बारव म्हणजेच पायर्या असलेली विहिर. केवळ बारव या नावाने आपण याला ओळखत असलो तरी याचे भरपूर प्रकार आहेत. पायर्यांची विहीर या बोली भाषेतील शब्दांत बारवेची नेमकी व्याख्या आलेली आहे. इतर विहिरीतून पाणी उपसण्यासाठी पोहर्याचा वापर करावा लागतो. किंवा मुळात या वहिरीचा उद्देशच पाणी उपसून त्याचा शेतीसाठी किंवा पिण्यासाठी उपयोग करणे असा असतो.
पण बारवेच्या बाबतीत मात्र पाणी मोटेने उपसणे हा हेतूच नाही. बारव ही त्या प्रदेशांतील जलव्यवस्थापनाचे केंद्र असते. बारवेच्या जवळपास उंचीवर एखादा तलाव, पाणीसाठा, नदी असते. त्या पाण्याचे जमिनीखालचे प्रवाह शोधून त्याच्या नेमक्या बिंदूवर बारव बांधली जाते. हीला पायर्या असल्याने त्याचा उद्देश पाणी प्रत्यक्ष घागरीने, म्हणजेच हाताने घेणे असा असतो.
बारवा जेंव्हा मंदिर परिसरांत बांधल्या जातात त्याला कुंड, तीर्थ, कल्लोळ अशी नावे असतात. कंकालेश्वर (बीड) येथील मंदिर तर एका सुंदर अशा बांधीव कुंडातच आहे. मादळमोळी (जि. बीड) येथील बारव ही चारही बाजूने सुंदर अशा बांधीव ओवर्या असलेली आहे. आता या बारवेतच देवीचे मंदिर बनविल्या गेले आहे. चारठाण येथील पुष्करणी बारवही चारही बाजूने ओवर्यांचे बांधकाम केलेली अशी विस्तीर्ण आहे. ज्या अतिशय विस्तीर्ण अशा बारवा आहेत त्यांना पुष्करणी म्हणतात. अतिशय विस्तीर्ण असा तलाव कंधार येथे आहे त्याला ‘जगत्तुंग समुद्र’ असे नाव दिल्या गेले आहे.
महाराष्ट्रात हीनयान बौद्ध काळांत लयनस्थापत्यांत पाण्याच्या टाक्यांची निर्तिती झाल्याचे तज्ज्ञ मांडतात. त्यानंतर महाराष्ट्रात भव्य मंदिरांचे निर्माण होवू लागले तेंव्हाच पाणी साठवण्यासाठी व्यवस्थापनासाठी बारवांची निर्मिती मंदिर परिसरांत झालेली आढळते. मराठवाड्यांतील प्राचीन मंदिरांपैकी औंढा, निलंगा, जामखेड (ता.अंबड) येथे बांधलेल्या दगडी विहिरी आढळतात.
मराठवाड्यांत साधारणत: राष्ट्रकुटांच्या काळात मंदिरांची निर्मिती झालेली आहे. त्या अनुषंगाने त्याच काळात बारवांची निर्मितीची सुरवात दिसून येते. आज ज्या बारवा महाराष्ट्रात आढळून येतात त्यांचा कालखंड उत्तर चालुक्यांचा होय. (दहावे-अकरावे-बारवे शतक)
औरंगाबाद परिसरांतील तीन प्रमुख बारवा ज्या अतिशय भव्य आकर्षक आणि बारव वास्तुशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत त्यांची दखल घ्यावी लागेल.
1. वेरुळचे शिवालय तीर्थ : ही बारव फार पुरातन आहे. अहिल्याबाईंनी हीचा इ.स. 1769 मध्ये जिर्णोद्धार केल्याचा उल्लेख तेथील शिलालेखात आहे. स्थापत्याच्या दृष्टीने अतिशय देखणे असे हे बांधकाम आहे. लाल चिर्यांत ही बारव बांधल्या गेली आहे. चारही बाजूंनी हीला करण्यासाठी सुंदर पायर्या आहेत. एका खाली एक असे सात टप्पे अशी पायर्यांची रचना केली आहे. बारवेच्या चारही बाजूनी अष्टकोनी आकाराचे बुरूजासारखे भक्कम बांधकाम केलेले आहे.
