Tuesday, November 16, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ७८

 

उरूस, 15 नोव्हेंबर  2021 

उसंतवाणी- 232

(सलमान खुर्शीद यांनी इसिस बोकोहराम सारख्या धार्मिक कट्टरवाद्यांशी हिंदुत्वाची तुलना त्यांच्या आयोध्येवरच्या पुस्तकांत केली.)

आयोध्या पुस्तक । खुर्शीद सल्मान ।
करी अपमान । हिंदूत्वाचा ॥
‘इसिस’शी करी । हिंदूंची तुलना ।
बुद्धीची गणना । काय त्याची ॥
कधी कुणावर । केले आक्रमण ।
अंगी कण कण । सहिष्णुता ॥
विश्वाला म्हणतो । सदा माझे घर ।
दयेचा सागर । उरामध्ये ॥
त्याच्यात विरूद्ध । ओकती गरळ ।
बोलती बरळ । कुबुद्धीने ॥
तोडीला लचका । करूनी फाळणी ।
म्हणती आळणी । मीठ तुझे ॥
जीभेवर सदा । टीकेसाठी हिंदू ।
सडलेला मेंदू । कांत म्हणे ॥
(13 नोव्हेंबर 2021)

उसंतवाणी- 233

(त्रिपुरात न घडलेल्या जाळपोळीचे ट्विट करून जाणीवपूर्वक महाराष्ट्रात दंगल पसरवल्या गेली. महाविकास आघाडी सरकारने त्याला प्रोत्साहन दिले. आरोपींना पाठिशी घालण्याचा प्रयत्न केला.)

जुन्या व्हिडिओंचे । करूनिया ट्विट ।
नियोजन नीट । दंगलीचे ॥
अशांतीचा हेतू । करावया पुरा ।
पेटवी त्रिपुरा । देशद्रोही ॥
महाराष्ट्र पेटे । त्रिपुरा निमित्त ।
धर्मद्वेष फक्त । ओळखा हा ॥
राऊत काढतो । आक्रोशाचा मोर्चा ।
हिंसाचार चर्चा । थांबविण्या ॥
सत्ताधारी करू । लागे आंदोलन ।
विधानभवन । कशाला हे? ॥
पेटवला तरी । महाराष्ट्र शांत ।
‘नवाबी’ आकांत । ऐकू येतो ॥
देश पेटविण्या । चाले धडपड ।
बसते थप्पड । कांत म्हणे ॥
(14 नोव्हेंबर 2021)

उसंतवाणी-234

(रझा अकादमीचा हात महाराष्ट्रातल्या दंगलीमागे असल्याचे समोर येते आहे. रझा अकादमीला शिवसेना आता वाचवत आहे जेंव्हा की 2012 च्या आझाद मैदानावरील रझा अकादमीच्या दंग्यांविरोधात शिवसेनेने कडाडून विरोधाची भूमिका घेतली होती. )

दोन हाणा पण । मुख्यमंत्री म्हणा ।
शिव‘रझा’सेना । विनविते ॥
याचसाठी दिले । होते ‘ते’ वचन ।
सत्ता अपचन । होवू दे रे ॥
‘हिरव्या’ पट्ट्याचा । वाघ हा पाळीव ।
हप्त्याचा गाळीव । इतिहास ॥
त्रिपुरा निमित्त । घडवू दंगल ।
हिरवे मंगल । होण्यासाठी ॥
सत्ताधारी करू । लागे आंदोलन ।
विधानभवन । काशाला हे ॥
‘खान की बाण’ ही । घोषणा विरली ।
लाचारी उरली । सत्तेसाठी ॥
सत्तेसाठी सोडी । विचारांचे सत्व ।
शून्य हो महत्व । कांत म्हणे ॥
(15 नोव्हेंबर 2021)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

संतवाणी - राजकीय उपहास- भाग ७७

 

उरूस, 12 नोव्हेंबर  2021 

उसंतवाणी- 229

(देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्डशी संबंधीत जमिनी खरेदी केल्या असा पुराव्यासह आरोप केला. त्याने मलिक अस्वस्थ झाले. कुर्ल्याच्या तीन एकर जमिनीचे हे प्रकरण आहे. )

