Tuesday, October 15, 2013

म.पैंगबर आणि जात्यावरच्या ओव्या

उरूस, दैनिक पुण्यनगरी मंगळवार 15 ऑक्टोबर 2013 


मराठी भाषेतील जात्यावरच्या ओव्या हा एक अमुल्य असा ठेवा आहे. आपल्या एका कवितेत इंद्रजित भालेराव यांनी वाईट वागणार्‍या अनैतिक चारित्र्यहीन पुरूषांवर टिका करत करत असं लिहीलं आहे
...अशा पुरूषांपासूनच इतिहासात 
कवितेला कायम भिती होती
म्हणून सातशे वर्षे
कविता फक्त जात्याभोवतीच जिती होती
 
या जात्यावरच्या ओव्यांचा मराठवाड्यात अतिशय सविस्तर व चिकित्सक अभ्यास डॉ. ना.गो.नांदापुरकर यांनी केला. मराठी स्त्री रचित रामकथा हे त्यांनी शोधलेलं प्रकरण तर केवळ अफलातून. जात्यांवरच्या ओव्यातून संपूर्ण रामायण नांदापुरकरांनी उभं केलं आहे. जगाच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडले की एखाद्या महाकाव्याची प्रमाण संहितेसोबत संपूर्ण समांतर अशी लोकसाहित्यात रचना सापडणे.
परभणी आणि परिसरात हिंडताना नांदापुरकरांना इस्लाम संबंधातील काही ओव्या सापडल्या. खरं तर या प्रदेशातील सर्वच लोक हे कष्टकरी/शेतकरी असल्याने त्यांच्या रोजच्या जगण्यात शेतीचे संदर्भ येणारच. स्वाभाविकच कला-साहित्य-संगीत यातही हे शेतीचे संदर्भ सापडणारच. शिवाय अगदी आत्ता आत्तापर्यंत (आणि लोड शेडिंगमुळे आताही) स्त्रीयांना रोज सकाळी जात्यावरती दळण दळावं लागायचं. मग ही कष्टकरी बाई आपल्या रोजच्या जगण्यालाच गाण्यातून सूर द्यायची. कलेसाठी कला की जीवनासाठी कला हा वाद घालणार्‍यांनी जात्यावरची ही ओवी लक्षात ठेवावी. जात्याला उद्देशून ही कष्टकरी बाई म्हणते आहे
दाण्याच्या जोडीनं जीण्याचा रगडा ।
गाण्याच्या ओढीनं तूला ओढीते दगडा ॥

इतक्या कलात्मक पातळीवर आपल्या रोजच्या जगण्याचे कष्ट आणि त्यातून कलेचा मिळणारा आनंद ती मांडते. इस्लाम या प्रदेशात आला तो सुफी तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून. या सुफी तत्त्वज्ञानानं स्थानिक चाली परंपरा यांचे बोट सोडले नाही. परिणामी पूर्वीच्या हैदराबाद राज्यात जी भाषा बोलली जाते ती दखनी या नावाने प्रसिद्ध आहे. ही उर्दूची बोलीभाषा असल्याचा गैरसमज काही विद्वान पसरवतात. पण ही भाषा उर्दूपेक्षाही जूनी असून या भाषेत उर्दूच्याही आधी ग्रंथरचनाही झाली आहे.
ही मुसलमान स्त्री आपल्या घरी जात्यावर दळण दळताना इतर हिंदू स्त्रीयांसारखीच ओव्या गाते आहे. आणि मग स्वाभाविकच ती आपल्या देवाचे गुणगान गात आहे.
देवा मंदी देव । पैगंबर हाय खरा ।
गावाच्या शेजारी । देलाय यानं डेरा ॥
 
बरं नुसताच डेरा दिलाय म्हणजे मशीद उभी आहे असं नाही. इस्लाम मधील जे सण आहेत त्यांचेही वर्णन ती आपल्या ओव्यात करते आहे. रमझानच्या महिन्यातील रोज्याचा उपवास ही स्त्री पाळते आहे. श्रावणाचे महत्त्व जसे हिंदू स्त्रीला आहे तसेच हीला रमझानचे आहे. आणि हे महत्त्व इतके की युद्धाची वेळ आली तरी ते सर्व बाजूला ठेवून माझा देव रोज्याचा उपवास सोडतो आहे.
बारा हजार घोडा । येशी येऊन थोपला ।
रोजा सोडाया गुंतला । पैगंबर देव माझा ॥

पैगंबराचे गुणगान गाताना ही स्त्री आपल्या सोबतच्या इतर स्त्रीयांचे देव विसरत नाही. ही परंपरा हिंदू स्त्रीयांकडून तीनं उचलली आहे. त्यामुळे ती त्यांच्याही देवाला आपल्या ओव्यात गुंफण्याला मोकळ्या मनाने तयार होते. धर्मनिरपेक्षतेच्या पोकळ गप्पा मारणार्‍या विद्वानांनी या अडाणी स्त्रीयांचे हे अक्षरधन मनलावून वाचावे. आणि यातून इच्छा असेल तर काही बोध घ्यावा.
पहिली माझी ववी । मरोती शिलेदार ।
दर्ग्यामंदी जिम्मेदार । पैगंबर देव माझा ॥
 
तीला सर्व देव सारखेच आहे. यांना मिरवत न्यायचे तर कसे
मरोतीला पालखी । ब्रह्मनाथाला मेना ।
शिंगो ठान्यावरीली आता । पैगंबर देवाला ॥
 
ज्याप्रमाणे ही मुसलमान बाई पैगंबराला कंदूरी करते त्याच प्रमाणे ती मारोतीलाही शेरनी वाटते
पैगंबर देवाला । कदूंरी बकर्‍याची ।
मरोती देवाला । शेरनी वाटीते साखराची ॥
नवस बोलले । देवा सकलादिला कांही ।
गाड्यावरी गलफ । हौशा हारी चाल पायी ॥

