माझ्या घराण्याची कुलदैवता तुळजापुरची भवानी आहे. त्यामुळे दर वर्षी अश्विन शुद्ध प्रतिपदेला घरी घटस्थापना होते. व नवरात्रात द्वितीयेपासून ते अष्टमीपर्यंत रोज संध्याकाळी आरत्या म्हटल्या जातात. एरवी अंधार पडेपर्यंत घराबाहेर उंडारणारी आम्ही मुलं नवरात्रात आरत्यांच्या आकर्षणानं लवकर घरी परतायचो. सध्याचे जे सार्वजनिक देवीचे प्रस्थ आहे ते तेंव्हा नव्हते. घरोघरी पारंपरिक चालीवर आरत्या म्हटल्या जायच्या. आमच्या घरात चुलत भाऊ, आत्ते भाऊ, वडिल अशी मोठी माणसं खड्या आवाजात आरत्या म्हणायचे, आम्ही पोरं त्यांच्या मागोमाग सुर मिसळायसाठी धडपडायचो. बायकांचे किनरे आवाज पुरूषांच्या पहाडी आवाजात अलगद मिसळायचे. आरत्या म्हणताना बहुतेकांच्या हातात पुस्तकं नसायची. एखाद्याकडे आरतीची जूनी, पानं पिवळी पडलेली हस्तलिखित वही असायची. ‘माहूरच्या देवीच्या आरत्या’ असं लिहीलेलं लाल, पिवळा, निळा अशा रंगाचे मुखपृष्ठ असलेले एकच पुस्तक होतं. तेही जीर्ण झालेलं.
देवीच्या या आरत्या म्हणताना काही शब्द आम्हा पोरांना अडायचे पण विचाराची हिंमत नसायची. मोठं झाल्यावर मग हे शब्द कानाला खुपायला लागले. वयाच्या पंचविसाव्या वर्षी मी अस्वस्थ होवून या आरत्यांचा शोध घ्यायची मोहिमच हाती घेतली. ‘विष्णूदासाची कविता’ नावाचे एक पुस्तक गल्लीत आईच्या मावशीकडे मुळावेकरांकडे सापडले. आरतीचे पुस्तक आणि ते कवितेसारखे छापलेले पाहून मला फारच आनंद झाला. नसता आरत्यांची पुस्तके ही गद्यासारखीच सपाट छापलेली असतात. म्हणजेच ओळींसमोर ओळी अशी. खरं तर कवितेची रचना ओळींखाली ओळी अशी असायला पाहिजे. ‘विष्णुदासांची कविता’ या पुस्तकात मुळ रचना पहाताना मला आम्ही म्हणताना मला खटकणारे शब्द सापडायला लागले.
देवीच्या आरत्या ज्या म्हटल्या जातात त्यात बहुतांश रचना ह्या विष्णुदासांच्याच आहेत. नगर जिल्ह्यातील संगमनेर येथील कृष्णरावजी धांदरफळे म्हणजेच विणष्णुदास. त्यांचा जन्म 1844 मधला. स्वामी पुरूषोत्तमानंद सरस्वती या नावाने अध्यात्मिक क्षेत्रात ते परिचित आहेत. विष्णुदास या नावानं त्यांनी विपूल काव्यलेखन केलं. देवीची जवळपास सव्वाशे पदे त्यांनी लिहीली. जानेवारी 1917 ला माहुर गडाच्या पायथ्याशी त्यांनी समाधी घेतली. माहुरला इतके जण दर्शन घेण्यासाठी जातात पण विष्णुदासांच्या समाधीचं दर्शन घ्यायचं मात्र विसरतात.
‘जय जय जगदंबे’ नावाची विष्णुदासांची आरती आहे. यातली शेवटची ओळ आहे,
‘विष्णुदास सदा बहुकष्टी ।
देशील जरि निज कोटी। तरी मज काय उणे ।’
या ओळीपाशी मी अडलो. मला कळेना आताही कोटी ही रक्कम मोठी आहे मग विष्णुदासांनी 100 वर्षांपूर्वी ‘देशील जरी निज कोटी’ कसे काय लिहीले असेल. मग ते पुस्तक शोधताना कळले की ती ओळ, ‘देशील जरी निज भेटी।’ अशी आहे.
