी, तुरीच्या डाळीचे वरण आणि भात’ हे आहे. मराठवाड्याचे पाच जिल्हे (आता 8) कर्नाटकाचे तीन जिल्हे आणि आंध्रप्रदेशातील तेलंगाणा विभागाचे 7 जिल्हे असा हा प्रदेश होता.
हैदराबाद संस्थानावर निजामाच्या असफजाही घराण्याची राजवट होती. त्यामुळे या राजवटीला निजामी राजवट असा शब्द आहे. पण सर्रास सगळे ‘निजामशाही’ राजवट असा शब्द वापरतात. आणि परत ही निजामशाही म्हणजे शिवाजी महाराजांचे वडिल शहाजी राजे ज्यांच्या पदरी होते ती निजामशाही असेही समजतात. 
दक्षिणेत गुलबर्गा येथे हसन गंगू बहमनी याने बहमनी साम्राज्याची स्थापना केली. याच साम्राज्याची पुढे पाच शाह्यात विभागणी झाली. 1. हैदराबाद जवळील गोवळकुंडा येथील कुतूबशाही. 2.बीदर (कर्नाटक)  येथील बरीदशाही 3. विजापूर (कर्नाटक) येथील आदिलशाही 4. एलिचपुर (खान्देश) येथील इमादशाही 5. अहमदनगर (महाराष्ट्र) येथील निजामशाही.  निजामशाही, बरीदशाही, इमादशाही राजवटी बरखास्त झाल्या. फक्त आदिलशाही व कुतूबशाही मात्र  जास्त काळ टिकल्या. याच कुतूबशाही सुलतानाच्या पदरी असलेल्या निजामाच्या पूर्वजांनी राज्य बळकावले व दिल्लीच्या मोगलांचे मांडलिकत्व पत्करून आपल्या ‘असफजाही’ घराण्याची राजवट पक्की केली. निजाम या पदामुळे या राजवटीला निजामी राजवट असे संबोधले जाते. 
भारत स्वतंत्र झाला तरी हैदराबाद संस्थान निजामाच्या अधिपत्याखालीच होते. 17 सप्टेंबर 1948 ला जनरल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली लष्काराने  "पोलिस कार्रवाई" असे नाव देवून हे संस्थान स्वतंत्र भारतात विलीन केले. हा सगळा इतिहास मला त्या माझ्या पश्चिम महाराष्ट्रातील मित्राला समजावून सांगावा लागला. त्यानेही तोंडाचा आ करून काहीतरी नवेच आपण ऐकत आहोत असा भाव चेहर्‍यावर बाळगला. 
वेगळे राज्य मागितले की कुणीही गल्लीबोळातील विद्वान उठतो आणि आपला जाड भिंगाचा चष्मा सावरीत मोठ मोठी जडजंबाळ आडकेवारी फेकत ‘‘पण हे राज्य आर्थिक दृष्ट स्वयंपूर्ण होणार नाही’’ असा बीनतोड (त्याच्यापरीने) युक्तीवाद आपल्या तोंडावर फेकतो. 20 वर्षांपूर्वी शेतकरी संघटनेने छोट्या राज्यांची संकल्पना मांडताना अवाढव्य प्रशासनिक खर्चाच्या राज्यांची संकल्पना खोडून सुटसूटीत प्रशासनाची छोटी राज्ये अशी संकल्पना मांडली होती.  त्याच अनुषंगाने बळीराज्य मराठवाडा, बळीराज्य विदर्भ, बळीराज्य उत्तर महाराष्ट्र, बळीराज्य पश्चिम महाराष्ट्र, बळीराज्य कोकण अशा महसुल विभागाप्रमाणे राज्यांचे चित्र रेखाटले होते. बळीराज्य म्हणणण्याचा उद्देश हे राज्य पोशिंद्यांचे असावे असा होता. पण इथे राज्य म्हटले की लगेच किती अधिकारी लागणार, किती इमारती बांधाव्या लागणार, किती नव्या फायली तयार होणार असल्या पैशा खाणार्‍या लांबलचक गोष्टींची यादी सुरू होते.
राज्य म्हणजे स्वयंपूर्ण स्वाभिमानी सामान्य माणसांची अस्मिता असे चित्र आमच्या डोळ्यासमोर येतच नाही. सध्या धावणार्‍या 1000 लालदिव्यांची जागा उद्या 2000 लालदिव्यांच्यागाड्या घेणार हीच आमची कल्पना. "बारीपाडा" या गावाबद्दल मी मागच्या लेखात लिहीले होते त्यावर मला आलेल्या असंख्य फोनपैकी अनेकांनी विचारले की ‘‘आहो, असे स्वाभिमानी गाव खरेच आहे काय?’’ म्हणजे आम्ही समजतो की जनता म्हणजे लाचार, भिकार, लोचट अशी कणाहीन माणसांची फौज आहे. आणि हीचे कल्याण करणारा कोणीतरी वर मुंबईला, दिल्लीला बसलेला आहे.