देवेंद्र घालतो । ‘नवाबा’त हड्डी ।
आरोप कबड्डी । सुरू झाली ॥
भूमी व्यवहार । दिसते वंडर ।
वर्ल्ड हे अंडर । गुंतलेले ॥
कुणाचे कुणाशी । आहे साटेलोटे ।
बारामती वाटे । सारे जाते ॥
सर्वत्र पसरे । चांदणे शरद ।
करिते गारद । भले भले ॥
शरद ऋतूत । चंद्राला ग्रहण ।
पेटले हे रण । राजकीय ॥
राष्ट्रवादीकडे । सदा गृह खाते ।
खाण्यासाठी नाते । जपलेले ॥
अंडरवर्ल्डशी । नात्याचे गुपित ।
सत्तेच्या कुपीत । कांत म्हणे ॥
(10 नोव्हेंबर 2021)

उसंतवाणी- 230

(नाशिक साहित्य संमेलनाच्या गीतामधून सावरकरांचे नाव वगळले. यावर तीव्र प्रतिक्रिया सावरकर प्रेमी साहित्य प्रेमी यांच्यामध्ये उमटली. त्याची दखल घेत हे नाव नव्याने समाविष्ट करण्यात आले. )

सावरकरांचे । वगळले नाव ।
नाशकात भाव । भलत्यांना ॥
छोटे मोठे कुणी । कवी फुटकळ ।
नेते भुजबळ । समाविष्ट ॥
लिहुनिया किती । साहित्य सकस ।
ठेवूनी आकस । नाकारले ॥
लेखण्या मोडून । बंदुका घ्या हाती ।
अशी ज्याची ख्याती । अभिमानी ॥
संमेलन गीती । त्याला नाही स्थान ।
बुद्धीने गहाण । पडले हे ॥
भिंतीरती जो । लिहीतो कविता ।
प्रकाश सविता । साहित्याचा ॥
संमेलन जत्रा । सुमारांची सद्दी ।
साहित्य हे रद्दी । कांत म्हणे ॥
(11 नोव्हेंबर 2021)

उसंतवाणी-231

(उद्धव ठाकरे यांना मानेच्या त्रासासाठी गळ्यात कॉलर बसवावी लागली.)

गळ्यात दिसे तो । मानेसाठी पट्टा ।
राजकीय थट्टा । अदृश्याची ॥
तिचाकी रिक्षाचा । रोजच दणका ।
तुटतो मणका । अभिमानी ॥
बाळासाहेबांचा । होता ताठ कणा ।
नाही खाणाखुणा । त्याच्या कुठे ॥
पाळीव वाघाच्या । मवाळ गर्जना ।
लाचार याचना । सत्तेसाठी ॥
आघाडीचे मंत्री । फुसके नवाब ।
हड्डीत कबाब । काय खावे? ॥
पद देवोनिया । ठेविले उपाशी ।
काकांची तुपाशी । फौज सारी ॥
पाठीचा असो की । राजकारणाचा ।
कणा महत्त्वाचा । कांत म्हणे ॥
(12 नोव्हेंबर 2021)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Tuesday, November 9, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ७६



उरूस, 9 नोव्हेंबर  2021 

उसंतवाणी- 226

(चार दिवसांची दिवाळी संपताच हुरहुर मनाला लागून राहते.  )

चार दिवसांची । संपली दिवाळी ।
विस्कटे रांगोळी । दारातली ॥
फटाक्यांचा कानी । येई न आवाज ।
उतरला साज । शृंगारही ॥
नातेवाईकांचा । पांगला कळप ।
उतरे कलप । लावलेला ॥
मिटे सजावट । उतरे झळाळी ।
दिव्यांच्या या ओळी । शांत शांत ॥
फुलांचे निर्माल्य । कचना नि धूर ।
ओसरला पूर । आनंदाचा ॥
सरते मांगल्य । उरतो पाचोळा ।
होई चोळामोळा । जीव भोळा ॥
वर्षभर राहो । पेटलेली वात ।
आशेची मनात । कांत म्हणे ॥
(7 नोव्हेंबर 2021)