प्रत्येक बाजूस एकूण 56 पायर्या या बारवेस आहेत. चौथ्या टप्प्यांत चार दिशांना चार आणि चार कोपर्यांत चार अशी आठ देवळे आहेत. या आठही देवळांची शिखरे वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगवेगळी आहेत. आठ दिशांच्या आठ देवता असे अष्ट दिक्पाल येथे दाखविले आहेत.
2. शेकटा बारव : औरंगाबाद जवळ वाळूजपासून शेंदूरवाद्याकडे एक रस्ता जातो. खाम नदीच्या काठावर शेंदूरवादा आहे. या शेंदूरवाद्याच्या बाजूला आताच्या बीडकीन पासून येणार्या मोठ्या रस्त्यावर (शेंद्रा-बीडकीन-नगर रोड) शेकटा आहे. शेकट्याची बारव औरंगाबाद परिसरांतील सर्वात भव्य आणि खोल अशी बारव आहे. ही बारव चौरस आकाराची आहे. पश्चिम बाजूला हीला दोन ठिकाणी प्रवेश करण्यासाठी पायर्या कोरलेल्या आहेत. प्रवेशाच्या पायर्या संपल्यावर एक सोपान (सपाट अशी जागा) सोडलेली आढळून येते. तेथून पर चौरस आकारात पायर्या उतरत उतरत निमुळत्या होत जातात. बारवेच्या दक्षिण बाजूला चार खांबावरचे शिवायलय आहे. त्याचे खांब आता ढासळले असून केवळ चौथरा शिल्लक आहेत. सहसा बारवेत न आढळणारी गोष्ट या बारवेत दिसून येते. पाणी उपसण्यासाठीची दगडी रचना दक्षिण काठावर केलेली आहे. मोटेने उपसलेले हे पाणी वाहून नेण्यासाठी दगडी हौद आणि पन्नास फुट अंतरापर्यंत दगडी नाला कोरलेला आहे. हे सहसा बारवेत आढळत नाही.
या बारवेत एकूण प्रत्ये बाजूला दोन असे आठ देवकोष्टके आहेत. पण यात आता देवतांच्या मुर्ती आढळून येत नाहीत. शिवालयातील महादेवाची पिंडी शाबुत आहे. आजही शिवरात्रीला येथे उत्सव साजरा केला जातो.
बारवेला भव्य अशी संरक्षक भिंतही बांधलेली आहे. सहसा बारवा संपूर्णत: जमिनीतच असल्याने अशा भिंती आढळून येत नाहीत. पण शेकट्याची बारव ही याला अपवाद आहे.
3. खुफिया बावडी : ही बारव देवगिरी किल्ल्याच्या पाठीमागे फतेयाबाद गावात आहेत. हीला खुफिया बावडी असे म्हणतात. हे निजामशाहीच्या काळातील बांधकाम असल्याचे मानले जाते. एका खाजगी शेतात ही बावडी आहे. उत्तरदिशेने जमिनीत उतरत गेलेल्या पायर्या आहेत. तीन तीन ओवर्यांच्या तीन भव्य बाजू आणि प्रवेशाची चौथी बाजू अशी ही खुफिया बावडी. गुप्त मसलतीसाठी हीचा वापर केला जायचा. चौरस आकाराच्या या बावडीच्या तीनही बाजूस कमानींची मोठी दालने आहेत. कमानींवर घुमट बांधण्याची शैली बहमनी कालखंडात मराठवाड्यात आढळून येते. पूर्वीच्या काळात अशा दगडी कमानी नाहीत.
खुफिया बावडीचे बांधकाम अजूनही भक्कम आहे. या बावडीचे पाणी शेतकरी आजही वापरतात.
याच खुफिया बावडीची लहान बहिण शोभावी अशी तीन ऐवजी एकाच कमानीच्या चार बाजू चार ओवर्या अशी छोटी वीटांनी बांधकाम केलेली बावडी औरंगाबाद शहरात कर्णपुरा देवीच्या मंदिरा जवळ उत्तर बाजूला शेतात आहे. ही बारव मोगलांच्या काळातील असावी. भाजलेल्या दगडी पातळ विटांनी हीचे बांधकाम केले आहे.