‘लोलो लागला’ नावाची एक मोठी प्रसिद्ध आरती आमच्या परिसरात म्हटली जाते. ती कोणी लिहीली कुणास ठावूक. त्यात पहिल्याच कडव्यात ओळ आहे,
प्रपंच हा खोटा मृगपाणी घोरे फिरतो प्राणी ।
कन्यासुतधारा धन माझे मिथ्या वदतो वाणी ।
यात कन्यासुतधारा म्हणजे काय ते मला कळेना. कन्या, सुत आणि धन हे कळले पण धारा काही कळेना. मग जेंव्हा शोध घेतला तेंव्हा लक्षात आले की हा शब्द ‘कन्या-सुत-दारा-धन’ असा आहे. धारा नसून तेथे ‘दारा’ म्हणजे पत्नी हा शब्द आहे. शिवाय हे सगळे वेगवेगळे लिहीले की त्याचा अर्थ लागतो.
‘श्री मूळपीठ नायिके’ नावाची एक अतिशय अप्रतिम आरती विष्णुदासांनी रचली आहे. त्यात शब्दांचे केलेले प्रयोग सुंदर आहेत. ही आरती पुस्तकात सपाट लिहीली असल्यामुळे ती कशी म्हणायची तेच कळत नाही. मी जेंव्हा कवितेसारखी तीची रचना करून पाहिली तेंव्हाच तिच्यातले सौंदर्य कळाले. आता बघा, ‘जय दुर्गे नारायणी विश्व स्वामिनी सगुण रूप खाणी । जय मंगल वरदायिनी सर्व कल्याणी जय महिषासुरमर्दिनी राजनंदिनी पंकज पाणी ।’ अशा ओळी लिहील्यावर त्या कशा कळणार? पण तेच ही रचना
जय दुर्गे नारायणी, विश्व स्वामिनी, सगुण रूप खाणी
जय मंगल वरदायिनी, सर्व कल्याणी
जय महिषासूरमर्दिनी, राजनंदिनी, पंकज पाणी
हे भार्गव जननी मला पाव निर्वाणी
जय प्रसन्न मुखत्रिंबिके, जगदंबिके, प्रसन्न तू होयी ॥
अशी केल्यास आणि योग्य ठिकाणी स्वल्प विराम दिल्यास कुठे थांबायचे ते लक्षात येते. याच कवितेत शेवटच्या कडव्यात ‘मी थोर पतित पातकी, माझी इतुकी अर्जी एैकावी’ अशी ओळ आहे. मला कळेना की जर पतित पातकी असेल तर विष्णुदास स्वत:ला ‘थोर’ कसं काय म्हणून घेवू शकतो? मग पुस्तकातून हा शब्द कळाला. तो ‘थोर’ नसून ‘घोर’ आहे. आता असला थोरपणा आम्ही करणार असू तर काय होणार?
‘आरती त्रिपुरसुंदरीची’ नावाची एक आरती देवीला म्हटली जाते. हीचाही कवी कोण माहित नाही. या आरतीत अनुप्रासाचा अतिशय चांगला वापर केला आहे. ‘येऊनी गणपती, कि सेनापती, चकित सरस्वती’ अशी ओळ असो किंवा ‘ब्रह्मानंदी, नाव आनंदी, राहे स्वच्छंदी’ किंवा ‘लागली आस, तारी भक्तास, दिसे आभास’ हे चालीत म्हणताना मोठं छान वाटते. माझ्या दुसरीतल्या मुलीनं ही आरती पाठ केली आणि मला एके दिवशी म्हणाली, ‘बाबा, हे तर आनंदी आनदं गडे सारखेच आहे!’ आधी मला कळेना हीला ‘आनंदी आनंद गडे’ या कवितेसारखं काय सापडलं. कारण चाल तर अतिशय वेगळी आहे. मग त्या कवितेत, ‘मेघ रंगले, चित्त दंगले, गान स्फुरले’ किंवा ‘ कमल विकसले, भ्रमर गुंगले, डोलत वदले’ हे जे अनुप्रास वापरले आहेत ते या आरतीशी जुळणारे होते.