उसंतवाणी- 227

(पेट्रोल डिझेल कर कपात केंद्राने केली. पण भाव वाढले म्हणून ओरडणारे विरोधी पक्ष आपल्या राज्यात राज्य सरकारचे कर कमी करायला तयार नाहीत. आता दिवाळी संपली. केंद्राची घोषणा होवून आठवडा उलटला. )

पेट्रोल दरात । केंद्रिय कपात ।
आणले गोत्यात । विरोधक ॥
राज्य जे करिती । आरडा ओरड ।
कपातीची रड । सुरू आता ॥
संपली दिवाळी । तरी ना घोषणा ।
मौनात ‘सामना’ । गप्पगार ॥
कोरोना लाटेत । अशीच ओरड ।
आरोपांची लड । पेटलेली ॥
आता विझल्या त्या । आरोपांच्या वाती ।
तोंड लपविती । विरोधक ॥
विरोधाचा सारा । खेळ पोरकट ।
होई बळकट । सत्ताधारी ॥
कांत शोधू आता । पर्यायी इंधन ।
संपन्न सधन । देश होवो ॥
(8 नोव्हेंबर 2021)

उसंतवाणी-228

(ऐन दिवाळीत राहूल गांधी देशाबाहेर गेले आहेत. मोदी सीमेवर सैनिकांसोबत दिवाळी साजरी करत आहेत. योगी आयोध्येत शरयु किनारी 12 लाख दिवे लावत आहेत. प्रियांका सोनिया यांचाही कुठे पत्ता नाही. )

ऐन दिवाळीत । होतो जो गायब ।
नेता हा नायब । कॉंग्रेसचा ॥
सैनिकांसोबत । मोदींची दिवाळी ।
करिती टवाळी । विरोधक ॥
राहूल विदेशी । टाळून दिवाळी ।
गप्प आळीमिळी । पुरोगामी ॥
मोदींनी करता । म्हणती नाटक ।
ही उठापटक । मतांसाठी ॥
सदर्‍यावरती । घालती जानवे ।
नाटक हे नवे । काय आहे? ॥
प्रियांका प्रेमाने । भावाला ओवाळी ।
अशी ही दिवाळी । दिसली का? ॥
नव्हे लोकनेता । जाणे ना भावना ।
सण उत्सवांना । कांत म्हणे ॥
(9 नोव्हेंबर 2021)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Monday, November 8, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ७५



उरूस, 6 नोव्हेंबर  2021 

उसंतवाणी- 223

(उद्धव ठाकरे बारामती येथे एका कार्यक्रमात बोलताना असे म्हणाले की पंचेवीस वर्षे भाजप सोबत आम्ही अंडी उबवली.  )

पंचेवीस वर्षे । उबवली अंडी ।
युतीमध्ये थंडी । खूप वाजे ॥
तीन बांबुंची ही । मांडली तिघाडी ।
सत्तेची खिचडी । शिजविण्या ॥
काकांमुळे मिळे । सत्तेची ही गर्मी ।
वसुलीची उर्मी । करोडोंची ॥
खिशात खेळती । तेंव्हा राजीनामे ।
आता करू कामे । घड्याळाची ॥
हप्तेवाले आत । तुरूंग कपाळी ।
करू ही दिवाळी । गरिबीत ॥
उबवली अंडी । बनेना कोंबडी ।
सत्ता ही चोंबडी । इरसाल ॥
कांत सत्तेसाठी । असंगाशी संग ।
भगव्याचा रंग । ‘हिरव’ळे ॥
(4 नोव्हेंबर 2021)

उसंतवाणी- 224

(नेमके हिंदूंचे सण आले की पर्यावरण, प्रदुषण अनिष्ट चालीरीती यांची चर्चा सुरू होते. सगळ्या पुरागाम्यांना नेमका इथेच जोर चढतो. हेच सारे इस्लाममधील अनिष्ट प्रथा परंपरांबाबत चकार शब्द काढत नाहीत. )