जरा प्रशासनाच्या पातळीवर छोटी छोटी राज्ये निर्माण झाली तर त्याने माणसांचे प्रश्न सोडवायला मदतच होईल किंवा जो अडथळा असेल तो नाहीसा होईल. आता मराठवाड्याच्या प्रत्येक गावातून मुंबईला जायला गाडी कशी मिळावी हीच प्रत्येकाला चिंता असते. म्हणजे निमाजाविरूद्ध लढणारे ताठ कण्याचे स्वामी रामानंद तीर्थांचे नेतृत्व जावून मुंबई आणि दिल्लीचे गुलाम असलेल्या हरामी लोचटानंद स्वार्थांचे नेतृत्व आले आहे. 
आमच्या एका उद्योगपती मित्राला बहुजन समाज पक्षाचा एक कार्यकर्ता हप्ता मागायला यायचा. काही दिवसांनी या कार्यकर्त्याने आपल्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र पक्षच काढला आणि हप्ता मागायला पूर्वीसारखाच आला. मित्राने त्याला विचारले, ‘‘अरे इतका मोठा पक्ष तूझ्या पाठिशी असताना तू कशाला सोडलास?’’ तो म्हणाला, ‘‘साहेब त्यांना हप्ता पोचविण्यापेक्षा ते दिल्लीला ज्याला देतात त्याच्याशीच आपण सरळ टाका भिडवला.’’ 
जर मराठवाड्यासाठी मुंबई दिल्लीकडे भिक मागणार असेल, शेतकर्‍यांसाठी पॅकेज दिल्लीहूनच सुटणार असेल आणि आमची मुंबईची विधानसभा नामर्दासारखी हातात हात घेवून बसून राहणार असेल तर मराठवाड्यानं डायरेक्ट दिल्लीकडे हात पसरलेले काय वाईट आहे? नाहीतरी इतिहासात अल्पकाळ का होईना देवगिरीच्या किल्ल्यावरून अल्लाउद्दीन खिलजीने संपूर्ण देशाचे राज्य केले होतेच. मग संपूर्ण देशाचे सोडा आमच्या प्रदेशाची तरी राजवट आमच्या हाती राहू द्या. आणि तसे नसेल तर आम्हाला तेलंगणात जावू द्या. नाहीतरी सांस्कृतिक आणि व्यापाराच्या दृष्टीने आजही आमची नाळ तेलंगणाशी जुळलेली आहेच.
अस्मितेच्या पातळीवर मराठवाडा स्वतंत्र आहेच. मराठी भाषेचा उगम आमच्याकडेच झाला, मराठीतील पहिला कवी मुकूंदराज आमच्याकडेच झाला, नामदेव, जनाबाई, ज्ञानेश्वर, एकनाथ, रामदास अशी मोठी संत परंपरा आमच्याकडे आहे. उर्दू भाषेतील पहिला कवी वली दखनीही आमच्याकडचाच. आमच्या परिसरात बोलली जाणारी दखनी भाषा ही तर उर्दूच्याही आधीची. आणि तिच्यात उर्दूच्या 300 वर्षे आधी ग्रंथरचना झाली होती. मग जिच्यात आधी ग्रंथ रचना झाली ती दखनी भाषा उर्दूची बोलीभाषा म्हणून हिणवण्याचे काय कारण? या भाषेचे व्याकरणही मराठी प्रमाणे चालते. या प्रदेशातील हिंदू आणि मुसलमानांची एक अतिशय समृद्ध अशी सुफी परंपरा उर्वरीत महाराष्ट्राला आजही नीट समजू शकली नाही. कारणं काहीही असो जर तूम्ही आम्हाला समजू शकला नसाल तर आम्ही तूमच्यासोबत रहायचे कशाला?
आज एका महाराष्ट्रात असूनही नगर नाशिक मधून मराठवाड्याला हक्काचे पाणी देण्यास नकार मिळतो आहे. न्यायालयाने आदेश देवूनही हे पाणी दिले जात नाही. संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केल्यास राज्य कर्जबाजारी आहे आणि हे कर्ज वाढतच आहे. मुळात ही शासनव्यवस्थाच कालबाह्य झाली आहे.  निजामाची राजवट आमच्या पूर्वजांनी ताठकण्याने  वागून भिरकावून लावली होती. 17 सप्टेंबरच्या मुहूर्तावर व्यवस्थापन शास्त्रात जगभरात मान्य असलेल्या 28 टक्के इतक्या खर्चात काम करणारे नविन जनताभिमुख प्रशासन मागण्याची हीच वेळ आली आहे. नसता सांस्कृतिक दृष्ट्या जवळच्या असणार्‍या तेलंगाणात तरी गेले पाहिजे.      

श्रीकांत अनंत उमरीकर,
मो. 9422878575.