बीडकीन शहरांत तीन अतिशय चांगल्या बारवा आहेत. एक तर अगदी अलीकडच्या कळातील भर बाजारात असलेली किल्लीच्या आकराची बारव आहे. एका बाजूने पायर्या आहेत. ही बारव गोल अकाराची आहे. पायर्यां जवळ देवकोष्टक असून त्यात सात आसरा आहेत. दुसरी बारव मुस्लीम कबरस्तानात असून चौकोनी आकाराची आहे. त्या परिसरांत मंदिराचे अवशेष विखुरलेले आहेत. एकेकाळी इथे महादेव मंदिर असल्याच्या खुणा आजही आढळून येतात. तिसरी बारव एकात एक चार टप्पे असलेली आहे. एका बाजूने या बारवेला प्रवेशाच्या पायर्या आहेत. बारवेत समोरा समोर असे दोन मंडप आढळून येतात. एका देवकोष्टकांत शेषशायी विष्णुची मूर्ती ठेवली आहे. औरंगाबाद परिसरांत बारवेत ज्या देवता आढळून येतात त्याचा पुरावा केवळ बीडकीन येथेच मिळतो. इतर ठिकाणच्या मुर्ती आता अस्तित्वात नाहीत. शेषशायी विष्णु मुर्ती ही केवळ जलाशयापाशीच आढळून येते. क्षीरसागरात शेषशय्येवर पहुडलेले विष्णु आणि त्यांची पाय दाबणारी लक्ष्मी अशी ही मुर्ती असते. याच मुर्तीच्या प्रभावळीत अष्टदिक्पाल यांच्याही मुर्ती आढळतात.
शेकट्याच्या जवळच्या शिवारात एका बुजलेल्या आवारात आजही ही शेषशायी विष्णुची मुर्ती झिजलेल्या अवस्थेत आहेत. त्याचे संवर्धन गावकर्यांनी नुकतेच केले आहे.
प्रत्यक्ष औरंगाबाद शहर आणि परिसरांत एकूण 18 बारवांची नोंद केल्या गेली आहे. खरं तर अजूनही काही बारवा सापडतील पण त्या बहुतांश नष्ट झाल्या, बुजल्या, कचरा टाकल्या गेला अशा आहेत. बांधकाम दृष्ट्या त्यांच्यात काही फारसे महत्त्वाचे नाही.
हर्सूल देवी परिसरांत तीन बारवा आहेत. एक तर प्रत्यक्ष देवीच्या मंदिरासमोरचे कुंडच आहे. त्याचा आकार चौरस आहे. त्याचा आकारही लहान आहे. बाकी दोन बारवा जरा दुर अंतरावर आहेत. मंदिराच्या दक्षिणेला जी मोठी बारव आहे ती एका मोठ्या बांधकामाचा महलाचा भाग असावा अशी आहे. जाळी उभारून तीला संरक्षीत केल्या गेले आहे. तिचा आकार चौरस आहे. याच बारवेजवळ एक सतीचा बुरूज आहे. शिवाय एक राजस्थानी शैलीतील एक समाधीसारखे बांधकामही आहे. हा संपूर्ण महल असावा. आता तिथे केवळ मोकळी जागा आहे. जोत्याचे दगडी अवशेष काही ठिकाणी सापडतात.
शहरांतील एक अष्टकोनी छोटी बारव समर्थनगर मध्ये आहे. (प्लॉट क्र.244 च्या बाजूची खुली जागा). हीला पुर्वकडून उतरण्यास पायर्या असून त्या परत उत्तरेकडे वळल्या आहेत. बारव अष्टकोनी असून संपूर्ण दगडी बांधकाम उत्तम अवस्थेत आहे. बारवेत भरपुर पाणी आहे. यशवंतराव होळकरांच्या काळात याच जागी एक महाल होता. त्या महालाच्या घुमटाचे अवशेष अजूनही शाबूत आहेत. जिथे आता अतिक्रमण केल्या गेले आहे. त्या महालाचा एक भाग म्हणजे ही बारव असावी.
विद्यापीठ परिसरांत सोनेरी महाल येथे दोन बारवा आहेत. या बारवांचे बहुतांश बांधकाम शाबूत आहे. शिवाय परिसरांत अजून एक मोठी बारव आहे.
जिचा खास उल्लेख करावा लागेल अशी एक बारव म्हणजे हिमायत बागेतील शक्कर बावडी. औरंगजेबाचा काळात हिमायत बाग विकसित केल्या गेली. यात आयताकृती अशी ही शक्कर बावडी आहे. एका बाजूला वीटांचे भक्कम असे कमानी कमानीचे बांधकाम असून त्यावर मोट लावण्याची दगडी रचना आहे. तिथून पाणी उपसले जायचे. बाकी तीनही बाजूंनी बांधीव अशी ही बावडी आहे.