सेक्युलर किती । आमचे फटाके ।
ढिल्ले करी टाके । हिंदुंचेच ॥
चारच दिसांत । किती प्रदूषण ।
हिंदुंना दुषण । देवू चला ॥
फारच सोपे हे । पुरोगामी फंडे ।
शाकाहारी अंडे । तैसेची हे ॥
बकरी ईदला । सांडताच रक्त ।
प्रदूषण मुक्त । जग सारे ॥
मशिदीमधून । उठता अजान ।
हवेत ये जान । त्वरित ही ॥
क्रिसमससाठी । तोडताच झाडी ।
निसर्गाची नाडी । धावू लागे ॥
खरा प्रदूषित । मेंदू पुरोगामी ।
बुद्धी अधोगामी । कांत म्हणे ॥
(5 नोव्हेंबर 2021)

उसंतवाणी-225

(दादरा नगर हवेली येथील लोकसभेची पोटनिवडणुक शिवसेनेने जिंकली. त्यावर संजय राउत यांनी दादर पासून दादरा पर्यंत आमचे कसे वर्चस्व आहे असे वक्तव्य केले. आता शिवसेनेची झेप पंतप्रधान पदापर्यंत असल्याचे सांगितले.)

दादर पासून । गाठले दादरा ।
परि तो दरारा । उरला ना ॥
बाळासाहेबांची । शिवसेना मर्द ।
काकापुढे सर्द । आता दिसे ॥
कॉंग्रेसी घोड्यांचा । करिती खरारा ।
शब्दांचा दरारा । पोकळच ॥
दरारा कसला । चर्चा ही ‘दराची’ ।
खंडणीखोराची । पिलावळ ॥
कोर्ट आवळिते । रोजच मुसक्या ।
वल्गना फुसक्या । संजयच्या ॥
केंद्राची कपात । पेट्रोल करात ।
उद्धव मौनात । चिडीचूप ॥
थोड्या यशात जी । शेफारते सत्ता ।
कटे तिचा पत्ता । कांत म्हणे ॥
(6 नोव्हेंबर 2021)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ७४



उरूस, 3 नोव्हेंबर  2021 

उसंतवाणी- 220

(लोकगीतं जात्यावरच्या ओव्या तशा आकृतीबंधात ही दिवाळीवरची रचना )

दिवाळी म्हणजे । आरास घरांची ।
तशीच सूरांची । श्रवणीय ॥
दिवाळी म्हणजे । भर्जरी अंगाची ।
रांगोळी रंगाची । उधळण ॥
दिवाळी म्हणजे । थंडीची चाहूल ।
सुखाचे पाऊल । काळजात ॥
दिवाळी म्हणजे । प्रेमाचा आहेर ।
लेकीला माहेर । उबदार ॥
दिवाळी म्हणजे । पोरांसाठी किल्ला ।
गोंधळ नि कल्ला । आनंदाचा ॥
दिवाळी म्हणजे । सजते अंबर ।
गायीचा हंबर । तृप्ततेचा ॥
दिवाळी म्हणजे । आईच्या डोळ्यांत ।
सजे फुलवात । कांत म्हणे ॥
(1 नोव्हेंबर 2021)

उसंतवाणी- 221

(म.गांधी, सरदार पटेल यांच्या बरोबरीने जिन्नांचे नाव घेवून अखिलेश यादव यांनी मोठी खळबळ माजवून दिली. उत्तर प्रदेश निवडणुकांचे वातावरण तापायला सुरवात झाली. )

अखिलेश तोडी । तारे अकलेचे ।
जिन्नाच्या स्तुतीचे । भाषणांत ॥
गांधीच्या जोडीला । जिन्नाचे घे नाव ।
देशप्रेमी नाव । बुडविली ॥
सेक्युलर ऐसी । घातली चादर ।
जिन्नाची कबर । सुखावली ॥
जोरात उमटे । बाटग्याची बांग ।
पुरोगामी ढोंग । मतांसाठी ॥
लोहियांचे शिष्य । हे समाजवादी ।
नव्हे माजवादी । संकुचित ॥
दंग्यांवर पोळी । भाजाया आपली ।
काढती खपली । फाळणीची ॥
कांत ज्याच्या मनी । अजुनीही ‘पाक’ ।
इरादा नापाक । ध्वस्त होवो ॥
(2 नोव्हेंबर 2021)

उसंतवाणी-222

(अखेर अनिल देशमुख ईडी समोर हजर झाले. त्यांना चार दिवसांच्या कस्टडीत पाठवण्यात आले.)

