Tuesday, September 24, 2013

अनंतमुर्ती, ओवैसी पंतप्रधान झाल्यास भारत सोडाल?

उरूस, दैनिक पुण्यनगरी,  मंगळवार 24 सप्टेंबर 2013 


    ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कन्नड साहित्यीक यु.अनंतमुर्ती  म्हणाले की, ‘‘जर मोदी पंतप्रधान झाले तर मी देश सोडून जाणे पसंत करेन.’’ दहा वर्षांपूर्वीचा प्रसंग आठवून बघा. ‘‘सोनिया गांधी पंतप्रधान झाल्या तर मी मुंडन करेन’’ असे सुषमा स्वराज म्हणाल्या होत्या. त्यांच्या वक्तव्यावर टिका करण्यात सगळेच पुरोगामी आघाडीवर होते. आता यु.अनंतमुर्ती सारख्या पुरोगामी डाव्या लेखकाने असे आततायी विधान केल्यावर काय करायचे? 
मराठी पुरोगामी विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांनी तर ‘अनंतमुर्तींच्या मुखाने संविधानच बोलत आहे’ असा सविस्तर लेखच लिहीला. चला यानिमित्ताने एक बरे झाले की मराठी साहित्यीक राजकीय प्रश्नांबाबत काहीतरी भूमिका घेत आहेत. नसता बोटचेपेपणाची मराठीत मोठी परंपरा आहे. दुर्गा भागवत यांचे नुसते नाव घ्यायचे पण कृती मात्र राजकीय नेत्यांच्या पायाशी बसून लाळघोटेपणा करण्याची करायची. 
जानेवारी महिन्यात चिपळूणला अखिल भारतीय साहित्य संमेलन संपन्न झाले. उद्घाटनाच्या कार्यक्रमाला संमेलन अध्यक्ष व माजी अध्यक्ष हे दोघे वगळता एकाही साहित्यीकाचे नाव पत्रिकेत नव्हते. स्वाभाविकच पंधरा राजकीय नेत्यांच्या भव्य उपस्थितीत हे उद्घाटन सत्र पार पडले. बोटचेपी परंपरा असलेल्या मराठी साहित्यीकांना याचे काहीच वाटले नाही.  त्याच्या आधी पैठण येथे मराठवाडा साहित्य संमेलन पार पडले. बाबा भांड हे संमेलनाचे अध्यक्ष होते. संमेलनाचे उद्घाटन महान साहित्यीक, विचक्षण असे रसिक, अतिशय चोखंदळ वाचक (?) येवला नरेश माननिय नामदार छगन भूजबळ यांच्या हस्ते पार पडले. मंचावर अर्थातच राष्ट्रवादीच्या वाङ्यमप्रेमी, वाचनप्रेमी, साहित्यप्रेमी कार्यकर्त्यांनी गर्दी केली. या गर्दीतील एक कार्यकर्ता ज्येष्ठ साहित्यीक, साहित्य संस्कृति मंडळाचे माजी अध्यक्ष प्राचार्य रा.रं.बोराडे यांना असं म्हणाला, ‘‘ सर तूम्ही जरा मागच्या रांगेतील खुर्चीत बसा. एवढा उद्घाटनाचा कार्यक्रम होवू द्या, माझा भुजबळ साहेबांसोबत फोटो निघू द्या, मग आम्ही तूम्हाला पुढच्या रांगेत आणून बसवतो.’’बोराडे सर सगळंच टाळून सरळ खाली प्रेक्षकांमध्ये जावून बसले. 
आताही मराठवाडा साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी शरद पवार येणार अशा बातम्या येत चालल्या आहेत. आजपर्यंत एकाही ज्येष्ठ मराठी साहित्यीकाने, ‘‘एखाद्या ज्येष्ठ साहित्यीकाला उद्घाटक म्हणून का नाही बोलवत?’’ असा साधा प्रश्नही साहित्य परिषदेला विचारला नाही. 
मराठीतील साहित्यीकांची ही मोठीच बोंब आहे. ते राजकीय भूमिका तर घेतच नाहीत शिवाय राजकीय नेत्यांपुढे आपली नांगी टाकतात. आणिबाणीच्या विरोधात मोठे आंदोलन देशभर उभे राहिले. साहित्यीकांनीही यात आपली भूमिका बजावली. दुर्गा भागवतांसारख्या काही मराठी साहित्यीकांनी तेंव्हा कठोर निषेधाची भूमिका घेतली होती. विनय हर्डीकर सारखे साहित्यीक तर 18 महिने तुरूंगात होते. याचवेळी  रा.भा.पाटणकर यांना ‘सौंदर्यमिमांसा’ या ग्रंथासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहिर झाला. शासनाच्या निषेधार्थ हा पुरस्कार परत करा अशी मागणी दुर्गाबाईंनी केली. पाटणकरांनी आपले पुस्तक हे अराजकीय विषयावरचे आहे, साहित्य अकादमी ही संस्थासुद्धा अराजकीय आहे असं म्हणत पुरस्कार परत करायचं टाळलं.
अनंतमुर्तींनी आततायीपणाने का होईना राजकीय विषयाबाबत जाहिर भूमिका घेतली हे चांगले झाले. पण त्याचसोबत जे प्रश्न उपस्थित होतात त्याची उत्तरे मिळायला हवी. ज्या पद्धतीनं हिंदू अतिरेकीपणाला आपल्या कठोर शब्दांनी फटकारे मारणे अनंतमुर्तींना आवश्यक वाटले तसे मुस्लिम अतिरेकीपणाला फटकारावे असे का नाही वाटले? आजपर्यंत अशी कृती किंवा वक्तव्य अनंतमुर्तीं किंवा त्यांचे समर्थन करणारे मराठी कवी यशवंत मनोहर यांनी का नाही केली? भारताचा विचार केला तर आपले लेखक फार मोठ्या प्रमाणावर मध्यममार्गी अथवा डाव्या विचारांचा प्रभाव मानणारे आहेत. उजवा विचार म्हणल्या जातो अशा हिंदुत्ववादी विचारांचे समर्थन करणारे किंवा तसे लेखन करणारे फारच थोडे लेखक आहेत. मग हे अपेक्षित होते की सर्वच अतिरेकीपणाचा निषेध पुरोगामी चळवळीतील लेखकांकडून व्हायला हवा होता. पण हे असे घडताना दिसत नाही. 
आज सरसकट अशी प्रतिमा तयार झाली आहे की जो काही शहाणपणा आमचे पुरोगमी नेते, लेखक सांगतात तो फक्त हिंदूनाच. परिणामी त्यांच्या म्हणण्यातील जी खरी बाजू आणि पटणारी बाजू आहे तीही लपली जाते. आणि दिसतो तो फक्त त्यांचा एकांगी दृष्टीकोन. ज्येष्ठ पत्रकार सीमा मुस्तफा या औरंगाबादला जयदेव डोळे यांनी अनुवादित केलेल्या असगर अली इंजिनिअर यांच्या पुस्तक प्रकाशनाला आल्या होत्या. त्यांना ऐकायला जमा झाले ते जवळपास सगळे हिंदूच. आणि त्यांनी पुरोगामीत्वाचा डोस पाजला तो परत हिंदूनाच. कार्यक्रम पुरोगामी चळवळीतल्या लोकांनी आयोजित केला होता. मग पुरोगामी चळवळी ही काय फक्त हिंदूचीच मक्तेदारी आहे? तिथे पुरोगामी मुस्लिमवर्ग का नव्हता? म्हणजे असंघटित कष्टकरी असा मुस्लिम समाज इतर कष्टकरी हिंदूसारखाच निमूटपणे हाल सोसत जगतो आहे. पण मध्यमवर्गीय असा जो मुस्लिम समाज आहे त्याच्यावर पुरोगामी चळवळींच्या पाठीशी उभी राहण्याची जबाबदारी आहे ती तो निभावताना दिसत नाही. आणि हे अनंतमुर्तीसारखा लेखक कधी सांगत नाही. ‘‘ओवैसी पंतप्रधान झाले तर मी भारत सोडेन’’ असे ते म्हणतील का?  पुरोगामी विचारवंत/लेखक उठसुठ पुरोगामी मध्यमवर्गीय हिंदूनाच फटकारत बसतो. उलट या मुळे धोका हा निर्माण झाला आहे की अतिशय संतुलीत विचार करणारा मध्यमवर्गीय हिंदूही अशा वक्तव्यामुळे मोदींकडे झुकू शकतो.
अनंतमुर्ती यांच्या बोलण्याचा परिणाम झाला असता जर त्यांनी कबीरासारखी दोन्ही समाजाला फटकारण्याची भूमिका घेतली असती तर. कबीराचा दोहा आहे
उंचे सूर मे बांग दिलाये । तेरा खुदा क्या बहरा है ।चिंटी के पग नेवर बाजे । तो भी अल्ला सुनता है ॥ (चिंटी के पग नेवर-मुंगीच्या पायातील घुंगरू)
आता एवढंच लिहून थांबेल तो कबीर कसला. त्याने हिंदूंनाही फटकारले
मुंड मुडाये हरी मिले । हर कोई लेही मुंडाए ।
बार बार जो मुंडते । भेड बैकुंठ न जाए ॥

