उरूस, 11 ऑगस्ट 2021
उसंतवाणी- 136
(नीरज चोप्राला सुवर्णपदक मिळताच एका वेगळ्याच टीकेला तोंड द्यावे लागत आहे. पूर्वी त्याने मोदींच्या अभिनंदानाचे कसे ट्विट केले होते, ऑस्टे्रलियातील भारतीयाची ज्याने खालिस्तान्याची धुलाई केली त्याचे अभिनंदन कसे केले परिणामी तो कसा भगवा दहशतवादी आहे, संघी आहे अशी गलिच्छ टिका पुरोगामी करत आहेत. त्याची जात काढली जात आहे. )
सोन्याचा दिवस । ज्यामुळे देशात ।
काढतात जात । त्याची इथे ॥
निरज शब्दाचा । अर्थ हो कमळ ।
सुरू मळमळ । त्यावरून ॥
संघी म्हणोनिया । मारू त्याला शिक्का ।
पुर्वग्रह पक्का । करूनिया ॥
मंगल प्रसंगी । लागतात भांडू ।
ऐसे हे लिब्रांडू । नतद्रष्ट ॥
संशय शिंतोडे । नीरज सोसतो ।
ट्विटर ठासतो । कधीतरी ॥
थुंकण्याचा आहे । पुरोगामी धर्म ।
विकृतीचे वर्म । ओळखावे ॥
कांत देशद्रोही । असली जमात ।
आली नशिबात । भारताच्या ॥
(9 ऑगस्ट 2021)
उसंतवाणी- 137
(अल्पवयीन बलात्कारितेच्या घरी राहूल गांधींनी भेट दिली. त्या कुटूंबाचा फोटो त्यांनी आपल्या ट्विटरवर प्रसिद्ध केला. हा कायद्याने गुन्हा आहे. पण हे तारतम्य त्यांना नाही. ट्विटरने तो फोटो डिलीट करताच रणदीप सुरजेवाला, पवन खेडा सारख्य त्यांच्या चमच्यांनी तो रिट्विट केला. त्यावरून मोठा गदारोळ उठला आहे. )
ट्विटरवरती । असभ्य दर्शन ।
हीन प्रदर्शन । राहूलचे ॥
पिडीतेच्या घरी । सांत्वनाची भेट ।
छायाचित्र थेट । प्रसिद्धीला ॥
कायदा सांगतो । नको फोटो नाव ।
घालु नका घाव । दु:खावरी ॥
कायदा तो सोडा । नाही नैतिकता ।
नाही बुद्धिमत्ता । तारतम्य ॥
तैसे नितीभ्रष्ट । त्यांचे झीलकरी ।
रीट्विट करी । तोची फोटो ॥
ट्विटर स्वत:च । करे ते डिलीट ।
परी न हो नीट । वृत्ती यांची ॥
कांत गेली खुर्ची । पुरेसा न धडा ।
अस्तित्वाला गाडा । राजकीय ॥
(10 ऑगस्टे 2021)
उसंतवाणी- 138
(ओबीसी आरक्षणाचा चेंडू कायदा करून केंद्राने राज्याकडे ढकलला. हे आरक्षण 50 टक्क्याच्या मर्यादेत बसविण्याचे आवाहन आता सर्वच राज्य सरकारांकडे आहे.)
कायद्याने उडे । आरक्षण चेंडू ।
केंद्र-राज्य भांडू । लागलेत ॥
पन्नास टक्क्यांचे । घातले बंधन ।
त्याचे उल्लंघन । शक्य नाही ॥
पन्नास मध्येच । बसवता कोटा ।
असंतोष मोठा । उठणार ॥
धरता चावते । सोडता पळते ।
सर्वांना छळते । आरक्षण ॥
धट्टाकट्टा त्याला । बनवते पंगु ।
कपड्यात नंगू । दाखवते ॥
मागासपणाची । अभिमाने स्पर्धा ।
त्याच्यासाठी गर्दा । सामाजिक ॥
कांत मागासांना । जोडता ‘इतर’ ।
तितर बितर । खेळ सारा ॥
(11 ऑगस्ट 2021)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575