पळुनि  थकला । दाखवी श्रीमुख ।
मंत्री देशमुख । ईडीपुढे ॥
कायदा व्यवस्था । जयाच्या मुठीत ।
तोचि चिमटीत । कायद्याच्या ॥
सचिन वाझेचे । जड झाले ओझे ।
‘परम’ ही गाजे । लपुनिया ॥
पालघर साधू । हत्येचे हे पाप ।
संन्याशाचा शाप । भोवला हा ॥
पडला महाग । सत्तापद माज ।
अटकेची आज । नौबत ही ॥
दादांवर छापे । उतरला तोरा ।
वाजले की बारा । घड्याळाचे ॥
कांत खुपसतो । पाठी जो खंजीर ।
सत्तेचा अंजीत । लाभेचना ॥
(3 नोव्हेंबर 2021)


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ७३

 

उरूस, 31 ऑक्टोबर  2021 

उसंतवाणी- 217

(आर्यन खानला बेल मिळताच पुरोगामी नाचत सुटले आहेत. जणू काही त्याची निर्दोष सुटकाच झाली आहे. )

आर्यन सुटला । झाली जमानत ।
सुटले नाचत । लिब्रांडू हे ॥
माध्यमांनी केली । अशी काव काव ।
चोरसुद्धा साव । भासू लागे ॥
केंद्र सरकार । वागते फ्याशिष्ट ।
बोलती हे शिष्ट । पुरोगामी ॥
त्याच्या विरोधात । लढाई हे सूत्र ।
शाहरूख पुत्र । निमित्त हा ॥
इमान गहाण । ऐसे पत्रकार ।
भासे चाटुकार । वाचकांना ॥
अंधभक्त तैसे । विरोधक अंध ।
विवेकाचा बंध । सुटलेला ॥
लोकांनो सांभाळा । माध्यमांचा तोल ।
लावुनिया बोल । कांत म्हणे ॥
(29 ऑक्टोबर 2021)

उसंतवाणी- 218

(दिवाळी अंकांची परिस्थिती बिकट आहे. नुसती चर्चा केली जात आहे पण प्रत्यक्षात चांगल्या अंकांच्या प्रती खपत नाहीत. त्यावर मोठी चर्चा घडताना दिसत नाही. )

दिवाळीची सुरू । झाली धामधूम ।
परि सामसुम । वाचनाची ॥
दिवाळी अंकाची । नाही लगबग ।
उलगा उलग । जागजागी ॥
उसने आणले । जरी अवसान ।
हो पर्यवसान । उदासीत ॥
रोख जाहिराती । ओघ अटलेला ।
जागी गोठलेला । व्यवहार ॥
सर्वदूर होई । वितरण वांधा ।
अर्थशास्त्र सांधा । निखळला ॥
प्रतिभाही कुठे । ऐसी उजळून ।
ठेवी खिळवून । वाचकाला ॥
कांत वाढविण्या । वाचनाचा भाव ।
डिजिटल गाव । शोधू जरा ॥
(30 ऑक्टोबर 2021)

उसंतवाणी-219

(दिवाळी सुरू होते आहे. हा आनंदाचा सण सर्वत्र सुखात साजरा होवो.)