अशा पद्धतीने आमचे पुरोगामी विचारवंत लेखक बोलत नाहीत. 
हेच पुरोगामी लेखक/पत्रकार बघता बघता दिल्लीच्या पदराखाली येतात आणि त्यांची भाषाच बदलून जाते. नारायण कुलकर्णी कवठेकर यांनी लिहील्याप्रमाणे, 
त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवला
आणि माझ्या लक्षात आले की
माझ्या पाठीचा कणाच गायब झाला आहे.

मोंदीवर टिका करण्याचे बक्षिस म्हणून राजकीय पदं भेटणार असतील तर अशा लेखकांच्या वक्तव्याला तरी काय किंमत द्यायची? यु.अनंतमुर्ती साहित्य अकादमीचे अध्यक्ष होते. आजही शासनाच्या विविध समित्यांवर ते काम करतात. मग जर त्यांनी मोदींसोबतच इतरही अतिरेकीपणा करणार्‍यांवर तोंडसुख घेतलं असतं तर त्यांची प्रतिष्ठा वाढली असती.
पण दुसरा एक मुद्दा लेखक, विचारवंत, कलाकार, शास्त्रज्ञ यांच्याबाबतीत जास्त गंभीर आहे. अशी वाचाळ, उठवळ विधानं यांनी करावीतच का? हे तर सर्वसामान्य माणसे करतात. किंवा जे करतात त्यांच्याविरोधातातील उद्गार म्हणजेच साहित्य. मग स्वत: लेखकानेच असा आततायीपणा करावा का? तेंडूलकर हेही असेच मोदीला गोळी घालायला निघाले होते. हा मार्ग लेखकांचा आहे का?

श्रीकांत अनंत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. मो. 9422878575.

No comments:

Post a Comment