विष्णुदासांच्या काही आरत्यांचा काव्यगुणासाठी विशेष विचार करावा अशा आहेत. त्यांचे एक देवीचे पद आहे,
विपुल दयाघन गर्जे तव हृदयांबदरी श्रीरेणुके हो ।
पळभर नरमोराची करूणावाणी ही आयके हो ।
किनवटच्या प्रा.मार्तंड कुलकर्णी यांनी विष्णुकवींवर संशोधन करून पीएच.डी. मिळवली आहे.
रा.चिं.ढेरे यांनी आपल्या ‘करवीरनिवासिनी श्रीमहालक्ष्मी’ (प्रकाशक, पद्मगंध, पुणे-अशोक शहाणे यांच्या धाकाने आजकाल प्रकाशकाचा उल्लेख सर्वजण आवर्जून करत आहेत) या पुस्तकात मुक्तेश्वरांच्या महालक्ष्मी आरतीचे उदाहरण दिले आहे. ते मोठे विलक्षण आहे. या आरतीतील तिसरे कडवे पार बदलून टाकल्या गेले. हे बदल चुकून झाले असते तर समजण्यासारखं होतं. पण जाणीवपूर्वक काही उल्लेख वगळल्या गेले.
‘तारा शक्ती अगम्य शिवभजका गौरी’ या ओळीत ‘शक्ती अगम्य’ हे अगम्य शब्द घुसले आहेत. मुळ शब्द ‘सुगतागमी’ असा आहे. शिवाय याच कडव्यात शेवटची ओळ ‘प्रकटे पद्मावती निज धर्माचारी’ यातील निज हा शब्द ‘जिन’ असा आहे. म्हणजे ‘प्रकटे पद्मावती जिनधर्माचारी’ अशी ती ओळ होते. सुगतागमींची म्हणजेच बौद्धांची तू तारा आहेस, जिनधर्माचारी म्हणजे जैनांची तू पद्मावती आहेस, शैवांची तू गौरी आहेस, सांख्यांची तू प्रकृती आहेस, मीमांसकांसाठी तू ‘गायत्री’ आहेस अशी तू सर्वांचीच देवता आहेस. म्हणजे वैदिक धर्मातील सहाही दर्शनं आणि अवैदिक असलेले जैन आणि बौद्ध ही दर्शनं यांचीही तू देवता आहेस असा व्यापक अर्थ मुक्तेश्वराला अभिप्रेत होता. आणि आम्ही मात्र संकुचित विचार करून ही आरतीच बदलून टाकली. हे मूळ कडवे असे आहे
तारा सुगातागमी, शिव भजका गौरी |
सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी |
गायत्री निजबीजा निगमागम सारी |
प्रगटे पद्मावती जिनधर्माचारी ||
सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी |
गायत्री निजबीजा निगमागम सारी |
प्रगटे पद्मावती जिनधर्माचारी ||
लहानपणापासून आरत्यांचे पठण करता करता तीच्यातील शब्दांचे अर्थ आम्ही विसरून गेलो. नुसतीच पोपटपंची करत राहिलो. मग हाती काय लागणार? गणपतीच्या आरतीतील एक कडवं विदर्भात म्हटलं जातं ते महाराष्ट्राच्या इतर भागात गाळल्या गेलं आहे. काव्यदृष्ट्याही हे अतिशय आशयघन आहे सौंदर्यपूर्ण आहे. गणपतीच्या आरतीतल हे दुसरं कडवं असं आहे,
चरणीच्या घागरीया रूणुझुणु वाजती ।
तेणे नादे देवा अंबर गर्जती ।
ता था ठुमकत ठुमकत नाचे गणपती ।
शंकर पार्वती कौतुक पाहती॥
आता इतके सौंदर्यपूर्ण कडवं आम्ही का गाळलं? जैन आणि बौद्धांचे उल्लेख आम्हाला नको वाटले त्यामागचा कट्टरपणा समजता येवू शकतो. पण हे शब्दसौंदर्य आम्ही का नाकारतो?