फुलत्या मनाचा । उत्सव दिवाळी ।
सुख रेषा भाळी । रेखतसे ॥
जिद्दी माणसाचा । पूर्ण हो नवस ।
पूजिली अवस । उजेडाने ॥
भावाबहिणीची । गोड भाऊबीज ।
आनंदाचे बीज । पेरणारी ॥
सकल नात्यांचा । वाढवी गोडवा ।
सजतो पाडवा । प्रेममय ॥
गाय वासराची । मांडियली पूजा ।
संस्कृतीची ध्वजा । फडफडे ॥
झेंडुच्या फुलात । सनईचे सूर ।
मांगल्याचा पूर । वाहतो हा ॥
मनातली रात । संपविते काळी ।
ती खरी दिवाळी । कांत म्हणे ॥
(31 ऑक्टोबर 2021)


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Monday, November 1, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ७२

 

उरूस, 28 ऑक्टोबर  2021 

उसंतवाणी- 214

(शरद पवारांनी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदाची निवडणुक लढवली. 29 वि. 2 मतांनी त्यांनी ती जिंकली. पवारांचा साहित्याशी काय संबंध? ही संस्था तरी त्यांनी स्थापन केली का? )

ग्रंथप्रेमी काका । दाविती उमाळा ।
राजकिय चाळा । नका म्हणू ॥
या मराठी ग्रंथ । संग्रहालयाची ।
बिल्डिंग मोक्याची । योगायोग ॥
ग्रंथप्रेम शुद्ध । ध्यानी ना भुखंड ।
कोण तो श्रीखंड । उपहासे ॥
जुनी इमारत । व्हावी डेव्हलप ।
हेतू शुद्ध खुप । बघा जरा ॥
गगनचुंबी ही । होता इमारत ।
साहित्य प्रगत । होणारच ॥
ग्रंथासाठी मस्त । ए.सी. करू खोली ।
कोपर्‍यात खाली । कुठेतरी ॥
कांत दिसतो हा । ग्रंथ मकबरा ।
तोंडात तोबरा । विद्वानांच्या ॥
(26 ऑक्टोबर 2021)

उसंतवाणी- 215

(कश्मिर भारतात सामील झाला तो दिवस म्हणजे 27 ऑक्टोबर. या दिवसाला पाकिस्तानात काळा दिवस म्हणतात. कश्मिर भारताने कसा जबरदस्तीने गिळंकृत केलाय असा प्रचारच जागतिक पातळीवर केला जातो.)

27 ऑक्टो । हाचि तो दिवस ।
कश्मिरी अवस । संपविली ॥
श्रीनगरवर । मिळविला ताबा ।
पाक म्हणे तौबा । पळतांना ॥
पाकसाठी हाच । दिवस तो काळा ।
आतंकिंची शाळा । भरलेली ॥
भारतविरोधी । प्रचार हा नीट ।
चाले टुलकीट । जागतिक ॥
क्रिकेट हा आता । राहिला न खेळ ।
देशद्रोही मेळ । दिसू लागे ॥
व्यापलेला भाग । लागला निसटू ।
समूळ उपटू । विषवल्ली ॥
पीओके घेवून । देऊ या उत्तर ।
पसरो अत्तर । कांत म्हणे ॥
(27 ऑक्टोबर 2021)

उसंतवाणी-216

(सीएए आंदोलनात भडकावू भाषण केले म्हणून शर्जिल इमाम तुरूंगात आहे. त्याची जमानत याचिका फेटाळण्यात आली. त्यावर मानवाधिकाराचे नाव घेवून पुरोगाम्यांनी आरडा ओरड सुरू केली आहे.)

शर्जिल इमाम । मिळाली ना बेल ।
भोग आता जेल । कर्मफळे ॥
‘भारताला तोडू’ । देशद्रोही बोल ।
जिभेचा हा तोल । सुटलेला ॥
केवळ ना जीभ । दूषित हा मेंदू ।
सेक्युलर भोंदू । लाडावती ॥
कायद्याने नीट । आवळला फासा ।
तडफडे मासा । देशद्रोही ॥
‘डर का माहौल’ । केला बोलबाला ।
अल्पसंख्याकाला । भुलविले ॥
देशद्रोही त्याला । नाही दया माया ।
हवे बडवाया । कायद्याने ॥
युएपीए चा हा । बसता फटका ।
फुटला मटका । कांत म्हणे ॥
(28 ऑक्टोबर 2021)


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575