सातारा परिसरांत खंडोबाचे मंदिर आहे. याच परिसरांत दोन बारवा आहेत. या बारवांची पडझड झालेली आहे. अहिल्याबाईंनी या खंडोबा मंदिराचा जिर्णोद्धार केल्याचा उल्लेख आढळतो. त्याच काळात या बारवाही दुरूस्त केल्या असाव्यात. पण त्या आता चांगल्या अवस्थेत नाहीत.
प्रत्यक्ष औरंगाबाद शहराचा जो भाग आता मुख्य वस्तीचा भाग आहे त्याला फारसा प्राचीन इतिहास नाही. याउलट औरंगाबाद लेण्या, हर्सूल देवी परिसर, सातारा डोंगर परिसर, कर्णपुरा, जाधववाडी येथे जूने संदर्भ आहेत. त्यामुळे जून्या बारवा या शहराच्या मध्यवर्ती अशा ठिकाणी नसून बाह्य भागात आहेत.
औरंगाबाद ही सैनिकांची वस्ती होती. नंतर मलिक अंबर काळापासून या शहराला चेहरामोहरा प्राप्त झाला. मलिक अंबर काळात पाणी व्यवस्थापनाची वेगळी अशी व्यवस्था नहरींद्वारे केली गेली. याचा परिणाम म्हणजे या परिसरांत बारवांची अवश्यकता राहिली नाही. कारण खापरी नळांद्वारे पाणी संपूर्ण परिसरांत खेळवले गेले होते. तसे नळ जागजागी आढळतात.
सातारा डोंगरावर खंडोबाचे मुळ प्राचीन मंदिर आहे. त्याला कालखंड अगदी यादवांच्याही आधी उत्तर चालूक्यांच्या काळापर्यंत जातो. याच मंदिरा जवळ दगडी बांधकाम असेलेले कुंड आहे. या कुंडाच्या तीन बाजू नीट बांधलेल्या आहेत. उतराची तिसरी पश्चिमेकडची बाजू मोकळी आहे. म्हणजे तेथूनपाणी वहात येवून या कुंडात साठवले जात असे. आजही या कुंडात पाणी साठते.
महाराष्ट्रांतील बारवांची मोहिम चालविणार्या रोहन काळे या तरुणाने शहरांतील एक दोन नव्हे तर 18 बारवांची नोंद जी.पी.एस. लोकेशन सह महाराष्ट्राच्या नकाशावर केली आहे. त्यांची यादी आणि त्यांचे लोकेशन खालील तक्त्यात दिले आहेत. आपण या बारवां नकाशावर जरूर शोधा. - समोर मॅपवरील क्रमांक दिला आहे. शिवाय जीपीएस कोऑर्डिनेटही दिले आहेत. या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्रातील तब्बल 1500 बारवा नकाशावर आल्या आहेत. यातील 10 बारवांना महाराष्ट्र पर्यटन नकाशावर पर्यटन महामंडळाने स्थानही दिले आहे.
1. विद्यापीठ परिसर शिवमंदिर बारव - 191
2. सोनेरी महल परिसर बारव-192
3. विद्यापीठ परिसर शिवमंदिर बारव 2- 193
4. कर्णपुरा देवीमंदिर बारव -194
5. शिवमंदिर बारव - 196
6. चरणदास हनुमान मंदिर बारव - 432
7. निपट निरंजन बारव - 433
8. सोनेरी महल परिसर बारव 2 - 434
9. विद्यापीठ परिसर बारव 3 - 435
10. छत्रीची बारव - 436
11. गंगा बावडी - 437
12. हरसिद्धी मंदिर (हर्सूल) बारव - 438
13. हरसिद्धी मंदिर बारव 2- 439
14. सुरेवाडी महादेव मंदिर बारव - 440
15. गुरूची बावडी- 441
16. समर्थ नगर बारव - 795
17. शक्कर बावडी - 986
18. हरसिद्धी मंदिर बारव 3 - 1276
(पुरक संदर्भ : महराष्ट्रातील बारव स्थापत्य आणि परंपरिक जलव्यवस्थापन, लेखक अरूणचंद्र पाठक, अपरांत प्रकाशन)
(बारवेंचे नकाशावरील स्थान निश्चिती संदर्भ रोहन काळे.)
(फोटो सौजन्य व्हिन्सेंट पास्किनली)