श्रीकांत अनंत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. मो. 9422878575
आम्ही खरोखर भाग्यवान आहोत! वरील सर्व आरत्या अगदी व्यवस्थीत म्हणायला आईने शिकविले एवढेच नाही तर फक्त आरतीचाच नाही तर प्रत्येक सणाच्या मागील आणि नैवद्यामागील विज्ञान बघण्याची दृष्टी दिली. प्रार्थनेने किंवा आरत्या म्हणुन देव प्रसन्न होणार नसून मन प्रसन्न होणार आहे हा केवढा मोठा दृष्टांत बाळबोध मनाला दिला. मला चांगले आठवते आईने सांगितलेल्या भक्त धृवाच्या गोष्टीनंतर मी पण तपश्चर्या करणार असे जाहीर केले आणि बॅग भरुन निघाले सुध्द्दा होते तेव्हा तिने काय शब्दांत माझी समजुत काढली ते नाही आठवत पण आपल्या संस्कृतीचा डोळसपणा देण्याचे कार्य मात्र तिने लिलया साधले.
ReplyDeleteधन्यवाद श्री दादा. तु काढलेल्या आरतीचे पुस्तक अजुनही माझ्या जवळ आहे.
नमस्कार मी मंगेश मुकुंद कुडे राहणार अमरावती महाराष्ट्र आमच्या अमरावती मध्ये श्री अंबादेवी व श्री एकविरा देवी या दोन्ही देवीचे मंदिर आहे हे मंदिर पुरातन काळातील असून येथील देवी स्वयंभू आहेत देवी च्या मंदिरात नियमित आरती होते नियमित आरती ची वेळ सायंकाळी ७:३० ते८:०० आणि दुसऱ्या देवी मध्ये ८:०० ते ८:३० अशी असते पण दर मंगळवारी देवी ला शृंगार असतो भाविकांची गर्दी सुद्धा मंगळवारी असते आणि मंगळवारी देवीची महा आरती होत असते मंगळवारी देवी च्या आरती ची वेळ रात्री १०:०० ते११:०० आणि ११:०० ते१२:०० अशी असते या दिवशी सुद्धा भरपूर भाविक येथे आरती साठी येतात तसेच येथे आमचं श्री अंबादेवी व श्री एकविरा देवी आरती मंडळ सुद्धा आहे आमच्या आरती मंडळामध्ये जवळपास ३०० ते ४००सदस्य आहे जे भक्तिभावे देवीची सेवा करण्यास तत्पर राहतात नवरात्री मध्ये इथला थाट काही वेगळाच असतो देवी मध्ये जनसागराचा लोट वाहतो भाविकांची अत्यंत मोठ्या प्रमाणात गर्दी असते यात्रा लागते या ९ दिवसांमध्ये मात्र आरती ची वेळ असते ती तुम्हा सगळ्यांना थोडी विचित्र च वाटेल नवरात्री मध्ये ९ दिवस श्री अंबादेवी ची आरती रात्री १०:३० ला सुरू होते आणि १२:०० किंवा १२:३० पर्यंत पूर्ण होते आणि त्या नंतर श्री एकविरा देवी ची आरती सुरू होते ती आरती सुमारे रात्री २:३० ते ३:०० वाजे पर्यंत पूर्ण होते अशी जगविख्यात आरती भू तलावावर कुठेच होत नाही अष्टमी च्या दिवशी देवी ला सुकामेवा च्या नैवैद्य असतो आता तो नैवेद्याच्या संकल्प ३१११ की एवढा झाला आहे अष्टमी ची रात्री ची आरती झाल्यावर तो प्रसाद आरती ला उपस्थित भक्तगण उपस्थित आरती मंडळाचे सदस्य आणि दर्शनाला येणारे शेकडो भक्त यांच्या मध्ये वितरित केला जातो दसऱ्याला देवी सीमोल्लंघनाला जाते त्या वेळेस देवी ना पालखी मध्ये बसवून त्यांना त्यांना दसरा मैदान नावाचे ठिकाणी घेऊन जातात तिथे देवीची आरती करतात आणि पुन्हा वाजत गाजत मोठ्या जल्लोषात देवी मंदिराकडे प्रस्थान करतात हे नवरात्री चे नऊ दिवस अमरावती मध्ये सर्वत्र खूप भक्ती भावाचे आणि प्रसन्न असे वातावरण असते
ReplyDeleteजगदंब उदयोस्तु 🙏🙏