मुसलमान पीराला केलेला नवस फेडण्यासाठी  या हिंदू स्त्रीचा लेक हौशा हरि गाड्यावर ‘गलफ’ घेऊन स्वत: पायी चालत जात आहे.
या जात्यावरच ओव्या हा एक मोठा पुरवा तर आहेच पण भारतीय सहिष्णु मानसितेबद्दल एक फार चांगलं निरीक्षण पुरव्यासह फिरोज रानडे यांनी नोंदवलं आहे. ते म्हणतात, ‘ इस्लाम जर भारतात सिंधऐवजी दक्षिणेतल्या केरळातून प्रसार पावला असता तर अतिशय वेगळं चित्र समोर आलं असतं’ (इमारत, मौज प्रकाशन, मुंबई.)  त्यासाठी त्यांनी एक मोठं विलक्षण उदाहरण दिलं आहे. भारतातील पहिली मशिद सन 627 मध्ये केरळात बांधली गेली. ही मशिद अगदी पैगंबरांच्या हयातीतच उभारल्या गेली. कोचिनला आलेल्या अरब व्यापारांकडून राजा चेरामन याला इस्लाम धर्माबद्दल माहिती कळाली. त्याला खुप उत्सूकता वाटली. त्यानं त्या आरबी व्यापारांबरोबर प्रवास करून मदिना गाठलं. प्रत्यक्ष पैगंबरांची भेट घेवून इस्लामचा स्वीकार केला. पैगंबरांच्या घराण्यातील रझिया बिबी या स्त्रीशी विवाह केला. भारतात परत येताना त्यांने सोबत शकुनाचे अठरा दगड आणले. प्रवासातच राजा चेरामन याचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्याची पत्नी रझिया, मुल्ला इब्न दिनार व इतर सहकार्‍यांनी भारतात परतल्यावर दर शुक्रवारी नमाज पढायला सुरवात केली. स्थानिक लोकांच्या मदतीने त्यांनी भारतातील पहिली मजीद बांधली. तीच ही चेरामन जामा मशीद. 
या मशीदीला मिनार, कमानी, घुमट असं काहीच नाही. कारण ही शैली नंतर बांधकामांत वापरल्या गेली. जेंव्हा प्रार्थनास्थळ बांधायचं ठरलं तेंव्हा तिथल्या लोकांनी स्थानिक इमारतींप्रमाणे बांधकाम केलं. शिवाय मंदिराप्रमाणे ब्रांझचा एक मोठा दिवा यात टांगला. नमाज पढणार्‍याचं तोंड पश्चिमेला असावं असा संकेत आहे. पण चेरामन मशिदीत नमाजीचे तोंड पूर्वेकडे असते.
फिरोज रानडे यांनी आपल्या "इमारत" याच पुस्तकात अजून एक मजेशीर निरीक्षण नोंदवलं आहे. चिपळूणला परशुरामाचं जे मंदिर आहे त्याची शैली ही पूर्णत: इस्लामी आहे. प्रवेशद्वाराची कमान तिच्यावरील दोन छोटे मीनार इस्लामी पद्धतीचे, मंदिराचा घुमट आणि कळस युरोपीय पद्धतीचा. मंदिराची एकूण रचना मशिदीसारखी वाटणारी. रानडे यांनी हे कोडं एका वृद्धाला विचारलं. त्यानं उत्तर दिलं, ‘‘हे मंदिर मशिदीसारखं वाटणारच. कारण हे बांधलंय जंजिर्‍याच्या हबशी सिद्धीने.’’
आमचे राज्यकर्ते तेंव्हा स्थानिक लोकांच्या भावभावना रिती परंपरा जपण्यासाठी प्रयत्न करायचे त्याची चेरामन मशिद व चिपळूणचे परशुराम मंदिर जिवंत उदाहरणं. सामान्य लोकांनी आपल्या काळजात काय जपलंय त्याचं जात्यावरच्या ओव्या हे तिसरं जिवंत उदाहरण. उद्याच्या बकरी इदीच्या निमित्तानं इतकं जरी आपण लक्षात ठेवलं तरी खुप आहे.    
  


     श्रीकांत अनंत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. मो. 9422878575.

7 comments:

  1. लेख अप्रतिम आहे अभ्यास पण चांगला केला आहे

    माहिती साठी धन्यवाद

    ReplyDelete
  2. श्रीकांत आपल्या वाचनाला, बहुश्रुततेला आणि विश्लेषक बुध्दीला सलाम... खूप चांगला लेख...! -प्रदीप.

    ReplyDelete
  3. छानच वाटलं वाचून.

    ReplyDelete
  4. नवस बोलले देवा सकलादिला काही
    जालाना जिल्ह्यात सकालादि बाबाचा दर्गा आहे .पर्ह्यडा येथे . तिथे हिंदू मुसलमान दोन्ही समाज येतात ..त्यावरून आशी ओवी आली असावी .. या अशा ओव्या हिंदू बायानीच गायलेल्या असाव्यात .अर्थात हिंदूंचा प्रभाव असणारी मुस्लीम कुटुंब सगळे हिंदू सन साजरे करतात .काही गावेच्या गावे अशी आहेत जेथे मुस्लीम केवळ नावाने ओळखरता येतात .हिंदू घरामध्ये काम काणारी मुस्लीम बाई जेव्हा दळते तेव्हा ती अशा ओव्या गाते ..काहीही असो .इटीग्रेटेद अप्रोच ...आशा कामाच पुस्तक केल्यास चालेल
    लेख उत्तमच आहे

    ReplyDelete